कोरोना काळात समर्थ सेवा

29 Jun 2020 13:27:25
@बाजीराव सोनवणे

दिंडोरी मठातर्फे कोणत्याही संकटाचा कार्यकारणभाव जाणून संकटावर मात करणारी उपाययोजना व आध्यात्मिक सेवा देण्यात येते. आध्यात्मिक बैठकीचे महत्त्व जाणून कोरोना काळात मठाच्या वतीने
श्री गुरुचरित्र, नवनाथ, श्री
स्वामी चरित्र, आदी पवित्र धर्मग्रंथांची आॅनलाइन पारायणे सुरू केली. तसेच प्रशासनाचे सर्व नियम पाळून, सामाजिक अंतर राखत मदतकार्य हाती घेतले आहे.


 Facebook Shree Swami Sam


भगवान श्री विष्णूंनी मानवजातीच्या कल्याणासाठी विविध अवतार धारण करून कार्य केले. भगवान श्री दत्तात्रेय रूपात संपूर्ण जगाला त्यांनी मार्गदर्शन केले. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजेच भगवान श्री दत्तात्रेय, श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती अशा विविध अवतारांत महाराजांनी अंधश्रद्धा दूर करून खरा देव समजावून सांगण्याचे काम केले. सन १८५६मध्ये महाराजांनी श्री क्षेत्र अक्कलकोट येथे अवतरित होऊन सुमारे २२ वर्षे जो जो भेटेल त्याला दु:खमुक्त करून स्वयंभू बनविले. अनन्य भावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या योगक्षेमाची हमी दिली. सर्वांचे कल्याण केले. मात्र हे करताना कोणालाही वार्‍या, खेट्या घालावयास लावल्या नाही. कोठेही प्रचार अथवा प्रवचने न करता संस्कृतीचे व सदाचाराचे मूळ मंत्र दिले. सन १८७८मध्ये समाधी घेऊन लौकिकदृष्ट्या देह संपविला. नंतर परमपूज्य पिठले महाराजांनी तो वारसा पुढे नेला. सद्गुरू परमपूज्य पिठले महाराजांनी १२ वर्षे हिमालयात, ३६ वर्षे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरी, तर २२ वर्षे नाशिकमध्ये गोदामाईच्या साक्षीने अत्यंत खडतर उपासना करून स्वत:ला स्वामीकार्यासाठी तयार केले. प्रत्यक्ष महाराजांच्या आदेशाने त्यांनी त्र्यंबकेश्वरी व नाशिकमध्ये ४८ वर्षे दु:खितांना मार्गदर्शन केले. आपल्यानंतर ही महान परंपरा - म्हणजे प्रत्यक्ष श्री दत्तात्रेय महाराजांची परंपरा लाभलेले कार्य समर्थपणे पुढे नेण्यासाठी त्यांनी दिंडोरीतील सद्गुरू परमपूज्य मोरेदादांची निवड केली. श्री क्षेत्र दिंडोरी येथे प्रधान केंद्र असलेला, तसेच संपूर्ण भारत आणि भारताबाहेर अनेक देशांमध्ये ६०००पेक्षा अधिक शाखा असलेला अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचा भक्कम पाया सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी रचला. सन १९७४मध्ये आपले जीवनकार्य संपविताना परमपूज्य पिठले महाराजांनी पुढील कार्याचे नियोजन मोरेदादांकडे सोपविले. सन १९७४ते १९८८ अशा अल्पावधीत दादांनी १००पेक्षा जास्त श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांची निर्मिती केली. हे करीत त्यांना असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. परंतु पिठले महाराजांच्या आशीर्वादाने, त्यांच्या सहवासात १९४८ ते १९७४ या काळात स्वामीकार्याचा रथ चालविण्यासाठीची पूर्वतयारी म्हणून अध्यात्माची पक्की बैठक दादांच्या तनमनात दृढ झालेली असल्याने ते डगमगले नाहीत. अनेक आघाड्यांवर वेगवेगळ्या लोकांचा विरोध मोडून काढीत त्यांनी आपले काम सुरूच ठेवले.

सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनंतर आज लाखो नव्हे, तर कोट्यवधी सेवेकर्‍यांचे प्रात:स्थान ‘गुरुमाउली’ असलेले परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्याकडे या कार्याची धुरा आली. मोरेदादांनी बांधलेल्या भक्कम पायावर आज गुरुमाउली परमपूज्य अण्णासाहेब यांनी ६०००पेक्षा जास्त केंद्रांची भव्यदिव्य समर्थसेवेची इमारत उभी केली आहे. हा स्वामीसेवेचा वटवृक्ष - महावृक्ष आज जगभर अनेकांची सावली बनला आहे. गुरुमाउलींसह आज गुरुपुत्र चंद्रकांतदादा, नितीनभाऊ आबासाहेब हे कार्य जगभर पोहोचविण्यासाठी रात्रीचा दिवस करीत आहेत.

रयतेच्या आधिव्याधी, अडचणी, त्यांचा कार्यकारणभाव जाणून संकटावर मात करणारी उपाययोजना व आध्यात्मिक सेवा देण्यासाठी प्रश्नोत्तरे कार्यक्रम दिंडोरी, त्र्यंबकेश्वरसह सर्व सेवा केंद्रांमध्ये केला जातो. या सेवेत ज्योतिष, शिवस्वरोदय शास्त्र, श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा, कुलदेवतेची सेवा, ग्रामदैवतांची सेवा, वास्तुशास्त्र, पितरसेवा अशा गोष्टींचा विचार केला. प्रत्येक दु:खी, आर्त, पीडितांचे दु:ख, संकट, विनामूल्य त्वरित निरसनासाठी प्रश्नोत्तरे खूपच उपयोगी पडताना दिसत आहे. घरच्या घरी रोज अर्ध्या तासाची सेवा सुरू करताच अनेक प्रश्न, समस्या अडचणी मार्गी लागल्याचा अनुभव रोज हजारो भाविक, सेवेकरी घेत आहेत. माणसाच्या जगण्यात ‘श्री स्वामी समर्थ’ या षडाक्षरी मंत्राने प्रचंड विलक्षण शक्ती निर्माण होत असल्याचा अनुभव आज कोट्यवधी सेवेकरी घेत आहे.

 Facebook Shree Swami Sam


सामूहिक सेवांची उत्तम परंपरा या सेवामार्गाने कायमच जोपासली आहे. जेव्हा राष्ट्रासमोर विविध समस्या उभ्या ठाकतात, युद्धसदृश परिस्थिती, दहशतवाद, अतेरिकी कारवायांचा धोका, भ्रष्टाचार, अनाचार अशा विविध मानवनिर्मित बाबींमुळे भारतासमोर जेव्हा संकट उभे राहते, तेव्हा तेव्हा परमपूज्य गुरुमाउलींच्या आदेशाने लाखो सेवेकरी सामूहिक सेवेसाठी एकत्रित येतात. माता भगवतीला आणि राष्ट्राचे कुलदैवत भगवान श्री शंकरजींना लाखो महिला-पुरुष सेवेकरी साकडे घालतात. ‘दार उघड बये आता दार उघड’ अशी आर्त हाक संत श्रेष्ठ एकनाथांनी घालून माता भगवतीस साकडे घातले होते. परमपूज्य गुरुमाउलींच्या आशीर्वादाने समर्थ सेवेकरी आज तोच वारसा पुढे चालवीत आहेत. दुष्काळ, जलप्रलय, अनेक आजारांच्या साथी जेव्हा उद्भवतात, तेव्हा सामूहिक सेवेच्या माध्यमातून सेवेकरी परमेश्वरी शक्तीस आर्त विनंती करतात. श्री दुर्गासप्तशती, रुद्र, श्री नवनाथ, सुलभ भागवत, श्रीगुरुचरित्र अशा अनेक रूपांत ही हाक भगवती व भगवान शंकरजीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सेवेकरी करतात. लक्षचंडी, कोटीचंडी व आता अब्जचंडी यासारखी अत्युच्च अशी सेवा सर्वसामान्य सेवेकर्‍यांकडून गुरुमाउली करून घेत आहेत. या सेवेचा संकल्प असतो राष्ट्ररक्षणाचा व राष्ट्रकल्याणाचा.

