'वास्तव'प्रियता आणि भावप्रियता यांचा संगम - रजनीगंधा

विवेक मराठी    06-Jun-2020
Total Views |
रजनीगंधा हा प्रेमाचा त्रिकोण आहे. जिथे नायकाला पूर्ण समर्पित नायिका हा नायिका असण्याचा निकष होता, त्या चित्रपटसृष्टीत, सत्तरच्या दशकात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची मध्यमवर्गीय, साधी, सरळ नायिका एकाच वेळी दोन तरुणांच्या प्रेमात आहे. यातल्या कुणाला आपले मानायचे ह्या बाबतीत तिचा निर्णय ती घेऊ शकत नाही. चित्रपटाचे वेगळेपण यात आहे.

Rajnigandha 1974 full hin

दोन महिने लॉकडाउनमुळे घराच्या बाहेर न पडल्याने अगदी नेहमीच्या वस्तूंचा तुटवडा जाणवतो आहे. टूथपेस्ट ही तशी नेहमीच घरात असणारी गोष्ट. साठा करावा असे लक्षातसुद्धा येत नाही. या वेळी मात्र ऑनलाइन ऑर्डर करायची वेळ आली. एकच ब्रँड उपलब्ध होता. एका मिनिटात ऑर्डर देऊन झाली. पूर्वी मॉलमध्ये गेले की हे एवढे पर्याय उपलब्ध असायचे. वेगवेगळे ब्रँड्स, त्यात अनेक प्रकार... मीठ असलेली, आयुर्वेदिक, दात दुखायला लागल्यावर उपयोगी पडणारी, हिरड्यांसाठी आणि एक, शिवाय हे कमी म्हणून की काय, चॉकलेटच्या चवीसारखीसुद्धा टूथपेस्ट. खूप सारे पर्याय, निवडीचे स्वातंत्र्य असले, तरी गोंधळल्यासारखे व्हायचे.
 
दातच तर घासायचे नं, घे दातांचे आरोग्य सांभाळणारी.. पण तसे होत नाही. खूप पर्याय असले की मनाचा गोंधळ उडतो. नक्की कोणता घ्यायचा याचा उलट-सुलट विचार करून थकवा येतो. पर्यायाचे स्वातंत्र्य आणि त्यांची मुबलकता अनेक वेळा त्यांचे महत्त्व कमी करते आणि एवढा विचार करून घेतलेला निर्णय नक्की बरोबर असेल का, ही शंका मात्र मनाला त्रास देते.
जर हे टूथपेस्टसारख्या गोष्टीबाबत होत असेल, तर जीवनसाथी निवडण्याची प्रक्रिया किती कठीण आणि गुंतागुंतीची असेल!
काल अनेक वर्षांनी बासू चटर्जी दिग्दर्शित 'रजनीगंधा' हा चित्रपट पाहिला.
गोष्ट अगदीच साधी. एका सुरेख, सर्वसामान्य मध्यमवर्गीय मुलीच्या आयुष्यात दोन पुरुष येतात. तिला तर दोघेही आवडतात. अगदीच शक्य आहे हे! आपल्या आयुष्याला अनेक पैलू असतात. त्यातल्या काही पैलूंशी जोडणारी व्यक्ती मिळाली की आपण प्रेमात पडतो. पण काही गोष्टी, काही आवडी तशाच राहून जातात. आयुष्याच्या प्रवासात कुठेतरी कोनाड्यात जाऊन लपतात!
मग त्या अडगळीत पडलेल्या पैलूशी जुळणारी दुसरी व्यक्ती आयुष्यात आली, तर! तार नाही छेडली जाणार?
रजनीगंधा हा प्रेमाचा त्रिकोण आहे. जिथे नायकाला पूर्ण समर्पित नायिका हा नायिका असण्याचा निकष होता, त्या चित्रपटसृष्टीत, सत्तरच्या दशकात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची मध्यमवर्गीय, साधी, सरळ नायिका एकाच वेळी दोन तरुणांच्या प्रेमात आहे. यातल्या कुणाला आपले मानायचे ह्या बाबतीत तिचा निर्णय ती घेऊ शकत नाही. चित्रपटाचे वेगळेपण यात आहे.


