श्रीगजानन महाराज संस्थान, शेगावसेवा कार्याचा नंदादीप!

स्रोत: विवेक मराठी    दिनांक29-Jun-2020
|

seva_1  H x W:

@प्रा. विवेक बिडवई

श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव हे उत्कृष्ट व्यवस्था व धर्मजागृती या विषयांबरोबरच सामाजिक सेवाभावी कायद्यात अग्रेसर असण्याचा संस्थानाचा लौकिक आहे. संस्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे सेवाधारी संकल्पना. सेवेचे व्रत घेतलेल्या या संस्थानाचे कोविड-१९ या दुर्धर प्रसंगातसुद्धा आपले व्यर्थ अबाधित ठेवले आहे.


seva_1  H x W:

विदर्भातील पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेगावचे श्रीगजानन महाराज संस्थान हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्रीगजानन महाराज समाधिस्थ होऊन शंभराहून अधिक वर्षे झालीत, पण महाराजांच्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या संस्थेच्या सेवा कार्याचे व सेवासंस्कार रुजविण्याचे यामध्ये मोठे योगदान आहे. उत्कृष्ट व्यवस्था व धर्मजागृती या विषयांबरोबरच सामाजिक सेवाभावी कार्यात अग्रेसर असण्याचा संस्थानचा लौकिक आहे.

श्रीगजानन महाराज यांच्या उपस्थितीतच १९०८ साली या संस्थानाची स्थापना झाली होती. श्रीमहाराजांनी घालून दिलेल्या नियमानुसारच आजही संस्थेचे कामकाज चालते. श्रीगजानन महाराजांचे समाधी मंदिर हे संस्थानचे प्रमुख श्रद्धाकेंद्र आहे. विशेष म्हणजे महाराजांनी त्यांच्या समाधीचे स्थान व दिवस आधीच सांगून ठेवले होते.

श्रीगजानन महाराज हे अवलिया संत होते. ते शेगावी आले, त्या दिवशी त्यांचा प्रकट दिन साजरा केला जातो. त्यापूर्वीचा नेमका इतिहास माहीत नाही. तसेच महाराजांची शिष्यपरंपरा, गादी इ. काही विषय नाहीत. "श्री’चीं कोणतीही गुरु-शिष्यपरंपरा, गादी नाही. येथे फक्त सेवेची परंपरा आहे.” असे या संस्थानच्या बाबतीत सांगितले जाते. श्रीगजानन महाराज संस्थानच महाराजांची परंपरा तसेच शिकवण समर्थपणे सांभाळत आहे. संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांच्या समर्पित व शिस्तबद्ध नेतृत्वाखाली एक आदर्श धर्मस्थळ म्हणून आज शेगाव संस्थान देशभरात प्रसिद्ध आहे. या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे सेवाधारी संकल्पना. जवळपास तीनशेहून अधिक गावांमधून सेवाधारी मंडळी संस्थानमध्ये सेवा देण्यासाठी येतात. त्याची नियमित रचना लागलेली आहे. आपल्या वाट्याला आलेले काम संपूर्ण सेवाभावनेने व नीटनेटके झाले पाहिजे, असा संस्कार येथे घडतो. अतिशय कठोर शिस्तबद्ध वागत असतानाच कोठेही उद्धटपणा बघायला मिळत नाही, उलट विनयशील वागणूकच अनुभवाला येते. येथील स्वच्छता व शिस्त अनुकरणीय आहे. श्रीगजानन महाराजांबद्दल असणाऱ्या श्रद्धाभावनेकडे व मा. शिवशंकरभाऊ यांच्या कुशल प्रशासनाकडे याचे मुख्य श्रेय जाते.

