कोरोनानंतरचं जग आणि जगणं

विवेक मराठी    03-Jun-2020
Total Views |
@डॉ. उमेश मुंडल्ये

आपल्याला, विशेषत: शहरांमध्ये गेली काही वर्षं पहाट म्हणजे वेगवेगळ्या रसायनांचा आणि प्रदूषण करणाऱ्या वायुंचा तीव्र वास, वाहनांचा आवाज आणि धूर असाच अनुभव झाला होता. कोरोनाच्या राष्ट्रव्यापी गृहबंदीत मात्र सध्या किमान माझी तरी पहाट सुरू होते ती दयाळ, नाचण, बुलबुल, शिंपी आणि चिमण्याचा किलबिलाट यामुळे. आमच्याकडे औदुंबर वृक्ष असल्याने आमच्याकडे पक्षी भरपूर असतात. सध्या येत असलेला अनुभव येणं गेली काही वर्षं बंद झालं होतं. पण सध्याचा, म्हणजे २४ मार्चनंतरच्या काळातील अनुभव म्हणजे अगदी माझ्या लहानपणीची आजोळची आठवण यावी तसा आहे. पारिजातक, अनंत वगैरे फुलांचा वास, पक्ष्यांचा किलबिलाट, स्वच्छ हवा इत्यादी लहानपणी घेतलेले अनुभव परत मिळण्याचा काळ आहे सध्या. टाळेबंदी झाल्यावर बदललेल्या या सर्व गोष्टींनी जग बदललं आहे.

The world and living afte 
कायदाप्रिय नागरिक असल्याने गृहबंदीच्या काळात उगाचच घराबाहेर जाणं टाळलं आणि त्यामुळे घरी रिकामा वेळ भरपूर मिळाला. सोशल मीडिया नामक अद्भुतरम्य जगातील एकूण वातावरण बघितलं, तरी 'काय करू नये' याचं उत्तम मार्गदर्शन होतं. पण त्यात जीव फारसा रमत नाही. मग काम, त्यातील प्रश्न आणि अनुभव, आजूबाजूच्या घटनांचं निरीक्षण इत्यादी गोष्टींवर आपोआप विचार सुरू होतो आणि मग काही प्रश्नांची उत्तरं शोधताना नवीन प्रश्न समोर येतात.
उत्क्रांत झालेला असला तरीही माणूस हा एक प्राणीच आहे आणि मनुष्यप्राण्याला कितीही प्रेमाने, रागाने, शिस्तीने शिकवलं तरीही त्याचा स्वार्थ काही कमी होत नाही, किंबहुना, जास्त शिक्षणाबरोबर येणाऱ्या नवीन जीवनशैलीमुळे गरजा वाढत राहतात आणि त्याचा ताण नैसर्गिक स्रोतांवर पडतो. त्यातच, गरजा पूर्ण करण्यात आणि नवीन गरजा तयार करण्यात सगळं कौशल्य खर्च होत असल्याने स्वार्थ असीमित झाला आहे. पण याच असीमित स्वार्थामुळेच एक गोष्ट नक्की बदल घडवू शकते आणि ती म्हणजे 'भीती' किंवा 'दहशत'.

याचे अनेक पुरावे आहेत. पण सध्याचा ताजा ताजा पुरावा म्हणजे कोरोना साथ!
जगभरचे बहुसंख्य लोक स्वत:च्या जिवाच्या भीतीने आगाऊपणा सोडून गप्प घरी बसलेत. हे केवळ ज्ञान देऊन शक्य होईल असं मला तरी एकूण अनुभवांवरून वाटत नाही. आणि जिवाच्या भीतीने आपले बहुतेक सगळे व्यवहार बंद करून फक्त माणूस हा एकच प्राणी घरी बसल्यावर वातावरण किती बदलतंय! शहर असो वा गाव, सगळीकडे हवा एकदम स्वच्छ झाली आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे वाहनं, उद्योग यातून होणारं ध्वनी आणि वायुप्रदूषण लक्षणीयरीत्या कमी झालंय. माणसाने अगदी गटार करून टाकलेल्या नद्या स्वच्छ होत आहेत, अगदी गाव पातळीवरील लहान लहान नद्याच नव्हे, तर अगदी उल्हास नदी ते गंगा नदी सगळीकडे पाणी स्वच्छ होतंय. अगदी गंगेचं पाणी थोड्याशा प्रक्रियेनंतर पिण्यायोग्य होऊ शकतं, यावर कोणाचा विश्वास बसला असता? माणूस गप्प बसल्यावर अगदी शहरातही किती पक्षी दिसायला लागले, रोज पहाटे त्यांचा किलबिलाट होऊन जाग येणं किती आनंददायक असतं, हे शहरातल्या नवीन पिढीलाही सहज कळायला लागलंय.

