जोगवा

स्रोत: विवेक मराठी    दिनांक30-Jun-2020   
|


pandharpur ashadhi ekadas

अनादि
निर्गुण प्रगटली भवानी

मोह महिषासुर मर्दनालागुनी

त्रिविधतापाची कराया झाडणी

भक्तालागोनी पावसी निर्वाणी ॥१

आईचा जोगवा जोगवा मागेन

द्वैत सारुनी माळ मी घालीन

हाती बोधाचा झेंडा मी घेईन

भेदरहित वारीसी जाईन ॥२

नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा

करूनी पोरी मागेन ज्ञानपत्रा

धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा

दंभ संसार सांडीन कुपात्रा ॥३

पूर्ण बोधाची घेईन परडी

आशा तृष्णेच्या पाडीन दरडी

मनोविकार करीन कुर्वडी

अद्भुत रसाची भरीन दुरडी ॥४॥

आतां साजणी जालें मी नि : संग

विकल्प नवऱ्याचा सोडियला संग

कामक्रोध हे झोडियले मांग

केला मोकळा मारग सुरंग ॥५

ऐसा जोगवा मागुनी ठेविला

जाऊनी महाद्वारी नवस फेडिला

एकपणे जनार्दन देखिला

जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥६

आज आपण जोगवा मागणार आहोत. या भारूडाला 'जोगवा' असे संबोधतात. या 'जोगवा' नामक भारुडात आपल्याला साधकाच्या पारमार्थिक प्रवासातील प्रगतीचे टप्पे दिसतात. साधकाला प्रथम त्रिविध ताप दूर करावे लागतात. द्वैत भाव पूर्णपणे विसरावा लागतो. आत्मबोध प्राप्त करून घेण्याचा निश्चय करावा लागतो. आपली पारमार्थिक प्रगती करून घेण्यासाठी नवविधा भक्तीचा मार्ग सांगितलेला आहे. ही भक्तीची साधना करावी लागते. अहंकार, दंभ, आशा तृष्णा हे मनोविकार मागे सोडून द्यायचे असतात. षड्रिपू जिंकावे लागतात. हीच आपली पारमार्थिक वाटचाल आहे. याचे फळ म्हणून शेवटी मोक्षाचा लाभ घडतो. जोगवा मागताना संत एकनाथांनी भक्ताने करावयाच्या साधनेचा सुसंगत तपशील दिला आहे याचे अतिशय सुंदर चित्र रेखाटले आहे.

देवी भवानीचे नाव घेऊन या भारूडातील स्त्री दारोदार जाऊन जोगवा म्हणजे भिक्षा मागते. जोगवा सादर करताना आपला लोकगायक महिलेची भूमिका घेऊन म्हणतो, "वास्तविक पाहता आदी जननी भवानी देवी ही अनादि म्हणजे अजन्मा आहे. ती निर्गुण म्हणजे गुणरहित आहे. सत्त्व , रज तम या त्रिगुणांच्या पलीकडे ती आहे. भक्तांना छळणाऱ्या मोहरूपी महिष राक्षसाला ठार मारण्यासाठी ती देवी सगुण होऊन प्रगट झाली आहे. मोह , मद , मत्सर इत्यादी सहा शत्रू जीवाला सतत त्रास देत असतात. ते नष्ट करण्यासाठी या भवानीने अवतार घेतला आहे. आधिदैविक, आधिभौतिक आणि अध्यात्मिक असे तीन प्रकारचे ताप दूर करून अखेरीस भवानी आपल्या भक्तांना पावते आणि त्यांच्यावर ती प्रसन्न होते. भवानी आईच्या नावाने मी जोगवा ( म्हणजे भिक्षा ) मागेन. द्वैत भाव दूर करून मी अद्वैताची माळ गळ्यात घालीन, बोधाचा म्हणजे आत्मानुभवाचा झेंडा मी हातात घेईन. मनात अद्वैत भाव ठेवून मी वारी करण्यासाठी जाईन. श्रवण, कीर्तन, इत्यादी नवविधा म्हणजे नऊ प्रकारच्या भक्तीचे नवरात्र मी साजरे करीन, देवीने मला आत्मज्ञान द्यावे, असे लेखी आश्वासन मी तिच्याजवळ मागेन. माझ्या अंत:करणात मी सद्भाव ( शुभ भावना ) धारण करीन, दांभिकपण अयोग्य विचारांचा पसारा मी सोडून देईन. माझ्याजवळच्या फुलांच्या परडीत मी पूर्ण आत्मबोध भरून घेईन, संसारातल्या वासना आणि तृष्णा ( तहान ) यांच्या दऱ्या मी नष्ट करून टाकीन. माझ्या मनातील सर्व विकल्प तिच्यावरून मी ओवाळून टाकीन. देवीच्या दर्शनाचा अद्भुत आनंद मला लाभेल, त्या अदभुत रसाने माझी कायारूपी टोपली भरून जाईल. सखे , मी आता नि:संग झाले आहे . माझे मन कशातही गुंतलेले नाही . संशयरूपी पतीचा मी त्याग केला आहे. वासना आणि राग या दोन शत्रूना मी मारले आहे. अशा रीतीने परमार्थाकडे जाणारा मार्ग मी मोकळा स्वच्छ करून ठेवला आहे. माझ्या अध्यात्मपर मनोकामनांची भिक्षा मी देवीजवळ अशा प्रकारे मागितली. मंदिराच्या महाद्वाराजवळ जाऊन मी नवस फेडला. एकाग्रतेने जनार्दनाचे दर्शन मी घेतले. त्यामुळे माझ्या जन्ममरणाचा फेरा चुकला. मोक्षाची प्राप्ती मला झाली. अशा रीतीने या जोगव्यात संत एकनाथांनी सुंदर रूपक योजले आहे.