पुरोगामिनी सावित्री

विवेक मराठी    05-Jun-2020
Total Views |
सावित्रीने एका नव्या कथेला आरंभ केला आहे.. ती आहे मानवाच्या उत्थानाची कथा! मानवी प्रयत्नांच्या पराकाष्ठेची कथा. प्रेम, निष्ठा, चिकाटी, चातुर्य, नम्रता या मानवी गुणांना प्रतिष्ठा नि यश मिळवून देणारी कथा. नियतीपुढे, मृत्यूसारख्या अंतिम सत्यापुढेही विवश न होण्याच्या मानवी विजिगीषेची कथा. सातत्यपूर्ण व योजनाबद्ध प्रयत्न, अपार धैर्य, तीव्र इच्छाशक्ती, स्वतःच्या ध्येयावर, योजनेवर, तत्त्वज्ञानावर अटळ विश्वास हे सारं सावित्री मानवाला सोपवून गेली आहे. आपल्या आतल्या ईश्वराला जागवण्याकरता किती खडतर प्रयत्न करावे लागतात, याचं भान देऊन गेली आहे.


vat purnima_1  
ते दोघं आश्रमकक्षेच्या बाहेर आले मात्र, सावित्रीने सत्यवानाचा हात घट्ट पकडला. हसून, तिचा हात थोपटत आश्वासक स्वरात त्याने विचारलं, "भ्यालीस? अन तेही मी सोबत असताना? ती बघ किती सुरेख फुललीत ती फुलं.." वाटेत सत्यवान तिला वनातली रमणीयता दाखवत होता. पण सावित्रीला आज काहीच रिझवू शकत नव्हतं. सत्यवानाचा वनविहाराचा आनंद मात्र द्विगुणित झाला होता. तो पुन्हापुन्हा तिला जवळ घेत होता, भरभरून बोलत होता. "आजइतकं हे वन मला कधीच सुंदर दिसलं नाही सवि! आज मी फार आनंदात आहे!"
सावित्रीच्या मनाचा ठाव सुटत होता. हा निरोप घेतोय की काय माझा?
ती मूकपणे फळं-मुळं गोळा करून झोळीत भरत राहिली. सत्यवान म्हणाला, "आता तू जरा या वृक्षातळी विश्राम कर. मी तिकडून लाकडं घेऊन आलोच!" भयव्याकूळ सावित्री नाही नाही म्हणू लागताच तो तिला चिडवू लागला! अखेर वाळकी फांदी तोडतो, असं म्हणत तिला दिसेल अशा वृक्षावर तो चढला आणि पुढच्याच क्षणी घामाघूम होऊन खाली कोसळला.
सावित्रीने त्याचं मस्तक मांडीवर घेतलं. शिरोवेदनेने तो तळमळत होता. श्वासही कोंडत होता. छातीत हजारो बाण घुसलेतसं त्याला वाटू लागलं. शरीराचा दाह होऊ लागला. कूस बदलण्याचंही त्राण उरलं नाही. केवळ "मला झोप येतेय सवि" म्हणत त्याने डोळे मिटले.
 
सावित्री त्याचा घाम पुसत होती, पापणीही न लवू देता ती पाहात होती आणि वक्षावर हात ठेवून होती. आणि तो क्षण आलाच. सत्यवानाचं स्पंदन पावणारं हृदय शांत झालं..
  
