पुरोगामिनी सावित्री

विवेक मराठी    04-Jun-2020
Total Views |
उद्या असलेल्या वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर, सावित्रीचं वेगळेपण, मोठेपण सांगणारा लेख. सावित्रीची ही गुणवैशिष्ट्यं समजून घेऊया. आजच्या काळाशी सुसंगत असं जे वाटेल ते आत्मसात करायचा प्रयत्न करूया.

सत्यवानाच्या आधीच कुटीच्या दरवाजाबाहेर उभी राहून सावित्री त्याची वाट पाहत होती. आजच्या दिवसाकरता गेलं वर्षभर तिने सिद्धता केली होती. तिने सत्यवानाला वरलं, तेव्हाच तिच्या विलक्षण संकल्पयात्रेचा आरंभ झाला होता.


svitari_1  H x
अंधत्वामुळे व दुर्भाग्याने राज्य गमावल्यानंतर वनात आश्रयाला आलेल्या द्युमत्सेन राजाचा पुत्र सत्यवान.
धनुर्विद्या, अश्वविद्या यासह राजनीती, अर्थनीती, धर्मशास्त्र सर्वात पारंगत, अतिशय देखणा , लोभस, नम्र आणि सौम्य स्वभावाचा सत्यवान! असा ज्ञानसंपन्न, रूपसंपन्न जामात निवडला या आनंदाचं आयुष्य काही क्षणांचंच ठरलं अश्वपती व त्याच्या पत्नीकरिता. नारदमुनींनी ती कटू भविष्यवाणी उच्चारताच अश्वपतींच्या राजप्रासादावर जणू वीज कोसळली होती. मातेचा आकांत, पित्याची साशंकता याने सावित्री ढळली नाही. नारदमुनींच्या "तिला हवं ते करू द्या" एवढ्या संकेतावर लेकीच्या निवडीचा आदर करायला हे मातापिता तयार झाले. या चौघांच्या मुठीत आता हे बोचरं सत्य बंद झालं होतं की सत्यवानाच्या हातात फक्त बारा मास आहेत!
द्युमत्सेनाचा परिवार राहत असलेल्या शाल्ववनातल्या विशाल, दीर्घजीवी वृक्षांच्या साक्षीने आणि पक्ष्यांच्या मधुर कूजनाच्या मंत्रोच्चारात सावित्रीचा हात सत्यवानाने ग्रहण केला. वधुवरांच्या मुखावरून अोसंडून वाहणार्‍या अवर्णनीय आनंदाशिवाय कोणतीच सजावट नव्हती नि त्यांच्या नेत्रातून झरणार्‍या प्रेमाव्यतिरिक्त कोणताच शृंगार नव्हता.. पण पाहणार्‍यांना एकमुखाने म्हणावंसं वाटत होतं की अगदी एकमेकांकरताच बनलं आहे हे युगुल!
विवाहानंतर अनेक वर्षं संतानप्राप्तीकरता अश्वपतीने केलेल्या घोर साधनेचं मधुर, तेजस्वी फळ होती सावित्री. हे निर्व्याज, रसरशीत फळ त्या क्रूर भविष्यापुढे टाकून परतताना, वृत्तीने योगी असलेल्या अश्वपतीचं मनही कळवळलं. राणीचा विलाप तर थांबतच नव्हता. जनांना वाटलं की राजकन्येला अशा कष्टप्रद वनात सोडावं लागल्यानेच दोघे शोकाकुल झाले आहेत..
 
सावित्रीने या सत्याचा निखारा मनावर बाळगला होता, पण त्याची धग मनाला लागू न देता. ना कधी या जाणिवेने तिची मुद्रा म्लान झाली, ना मुखावर चिंतेची सूक्ष्मही लकेर कुणा दिसली! भयाला नखं रोवू दिली तर त्या क्षतांमधून आपलं धैर्य वाहून जाणार, हे जाणून तिने कधी भीतीला फिरकूच दिलं नव्हतं आसपास.
 
 
वर्षभराच्या या साधनेच्या प्रवासात सावित्री अखंड सावध होती. वस्तूंच्या, भोगांच्या आनंदात तिला अडकायचं नव्हतं. कोणताही मोह तिला तिच्या ध्येयापासून विचलित करू शकला नाही. तिला लढायचं होतं साक्षात काळाशी. या युद्धात कोणतंच बाह्य साधन, शस्त्र कामाचं नाही हे ती जाणून होती. ती स्वतःच योद्धा नि स्वतःच शस्त्र होती. त्याकरता आत्मबळाचं शस्त्र तिला धारदार बनवायचं होतं. तिला तर आपलं युद्धक्षेत्रही माहीत नव्हतं. कोणत्याही स्थानी, कोणत्याही रूपात तो येईल याची तयारी तिने वरमाला घालतानाच केली होती!
 
