निसर्ग चक्रीवादळाच्या निमित्ताने

विवेक मराठी    05-Jun-2020
Total Views |
@रोहन राजपकर

दिनांक ३ जून २०२० रोजी निसर्ग चक्रीवादळ मुंबईच्या किनारपट्टीवर येणार या बातमीने सर्वच पश्चिम किनारपट्टीवरील प्रदेशात - विशेषतः मुंबई, अलिबाग व दापोली या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु सुदैवाने या चक्रीवादळाने जास्त हानी न पोहोचवता आपला मार्ग बदलला. आधीच संपूर्ण जग व आपला देश कोरोनासारख्या समस्येमधून जात असताना अशी नैसर्गिक आपत्ती येणे हे अत्यंत चिंतेची बाब आहे व स्थानिक प्रशासनाला या समस्या सोडवण्याकरिता अत्यंत सजग राहून अशा संकटांवर मात करावी लागते.

cyclone attack in konkan_

नुकत्याच आलेल्या या चक्रीवादळाला 'निसर्ग चक्रीवादळ' असे नाव देण्यात आले आहे. परंतु ही अशी नावे देण्याची पद्धत कशी ठरते, याचा आपण कधी विचार करत नाही. जर चक्रीवादळाचा वेग ताशी ३४ नॉटिकल मैलांपेक्षा जास्त असला, तरच त्या विशिष्ट चक्रीवादळाला नाव देण्यात येते.
 
हिंदी महासागराच्या उत्तरेकडील भागात तयार होणाऱ्या चक्रीवादळांना भारतीय हवामान खाते नाव देते.
 
चक्रीवादळांची निर्मिती

सर्वच वादळे चक्रीवादळ नसतात. चक्रीवादळांच्या निर्मितीसाठी तापमान, वायुभार किंवा वायुदाब, वाऱ्याचा वेग, प्रदेशाचे स्थान, समुद्राची खोली व पाण्याची क्षारता इतर सर्व गोष्टी एकत्रितरीत्या कारणीभूत ठरतात. चक्रीवादळांची तीव्रता तेथील तापमानावर, आर्द्रतेवर व वायुभारावर अवलंबून असते.
 
आपणा सर्वांना माहीत आहे की पृथ्वीवर विषुववृत्त, कर्कवृत्त व मकरवृत्त आहेत. विषुववृत्ताच्या उत्तरेकडे कर्कवृत्त, तसेच विषुववृत्ताच्या दक्षिणेस मकरवृत्त आहे. कर्कवृत्त ते मकरवृत्त म्हणजेच ० अंश ते २३.१/२ अंश उत्तर व २३.१/२ अंश दक्षिण हा भाग उष्ण कटिबंधीय प्रदेश म्हणून ओळखला जातो, कारण बाराही महिने या प्रदेशाचे तापमान अधिक असते. तसेच हा भाग सर्वाधिक पाण्याने व्यापलेला आहे, त्यामुळे समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान जास्त असते व हेच कारण पुढे चक्रीवादळांच्या निर्मितीस कारणीभूत ठरते.
 