सद्गुरू परमपूज्य मोरेदादा, परमपूज्य गुरुमाउली यांनी विस्मृतीतील पोथ्या, तत्त्वज्ञानांचे ग्रंथ, वेद बाहेर काढून त्यातील अतिमौल्यवान उपयोगी जप, मंत्र, उपचार, आयुर्वेद, साधना यांची शिकवण समाजाला दिली. परमपूज्य मोरेदादा व परमपूज्य गुरुमाउली स्वत: हाडाचे शेतकरी असल्याने शेती व शेतकरी हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. उत्तम शेती कशी करावी, शेतीसाठी अध्यात्माचा कसा उपयोग करून घ्यावा, आध्यात्मिक, सात्त्विक, नैसर्गिक शेती कशी करावी याचे सर्व प्रात्याक्षिकांसह त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठामध्ये, तसेच दिंडोरीत प्रधान केंद्रात शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले जाते. शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी गुरुपीठ गुरुमाउली महाराष्ट्रभर पायपीट करून शेतकर्‍यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न करतात. शेकडो कृषी मेळावे घेऊन लाखो शेतकर्‍यांशी त्यांनी संवाद साधला. सेवामार्गाच्या वतीने दर वर्षी होणारा भारतातील सर्वात मोठा जागतिक कृषी महोत्सव यामुळेच लोकप्रिय व मार्गदर्शक ठरत आहे. चार-पाच दिवसांच्या या महोत्सवात ५ लाख शेतकरी, संशोधक, अभ्यासक विद्यार्थी, पत्रकार, कृषी उत्पादक विक्रेते सहभागी होतात आणि शेतीच्या व शेतकर्‍यांच्या उत्कर्षासाठी सक्रिय होतात. विशेषत: सेंद्रिय शेती करून दुर्धर आजारांना दूर कसे ठेवता येईल, याबाबत प्राधान्याने चर्चा, प्रयोग होत आहेत. शेतकर्‍यांचे गट बनवून त्यांचा सेंद्रिय माल प्रत्यक्ष ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक प्रयत्न केले जात आहेत. यातून शेतकरी व ग्राहक यांच्यामधील दरी दूर होत आहे. आयुर्वेदावर फक्त चर्चाच न करता श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरी औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली असून १००पेक्षा जास्त आयुर्वेदिक औषधांची निर्मिती केली जाते. घरातच उपलब्ध असलेल्या किंवा सहजगत्या प्राप्त होणार्‍या औषधी वनस्पतींचा वापर करून मोठमोठ्या दुर्धर आजारांना कसे रोखता येते? याबाबात गुरुपीठ गुरुमाउली सातत्याने मार्गदर्शन करत असतात. सहज उपलब्ध वनस्पतींनी कॅन्सरसारखा दुर्धर आजरही पळवता येतो, हे अनेक उदाहरणांवरून सिद्ध झाले आहे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या पावन भूमीत २५ एकरात साकारलेल्या श्री गुरुपीठात आयुर्वेदाशी संबंधित अनेक उपक्रम राबविले जातात. येथील पंचकर्म केंद्रात सर्वच आजारांवर उपचार केले जात आहेत. भविष्यात सेवामार्गाच्या वतीने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे उभे राहणारे सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल दुर्गम भागातील गरीब रुग्णांना वरदान ठरणार आहे. एक हजार बेडच्या या अत्याधुनिक सुसज्ज व जगातील वैद्यकीय शास्त्रातील सर्व प्रगत यंत्रणा उपलब्ध असलेल्या या हॉस्पिटलच्या माध्यामातून गोरगरिब जनतेस सर्वत्र लहान-मोठ्या, दुर्धर आजारांवर उपचार करवून घेणे शक्य होणार आहे. महाराष्ट्रातूनच नव्हे, तर संपूर्ण भारतातून आलेल्या गरजू-गरीब रुग्णांसाठी हे भव्य हॉस्पिटल भविष्यात वरदान ठरणार आहे.

‘शेतकर्‍यांच्या आत्महत्या’ हा चिंतेचा तसेच आत्मपरीक्षणाचा विषय आहे. आत्महत्या होण्यामागे जी विविध कारणे आहेत, त्यापैकी एक आहे थाटामाटातील विवाह सोहळा. मुला-मुलींच्या लग्नासाठी शेतकरी कर्जबाजारी होतात आणि हे अवाच्या सव्वा कर्ज फेडता येत नाही. मग ते जीवन संपवितात. यातून गुरुपीठ गुरुमाउलींनी मार्ग काढला. विनाहुंडा विवाहाची मोहीमच सेवामार्गाने हाती घेतली. त्र्यंबकेश्वर, दिंडोरीसह सर्व केंद्रांच्या माध्यमातून, हुंडा न घेता, न देता आतापर्यंत हजारोे विवाह पार पडले. ही विनाहुंडा मोहीम अखंडपणे चालूच आहेत.