सत्यवानाने तिचं पाणिग्रहण केलं असं समाजाला वाटलं, पण त्या क्षणी सावित्रीनेच उत्तरदायित्व घेतलं होतं सत्यवानाच्या आयुष्याचं. एक क्षणही न घालवता तिने त्या अंतिम युद्धाकरता स्वतःला घडवायला घेतलं. ही तयारी दोन पातळ्यांवर करायची होती - शरीराला सक्षम करणं आणि मनोबल वाढवणं. थोडक्या प्रयत्नात तिने शारीरिक स्वास्थ्य आणि बळ कमावलं. दुसरा मनाचा प्रदेश! मनोबल कमावणं मात्र फार कठीण होतं. त्या स्वयंप्रशिक्षणाच्या प्रदेशात मात्र तिला मनात सतत झंकारणारे सत्यवानाच्या प्रेमाचे नूपुर उतरवूनच प्रवेश करावा लागला. तिथली आव्हानं दुर्धर होती..
 
अज्ञान, आळस, मोह, क्रोध अशा अनेक आदिम भावना क्रूरपणे तिला छळत होत्या. यावर मात करण्यात तिला कुणाचंही सहकार्य मिळणं असंभव दिसत होतं. या वेळी तिच्या मनोदेवतेनेच तिला मार्ग दाखवला - तुझ्या आत्म्याला साद घाल. त्याला शोध. तू तुझ्यातल्या आत्मतत्त्वाला शोधून त्याला परम आत्म्याशी एकरूप करू शकलीस, तर तुला तुझ्या मनावर नियंत्रण मिळेल. तुझं शस्त्र आहे तुझा आत्मविश्वास. तो तुझ्या ताब्यात येईल.
अन् सावित्रीचा शोध सुरू झाला. मनातील विचारांना ध्येयावर केंद्रित करण्याकरता आत्मबल मिळवण्याचा.
त्याकरता प्रथम आत्मा भेटायला हवा!
 
पण तिला कळत नव्हतं, कुठे असेल माझा आत्मा? तिथवर पोहोचू कसं, नि त्याला अोळखू तरी कसं? पण निर्धाराने ती त्या दुर्धर मार्गावर निघाली.
 
पहिल्याच वळणावर भेटली एक जराजर्जर वृद्धा.
संसाराच्या समग्र दुखांचं, भोगाचं सार असलेला तो करुण जीव तिला सांगू लागला की "मीच तुझा आत्मा.. मी युगानुयुगं झटते आहे या विश्वातलं सारं दुःख, सारी निराशा संपवण्याकरता. माणसाला त्याचं दुःख कमी करून हवंय, पण त्याला ते मिरवायचंय.. त्याला वाटतं की दुःख सोसल्याशिवाय आनंदाची प्राप्ती नाही. त्यामुळे तो ते सोसण्याचा मार्ग शोधतो, मुक्तीचा नाही!" सावित्रीला वाटलं की ही दुःखाला जाणते. ही आत्मशक्तीचा अंश असू शकेल, पण ही संपूर्ण नाही.. ती पुढे निघाली.
 
 
दुसर्‍या वळणावरच्या ऐश्वर्यसंपन्न, दिव्य प्रभा असलेल्या देवीपुढे सावित्री नतमस्तक झाली. ती देवी म्हणाली, "मी असुरसंहारिणी दुर्गा.. ऐश्वर्यदायिनी लक्ष्मी. मी मनुष्याचे सारे अभाव दूर करू शकते, पण मला माणसाकडून हवं आहे धनाला पावित्र्याचं, शुचितेचं अधिष्ठान. ते अजून मी निर्माण करे शकले नाही. पण मी हार मानलेली नाही अजूनही.." सावित्रीला वाटलं, ही दिसायला समर्थ पण आतून असाहाय्य असलेली स्त्री माझी आत्मा असू शकत नाही. मी इथे वेळ घालवणं योग्य नाही. ती पुढे निघाली.
 
तिसर्‍या वळणावरचा तो निळा प्रकाश पाहूनच ती मोहून गेली. ती श्वेतवसना, सौम्यवदना तिला कोमल, आत्मीय आवाजात सांगू लागली की "मी आहे तुझा आत्मा. मी अज्ञानाचा अंधार दूर करण्याचा, मनुष्याला स्वयंप्रकाशी करण्याचा वसा घेतला आहे."
"मग झालं का तसं?" सावित्रीनंने उत्साहाने विचारलं, "नाही. ज्याला मदत हवी त्याला मी ती करते. पण सत्याच्या दिशेने येण्याची मानवाची गती इतकी मंद आहे की..."
सावित्री सावध होतीच.. नाही! हेही रूप अंशात्मकच. ती निघालीच.
पुढे एक लांबच लांब भुयार होतं. आदि ना अंत, प्रकाश ना अंधार, पाया ना छत असं. सावित्री चालत होती की नव्हती हे तिलाच कळेना.. अन चालता चालता तिला जाणवलं की आपल्या देहभावांचं अोझं गळून पडतंय.
 