सारा अासमंत स्तब्ध. ना वारे वाहात होते, ना पक्षी बोलत होते. संध्याकाळचा मळकट उजेड आणि पाऊल टाकू पाहणारा अंधार. सावित्री आता सत्यवानाच्या निश्चल देहापेक्षाही अधिक अविचल झाली. तिने आपलं मन एकाग्र केलं. त्या दोघांव्यतिरिक्त 'त्या' तिसर्‍याचं अस्तित्व तिला जाणवलं. एका पाशधारी, आरक्त नेत्रांच्या विशाल पुरुषाला जवळ उभा पाहून ती हलकेच सत्यवानाचं मस्तक खाली ठेवून उभी राहिली. त्या दिव्य महाकाय पुरुषापुढे नम्रपणे पण ठामपणे उभं राहून तिने त्याला त्याची अोळख व येण्याचं प्रयोजन विचारलं. तो महापुरुष म्हणाला की "केवळ तुझ्या तपस्येमुळे तू मला पाहू शकते आहेस. मी यम आहे व सत्यवान धर्मनिष्ठ, कर्तव्यदक्ष असल्याने त्याच्या जीवपुरुषाला पाशबद्ध करून घेऊन जाण्याकरता मी स्वतः आलो आहे .." असं म्हणून त्याने अत्यंत निर्विकारपणे सत्यवानाच्या देहापासून त्याच्या जीवपुरुषाला विलग केलं अन तो निघाला.
सावित्री त्याच्या मागे निघाली. चालता चालता ती मातापिता व गुरू यांचं स्मरण करू लागली व त्यांचं महत्त्व, त्यांच्याप्रति मनुष्याची काय कर्तव्यं आहेत हे उच्चारू लागली. यमराजांना संबोधित न करता ती मनुष्य, त्याचं कर्म, त्याचा प्रभाव यावर बोलत राहिली.


vat purnima_1  
यमराज सारं लक्षपूर्वक ऐकत होते. मागे वळून न पाहताच, चालता चालताच ते सावित्रीला म्हणाले की "तू केवळ पतिव्रता नाहीस, धर्मज्ञ आहेस. ज्ञानी आहेस. पण तू माझ्याच नव्हे, तर तुझ्या पतीच्याही अंतिम यात्रेत बाधा आणत आहेस. तू आता मागे फीर."
त्यावर सावित्रीने त्यांना सांगितलं, तिला संस्कारच असे मिळाले आहेत की पतीच्या मागे जाणं हा तिचा धर्मच आहे. जिथवर सोबत करता येईल तिथवर ती करेल,
 
अन्यथा ती प्राण त्यागेल, परंतु ती या जगात पतीशिवाय राहू शकत नाही. यावर यमाने तिला सत्यवानाचे प्राण सोडून एखादा वर मागायला सांगितला. त्या वेळी सावित्रीने तिच्या सासर्‍यांचं राज्य व दृष्टी परत मिळावी असा वर मागितला. यमराजाने "तसं होईल" असं आश्वासन देऊन पुन्हा तिला माघारी जायला सांगितलं.
 
"तुला पुढच्या मार्गावरचे कष्ट झेपणार नाहीत" असं म्हटल्यावर सावित्रीने त्याला सत्संगतीचा महिमा कथन केला व "आपल्यासारख्या सत्पुरुषाची सोबत असता मला कोणतेही कष्ट पडणार नाहीत" असं म्हणून ती चालत राहिली.
यमराज तिच्या एकेका युक्तिवादावर प्रसन्न होत होते.
 
त्यांनी तिला सत्यवानाच्या जीविताव्यतिरिक्त आणखी एक वर मागायला सांगितला. ती अश्वपतींची एकुलती एक कन्या असल्याने त्यांना वारस म्हणून पुत्रप्राप्ती व्हावी, असा वर तिने मागितला. तोही वर तिला मिळाला. आता नकळत त्यांच्यात संवादच सुरू झाला.
 
ते तिला म्हणाले,
"आता मात्र तुला परतावंच लागेल. परत जा व आपल्या पतीचं क्रियाकर्म कर. तो आता दुसर्‍या लोकाचा निवासी झाला आहे. त्याला तिथे कष्ट होणार नाहीत. तूही वेळ आल्यावर स्वर्गाची अधिकारी होशील. वास्तवाचा स्वीकार कर व परत जाऊन आपलं सांसारिक कर्तव्य कर."
पण सावित्री चालतच राहिली व यमराजांना म्हणाली,
"मी आता तुम्हाला गुरू मानलं आहे. तुमच्याकडून धर्मविषयक ज्ञान प्राप्त करण्यानेच माझ्या आयुष्याचं सार्थक होणार आहे. त्यामुळे मला आता संसारात परत जाण्याचं काही प्रयोजनच नाही."
यमराजांनी पुन्हा तिला सत्यवानाचे प्राण सोडून असं काही मागायला सांगितलं, ज्याने तिचं आयुष्य पूर्ण होईल.
सावित्री म्हणाली,
"आपण मला पित्यासमान आहात. आपल्याला माझं दुःख दूरच करायचं आहे, तर मग मला शक्य तर असा वर द्या, की मला सत्यवानासारखी सौम्य, रूपवान, गुणवान अौरस संतती लाभेल."
तिच्यापासून सुटका व्हावी, म्हणून यमराजांनी "तथास्तु!" म्हटलं व ते घाईघाईने पुढे आले. समोर वैतरणा नदी आडवी आली. यमराजांना वाटलं, आता हिला परतावंच लागेल. पण पाहतात तो सावित्रीने वैतरणाही लीलया पार केली व ती अजूनही तिचा पक्ष मांडत मागे येतेच आहे.
 
