जनजाती क्षेत्रातील कृषी - स्थानीय सेवा व्यवस्थांची गरज

स्रोत: विवेक मराठी    दिनांक28-Jun-2020
|
@कपिल सहस्रबुद्धे

seva_1  H x W:


गेल्या लेखात आपण जनजाती क्षेत्रामधील कृषीची स्थिती, भविष्यात कृषिविकासात कोणत्या मूलभूत तत्त्वांच्या आधारे धोरण बनविले पाहिजे व आणि त्यातून किमान कोणती उद्दिष्टे साध्य झाली पाहिजेत, याचा विचार केला. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या एकात्म मानव दर्शन या भारतीय विकास चिंतनात ही तत्त्वे आपणाला मिळू शकतात. यामध्ये परस्परावलंबन, संसाधनांचा शाश्वत वापर आणि समाजाने स्वतःच्या विकासात पुढाकार घेण्याची आवश्यकता यावर भर देण्यात आला आहे.
या तत्त्वांच्या आधारे जनजाती क्षेत्रातील कृषीचा विचार केला, तर किमान अन्नसुरक्षा, खर्चात बचत, स्थानिक रोजगार आणि संसाधनांची सुरक्षितता या बाबी कृषीमधून पूर्ण होणे गरजेचे आहे. हे झाले, तर जनजाती समाजातील मोठा घटक आपल्या भागातच राहायला प्राधान्य देईल. त्यातून कला, संस्कृती या गोष्टींचीसुद्धा भरभराट होईल अशी आशा आहे.
 
 
सेवा व्यवस्थांची आवश्यकता
 
 
कृषीसाठीच्या सेवा व्यवस्था आजही काही प्रमाणात उपलब्ध आहेत. आपण जिथून बी-बियाणे, खते वगैरे घेतो ते सुविधा केंद्र, गावात येऊन पीक विकत घेणारा व्यापारी, मोबाइलवर संदेश पाठवून हवामान संदेश देणारी कंपनी अशा विविध प्रकारच्या सेवा व्यवस्था आपण वापरतोच आहोत. वेगेवेगळी अवजारे बनवून देणारा, आपल्या उत्पादनावर प्राथमिक प्रकिया करून देणाऱ्या व्यवस्था आपल्याकडे शेकडो वर्षांपासून आहेतच. याशिवाय गावातल्या म्हणूनही व्यवस्था असायच्याच. या बऱ्याच अंशी अनौपचारिक प्रकारच्या होत्या - उदा., हवामानासंबंधीचा अंदाज सांगणारे लोक गावात / पंचक्रोशीत होते. अडजी-पडजीसारख्या एकमेकांना कृषी कामात मदत करायच्या पद्धती वेगेवेगळ्या भागांत होत्या. विविध प्रकारचे प्रक्रिया उद्योग - तेल घाणे, भात कांडप यंत्रे त्या त्या भागातील गरजेनुसार होते. अशा विविध प्रकारच्या व्यवस्था उपलब्ध होत्या. उत्पादनवाढीच्या रेट्यात यातील काही व्यवस्था बंद पडल्या, काही सरकारने स्वतःकडे घेतल्या किंवा काहींची जागा नवीन व्यवस्थांनी घेतली. एक मोठा बदल झाला, तो म्हणजे बऱ्याच व्यवस्था एकतर गावाबाहेर गेल्या किंवा बाहेरची माणसे येऊन ती पुरवू लागली. यातून शेतकऱ्याचे अवलंबित्व वाढले. गावातला पैसा बाहेर जाऊ लागला. त्याचा खर्चही वाढला. या नवीन बाहेरून मिळणाऱ्या व्यवस्था सगळीकडे आल्या, पण त्या परवडू शकतील असे उत्पन्न सगळीकडे मात्र वाढले नाही.
 