मानसिक भावही विरलेत. प्राणसत्तेचीही जाणीव लोप पावलीय. दिशा, काल कशाचंच भान उरलं नाही. केवळ एक तेजस्वी सूर्य आहे. निव्वळ तेज. केवळ सवितृ..
आणि त्या प्रकाशात तिच्यातली सारी चक्रं उमलताहेत. 

तिची दृष्टी आत वळलीय. तिथेही तिला दिसला तिची वाट अडवून असलेला एक अग्निपुंज. सावित्री आता थांबणार नव्हती. ती त्यालाही पार करून गेलीच. आता तिला जाणवत होतं संपूर्ण एकत्व. परम आत्म्याशी तिचा आत्मा एकरूप पावत होता. जिवाशिवाची भेटच ती..
मानवाचं अंतिम गंतव्य!
पण तिला तिथे रमायचं नव्हतं. ते बळ घेऊन ती सत्यात परतली. तिच्या भवतालातल्या कुणालाच तिने जाणवू दिलं नाही की तिचा प्रवास कुठवर पोहोचलाय.
तिने स्वर्ग आपल्या मुठीत बांधला होता, पण लोकांना एवढंच दिसत होतं की राजा द्युमत्सेनाची सून फार धार्मिक आहे. व्रतं करते. कठोर तपाचरण करते. अगदी आपल्या पित्यासारखी निग्रही आहे!
 
गेले तीन दिवस सावित्रीने अन्नाचा कणही ग्रहण केलेला नाही. या त्रिरात्र साधनेचा आज चौथा दिवस. तीन रात्री तिने उभ्याने जागून काढल्यात. सत्यवानाची माता म्हणाली, "मुली, आता तरी खाऊन घे काही!" सावित्री उत्तरली, "माते, सूर्यास्तानंतर माझा संकल्प पूर्ण होईल, मग मी अन्न ग्रहण करीन."
 
अग्नीला हवन करून, पूजा करून सर्वांना प्रणाम करून तिने सर्वांचे आशीर्वाद घेतले. तिला आज त्याची फार गरज होती. नववधूला विसंगत अशा तिच्या या अतिरेकी साधनेपासून, कठोर तपाचरणापासून नेहमीच सगळे तिला परावृत्त करत. ती मूकपणे सारं ऐकून घेई. मंद हसताना ती विचार करायची, माणसाला भविष्याची जाणीव असणं हा वर की शाप? वर्तमानाचा स्वाद बिघडू नये म्हणून मानव त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो की खरंच नियतीच्या योजनेपुढे तो हतबल असतो? भवितव्याच्या जाणिवेने तो विकास करेल की ते भविष्य बदलण्याच्या नादात तो आणखी काहीतरी करून बसेल? मग विकास म्हणजे तरी काय? त्याचे पदर तरी किती? सावित्री विचार करत होती, उत्तरं शोधू पाहात होती, अंधकार भेदू पाहत होती, पण केवळ स्वतःच्या समस्येकरता ती श्रमत नव्हती. तिला हे रहस्य भेदायचं होतं ते समस्त मानवजातीकरता ..


svitari_1  H x
सकाळ झाली. सत्यवान जंगलात कंदमुळं शोधायला निघाला. हवनाकरता लाकडंही हवीत म्हणून कुर्‍हाडही घेतली त्याने. तो झोळी लटकवून निघणार तोच सावित्री पुढे आली.
"आज मीही येणार तुम्हासवे." तिने हट्ट धरला.
"तीन दिवसांच्या उपासाने श्रमली आहेस तू सावित्री, आज नको. मी तर रोजच जात असतो. पुन्हा कधी जाऊ!"
"मी जराही थकले नाही. मी चालेन. मला येऊ द्या ना..." म्हणताना तिचा कंठ भरून आलाच! माता तर अनुमती देईचना. द्युमत्सेन राजाला मात्र तिच्या व्याकुळ स्वरांतलं अार्जव जाणवलं असावं. तो म्हणाला, "वर्षभरात पोरीने मुखावाटे काहीही मागितलं नाही. आज काही मागते आहे तर.. जाऊ द्या तिला!"
 
आश्रमाच्या कक्षेतून बाहेर पडेतो माता सत्यवानाला सावित्रीची काळजी घ्यायला बजावत होती. शेवटीही हात उंचावून उंच स्वरात ती म्हणाली, "जराही दृष्टिआड होऊ देऊ नको रे तिला..."
 
सावित्रीला तेच तर हवं होतं!
आज तिच्या परीक्षेचा दिवस होता.

(पूर्वार्ध)
(पूर्वार्ध)