॥ चंद्र व्हा हो पांडुरंगा ॥

28 Jun 2020 18:20:45

pandharpur ashadhi ekadas 
भारतीय साहित्यसृष्टीत जी अनेक सुंदर मिथकं आहेत, त्यातलं एक चकोराचं. सार्‍या पृथ्वीला आपल्या स्नेहशीतल प्रकाशाने न्हाऊ घालणार्‍या चंद्राचे कोवळे किरण प्राशन करून चकोर आपला निर्वाह करतो. चंद्र हा मनाचा कारक. भावनांचा स्वामी.
मनुष्याची बलस्थानं मोजण्याचे जे निर्देशांक आहेत, त्यात बुद्ध्यंकाइतकाच भावनांकही महत्त्वाचा, हे आता सिद्ध झालंय. त्यामुळं त्याचं पोषण महत्त्वाचं आहेच. ते करण्यासाठी अध्यात्म- तत्त्वज्ञान-भक्ती व साहित्य-कला-परंपरा यांची सुरेख गुंफण हा भारतीयांचा 'युनीक' ठेवा आहे!
चकोर पक्षाचा उल्लेख ज्ञानेश्वरांनी फार मार्मिकतेने केलाय.
जैसे शारदियेचे चंद्रकळे
माजी अमृतकण कोंवळें
तें वेंचिती मनें मवाळें
चकोरतलगे ll
ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता श्रोत्यांची मनोभूमिका तयार करण्याकरता ते हे उदाहरण देतात.

या ग्रंथाद्वारे मी जे ज्ञान आपल्याला देऊ पाहतोय, ते अनमोल आहे सूक्ष्म आहे. ते ग्रहण कसं कराल? तर ज्या आर्ततेने, आतुरतेने, मनःपूर्वकतेने चकोर पक्षी चंद्रकिरणांचं सेवन करतो, तसं तुम्ही ऐकावंत. किंवा चंद्रप्रकाशात दिसणारे अमृतकण चकोराची पिलं जशी अलगद टिपतात, तसं तुम्ही या ग्रंथाच्या प्रकाशात आपल्या जीवनातलं अमृत वेचायला शिकावं!
ईश्वराकडे कृपा मागावी कशी आणि ती झाल्यावर घ्यावी कशी, याचा राजस मार्ग माउली दाखवतात. त्या भावनांच्या भुकेल्या परमात्म्याला अंतःकरणपूर्वक साद घालावी व त्याला हे पटवून द्यावं की तुझ्याविणा मला कुणी नाही. मला अन्य काही नकोच. मी त्या चकोरासारखा व्याकूळ होऊन तुला विनवतोय की हे पांडुरंगा, तुम्ही कृपाचंद्र व्हा व तुमच्या कृपाकिरणांचा वर्षाव करा.
बालपण बागडण्यात संपलं. तारुण्याची रग सगळ्या वासनांमागे धावण्यात जिरली. आता पैलतीर दिसू लागला. अन्य काही मनीषाच आता उरली नाही. पुन्हा जन्ममरणाचा फेरा नको.
या संसारात रमणं, त्यातली सोंगं वठवणं पुरे झालं. आता फक्त तुमच्या कृपेचीच आस आहे. चर-अचर, ज्ञात-अज्ञात या सार्‍याच्या पार कधी न्याल, अशी तळमळ लागली आहे. आता उशीर करू नका. लवकर मला बोलावून सवे न्या!
माझ्यासारख्या सामान्य भक्ताला उचलून घेण्याइतकं तुमचं मातृहृदय नक्कीच थोर आहे. मजकडे तुमचं लक्ष जावं व तुम्ही माझे सारे अपराध विसरून मला उचलून घ्यावं, याकरता मी तुमच्या नावाचा टाहो मांडला आहे.
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग ....
चित्रपटांप्रमाणेच संतजीवनावर आधारित मराठी संगीत नाटकंही झाली. संगीत संत गोरा कुंभार या नाटकातलं हे पद. अशोकजी परांजपेंच्या या निर्मळ शब्दांना पं. जितेंद्र अभिषेकी यांनी चाल दिली होती. प्रसाद सावकार त्यात गोरोबांची भूमिका करत असत. मूळ नाटकातली चित्रफीत वा ध्वनिफीत उपलब्ध नाही, पण केैवल्याची अनुभूती देणारा हा अभंग मात्र नक्की ऐका.
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर
बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले
वृद्धपणी देवा अाता दिसे पेैलतीर
जन्ममरण नको अाता, नको येरझार
नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार
चराचरा पार न्या हो जाहला उशीर
'पांडुरंग' 'पांडुरंग'.. मन करा थोर

 
Powered By Sangraha 9.0