Rajnigandha 1974 full hin
चित्रपट सुरू होतो दिल्लीत. दीपा (विद्या सिन्हा) रिसर्च स्टुडंट आहे. कला शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेऊन ती पीएच.डी. करत आहे. दिल्लीत संजय (अमोल पालेकर) नावाच्या एका तरुणावर तिचे प्रेम आहे. संजय हा सरकारी नोकरीत आहे. इथेच बढती मिळाली की दीपाशी लग्न करून स्थायिक व्हायचे, एवढे साधे स्वप्न तो पाहतो आहे. अशात दीपाला मुंबईतील एका कॉलेजमध्ये लेक्चररच्या नोकरीसाठी मुलाखतीला बोलावले जाते आणि तिची भेट होते तिच्या पूर्वायुष्यातील प्रियकराशी, नवीनशी (दिनेश ठाकूर). ही पुनर्भेट आतापर्यंतच्या सरळ रस्त्यावर एका वळण आणते.
नवीन आणि दीपा कॉलेजपासून एकमेकांना ओळखत असतात. नवीन हा विद्यार्थी चळवळीत सक्रिय असतो. एक दिवस कॉलेज मॅनेजमेंटच्या विरुद्ध निदर्शन करत असताना तो दीपाला कॉलेजमध्ये जाण्यापासून अडवतो. दीपाचा या चळवळीशी संबंध नसतो. ती नवीनचे ऐकण्यास नकार देते. अहंकार दुखावले जातात आणि दोघे दुरावतात.
आज इतक्या वर्षांनी परत भेटल्यावर जुन्या आठवणी उफाळून येतात, पण नवीन मात्र आपल्या आयुष्यात स्थिरावलेला असतो. पूर्वीच्या नात्याचा त्यात अंशही नसतो. मित्रत्वाच्या नात्याने तो तिला मदत करतो. सुरुवातीचे अवघडलेपण कमी झाल्यावर, दीपा मात्र वेगळ्या नजरेने आपल्या भूतकाळाकडे पाहू लागते. आपल्या आताच्या आयुष्याशी त्याची तुलना करू लागते. नवीनच्या स्नेहपूर्ण वागण्याचे आपल्या मनाला भावेल असे अर्थ लावू लागते. कॉलेजमध्ये त्याला निळा रंग आवडायचा, म्हणून ती निळ्या रंगाची साडी नेसते. त्याने कौतुकाची थाप दिल्यावर, तिच्या दिसण्याकडे फार लक्ष न देणाऱ्या संजयचे वागणे तिला खटकायला लागते.

संगीतकार सलील चौधरी, गीतकार योगेश आणि मुकेश यांनी चित्रपटाचा मूड या गीतात व्यवस्थित पकडला आहे.
कईं बार यूँ भी देखा है,
ये जो मन की सीमा रेखा है
मन तोडने लगता है
पहिले प्रेम लांब जाऊन पाच वर्षांचा काळ उलटला आहे. आता कुठे आयुष्य स्थिरावत असताना, मन परत एकदा फुलत असतानाच, तेच पहिले प्रेम एखाद्या झंझावातासारखे येते तिच्या आयुष्यात आणि मग सुरू होते मनाची घालमेल. समाजाने आखलेल्या रितीरिवाजात जखडलेले मन लक्ष्मणरेषा ओलांडून बंड करू पाहते. 'रजनीगंधा' या संदिग्धतेची आणि मोहाची कथा आहे.
माणसाला पर्याय नसेल तर आयुष्य सोपे असते, पण असंख्य शक्यतांमधून स्वतःला आवडेल, जमेल असा पर्याय निवडणे फार अवघड असते.
राहों में राहों में, जीवन की राहों में
जो खिले हैं फूल, फूल मुस्कुरा के
कौन सा फूल चुराके,
रखू मन में सजा के ..
..दीपा सतत वर्तमानाची भूतकाळाशी तुलना करते. दोन्ही वेगळे, पण दोन्ही आकर्षक आणि दोघेही भुरळ पाडणारे. स्त्रीला दोन्ही पुरुष आवडण्याचे स्वातंत्र्य या चित्रपटात आहे आणि जे घडते ते अतिशय स्वाभाविक घडलेले दाखवले आहे.
या चित्रपटातील तिन्ही पात्रे अविवाहित आहेत. त्यामुळे निदान नैतिकतेचा अँगल इथे नाही.
आयुष्याचा निर्णय घेताना असे थबकायला होतेच. त्यात पर्याय असतील तर गोंधळायलासुद्धा आणि सहज उपलब्ध असतील तर 'कौनसा फूल चुराके' म्हणत हात पुढे जाणे स्वाभाविक.. ही मुलगीसुद्धा खूप बोल्ड नाही. साधी, मध्यमवर्गीय, खूप महत्त्वाकांक्षी नाही. त्यामुळे लक्ष्मणरेषा जपणारी आहे. टॅक्सीत ती दोघेच आहेत, पण मध्ये अंतर. अगदी सहज आणखी एक बसू शकेल असे अंतर. ते अंतर तोडणे तेवढे सोपे नाही हे माहीत आहे, तरीही जे अप्राप्य, ते हवेहवेसे वाटणे स्वाभाविक असतेच. ही सहजता या चित्रपटाची खासियत आहे.
मुलाखत होते. तिला नोकरी लागावी म्हणून नवीन ओळख काढतो, धडपड करतो. ही नोकरी तुलाच मिळेल असा दिलासाही देतो. पण दीपाला आस असते ती त्याच्या प्रेमाच्या कबुलीची. ते मात्र घडत नाही. एका आठवड्यानंतर दिल्लीला परत आल्यानंतरसुद्धा तिचे मन नवीनच्या आठवणीतच रमलेले असते. नवीनचे पत्र तर येते, पण त्यात तिला नोकरी मिळाली त्याचाच आनंद व्यक्त केलेला असतो. तिच्या प्रश्नांची उत्तरे नसतात.
चित्रपटाच्या शेवटी हातात रजनीगंधाची फुले घेऊन येणारा संजय पाहिल्यावर मात्र दीपाची द्विधा संपते. जे आपल्या जवळ असते, तेच आपले या साक्षात्कारावर हा चित्रपट संपतो.
 
