सेंट ऑगस्टिन:

विवेक मराठी    03-Jun-2020   
Total Views |
सेंट ऑगस्टिन हा 'हिप्पोचा बिशप' म्हणूनही ओळखला जातो. खरे म्हणजे मध्ययुगीन कालखंडातला कट्टर ख्रिश्चन धर्मप्रसारक अशी त्यांची मुख्य ओळख आहे. इसवीसन ३५४मध्ये त्याचा जन्म झाला. ख्रिश्चन धर्माचा प्रसार हेच त्याच्या एकूणच जीवनाचे ध्येय होते. मात्र धर्मप्रसार करत असताना त्याने जे लेखन केले, ज्या नव्या गोष्टी मांडल्या, वेगळा विचार प्रस्थापित केला, त्यामुळे तो राजकीय विचारवंत आणि तत्त्वज्ञदेखील ठरला. एका अर्थाने प्राचीन आणि आधुनिक काळातील विचारवंतांमधील सेतू म्हणजे सेंट ऑगस्टिन होय.

Saint Augustine,  philoso
ऑगस्टिन आफ्रिकेमध्ये न्यू मीडिया या प्रांतात जन्मला. त्याची आई कट्टर ख्रिश्चन होती. हिप्पो या ठिकाणी बिशप म्हणून त्याने इसवीसनाच्या ३९६पासून ४३०पर्यंत काम केले. सेंट ऑगस्टिनच्या कालखंडामध्ये एक विशेष परिस्थिती होती. कॉन्स्टन्टाइन या सम्राटाने काही काळापूर्वी रोमन राज्यात राजधर्म म्हणून ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला होता आणि त्यानंतर थोड्याच काळात या रोमन साम्राज्याला एकदम उतरती कळा लागली. त्या दरम्यान काही लोकांनी असा विचार मांडायला सुरुवात केली की, ख्रिस्ती धर्म हा राजधर्म म्हणून स्वीकारला, या कारणामुळेच रोमन साम्राज्य लयाला जात आहे. काही लोकांनी तर जुन्या रोमन देवता कोप पावल्या आहेत, त्यामुळेच रोमन वैभव लयाला जात आहे, असे मांडणे सुरू केले. साध्याभोळ्या जनतेमध्ये अस्वस्थता पसरली. ख्रिस्ती धर्म योग्य की जुन्या काळचा ईश्वरवादी देवी-देवतांचा धर्म योग्य, हे त्यांना कळेनासे झाले आणि याच काळात ऑगस्टिनने या सर्व विषयावर लेखनास सुरुवात केली. त्याने रोमन वैभव आणि रोमन देवता यांचा परस्पर काही संबंध नाही, केवळ रोमन लोक गुणवान होते, म्हणून त्यांनी या राज्याला वैभवसंपन्न बनवले होते; आता त्यांच्या गुणवत्तेच्या ऱ्हासामुळे आणि दुर्गुणांच्या वाढीमुळे रोमन साम्राज्याचे वैभव कमी होत आहे, त्याचा ख्रिस्ती धर्माशी काहीएक संबंध नाही, हे लोकांना विविध मार्गांनी पटवून दिले.
'सिटी ऑफ गॉड' हे पुस्तक त्याने दर वर्षी काही भाग असे करत करत सलग १३ वर्षे लिहिले. त्या काळातील समाजासमोर निर्माण झालेल्या प्रत्येक समस्येला या पुस्तकातील एकेका भागामुळे उत्तरे मिळत गेली आणि ख्रिस्ती धर्म व चर्च यावर होणारे आरोप ऑगस्टिनने खोडून काढले.
हे करत असतानाच त्याने अशा काही संकल्पना मांडल्या, ज्या तत्त्वज्ञान म्हणून श्रेष्ठ ठरल्या. त्यातीलच एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे ईश्‍वरी राज्याची संकल्पना होय.
त्या काळामध्ये राजसत्ता श्रेष्ठ की धर्मसत्ता श्रेष्ठ? याविषयी विचारवंत भरपूर चिंतन करत असत. सेंट ऑगस्टिनही या गोष्टीला अपवाद नव्हता. त्याने ऐहिक राज्य आणि ईश्वरी राज्य अशी दोन राज्ये पृथ्वीतलावर असतात असे मानले. त्यातील एक राज्य आणि दरोडेखोर हे एकसारखेच असतात, मात्र दरोडेखोरांच्या टोळीपासून राजसत्ता भिन्न आहे, वेगळी आहे असे सिद्ध करायचे असेल तर राजसत्तेने परमेश्वराची प्रमुख सत्ता मान्य केली पाहिजे, नैतिक तत्त्वे स्वीकारली पाहिजेत, धर्मबंधने मान्य केली पाहिजेत असे तो म्हणतो.