ज्या वेळी तापमान वाढते, तेव्हा त्या भागावर वायुभार कमी होतो - म्हणजेच तेथील हवा हलकी होते, हळूहळू हवा वरच्या दिशेने वाहू लागते, त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होतो व या भागात हवेची पोकळी निर्माण होते. ही पोकळी भरून काढण्यास आजूबाजूच्या प्रदेशातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून वारे वाहू लागतात (वारा जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशात वाहतो.) वारा जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहत येताना घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने चक्राकार वाहू लागतो व ही प्रक्रिया सतत सुरू राहिल्यामुळे तेथे चक्रीवादळे तयार होतात. या चक्रीवादळाचे केंद्र कमी दाबाचा भाग असतो, त्या केंद्राला चक्रीवादळाचा डोळा असे म्हणतात. जेवढे जास्त तापमान तेवढी चक्रीवादळाची तीव्रता अधिक असते. परंतु जशी चक्रीवादळे समुद्राकडून जमिनीच्या दिशेने येऊ लागतात, तसतशी त्यांची तीव्रता कमी होऊन चक्रीवादळाचे अस्तित्व संपुष्टात येते. या प्रक्रियेला Landfall असे म्हणतात. याचे कारण समुद्रातील आर्द्रतेचा तुटवडा हे होय. समुद्रातील पाण्याची आर्द्रता चक्रीवादळांना शक्ती देत असते. त्यामुळे त्यांना त्यांचे रौद्ररूप धारण करण्यास मदत होते. परंतु जमिनीच्या दिशेने जात असताना या आर्द्रतेचे प्रमाण कमी होते व चक्रीवादळ शांत होते. चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग हा सर्वात चिंतेचा विषय असतो व जोरदार वेगामुळे जीवित व वित्तहानी होते. ताशी अंदाजे १०० ते १९० किलोमीटर इतका जोराचा वारा चक्रीवादळासह येतो.
चक्रीवादळांना आवर्त असेसुद्धा म्हणतात. भारतीय हवामान खात्याने निसर्ग चक्रीवादळाला अत्यंत धोकादायक श्रेणीतील विभागात ठेवले होते. परंतु निसर्ग चक्रीवादळाचा इतका प्रभाव दिसून आला नाही. सहसा अरबी समुद्रात चक्रीवादळ येण्याचे प्रमाण कमीच असते व जरी ती तयार झाली, तरी त्यांची तीव्रता बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळांपेक्षा कमीच असते, कारण अरबी समुद्र तुलनेने थंड व त्याची खोली जास्त आहे, त्या मानाने बंगालचा उपसागर उष्ण आहे, त्याचे तापमान जास्त आहे, त्याची खोलीही कमी आहे व दोन भूभागालगत त्याचे स्थान असल्यामुळे तेथील तापमान जास्त असते. परंतु मागील काही वर्षांपासून अरबी समुद्रातील घडामोडींना वेग आला आहे. जागतिक तापमान वाढीचा व हवामान बदलाचा फटका भारताच्या पश्चिम किनारपट्टीला बसण्यास सुरुवात झाली आहे व येणारी चक्रीवादळे त्याचे संकेत आहेत. २०१९मधील वायू हेक्का, क्यार, पवन, महा व नुकतेच आलेले निसर्ग चक्रीवादळ ही त्याचीच उदाहरणे आहेत. शास्त्रज्ञांच्या मते अरबी समुद्रातील चक्रीवादळ निर्माण होण्याची वारंवारता वाढलेली असून ती ४६ टक्के इतकी झालेली आहे व तापमान वाढीमुळे पश्चिम किनारपट्टीच्या पातळीत १.८ मीटर वाढण्याची शक्यता दर्शवली आहे.
 

cyclone attack in konkan_ 
निसर्ग चक्रीवादळ मुंबईला येऊन आदळणार अशी दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. तशी चिन्हे दिसत होती. परंतु तसे काही झाले नाही, त्यामागचे एक वैज्ञानिक कारण समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू.
सर्वात महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे पृथ्वीचे परिवलन. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते, त्या वेळी पृथ्वीवर कोरिओलिस फोर्स coriolis force तयार होत असतो व तो पृथ्वीवरील ग्रहीय वारे, स्थानिक वारे यांना त्यांच्या मुख्य प्रवाहापासून विचलित करतो, म्हणून उत्तर गोलार्धात वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात व दक्षिण गोलार्धात पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. ज्या वेळी हे चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने येत होते, तेव्हा पूर्वेकडून - म्हणजे मुंबईकडून येणारे विषुववृत्तीय वारे समुद्राच्या दिशेने वाहू लागले. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळात मुंबईच्या किनारपट्टीवर न धडकता उत्तरेकडील राज्यांकडे वळले.
 

cyclone attack in konkan_ 
चक्रीवादळामध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी व जीवितहानी करण्याची क्षमता असते. किनारपट्टीच्या प्रदेशांना सर्वाधिक धोका पोहोचतो. मुख्यतः मच्छीमारीवर याचा परिणाम होतो. सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत होते. विद्युतखांब तुटून पडतात. झाडे तुटतात. यामुळे अनेकांचे जीव जातात. तसेच सोबत ढगांचा गडगडाट व वीज पडणे, तसेच अतिवृष्टीची शक्यता असते व मोठ्या प्रमाणात सागरी उधाण येतात.
हवामान क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते ही चक्रीवादळे नियमित मान्सूनला अडचण निर्माण करत नाहीत. त्यामुळे पुढे येणाऱ्या मान्सूनला याचा काही फटका बसणार नसून मान्सून भारतात ११ ते १५ जूनपर्यंत दाखल होण्याची चिन्हे आहेत.
चक्रीवादळेही तात्पुरते पर्जन्य पडण्यास कारणीभूत ठरतात. अशा प्रकारच्या पर्जन्याला आवर्त पर्जन्य म्हणतात.