The world and living afte

माणसाने प्रगती करताना निवडलेल्या रस्त्याने जाताना जंगल संपवत आणलं, उद्योगांमुळे नैसर्गिक स्रोतांचा अतिवापर चालू केला, त्यामुळे आणि इतर ध्वनी, वायू आणि जल प्रदूषण यामुळे त्या भागातील पक्षी, प्राणी आणि वनस्पती सृष्टी धोक्यात आली. जेमतेम एक महिना (खरं तर त्यापेक्षाही कमी काळ) माणूस स्वत:च्या जिवाच्या भयाने रोजची कामं, उद्योग, नोकरी, व्यवसाय इत्यादी गोष्टी कमी किंवा पूर्ण बंद करून घरी बसला, तर गेल्या साठ-सत्तर वर्षांमध्ये निसर्गात केलेली ढवळाढवळ निसर्गाने अलगद बाजूला करून ठेवली आहे असं दिसतंय. माणसाने जिथे जिथे अतिक्रमण केलंय, तिथले मूळ रहिवासी परत दिसायला लागलेत. मग कुठे साप वगैरे घरात येत आहेत, तर कुठे जंगली श्वापदं.
 
अर्थात, माणूस हे करतोय ते केवळ 'जिवाची भीती' या एका गोष्टीमुळे. पण हेही नक्की की या संकटातून बाहेर पडलेली माणसं परत त्याच चुका करणार, याबद्दल किमान मला तरी काहीही शंका नाही. फक्त त्या चुकांचा वेग मर्यादेत असेल तर संकट जास्त काळ लांब राहू शकेल.
 
स्वत:ला शहाणा मानणाऱ्या माणसाने गेली कित्येक वर्षं 'Save nature', 'Save Tiger', नदी वाचवा, जंगल वाचवा इत्यादी चळवळी केल्या. त्यात मर्यादित यशही मिळवलं. खूप संस्थांचा संसारही त्यावर पार पडला. पण मुळात हा याला वाचवा, त्याला वाचवा हा अहंकारी विचार माणसाच्या मनात आला, याचीच गंमत वाटते. माणूस काय निसर्ग वाचवणार? माणूस हा काही उत्पादक नाही निसर्गात, तो केवळ एक ग्राहक आहे आणि अडेलतट्टू ग्राहक आहे. जे काही प्रयत्न केले जात आहेत ते निसर्गावर प्रेम म्हणून नाही, तर माणसाला स्वत:चा जीव वाचवायचा आहे म्हणून आहेत. वातावरणातील समतोल ढासळायला माणूस हाच प्राणी जबाबदार आहे आणि तो गप्प बसला तर निसर्गाचं जास्त चांगलं चालतं, हासुद्धा या माणसाच्या गृहबंदीचा धडा आहे.
 
 
आताच्या - म्हणजे कोरोना आल्यानंतरच्या जगात अनेक बदल घडलेत. सध्या ते नाइलाजाने किंवा बळजबरीने स्वीकारले असले, तरी त्यातून पुढच्या जीवनशैलीची एक चुणूक आपल्याला बघायला मिळाली आहे. २४ मार्च २०२०नंतर जगामध्ये अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत. आपल्यापैकी अनेकांना ते तात्पुरते वाटत असले, तरी थोडा विचार केला आणि आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल की आता यापुढे काही नियम आपल्याला पाळावे लागणार आहेतच. मग ते आपल्याला आज जाचक किंवा अतिरेकी वाटले तरीही.
 
गृहबंदीच्या काळात आपण उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. ते प्रयत्न सध्या तरी केवळ कोरोना रोगावर लस आणि औषधं शोधणं इतकेच सीमित झालेले दिसत आहेत. कोरोना हे एक कारण आहे, या निमित्ताने आपण आपल्या जीवनशैलीत काही बदल करायची गरज आहे का यावर विचार करून, योग्य मार्ग शोधून त्या मार्गाने पुढचा प्रवास करायची गरज आहे. माझ्या दृष्टीने आपण या संकटातील संधीचा उपयोग करून घेऊन आपल्या जीवनशैलीत बदल करताना कोणते मुद्दे लक्षात घ्यायला हवेत, ते थोडक्यात सांगतो. यात अनेक मुद्द्यांची भर पडत जाणार आहे याची मला कल्पना आहे, पण सुरुवात करताना ठळक मुद्दे घेऊन करावी या विचाराने मुद्दे मांडतो.
 