 
कृषीमधील नवीन सेवा व्यवस्था
 
 
येत्या काळात आपल्याला स्थानिक पारंपरिक व्यवस्थांच्या पुनर्निर्माणाचा आणि काही नव्या प्रकारच्या सेवा व्यवस्थांचा विचार करायला लागेल. अशा सेवा व्यवस्था, ज्या कृषीतील खर्च कमी करतील, शेतातील कष्ट कमी करतील, रोजगार, ज्ञानप्राप्तीच्या नवनवीन संधी मिळवायला मदत करतील व आपले उत्पन्न वाढवतील. याशिवाय सेवा व्यवस्थांच्या माध्यमातून कृषीसंबंधीच्या नोंदी, अभ्यास यासाठीची नवीन सेवा कार्येसुद्धा तयार होतील. सेवा कार्ये म्हणजे कोणत्याही मोबदल्याच्या विचार न करता गावासाठी / समाजासाठी काम करणे. सेवा व्यवस्था आणि सेवा कार्ये या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
 
 
शेतकरी गट, ग्राम, ग्रामसमूह अशा विविध स्तरांवर या व्यवस्थांचा विचार केला पाहिजे. ग्रामसमूह म्हणजे एका लघुपाणलोट क्षेत्रातील गावे. यांची कृषिपद्धती, पिके सारखेच असतात. व्यवस्था तयार करताना फक्त सामूहिकतेचा आग्रह न धरता वैयक्तिक व्यवस्थासुद्धा उभारता येतील. या व्यवस्थांसंबंधी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. या व्यवस्था कृषीला पूरक अशा आहेत. यातील बऱ्याचशा व्यवस्था शेतकऱ्यांना स्वतःला करायच्या आहेत. यासाठी काहींना नवीन कौशल्ये शिकावी लागतील. तरुण पिढीवर विश्वास ठेवत काही व्यवस्था त्यांच्यावर सोपवाव्या लागतील. काही व्यवस्थांमध्ये गावातील भूमिहीन किंवा अत्यंत कमी जमीन असलेल्यांना प्राधान्य द्यायला हवे. यातून गावात परस्परपूरक वातावरण तयार व्हायला मदत होईल, ज्याचा फायदा एकूणच व्यवस्था बळकटीकरणासाठी होईल. तसेच ग्रामपंचायतीचे राजकारण आणि या व्यवस्था यांचा संघर्ष होणार नाही, याची सतत काळजी घ्यावी लागेल. मग या व्यवस्था सरकारच्या न होता लोकांच्या होतील.
 
 
काय असू शकतील अशा व्यवस्था?
 
 
कृषीतील गरजा, कृषीतील आजचे प्रश्न बघता खालील मुख्य विभागात नवीन व्यवस्था तयार होऊ शकतात. यामध्ये कृषीतील निविष्ठा पुरविणे, प्रक्रिया आणि विक्री, माहिती, तंत्रज्ञान आणि ज्ञाननिर्मिती आणि लोकसंचालित संस्था असे चार प्रमुख विभाग तयार होऊ शकतात .
 
 
कृषीतील निविष्ठा पुरविणे
 
 
कृषीसाठी बियाणे, विविध प्रकराची खते, कीटकनाशके यांची आणि अन्य बाबींची सतत आवश्यकता असते. आज या निविष्ठा बाहेरून विकत घ्याव्या लागतात. पण यातील काही गोष्टी आपण गावात तयार करू शकतो. यासाठी ग्रामसमूह पातळीवर आपण बियाणे उत्पादन गट, खते आणि कीटकनाशके पुरविणारे गट, सेंद्रिय खते उत्पादन करून पुरविणारे गट असे गट करता येतील. सध्या शेतकरी उत्पादक कंपन्या करण्याची सोय झाली आहे. आपल्या ग्रामसमूहात अशी कंपनी तयार करून असे पुरवठादार उद्योग आपण आपल्या भागासाठी तयार करू शकतो. बियाणे हा यातील एक नाजूक आणि महत्त्वाचा भाग आहे. यासाठी कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विभाग यांची मदत होऊ शकते. किमान अन्नधान्य पिकांच्या बाबतीत तरी बियाणे स्वावलंबन हा विषय आपण पुढे नेला पाहिजे. खर्च कमी करण्याचा चांगला मार्ग म्हणजे सरळवाणांचा वापर. परिसरातील शेतकरी तेच वाण ३-४ वर्षे वापरू शकतील किंवा आपल्या गटाकडून घेऊ शकतील. असा गट तयार झाला तर केव्हीके, आत्मा, कृषी विभागसुद्धा मदत करायला तयार होईल. नंदुरबारला नेसू परिसरात हा प्रयोग यशस्वी झाला आहे. अन्यही काही ठिकाणी अशा प्रकारे बियाणे उत्पादन सुरू झाले आहे.
 