बासू चटर्जी यांची नायिका जरी स्वतःच्या भावनांचा वेध घेताना गोंधळली आहे, तरीही ती स्वतःच्या मर्यादा ओळखून आहे. एकट्याने दिल्ली ते मुंबई प्रवास करणे तिला आत्मविश्वास देते, तसेच नात्यांचा हा गुंता सोडवण्याचा अनुभव तिला स्वतःच्या मनाकडे उघड्या डोळ्यांनी पाहायला शिकवतो. संजय थोडासा स्वार्थी आहे असे सुरुवातीला वाटते. दीपा बरोबर असतानासुद्धा त्याच्या मनात ऑफिसचे, प्रमोशनचे विचार असतात. तो कधीही वेळेवर पोहोचत नाही. तरीही हे सर्व करण्यामागे हेतू असतो, तो दीपाशी लग्न करणे. तिला सुखी ठेवणे. त्यांचे नाते कदाचित निर्दोष नसेलही, पण खरे असते.
 
यातली नवीनची भूमिकासुद्धा खूप वेगळी आहे. दोघांमध्ये येणारा तो काही खलनायक नाही. आपल्यापासून ती दूर गेली आहे याची जाणीव आहे त्याला. संकोच आणि आपली सीमारेषा ओळखल्याने तो तिला स्पर्शही करत नाही. सतत सिगारेट ओढणे म्हणजे केवळ बेपर्वा असल्याचा अभिनय.
 
आयुष्यात अनेक व्यक्ती भेटतात, अनेक जण आवडतातसुद्धा, तरीही तडजोड हा जीवन जगण्याचा अटळ भाग आहे. ज्याचा सोबतीने जीवन सुखी होईल हे शोधताना हृदयाबरोबर बुद्धीचाही कस लावावा लागतो, तरच निवड सार्थ ठरते. रजनीगंधा चित्रपट हा संदेश देतो.
 
सत्तरच्या दशकात व्यावसायिक चित्रपटांबरोबर समांतर चित्रपटांचा प्रवास सुरू झाला. या चित्रपटांमुळे हिंदीतल्या नामवंत लेखकांच्या कथा पडद्यावर आल्या. बासू चटर्जी, गोविंद निहलानी, श्याम बेनेगल इत्यादी फिल्म सोसायटी चळवळीतले कितीतरी लोक समांतर चित्रपटांमुळे चित्रपट दिग्दर्शनाकडे वळले. सामान्य चेहऱ्याच्या, मध्यमवर्गीय, बसने प्रवास करणाऱ्या व्यक्तिरेखांना ओळख देण्याचे महत्त्वाचे कार्य बासू चटर्जी यांच्या चित्रपटांनी केले. त्यांच्या प्रेमकथा साध्या, ज्या कुणाच्याही आयुष्यात घडू शकतात अशा असल्याने प्रेक्षकांना त्या भावल्या, स्वतःच्या आयुष्याचे प्रतिबिंबच त्यांनी मोठ्या पडद्यावर पाहिले.
"चित्रपट केवळ स्वप्नरंजन करत नाही, तर रोजचे जीवनसुद्धा जगण्याचा धडा देतो" असे बासूदा म्हणत. त्यांच्या सिनेमांनी हसतखेळत जगण्याचा मूलमंत्र दिला.
 
हलकेफुलके विनोद, सरळ साधी कथा हे बासू चटर्जी यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य होते. याच वैशिष्ट्यांमुळे ते आणि त्यांचे चित्रपट कायम लक्षात राहतील.