सेवामार्गाचा आत्मा आहे ‘बालसंस्कार विभाग’, ज्यांच्या खांद्यांवर उद्याचे राष्ट्र समर्थपणे उभे राहणार आहे अशी आजची बालपिढी मानसिक, शारीरिकदृष्ट्या सक्षम व सुसंस्कारित करण्यासाठी प्रत्येक केंद्रामध्ये बालसंस्कार विभाग आहे. अंधकारमय भविष्याला तोंड देण्याची हिंमत, खंबीरता, धैर्य, प्रतिकूलतेवर मात करण्याची जिद्द, संयम, बालकांमध्ये व युवकांमध्ये तयार करण्याचे काम बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग करतो. त्यांच्यासमोर राष्ट्रपुरुषांचे आदर्श ठेवून प्रखर राष्ट्रप्रेमाची ज्योत चेतविण्याचे महत्त्वाचे कार्य सुरू आहे. बालसंस्काराप्रमाणेच व युवा प्रबोधन हा महत्त्वाचा विभाग सेवामार्गातून लाखो युवकांना व्यसनमुक्ती, कायदा-सुव्यवस्था, राष्ट्रहित-राष्ट्रप्रेम, स्वयंरोजगार, परिसर-गाव स्वच्छता, पर्यावरण प्रकृती, दुर्गसंवर्धन, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन, वेद-विज्ञान संशोधन. योग ध्यान-धारणा, युवती-महिलांना स्वसंरक्षणाचे धडे, कृषी जोड व्यवसाय प्रशिक्षण, सण-उत्सव यामागील शास्त्र, विज्ञान समजावून सांगणे, भारतीय कलांचा अभ्यास, वास्तुशास्त्र या सर्व गोष्टी युवकांना, बालकांना समजावून सांगण्यासाठी सेवामार्गाच्या वतीने युवा महोत्सवाचे आयोजन आयोजन करण्यात येते. स्तोत्र-मंत्रपठणाबरोबरच वृक्षारोपणाचा विश्वविक्रम, युवा महोत्सवातील उपस्थितीचा विक्रम, व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी विश्वविक्रमी मानवी साखळी, मातीपासून एकाच दिवसात हजारो गणपती बनविण्याचा विश्वविक्रम, किल्ले बनविण्याचा विक्रम, विश्वविक्रमी विज्ञान महोत्सव, रक्तदान शिबिर, शाळा, कॉलेज, वाडी-वस्ती सोसायटी, अनाथालाय, आश्रमशाळा सर्वत्र बालसंस्कार, शिक्षक-पालक-विद्यार्थी मेळावे असे अनंत उपक्रम सेवामार्गातून सुरू असून लाखोंनी त्याचा लाभ घेतला आहे.
 
 
pandharpur ashadhi ekadas

सेवामार्गाच्या अंतर्गत कार्य करणार्‍या, देश-विदेश अभियानांतर्गत सेवा कार्य आता महाराष्ट्राबाहेर दिल्ली, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, छत्तीसगड, हिमाचल, पंजाब, झारखंड, गुजरात या राज्यांमध्ये, तर देशाची सीमा पार करून अमेरिका, नेपाळ, यू.ए.ई., ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, जपान, दुबई, टांझानियापर्यंत सेवामार्ग जाऊन पोहोचले आहेत. दुबईत सेवामार्गाचा ‘विश्वशांती महोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा झाला. नेपाळमध्ये तर कार्याने खूपच वेग घेतला असून नियमितपणे विविध उपक्रम राबविले जातात.

