॥ हेचि येळ देवा नका ॥

स्रोत: विवेक मराठी    दिनांक29-Jun-2020   
|

pandharpur ashadhi ekadas
भागवत पंथाने खांद्यावर विश्वकल्याणाची पताका धरलीय खरी, पण ती धरणारी सर्वसामान्य रयत नाडली जाते आहे. महाराष्ट्राची भूमी परक्या आक्रमकांच्या दमनकारी घोड्यांच्या टापांखाली तुडवली जात असताना सह्याद्रीच्या अंधारलेल्या दर्‍याखोर्‍या शिवनेरीवर उगवलेल्या शिवसूर्याच्या प्रकाशाने हलके हलके उजळू लागल्यात. पण त्याला झाकोळून टाकतील असे भयकारी ढग कधीतरी त्याच्या समोर येतात आणि मग आऊसाहेबांच्या काळजाचा ठाव सुटतो. शिवबाच्या डोळ्यात त्यांनी स्वराज्याचं स्वप्न जोजवलेलं असतं. त्या स्वराज्याची एक एक वीट उभी राहतेय..
पण आज जो थेट काळाच्या जबड्यात शिरायचं धाडस करायला गेलाय, तो केवळ त्यांच्या काळजाचा तुकडा नाही, अवघ्या हिंदू समाजाचा तारणहार आहे. तो सुरक्षित परतायलाच हवा. या मातीसाठी. या देशासाठी.
थेट शाहिस्तेखानाच्या महालात शिरून त्याची खोड मोडायला गेलेले महाराज व त्यांच्या काळजीने जिवाचं पाणी पाणी झालेल्या आऊसाहेब.. अशा वेळी महालात बुवा तुकोबांच्या शब्दात विठुरायाला घातलेलं साकडं गात आहेत आणि सारे जण कळवळून प्रार्थना करत आहेत -
हेचि येळ देवा नका मागें घेऊ
तुम्हाविण जाऊ शरण कुणा ॥
नारायणा ये रे पाहूं विचारुन
तुजविण कोण आहे मज ॥
रात्रंदिन तुज आठवुनि आहें
पाहतोसि काय सत्त्व माझें ॥
तुका म्हणे किती येऊ काकुळती
काही माया चित्तीं येऊं द्यावी ॥
हिंदवी स्वराज्यावरच्या अशा प्राणसंकटाच्या वेळी त्या सर्वसाक्षी विठ्ठलाला सोडून अन्य कुणाला साकडं घालायचं?
देवा, या वेळी मात्र आता जराही पाऊल मागे घेऊ नका. माझ्या आर्जवाला नाही म्हणू नका. तुम्हाविणा मी कोणाला शरण जाऊ नि ही काळीज पोखरणारी काळजी सांगू तरी कुणाला?
नारायणा, या आता असं मी पुन्हापुन्हा विनवतो आहे. तुझ्याशिवाय माझे कुणी नाही रे दयाळा!
रात्रंदिवस मी केवळ तुझेच स्मरण करत असतो. आता मात्र ही वेळ खरोखर परीक्षेची आहे. माझी आणखी सत्त्वपरीक्षा पाहू नको!
आणखी किती तळमळून सांगावं तुम्हाला? किती अार्जवं करावीत? लेकराच्या आर्ततेने तुम्हाला हाका मारत आहे. हे विठूमाउली, आता तुझ्या हृदयाला पाझर फुटू दे. धाव पाव गे विठाई!
समूहस्वर जेव्हा आर्ततेने आवाहन करतो, तेव्हा अवघा महाराष्ट्र विठुरायाला आवाहन करतो आहे असं वाटतं आणि मग विठ्ठल विठ्ठल असा गजर चालू असताना मोहीम फत्ते करून गडावर परतणार्‍या महाराजांच्या घोड्यांच्या टापांच्या गजरातूनही विठ्ठल विठ्ठल ऐकू येतंय असा भास होऊन रोमांच येतात!

'फत्तेशिकस्त' चित्रपटातलं हे गीत. तुकोबारायांचे शब्द आहेत. अवधूत गांधी यांचा आवाज व देवदत्त मनीषा बाजी यांचं संगीत. आजच्या या परीक्षेच्या काळात महाराष्ट्राला महाराजांच्या धैर्याची व विठ्ठलाच्या आशीर्वादाची नितांत गरज आहे! अतिशय हृदयस्पर्शी असं हे गीत पाहताना आपणही हेच मागणं मागू ....
आता पुरे झालं! काही माया चित्ती येऊ द्यावी....