आपले उदाहरण स्पष्ट करताना तो लिहितो की, दरोडेखोरांची टोळी लुटालूट करते. मात्र आपसामध्ये त्यांचे नियम ठरलेले असतात. ते लुटीची त्यानुसार वाटणी करतात आणि ते शिस्तबद्ध असतात. राजसत्तादेखील लोकांकडून कर घेते. त्या करांचा नागरिकांसाठी वापर करते. एका अर्थाने लूट करण्याचा हा प्रकार आहे. येथे विरोधकांना शासन केले जाते, काही कायदेदेखील असतात. परंतु ऐहिक राज्य दरोडेखोरांच्या टोळीपासून भिन्न तेव्हाच ठरते, जेव्हा समाजात एकाच परमेश्वरावर नागरिकांची श्रद्धा असेल. प्रेमाच्या व सहकार्याच्या जोरावरच समाजसुधारणा होऊ शकते. त्यामुळे राजाने परमेश्वरी अधिसत्ता मान्य केली, तरच येथे न्याय राहू शकतो असे सेंट ऑगस्टिन म्हणतो.

यानंतर सेंट ऑगस्टिन ईश्‍वरी राज्याची विशेष कल्पना मानतो. या कल्पनेमुळे ऑगस्टिन हा कट्टर ख्रिस्ती धर्मप्रसारक असूनही तत्त्वज्ञ ठरला. या संकल्पनेमुळे पुढे चालून नवनव्या आंतरराष्ट्रीय संघटना एकसंघपणे काम करू शकल्या.

एखादी संकल्पना पहिल्यांदा मांडण्याचे श्रेय निश्चितच महत्त्वाचे असते. त्या दृष्टीने
सेंट ऑगस्टिनने मांडलेली ईश्‍वरी राज्याची संकल्पना महत्त्वाची ठरते. ती नेमकी काय आहे, ते आपण समजून घेऊ.

आधुनिक काळात आपण स्काऊट-गाइड, रोटरी क्लब, कम्युनिस्ट इंटरनॅशनल, लायन्स क्लब, इस्कॉन मिशन, चिन्मय मिशन, सहजयोग यासारख्या वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटना पाहत असतो. जागतिक स्तरावर, वेगवेगळ्या भूभागांवर त्यांचे समान कार्य सुरू असते. एका अर्थाने भिन्न भूभागावर असूनही ही सर्व मंडळी 'एकाच राज्यात' राहत असतात. जगाच्या इतिहासात सेंट ऑगस्टिन यांनी या प्रकारचा बोध पहिल्यांदा मांडला, असे मानले जाते.