विशेषत: शहरांमध्ये, जिथे लोकसंख्येची घनता खूप जास्त आहे तिथे, ही घनता कमी करण्याकडे आपली वाटचाल चालू करायची गरज आहे. कोरोनाचा हा एक धडा आहे. आत्ताही, जिथे गर्दी जास्त, तिथे कोरोन पसरण्याची भीती जास्त हे लक्षात आल्यानेच गृहबंदीसारखा टोकाचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. गृहबंदी हा केवळ रोग पसरू नये म्हणून केलेला प्राथमिक उपाय होता, हे अनेक लोकांच्या - खरं तर प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील लोकांच्या लक्षात आलंय, असं आपल्याला येत असलेल्या अनुभवावरून वाटत नाही. घनता कमी करणं हे सांगायला सोपं वाटत असलं, तरी प्रत्यक्षात आणायला कठीण काम आहे. आजची आपली लहान-मोठी शहरं बघितली तर हे सहज लक्षात येतं की आपल्या आजच्या विकासात 'नागरीकरण आणि औद्योगिकीकरण' हे दोन अनिवार्य घटक आहेत असाच बहुसंख्य लोकांचा समज आहे. याचा अतिरेक झाल्याने कमी जागेत जास्त लोकसंख्या एकत्र झाल्याने साथीच्या रोगांमध्ये असा दाटीवाटीने वसलेला भाग लवकर धोक्याची वरची पातळी गाठतो, असा अनुभव आपण घेतला आहे. त्यामुळे, या लोकसंख्येच्या घनतेवर आपल्याला परिणामकारक उपाय शोधायची नितांत आवश्यकता आहे. सध्या सगळ्यात जास्त प्रचलित शब्द आहे 'social distancing' म्हणजे सामाजिक अंतर. खरं तर हे 'वैयक्तिक अंतर' म्हणणं जास्त सयुक्तिक होईल, असं मला वाटतं. दोन माणसांमध्ये ठेवायचं किमान अंतर. सध्याच्या काळात हे नेहमीच्या पद्धतीने जगताना करणं जमणार नाही म्हणून जो टोकाचा निर्णय घेतला गेला, तो म्हणजे गृहबंदी. जर आपल्यापैकी बहुसंख्य लोकांना हे वैयक्तिक अंतर ठेवत वावरणं जमलं असतं, तर गृहबंदी लवकर हटवता आली असती. पण विकासाच्या या मार्गामध्ये 'गर्दी' हा घटक महत्त्वाचा असल्याने लोकसंख्येचं ध्रुवीकरण होऊन अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विकेंद्रित विकास हाच एक व्यावहारिक मार्ग आहे. पण तो सोपा बिलकुल नाही आणि त्यात वेळ आणि पैसा जास्त खर्च होणार आहे.
 
दुसरा महत्त्वाचा घटक आहे 'संयम'. औद्योगिक संपन्नतेकडे जाताना तंत्रज्ञान जसं प्रगत होत जातंय, तसतसा आपला सर्वांचा संयम कमी होत चालला आहे. अगदी सध्या सध्या गोष्टींमध्ये हे आपल्याला सहज कळून येईल. माझ्या मनात आलं की ते मला लगेच करता आलं पाहिजे, मिळालं पाहिजे, नाहीतर माझ्या मानसिक शांततेवर त्याचा लगेच परिणाम होतो, हे आपल्यापैकी बहुसंख्य लोकांच्या लक्षातच येत नाहीये. आपल्या जगण्याच्या प्रवासाचा वेग आपणच इतका वाढवून ठेवला आहे, की आता जिवाच्या आकांताने आपण नुसते धावत सुटलोय. आणि हे किती फोल आहे हे गेल्या दोन महिन्यांमध्ये अनुभवाला आलंच आहे. 'माझ्याशिवाय' माझ्या उद्योगाचं, कंपनीचं, व्यवसायाचं काही चालणार नाही, हा धावण्याच्या मागचा विचार होता. पण या काळात हे लक्षात आलंय की असं काही नसतं. आधी तुम्ही जिवंत आणि तंदुरुस्त राहणं आवश्यक असतं. ते झालं तर बाकीच्या गोष्टींना किंमत असते. त्यामुळे, यापुढे 'संयम' हा गुण वाढवणं ही महत्त्वाची गोष्ट असणार आहे.
जीवनशैली हा एक महत्त्वाचा भाग आहे. आपली सध्याची जीवनशैली ही आपली इच्छेवर किंवा विचारांवर अवलंबून नाहीये, तर ती उद्योगांच्या जाहिरातीत दाखवल्या जाणाऱ्या कल्पनाचित्रांना बळी पडल्यासारखी आजची स्थिती आहे. आपल्याला कमी पडणाऱ्या गोष्टी म्हणजे गरजा आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण आपली बुद्धी आणि प्रयत्न वापरायचे, हा विचार आता फार कमी झालेला आहे आणि अनेक निरुपयोगी किंवा अनावश्यक गोष्टी म्हणजे गरजा असा नवीन विचार रुजला आहे आणि नवीन गरजा निर्माण केल्या गेल्या आहेत. समाजातील संपन्नतेची ओळख म्हणून लोकांच्या मनात हे खोलवर रुजल्याने हा धावण्याचा वेग अचानक वाढला आहे. यावर आपल्याला नियंत्रण मिळवावं लागणार आहेच. मग ते आपल्याला पटलं म्हणून असेल किंवा ते करण्याची अनिवार्यता म्हणून असेल. यावर खूप काम करायची गरज आहे एक समाज म्हणून.