 
भाजीपाला पिकांच्या नर्सरी हा एक चांगला व्यवसाय यामध्ये जोडला जाऊ शकतो. छोट्या जागेतील या व्यवसायातून स्थानिक ठिकाणीच रोपे मिळतील, ज्यातून खर्च वाचेल. तसेच विक्रीमध्येसुद्धा याचा फायदा होईल. खते, कीटकनाशके यांच्या बाबतीत एकत्रित खरेदी करून बचत करण्याचे प्रयोग गेली काही वर्षे होत आहेत. साक्री तालुका, जिल्हा धुळे येथील एका शेतकरी कंपनीने असे काम सुरू केल्याने शेतकऱ्यांची १०-३०% रक्कम वाचली, असा अनुभव आहे.
 
 
प्रक्रिया आणि विक्री व्यवस्था
 
 
शेतमालाची स्थानिक प्रक्रिया हा एक महत्त्वाचा विषय समोर आला आहे. प्रक्रिया व्यवस्था नसल्याने उत्पादन कमी किमतीला विकावे लागते, मालाची नासाडी होते. पारंपरिक पद्धतीमुळे महिलांच्या श्रमात वाढ होते. गावातील तरुणांनी, महिला गटांनी किमान प्राथमिक पातळीवर छोटे शेतमाल प्रक्रिया उद्योग सुरू केले, तर चांगली सुरुवात असेल. यामध्ये मुख्यतः राइस मिल, डाळ मिल, तेल घाणे, भगर प्रक्रिया अशा प्रकारच्या सेवा देऊ शकणारे उद्योग उपयुक्त ठरतील. वेळप्रसंगी अधिकच्या मालावर प्रक्रिया करून विक्रीसाठीसुद्धा यांची मदत होऊ शकते. या छोट्या उद्योगांतून उद्योजकतेसंबंधी आत्मविश्वास निर्माण होतो. त्यातून मग मोठ्या उद्योगाची कल्पना, धाडस करू शकतो. नेसू परिसर, नवापूर, नंदुरबार जिल्ह्यात मोबाइल राइस मिलच्या माध्यामातून असे उदयोग सुरू करण्यात आले. यातून अनुभव घेऊन आता नेसू परिसर उत्पादक कंपनीची स्थापना होऊन या परिसरात मोठी राइस मिल टाकली गेली आहे. यामुळे साळ विकावी लागणारा शेतकरी आता तांदूळ विकू शकतो. तसेच परिसरातच सेवा उपलब्ध असल्याने साठवण करून हवे तेव्हा त्याचा उपयोग करू शकतो. या अनुभवाच्या आधारे पुढे जाऊन विविध प्रकारचे उद्योग सुरू करता येऊ शकतील.
 
Agriculture in tribal are
 
शेतमालाची विक्री हासुद्धा एकत्रित प्रयोग करण्याचा विषय आहे. यामध्ये पारंपरिक बाजाराला काही माल देणे व नवीन बाजारात काही माल पाठविणे असा विषय करू शकतो. अक्कलकुआ तालुक्यातील कंजाला आणि परिसरातील दुर्गम भागात सीताफळांसाठी आम्ही हा प्रयोग करून बघितला. गेली काही वर्षे गावातील तरुणांचा गट बनवून सुरतला मोठ्या बाजारात सीताफळाची विक्री होत आहे. यातून नफ्याचे प्रमाण वाढले आहे. तांदूळ महोत्सवाच्या माध्यमातून नंदुरबारला एक वेगळा प्रयोग केला गेला. जनजाती शेतकऱ्यांनी गटांनी सहभागी होऊन याचा फायदा घेतला. थेट मुंबईला माल नेऊन विक्री करण्याचा प्रयोगसुद्धा करून बघितला. यामध्ये गावातील तरुणाचे गट करून त्यांच्या माध्यमातून विक्रीची व्यवस्था लावायचा प्रयत्न केला गेला.
 
 
माहिती, तंत्रज्ञान आणि ज्ञाननिर्मिती
 
 
आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे असल्याने कॉम्प्युटरचा वापर करून गावपातळीवर किंवा समूहपातळीवर सेवा मिळण्याची सोय झाली, तर याचा उपयोग होईल. काही प्रमाणात शासनाकडून मिळणाऱ्या विविध सेवा आता ऑनलाइन स्वरूपात मिळत आहेत. यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न करता येतील. ऑनलाइन बँकिंग, पॉस आधारित पैसे देणे-घेणे व्यवस्था करता येतील. किसान क्रेडिट कार्ड आणि अन्य योजनांची माहिती, भरणे आदी गोष्टी करता येऊ शकतील.
कृषी उत्पादन विक्रीसाठी ENAAM व्यवस्था तयार झाली आहे. गावातील शिक्षित तरुण त्यासाठी गरजेचे खरेदी-विक्री कौशल्य शिकू शकतील व सर्वांना त्याचा फायदा मिळेल. याशिवाय इंटरनेटच्या मदतीने विविध भागांतील कृषीविषयक तज्ज्ञांची मदत घेता येईल. नवनवीन यंत्रे, अवजारे शोधता येतील.
 