ईश्‍वरी राज्य हे विशाल असून त्याची सदस्यता विशाल आहे, असे ऑगस्टिन म्हणतो. या राज्याचे प्रतिनिधी केवळ ईश्वराला उत्तरदायी असणार असेही तो सांगतो. न्याय आणि शांती हे दोन सद्गुण या राज्यांमध्ये असतात, असे तो म्हणतो. या राज्यातील सदस्य हे सद्गुणी लोक, देवदूत, संत, उत्तम नीतिमत्ता असणारे आणि ख्रिस्ती धर्माला शरण गेलेले असेच असू शकतील, असे तो सांगतो.
माझा वंश मोठा आहे, विशेष आहे, मी विशिष्ट वर्गाचा आहे किंवा मी विशिष्ट वर्णाचा आहे म्हणून कोणीही ईश्वरी राज्याचा नागरिक होऊ शकणार नाही. त्याला या सत्तेचे सदस्यत्व मिळण्यासाठी धर्मतत्त्वे स्वीकारून ती आचरणात आणावी लागतील, असे त्याने आपल्या पुस्तकात सांगितले आहे.
ईश्वरी राज्याचे प्रतिनिधी नागरिक वेगवेगळ्या भूभागावर राहत असले - म्हणजे जगाच्या विविध भागांमध्ये विखुरलेले असले, तरी ते एकाच राज्याचे नागरिक असतील. त्यांना लाभलेले ऐहिक राज्य हे कदाचित त्यांच्या विचारांचे असेल किंवा नसेलही, मात्र त्यामुळे त्यांच्या जीवनात काहीही फरक पडणार नाही. कारण त्यांची अधिसत्ता ही ईश्वरी राज्याची अधिसत्ता असते, स्वार्थप्रेरित ऐहिक राज्याची नव्हे.
या ईश्वरी राज्याच्या प्रतिनिधींना आपल्या जीवनाचे ध्येय हे आपल्या आंतरिक राज्यास अनुकूल ठरवता येते. त्यानुसार जीवन जगता येते. जर आपल्या विचारांचे धर्मसत्ता मान्य करणारे ऐहिक राज्य लाभले, तर दुधात साखरच!!
इसवीसनाच्या चौथ्या शतकात हा विचार अत्यंत अभिनव होता. सेंट ऑगस्टिनने 'सिटी ऑफ गॉड' आणि 'कन्फेशन' ही दोन मुख्य पुस्तके लिहिली. त्यातील 'सिटी ऑफ गॉड' हे अनेक खंडांचे दीर्घ प्रबंधात्मक पुस्तक आहे. त्याने दुहेरी सत्तेची कल्पना पहिल्यांदा मांडली व पोप आणि सम्राट दोघेही परमेश्वराला जबाबदार आहेत आणि परमेश्वरी सत्तेच्या सेवेसाठीच भौतिक सत्ता निर्माण झालेली आहे, हे त्याने वारंवार मांडले. ईश्वरी राज्यातील लोक भलेही परस्परांपासून दूर असले, तरी त्यांची एकाच ईश्वरावरील निष्ठा आणि श्रद्धा यामुळे त्यांच्यात बंधुभाव, प्रेम, त्याग आणि एकत्रित कार्य करण्याची भावना हे स्वाभाविकपणे दिसून येते, असे सेंट ऑगस्टिन म्हणतो. अगदी याच धर्तीवर आपण विविध प्रकारच्या सामाजिक धार्मिक, आध्यात्मिक, राजकीय, वैज्ञानिक, आर्थिक संघटना आज आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुभवतो.

सेंट ऑगस्टिनने हा विचार पहिल्यांदा लिहून काढला, लोकांसमोर आणला. कॅथलिक ख्रिश्चन धर्मामध्ये त्याच्यानंतर जवळपास आठशे ते हजार वर्षे कोणीही नवा तत्त्वचिंतक उदयास आला नाही, कोणताही नवीन राजकीय विचारही या कालखंडामध्ये उदयाला आला नाही, हे एक आश्‍चर्यच म्हणावे लागेल!!

एक कट्टर ख्रिस्ती धर्मप्रचारक म्हणून मान्यता असलेला हा आगळावेगळा तत्त्वज्ञ आणि राजकीय विचारवंत सेंट ऑगस्टिन यामुळेच ऐतिहासिकदृष्ट्याही वेगळा ठरतो. प्लेटो आणि ऍरिस्टॉटल यांच्यानंतर प्राचीन काळातील शेवटचा व मध्ययुगीन काळातील पहिला विचारवंत म्हणजे सेंट ऑगस्टिन होय.