The world and living afte 
आवश्यकता आणि गरज यामधला फरक ओळखून आणि त्याचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा विचार करून त्याप्रमाणे आपल्याला आपली मार्गक्रमणा करायची आवश्यकता आहे. सध्या आपण सगळे नैसर्गिक स्रोत फक्त माणसासाठीच आहेत अशा समजातून आपल्या वाढत्या गरजांनुसार वाट्टेल ते बदल घडवून आपल्याला हवं ते बळजबरीने मिळवतो आहोत. या गोष्टीचा फार गंभीर विचार आपल्याला करावा लागणार आहे. खरं तर यालाही उशीरच झाला आहे, पण 'माणूस' हा प्राणी शांतपणे घरी बसला, तर निसर्गातील सर्व घटक किती वेगाने समतोल साधण्याच्या दिशेने जाताना दिसायला लागले! म्हणजेच, नैसर्गिक समतोल साधण्याच्या दृष्टीने विचार केला तर आपण किती नुकसान पोहोचवतो आहोत हे आपल्या सहज लक्षात येईल. खरं तर हे लक्षात येत नाही असंही नाही, पण तात्कालिक छोट्या फायद्यासाठी आपण या सर्व चुकांकडे दुर्लाक्ष करत आहोत. यातून आपण आपल्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं करतोय हे एकतर आपल्या लक्षात येत नाहीये किंवा आपल्याला वेगाने जाताना हे दिसूनही आपण जाणूनबुजून दुर्लक्ष करून आपला भविष्यकाळ संकटात टाकतो आहोत.
वर सांगितलेल्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेतच. आपण या बदलांची सुरुवात कधी करणार, यावर पुढचा प्रवास अवलंबून राहील. हा प्रवास सुखकर करायचा असेल तर त्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट काय हे बघितलं तर लक्षात येईल, की यापुढे एक अत्यंत महत्त्वाचा गुण आपल्याला अंगात रुजवावा लागणार आहे, तो म्हणजे 'स्वावलंबन'. गेल्या दोन महिन्यांमध्ये याचं महत्त्व आपल्याला नक्कीच कळलं आहे असं म्हणायला कोणाची हरकत नसावी. माझ्या दृष्टीने हा सर्वात आवश्यक गुण आहे, जो प्रत्येकाने गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.
  
माणूस हा प्राणी उत्क्रांत होताना जास्त विचार करत गेला आणि विचार करू शकणं आणि भविष्याचा विचार करू शकणं या दोन गोष्टींमुळे माणसाची प्रगती होत गेली, असं आपण आपल्या उत्क्रांतीबद्दल म्हणू शकतो. माणूस केवळ आपल्या प्रजातीपुरता विचार आणि कृती करतोय, ज्यामुळे निसर्गातील समतोल ढासळत चालला आहे. नैसर्गिक स्रोत, साधनसंपत्ती या गोष्टी आपल्या गरजा पुरवू शकतात, आपली हाव पूर्ण करू शकत नाहीत, हे आपण अजूनही समजू शकत नाही आहोत. त्यामुळे आजही, चुकीच्या संकल्पनांच्या आणि विचारांच्या मागे धावत असताना आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना संकटात टाकत आहोत. आणि बरेचदा याची जाणीवही आपल्याला नाहीये, ही आजची वस्तुस्थिती आहे.
 
स्वावलंबन, शिस्त, संयम या अनेकांना 'त्रासदायक किंवा अडचणीच्या' वाटणाऱ्या आचारविचारांचा पुनर्विचार करून आपल्या वागण्यात आवश्यक बदल करून पर्यावरणातील समतोल साधण्यासाठी आणि मग तो टिकवून ठेवण्यासाठी काम करणं ही अनिवार्य बाब झाली आहे. अर्थात, आपल्याला चांगल्या वातावरणात सुरक्षित जगायची इच्छा असेल तर. नाहीतर जे चालू होतं तेच आपण परत करणार आहोत. पुन्हा काही नवीन संकट येईल, त्यावर प्राथमिक उपाय करून आपण आपल्या मार्गावरून झगडत पुढे जात राहू, हे नक्की. प्रत्येक वेळी आपल्याला शहाणं होण्यासाठी कोणा विषाणूची गरज कुठे आहे? मुद्दा फक्त हा आहे, की हे आपण शिकून जीवनशैलीत बदल करणार की परत मागच्याच मार्गाने पुढे जायला लागणार? काळच सांगेल आपण यातून काही शिकलो आहोत का ते.