ती म्हणाली, "हे सुरेश्वर, मला सांगा की मी संसारात परत जाऊन दुःखमुक्त होऊ शकेन का?" यमराजांना आता तिच्या क्षमतेची कल्पना आली होती. त्यांनी जाणलं की ही कोणत्याही स्तरापर्यंत आपल्या मागे येऊ शकते.
ते आता तिला तोडून टाकत म्हणाले,
"दुःख कसं विसरायचं हे मानव जाणतात. काळ त्यांना मदत करतो."
- "पण मी वस्तू, साधनं यांनी सुखी होऊ शकणार नाही. माझा आनंद सत्यवानासह जगण्यात आहे. मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही."
: "प्रथम सार्‍यांनाच असं वाटतं. अन्यत्र मन गुंतलं की तुलाही विसरता येईल."
- "देवा, यात माझा नाही, प्रेमाचा, मानवजातीचाच अपमान आहे!"
: "मुली, सांसारिक प्रेम तर मानवी जीवनापेक्षा भंगुर आहे. व्यक्ती जिवंत असते, पण प्रेम संपून जातं.
कदाचित सत्यवान आता जिवंत नसल्याने त्याचं प्रेम तुझ्या हृदयात चिरकाल राहील अशी शक्यता आहे."
- "माझं जीवन तर सत्यवानच आहे आणि मी जिवंत आहे म्हणजे तोही जिवंतच आहे. त्याच्याखेरीज माझ्या अायुष्यात नित्य असं काहीच नाही. त्याला दिवंगत म्हणू नये प्रभू!"
: "मुली तू त्याच्याच पुढच्या प्रवासात बाधा आणते आहेस. त्याच्या मुक्तीच्या आड येते आहेस. त्याला नवं जीवन जगू दे. जाऊ दे त्याला."
- "का म्हणून जाऊ देऊ? असं अकाली, अकारण?"
: "कारण तो इतकंच आयुष्य घेऊन आला होता."
- "हे अनुचित अाहे. अन्याय आहे हा.."
: "देवलोकाला मनुष्याकडून न्याय नीतीचे पाठ नको आहेत मुली.."
कठोरपणे यमदेव बोलले.
सावित्री आता समस्त मानवजातीचाच पक्ष मांडते आहे..
 