देशासमोर जेव्हा जेव्हा भयानक संकटे उभी राहतात, तेव्हा सेवेकरी परमपूज्य गुरुमाउलींच्या आदेशाने आध्यात्मिक सेवेबरोबरच प्रत्यक्ष समाजात जाऊन मदत करण्यास अग्रेसर आहेत. याआधीदेखील अनेक प्रसंगी - विशेषत: संपूर्ण महाराष्ट्रभर भयानक दुष्काळाचे चटके बसत असताना सेवामार्गाच्या वतीने राज्यभरातील शेतकर्‍यांच्या जनवारांसाठी हजारपेक्षा अधिक ट्रक चारा जमा करून राज्यभर वितरित करण्यात आला होता. सध्या संपूर्ण विश्वावर कोरोनाचे महाभयानक संकट आले असता परमपूज्य गुरुमाउली प्रचंड अस्वस्थ झाले. कोरोनाला रोखण्यासाठी गुरुमाउलींनी आध्यात्मिक, आयुर्वेदिक उपाय सुचवलेच, पण तेवढ्यावर न थांबता संपूर्ण राज्यातील व राज्याबाहेरील सेवेकर्‍यांनी या संकटसमयी आपल्याला जमेल त्या पद्धतीने पण प्रशासनाचे नियम पाळून मदतकार्य हाती घ्यावे, असे सुचविले. देशाभरातील जनता प्रचंड दहशतीत, भीतीत असताना त्यांना धीर देण्यासाठी परमपूज्य गुरुमाउली व श्री चंद्रकांतदादा यांनी गावागावातील केंद्रांच्या माध्यमातून जनतेशी ऑनलाइन/ई-संवाद साधून लाखोंना धीर देऊन त्यांचे मनोधैर्य वाढविले. दर गुरुवारी, रविवारी स्वत: गुरुमाउली व इतर वेळी चंद्रकांत दादा यांनी सर्व समाजघटकांशी संवाद साधला. कोरोनाशी लढणारे पोलीस, आरोग्य कर्मचारी, सेवाभावी संघटना यांच्याशीसुद्धा संवाद साधून त्यांचा उत्साह वाढविला. घरीच सुरक्षित राहून लाखो सेवेकर्‍यांनी श्री गुरुचरित्र, नवनाथ, सुलभ भागवत, श्री दुर्गासप्तशती, श्री स्वामी चरित्र अशा पवित्र धर्मग्रंथांची ऑनलाइन पारायणे केली आणि माता भगवतीला व श्री दत्तमहाराजांना कोरोनाचे संकट दूर करण्याची विनंती केली.

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील समर्थ श्री गुरुपीठात १०० खाटा कोरोना विलगीकरण कक्षासाठी प्रशासनास देऊन सेवामार्गाच्या वतीने सहकार्य करण्यात आले. गरज पडल्यास ३०० खाटांपर्यंत ही क्षमता वाढविण्याची तयारी ठेवण्यात आली. लॉकडाउनमुळे खेड्यापाडयातील जनतेला - विशेषत: ज्यांचे पोट हातावर आहे अशांना अन्नधान्याची टंचाई भासू लागली होती. त्र्यंबकेश्वरला लागून असलेल्या जनजाती पाड्यांना धान्य पोहोचवून मदतकार्य सुरू करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ असे सर्वत्र धान्य, तयार अन्न, गरज पडल्यास कपडे अशा मदतीचा ओघ सेवेकर्‍यांकडून सुरू झाला. काही ठिकाणी तृतीयपंथीयांनाही मदत करण्यात आली. अन्नधान्य, वस्त्र या स्वरूपातील मदतकार्य आजही सुरूच आहे. याला जोडूनच रक्तदान शिबिरांचा उपक्रम हाती घेण्यात आला. राज्यभरात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करून एक हजारपेक्षा अधिक सेवेकर्‍यांनी रक्तदानाचे पुण्य कमविले. अन्नधान्य, वस्त्र या स्वरूपातील मदत आजपर्यंत जवळपास दोन लाख गरजूंपर्यंत पोहचविण्यात आली आहे. काही ठिकाणी तर गरजू कुटुंब दत्तक घेऊन त्यांना आजही सर्व प्रकारची मदत केली जात आहे. राज्यभरात पोलीस, आरोग्य कर्मचारी यांना जेवणाबरोबरच सुमारे २५ हजार मास्कचे वितरण करण्यात आले. याबरोबरच सेवामार्गाचा फिरता दवाखाना रुग्णांना अखंडपणे सेवा देत आहे. सेवामार्गाच्या वतीने मुख्यमंत्री निधीसाठी अडीच लाख रुपयांची मदतही सुपुर्द करण्यात आली. महाराष्ट्राप्रमाणेच आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू व इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मदतकार्य झाले आहे.

ई-बालसंस्कार वर्गाच्या माध्यमातून मुलांनी मिळालेल्या वेळेला सदुपयोग करण्यासाठी लॉकडाउन काळात अनेक उपक्रम राबविले जात आहेत. चित्रकला स्पर्धा, स्तोत्र-मंत्रपठण, मातृ-पितृपाद्यपूजन असे विविध आगळे-वेगळे उपक्रम होत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १२ जुलै रोजीचा सेवामार्गाचा गुरुपौर्णिमा उत्सवसुद्धा सेवेकर्‍यांनी घरीच करण्याचा निर्णय झाला आहे. श्री गुरुपूजन सोहळाही ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहे.

बाजीराव सोनवणे
अ.भा. श्री स्वामी समर्थ सेवामार्ग दिंडोरी, जि. नाशिक
Powered By Sangraha 9.0