संस्थेच्या शाखा

श्रीगजानन महाराज त्यांच्या जीवनकालात जेथे जेथे तीर्थक्षेत्र म्हणून गेले होते, त्या त्या ठिकाणी आज संस्थेच्या भव्य शाखा निर्माण झाल्या आहेत. पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, आळंदी, तसेच मध्य प्रदेशातील ओमकारेश्वर या ज्योतिर्लिंगाच्या क्षेत्रात आज श्रीगजानन महाराज संस्थानच्या भव्य शाखा उभ्या आहेत. या सर्व शाखांमध्ये महाराजांचे मंदिर, सर्व सुविधांनी युक्त असहा भक्तनिवासाची व भक्तांच्या प्रसादाची व्यवस्था आहे. येथील स्वच्छता व शिस्तसुद्धा शेगावसारखेच अनुभवायला मिळते.

संस्थानचे उपक्रम

वर उल्लेख केल्याप्रमाणे संस्थानची परंपरा सेवेची आहे, त्याला अनुसरून संस्थेद्वारे बेचाळीस सेवा उपक्रम चालविले जातात. स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीनुसार 'शिवभावे जीवसेवा' हे संस्थानचे व्यवहार तत्त्व आहे.
संस्थेच्या बेचाळीस उपक्रमांपैकी महत्त्वाच्या ठळक उपक्रमांची माहिती घेऊ या.

आरोग्य सेवा

* संस्थानद्वारा आयुर्वेदिक, होमिओपॅथिक व अॅलोपॅथिक चिकित्सालय स्वतंत्रपणे चालविले जातात. फिजिओथेरपी विभागसुद्धा चालविला जातो.
* फिरते रुग्णालय - विशेष म्हणजे वनवासी क्षेत्रासाठी स्वतंत्र फिरते रुग्णालय आहे, याद्वारे ग्रामीण व वनवासी क्षेत्रात फार मोठी आरोग्य सेवा केली जाते.
* नेत्रशस्त्रक्रिया शिबिर, ग्रामीण आरोग्य सेवा योजना अंतर्गत बुलढाणा जिल्ह्य़ात चाळीस हजाराच्या आसपास रुग्णांवर भिन्न भिन्न शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तसेच १२ लाखाहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
* वेगवेगळ्या गंभीर आजारांनी पीडित रुग्णांकरिता विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन व मदत, तसेच लसीकरणाचे उपक्रम नियमित राबविण्यात येतात.
* विविध चिकित्सालयांतून आजपर्यंत संस्थानच्या माध्यमातून जवळपास एक कोटी सत्तर लाख रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे.
* संस्थेच्या शाखांमधूनसुद्धा विविध यात्रा-उत्सवकाळामधे आरोग्य सेवा दिली जाते- उदा., त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्यात, पंढरपूर, आळंदी येथील यात्रांमध्ये, ओमकारेश्वर येथे कार्तिक मेळा व नर्मदा जयंतीच्या यात्रांमधून नियमित आरोग्य सेवा दिली जाते.

अन्नदान – प्रसाद सेवा

शेगावला येणाऱ्या भाविकांच्या मनात महाराजांच्या प्रसादाची ओढ असतेच. साधारणपणे दररोज ४५ हजार भक्तांना मिष्टान्नासह भोजन प्रसाद मिळतो.
* सर्व शाखांमधूनसुद्धा यात्राकाळात भोजन-प्रसादाची व्यवस्था असते.
* वनवासी क्षेत्रात आवश्यकतेनुसार धान्यवाटप, तसेच दीपावलीच्या पर्वतावर मिष्टान्नासह भोजन प्रसाद तसेच कपडे वितरित केले जातात.
• आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या कुटुंबांना मदत, तसेच त्यांच्या मुलामुलींसाठी भोजन व्यवस्था करण्यात येते.
• वनवासी क्षेत्रात अंगणवाडी प्रकल्प चालविण्यात येतात.
• अवर्षण भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येते.

वारकरी शिक्षण संस्था

संस्थानद्वारा वारकरी शिक्षण संस्था चालविली जाते. या संस्थेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे लोक तयार केले जातात.