- "मला मान्य आहे की मानव भ्रष्ट आहे. पण त्याकरता केवळ तोच जबाबदार नाही. तो आपले भूत-भविष्य जाणत नाही. पापी मनुष्य सुखात राहतो व पुण्यात्मा कष्ट सोसतो, तेव्हा त्याची श्रद्धा डळमळणार नाही का? वस्तुतः मनुष्य अफाट विस्तार पावू शकतो. त्याच्या कमतरतेवर मात करण्याची, स्वयंविकासाची अद्भुत प्रेरणा त्याच्यात आहे. तरीही या ईश्वरी योजनेत त्याला असं न्यूनत्व का? त्याचं आयुष्यच त्याच्या हाती न ठेवून त्याची विकासाची संधी का नाकारली जाते?"
: "हे मानवी, मनुष्याला प्रभुसत्तेने अनेक अवसर दिले, पण त्यानेच त्या संधी गमावल्या आहेत. तो विकास करतो, पण भौतिक सुखांकरताच."
- "कारण तो भ्रमित होतो प्रभू! त्याला हे ज्ञान मिळायला हवं."
: "तूही आता भ्रमितच झाली आहेस भद्रे. परत जा व तुला मिळालेल्या सिद्धी वापरून सुखात राहा."
- "प्रभू, आपणच म्हणालात की मनुष्याला विकासाची संधी मिळाली तरी तो ती घेत नाही, तो ज्ञानाचा उपयोग केवळ वस्तुलाभाकरता करतो. मग मला तुम्ही हे करायला का सांगत आहात?"
: "तू जे करशील, ते पवित्रच असेल कन्ये!"
- "सत्यवानापेक्षा पवित्र, त्याच्याइतकं श्रेष्ठ अन् सुंदर काहीच नाही प्रभू! तोच माझ्या आयुष्याचा वाहक आहे. आम्ही एकच आहोत."
: "दुःखाने तुझा विवेक क्षीण झाला आहे सावित्री.
सर्वांच्यात परमात्म्याचा अंश असताना एका विशिष्ट आत्म्यावर आपला हक्क सांगणं हीच माणसाची मोठी चूक आहे."
- "परंतु आत्मा युग्मरूपातही असू शकतो, समूहरूपातही. त्यांचं गंतव्य एकच असू शकतं. मला सत्यवानासोबतच माझा प्रवास पूर्ण करायचा आहे."
: "पण नियतीचा संकेत तसा नाही!"
- "महाराज, आपण नियमांचे पालन करणारे म्हणून 'यम'राज म्हणवता. लोकांना धर्माचरणाला उद्युक्त करणारे धर्मराज आहात. मनुष्य स्वतःपेक्षाही तुमची सत्ता मानतो. मला क्षमा करा, पण आपण नियम हे असे निर्दयपणे का बनवता? नीती, नियम जर सत्कर्माला प्रेरित करण्याकरता असतील, तर ते मातेप्रमाणे संवेदनशील नि सहृदय असायला हवेत. आपले नियम निर्मम आहेत!"
यमराज या बोलण्यावर प्रसन्न झाले. म्हणाले,
"असा युक्तिवाद आजतागायत कुणीही केला नव्हता.
मला मानवाची प्रगती पाहून संतोष होतो आहे!"
 
सावित्री हळूच म्हणाली, "आपल्याला असं प्रसन्न पाहून मीच रोमांचित झाले आहे. आपण मला संततीचं वरदानही दिलं आहे.."
यमराज म्हणाले "होय, आणि त्यांच्यासह तू दीर्घकाळ सुखात राहशील असंही म्हणतो. आता जाण्यापूर्वी एखादं सुंदर वरदान माग!"
सावित्री सावध होती. ती चटकन म्हणाली,
"हे पिता, मला अंतिम वरदान म्हणून सत्यवानाचं दीर्घायुष्य द्या! या वेळी तुम्ही 'त्याचे प्राण सोडून माग' असं म्हटलं नाहीये. आपण मला अौरस संततीचं वरदानही दिलं आहे. आपण धर्मराज आहात. आपलं बोलणं मिथ्या होऊ नये. आपण मला मुली म्हणत आहात. मी सत्यवानावाचून जगू शकत नाही. आपले वर सत्य होण्याकरता तरी सत्यवानाला परत द्या!"


vat purnima_1  
यमराज हेलावले. त्यांच्या हातातील पाश सैल पडले.
एका मानवकन्येने त्यांचे अश्रू पाहू नयेत याकरता ते तोंड फिरवून उभे राहिले..
 
"जा मुली, अखंड सौभाग्यवती हो. जा. तो जागा होईल, तू दिसली नाहीस तर व्याकूळ होईल. लवकर जा. तुझं कल्याण होवो."
सावित्री त्यांच्या पायावर कोसळलीच! मूकपणे नमस्कार करून ती शतगुणित वेगाने परत आली.
सत्यवान अजूनही तसाच पडलेला होता. ती त्याच्या अंगावरून हात फिरवू लागली. हळूहळू परतणारा त्याचा श्वास पाहून तिला धीर आला. सत्यवानाचे डोळे किलकिले झाले. सावित्रीला डोळे भरून पाहून त्याने अस्फुट स्वरात विचारलं, "तो कुठे आहे, कोण होता, जो मला घेऊन निघाला होता?"
- "तो गेला. त्यांना प्रणाम करा. आपण सावकाशीने बोलू. आता आधी आश्रमात परतू या. तातमाता चिंतेत असतील" असं म्हणत सावित्रीने हलकेच त्याच्या बाहूला धरून त्याला उभं केलं. त्याच्या अंगावरली धूळ पदराने झटकली. फळं, लाकडं तशीच वनात सोडून एका हातात कुर्‍हाड घेऊन सत्यवानाला आधार देत ती चालू लागली.
दोघे आश्रमात येईतो अंधार गडद झाला होता.
 