 
बदलत्या काळात विविध प्रकारची यंत्रे, अवजारे, पाण्याची इंजीने यांचा वापर वाढत आहे. यांच्या दुरुस्तीचीही गरज भासते. यासाठीचे तंत्रज्ञ गावातच तयार झाले, तर फार उपयोग होऊ शकेल. तरुण मुले याचा विचार करू शकतात. ITIमध्येही या दृष्टीने काही ट्रेड आणल्यास त्याचा फायदा होईल. छोटी यंत्रे, अवजारे स्थानिक पातळीवर बनविणे हेसुद्धा महत्वाचे आहे. पारंपरिक लोहार व त्या आधारित व्यवस्था कमी पडत आहे. विविध कारणांनी प्रमाणही कमी होत आहे. यात रोजगाराची संधी आहे.
स्थानिक गोदामे ही एक महत्त्वाची व्यवस्था तयार होऊ शकते. सुरक्षित जागेच्या अभावी बरेचदा माल कमी किमतीला विकावा लागतो किंवा सगळा एकदमच विकावा लागतो. बचत गटाच्या माध्यमातून अशी गोदामे केली, तर शेती आणि वन उत्पादने दोन्हीला त्याचा फायदा होऊ शकतो. यासाठी शासकीय योजनांचा फायदा घेता येऊ शकतो.
 
 
जनजाती भागात मुख्यतः छोटे शेतकरी जास्त असल्याने वैयक्तिक यंत्र, अवजारे परवडणे शक्य नाही. त्यातही महिलांच्या कामाची अवजारे तर बहुतेक ठिकाणी पारंपरिक प्रकारचीच असतात. अशा वेळी छोट्या अवजारे बँकेची / शेतकरी सुविधा केंद्राची सोय उपयोगी पडू शकते. यामध्ये भाड्याने यंत्रे देणे व मागणीनुसार विकत देणे असे काम होऊ शकते.
 
 
या जोडीला गावपातळीवर माहिती व ज्ञानाची निर्मिती होण्यासाठीची सेवा कार्य सुरू करण्याची गरज असेल. हे सेवा कार्य स्वरूपात एवढ्यासाठीच आहे की याचा उपयोग कधी, कोणाला, कसा होईल हे मोजणे, सांगणे अवघड आहे. मात्र या एकत्रित ज्ञानाचा उपयोग होईल हे मात्र खरे. त्यामुळे कृषी व पूरक गोष्टींसाठी गरजेचे ज्ञान, माहिती मिळविणे व लोकांना देणे यासाठी तरुणांचा स्वयंसेवी गट करावा लागेल. कृषी, जल, पशू असे विषय वाटून घेऊन त्याचा सतत अभ्यास करणे, माहिती घेणे असे प्रयोग करावे लागतील. तसेच तालुक्यातील, जिल्ह्यातील केव्हीके, कृषी, पशुसंवर्धन, उद्योग, जनजाती विभाग, विविध स्वयंसेवी संस्था, उद्योजक यांच्याशीसुद्धा या गटाने सतत संपर्क ठेवून माहिती घेणे व गावात पुरविणे हे काम करावे लागेल. याशिवाय प्रत्यक्ष गावामध्ये काही अभ्यास सुरू करावे लागतील. उदा., पाऊस मोजण्याची व्यवस्था करावी लागेल, जेणेकरून आपल्या गावातील पाऊस कसा बदलतोय, त्यानुसार आपल्याला काय करण्याची गरज आहे याची चर्चा आपण करू शकू. त्याचबरोबर पारंपरिक वाण, उपयोगी कीटक, गावातील शेतकऱ्यांनी केलेले कृषीतले प्रयोग, नवनवीन रोग, किडी याची नोंदही सतत ठेवावी लागेल, जेणेकरून तज्ज्ञांकडून आपल्याला मार्गदर्शन मिळविताना सोपे जाईल. यासाठीही इंटरनेट आधारित विविध तंत्रज्ञानाचा आपल्याला उपयोग होईल.
 