शेगावला येणाऱ्या दिंड्यांनां तसेच आळंदी, पंढरपूर येथेसुद्धा भजनी साहित्याचे वाटप केले जाते. या दिंड्यांनां टाळ, मृदंग तसेच वीणा दिली जाते. याबरोबरच संतवाङ्मयाचेसुद्धा वितरण केले जाते. अठरा हजारहून अधिक गावांतील दिंड्यांनां आतापर्यंत वरील साहित्य दिले गेले.


seva_1  H x W:

मुलांसाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांचे आयोजन केले जाते.

वेगवेगळ्या निमित्ताने कीर्तन प्रवचन याद्वारे प्रबोधन केले जाते.
• दर वर्षी आषाढी एकादशीच्या वारीसाठी श्रीगजानन महाराजांची पालखी पंढरपूर येथे जात असते. हा पालखी सोहळा विदर्भातील मोठा सोहळा आहे. विदर्भ मराठवाडा भागातील भाविकांना श्रीगजानन महाराजांच्या पालखीचे अत्यंत आकर्षण असते. सर्वच पालखी सोहळ्यांत असणारी शिस्त या सोहळ्यात विशेष रूपाने बघावयास मिळते.
• जनावरांसाठी, गोवंशासाठी आवश्यकतेनुसार चाऱ्याचे वाटप केले जाते.
• मतिमंद, कुष्ठरोगी यांच्यासाठी काम करणाऱ्यांना मदत केली जाते.
• पर्यावरण रक्षण-संवर्धनासाठी वृक्षारोपण कार्यक्रम राबविला जातो. आतापर्यंत दोन लाख तीस हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
• शेगाव व अन्य शाखांच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना शुद्ध पवित्र वातावरणात निवास व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी सर्व मिळून तीन हजार खोल्यांची व सामुहिक कक्षांची (डॉरमेट्री) असलेल्या भक्तनिवासाची निर्मिती करण्यात आली आहे, जेथे अत्यल्प दरात उत्कृष्ट निवास व्यवस्था व भोजन प्रसाद व्यवस्था होते. या भक्तनिवासांची तुलना तारांकित अतिथीगृहांशी करता येईल इतकी सुविधा व स्वच्छता येथे बघायला मिळते. विशेष म्हणजे भक्तिभावनेने येणाऱ्या यात्रेकरूंना बाजारी वातावरणात न राहता पवित्र व आध्यात्मिक वातावरणात राहायला मिळते.

संस्थान अशा अनेकविध प्रकारे समाजाची सेवा करण्याचे व्रत अखंडपणे चालवत आहे. विषेश म्हणजे या सर्व ४२ प्रकारच्या सेवा कार्यांची जाहिरातबाजी कोठेही केली जात नाही. समाजात तर असे अनुभव येतात की थोडेसेच करायचे आणि त्याची जाहिरात मात्र खूप करायची. पण अनेक वेळा तर संस्थानकडून झालेल्या मदतीचा उल्लेखसुद्धा करू दिला जात नाही. समाजाप्रती संपूर्णपणे आत्मीय भाव बाळगून महाराजांची आज्ञापालन करण्याचा सेवायज्ञ येथे निरंतर सुरू आहे.

आपत्तिकाळात संस्थान नेहमीच सेवेसाठी तत्पर असते. भूकंप, पूर, दुष्काळ, अग्निप्रकोप अशा स्वरूपातील कोणतीही नैसर्गिक आपत्ती आजूबाजूच्या विभागात घडली, तर सर्वतोपरी मदत करण्याची संस्थानाची परंपरा राहिली आहे.

कोविड-१९च्या या दुर्धर प्रसंगातसुद्धा सेवेचे व्रत अबाधितपणे सुरू आहे. मुख्य म्हणजे आरोग्यरक्षणासाठी खबरदारी म्हणून या काळात मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. महत्त्वाचा भाग असलेला पालखी सोहळा या काळात स्थगित करण्यात आला आहे. या संकटकाळात रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन प्रभावीपणे जे प्रयत्न करत आहे, त्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी संस्थानसुद्धा सेवाभावनेने सेवा उपक्रम राबवीत


seva_1  H x W:

कोरोना लॉकडाउनच्या काळात श्रीगजानन महाराज संस्थानकडून केलेले सेवा कार्य

* कम्युनिटी किचनअंतर्गत गरजूंना भोजन पाकिटांचे वितरण – बुलढाणा या जिल्हा मुख्यालयासह मलकापूर, मोताळा, शेगाव येथे, तसेच पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर व ओमकारेश्वर या संस्थेच्या शाखांच्या माध्यमातून प्रवासी मजूर, बेघर, निराधार गरजू बांधवांना दि. ०२ एप्रिल ते दि. १७ मेपर्यंत सुमारे ७२०० भोजन पाकिटांचे वितरण दररोज करण्यात आले.
* शेगाव येथे वैद्यकीय सेवा देणाऱ्या सामान्य रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स व अन्य इतर कर्मचारी मंडळींसाठी संस्थानने विसावा भक्त संकुल येथे निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली व चहा-नाश्ता-भोजन इ. सुविधा पुरविण्यात आली.
* परप्रांतीय मजुरांचा परत जाण्याचा मोठा विषय झाला होता. परिसरातील मजूर स्वस्थानी परत जात असतांना भुसावळ, अकोला, बडनेरा, शेगाव या रेल्वे स्थानकांवर प्रशासनाच्या मागणीवरून आवश्यकतेनुसार भोजन पाकिटे उपलब्ध करून दिली.
* या काळात संस्थानच्या वतीने जवळपास अडीच लाखाहून अधिक भोजन पाकिटांचे वितरण करण्यात आले. या सर्व भोजन निर्माण आणि वितरण प्रक्रियेमध्ये आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले गेले. सर्व काळजी घेऊन, सुरक्षित अंतर ठेवून हे कार्य केले गेले.

क्वारंटाइन युनिट उपलब्ध करून देणे –
* शेगावला विसावा भक्तसंकुल येथे ५०० खाटांचे सुसज्ज क्वारंटाइन युनिट उभारण्यात आले. या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. तसेच परदेशात शिक्षणासाठी गेलेले जे विद्यार्थी भारतात परत आले, त्यापैकी फिलिपाइन्स देशातून परतलेल्या विद्यार्थ्यांना येथे क्वारंटाइन करण्यात आले होते. या सर्व लोकांचे भोजन-चहा-नाश्ता ही सर्व व्यवस्था संस्थानकडून पुरविण्यात आली.

संस्थानच्या शाखांमधून झालेले सेवा कार्य

* पंढरपूर येथे संस्थानच्या शाखेत १०० खाटांचे सुसज्ज क्वारंटाइन युनिट तयार केले होते, ज्यामध्ये परप्रांतीय मजूर व कोविड संशयितांना क्वारंटाइन केले होते. त्याचीही भोजनादी व्यवस्था करण्यात आली होती. या शाखेत दररोज सकाळ-संध्याकाळ ५०० भोजन पाकिटांचे वितरण झाले.
* त्र्यंबकेश्वर येथेसुद्धा परिसरात दररोज ५०० भोजन पाकिटांचे वितरण करण्यात आले व येथे ७० खाटांचे क्वारंटाइन युनिट उभारण्यात आले.
आळंदी येथे परिसरात दररोज २५० भोजन पाकिटांचे वितरण करण्यात आले.
* ओमकारेश्वर येथे यादरम्यान गरजूंना दररोज ५०० भोजन पाकिटांचे वितरण करण्यात आले व तेथील जिल्हा प्रशासनाच्या विनंतीवरून अजूनही आवश्यकतेनुसार भोजन पुरविण्यात येत आहे.

जनजागृती - या संक्रामक व्याधीचा प्रसार रोखण्यासाठी संबंधित सर्व स्थानांमध्ये जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आला.

अशा प्रकारे या कोविड संकटात श्रीगजानन महाराज संस्थानने आपली सेवा परंपरा कायम राखली आहे. यासाठी महाराजांचा आशीर्वाद व प्रेरणाच कारणीभूत आहे, असे संस्थेचे संचालक विनयाने सांगतात!