राजाची दृष्टी परत आल्याने आश्रमात हर्षोल्हासाचं वातावरण होतं. केवळ या दोघांच्या विलंबामुळे चिंता होती. परतल्यावर सर्वांसमक्ष सत्यवानाने तो प्रसंग कथन केला. द्युमत्सेनाने तर आपला पुत्र तरुण झाल्यानंतर पाहिलाच नव्हता. दोघांना पाहून, कुरवाळून त्याने सावित्रीला काही खाऊन व्रत सोडायला सांगितलं.
 
"कशाकरता हे व्रत होतं?" असं विचारल्यावर "कल्याणाकरता" इतकं बोलून स्मितवदनाने ती आत निघून गेली. ती गेल्यानंतर वृद्ध मुनिवरांनी पुन्हा सत्यवानाला सारा प्रसंग विचारून घेतला व राजाला म्हणाले, "तुमची सून असामान्य कार्य करून आली आहे. तिच्यात उच्च आध्यात्मिक शक्ती आहे. आज तिच्या मुखावरचं अपूर्व तेज अतिशय विरळा आहे."
सावित्रीच्या मातापित्यांचाही ऊर अभिमानाने भरून आला. सावित्रीचे एकेक वर यथाकाल फळाला आले. 
पण कथा इथे संपत नाही. सावित्रीने एका नव्या कथेला आरंभ केला आहे..
 
ती आहे मानवाच्या उत्थानाची कथा! मानवी प्रयत्नांच्या पराकाष्ठेची कथा. प्रेम, निष्ठा, चिकाटी, चातुर्य, नम्रता या मानवी गुणांना प्रतिष्ठा नि यश मिळवून देणारी कथा.
 
नियतीपुढे, मृत्यूसारख्या अंतिम सत्यापुढेही विवश न होण्याच्या मानवी विजिगीषेची कथा. सातत्यपूर्ण व योजनाबद्ध प्रयत्न, अपार धैर्य, तीव्र इच्छाशक्ती,
स्वतःच्या ध्येयावर, योजनेवर, तत्त्वज्ञानावर अटळ विश्वास हे सारं सावित्री मानवाला सोपवून गेली आहे.
आपल्या आतल्या ईश्वराला जागवण्याकरता किती खडतर प्रयत्न करावे लागतात, याचं भान देऊन गेली आहे.
एका नवविवाहितेने, युवतीने प्रथम स्वतःच्या शरीरबल व आत्मबल याच्या वृद्धीला कसं महत्त्व दिलं पाहिजे, हे दाखवून गेली आहे. संघर्षाला उभं ठाकण्यापूर्वी 'गृहपाठ' कसा व किती केला पाहिजे हे तिने शिकवलं आहे. भौतिक सुखांच्या पलीकडचा प्रदेश दोघांनी मिळून पादाक्रांत करण्याचं दांपत्यजीवनाचं ध्येय सांगून गेली आहे. त्याकरता एकमेकांवरचा अतूट विश्वास, प्रेम याचं उदाहरण निर्माण करून गेली आहे.
 
मानवाचा विकास म्हणजे त्याच्या आतल्या 'स्व'चा विकास हे दाखवण्याकरता त्या वाटेवर प्रकाश बनून ती पुरोगामिनी थांबली आहे. आपली पावलं तिकडे वळण्याची वाट पाहते आहे!
 
(संदर्भ : श्रीअरविंद यांच्या सावित्री महाकाव्यावर आधारित 'सुधा' लिखित पुस्तिका 'पुरोगामिनी.)