 
लोकसंचालित संस्था
 
 
वरील गोष्टी करण्यासाठी गावातील, ग्रामसमूहातील लोकांचे प्रबोधन, मानसिकता तयार करणे, शासनाच्या तसेच अन्य संस्थांच्या विविध योजनांचा फायदा मिळविणे, विकासकामात सगळ्यांना संधी मिळेल हे बघणे यासाठी विविध पातळ्यांवर काही व्यवस्था कराव्या लागतील. गावपातळीवर वेगवेगळ्या प्रकारच्या समित्यांची आपल्याला सवय आहे. पण आपल्याला इथे थोडी वेगळी वाट निवडावी लागेल. आपल्याला कोणती योजना किंवा सरकारने सांगितले म्हणून समिती करायची नसून गावच्या विकासात स्वयंसेवी पद्धतीने पुढाकार घेण्यासाठी लोकांना एकत्र आणून समितीत काम करायचे आहे. लोकांनी या कामात स्वेच्छेने वेळ द्यावा व त्याचा कोणताही मोबदला मागू नये, ही अपेक्षा आहे.
 
 
नंदुरबारच्या आमच्या कामात आम्ही विविध पिके घेणारे, एकत्र पाणी वापर करणारे, शेळी/कोंबडी पालन करणारे, वाडीधारक असे छोटे गट केले होते. याशिवाय गावात एक ग्रामविकास समिती आणि विविध गावांना एकत्र करणारी परिसर सेवा समिती तयार केली. या प्रत्येकाची कामे त्यांनीच निश्चित केली. तसेच त्यामध्ये सुधारणासुद्धा होत गेल्या. या जोडीलाच शेतकरी उत्पादक कंपनी, विक्री गट, वैयक्तिक, महिला बचत गटामार्फत उद्योग या गोष्टीसुद्धा केल्या. यातून परिसरात लोकांच्या संस्थांचे एक जाळेच तयार झाले. विविध गोष्टीबद्दल मत मांडण्यासाठी व्यासपीठ तयार झाले. यातून राजकारण हा विषय कटाक्षाने बाजूला ठेवण्याचा निर्णय आणि प्रयत्न लोकांनीच केला. त्यामुळे कामाला मदतच झाली.
 
 
जानेवारी २०१५मधील गारपिटीमुळे नेसू परिसरातील गावामध्ये बरेच नुकसान झाले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील बऱ्याच भागात फेब्रुवारीमध्ये गारपीट झाली. शासनाने मदतीची घोषणा फेब्रुवारीमधील गारपिटीसाठी. जानेवारीतील गारपिटीची नोंद नव्हती, कारण ती नवापूर या तालुक्याच्या गावात झाली नाही, जिथली माहिती शासनाकडे असते. हे लक्षात आल्यावर नेसू परिसर सेवा समितीने आपल्या गावातील जलदूतांनी ठेवलेल्या पावसाच्या नोंदी, स्थानिक वर्तमानपत्रातील कात्रणे आदी माहिती जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवली. समितीची तयारी बघून जिल्हाधिकाऱ्यांनी या माहितीची तपासणी केली व शासनाच्या निर्णयात दुरुस्ती केली. यामुळे शेकडो शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली. शेतकऱ्यांनीसुद्धा मिळालेली भरपाई व स्वतःजवळचे पैसे घालून तुटलेल्या आंबा वाड्या परत लावल्या. स्थानिक नोंदी ठेवण्याची व्यवस्था, लोकांचे संघटन यातून अशा अडचणीच्या वेळी मोलाची मदत झाली.
 
 
अंत्योदयासाठी लोकांच्या व्यवस्था
 
 
एकात्म मानव दर्शनाच्या आपल्या विवेचनात पंडित दीनदयाळ उपाध्याय 'विकासाच्या कामात लोकांचा पुढाकार असला पाहिजे व शासनाची भूमिका साहाय्यक रूपाची असली पाहिजे' असा मूलभूत विचार मांडतात. हे जर प्रत्यक्षात आणायचे असेल, तर लोकांच्या स्वतःच्या संस्था असणे गरजेचे आहे. समाजात जेव्हा अशा संस्था, व्यवस्था तयार होतील तेव्हा त्यांना मदत करणे एवढेच काम बाकी राहील. यातूनच मग विकास खऱ्या अर्थाने शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल.
 
 
कपिल सहस्रबुद्धे
योजक