कोरोना प्रसार रोखणे : काही नवे तांत्रिक मुद्दे

स्रोत: विवेक मराठी    दिनांक08-Jun-2020
|
@डॉ. मिलिंद पदकी....

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. चिंतेची बाब म्हणजे यावर उपाय म्हणून कुठलेही औषध अथवा लसीचा शोध अद्याप लागलेला नाही. आता तरी केवळ प्रतिबंधात्मक उपाय हे एकमेव साधन कोरोनापासून बचावाचे आहे. या लेखात आपण कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी काही नवीन तांत्रिक मुद्दे पाहणार आहोत.


corona_1  H x W

सध्या कोरोनाच्या साथीत, विषाणू संसर्ग टाळण्यासाठी शारीरिक अंतर राखण्याबाबत, अनोळखी माणसापासून किमान सहा फूट दूर राहून बोला असे आपल्याला सांगितले जात आहे. याचे कारण म्हणजे समोरच्या माणसाकडून येणारा विषाणू या अंतरापलीकडे प्रवास करणार नाही, असा समज आहे. पण यात काही त्रुटी आहेत, त्या पुढीलप्रमाणे - आपण जेव्हा कोरोना विषाणू हवेतून प्रसार पावतो असे म्हणतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर केवळ एक 'नग्न' विषाणू कण हवेत तरंगत असतो. पण हे चुकीचे आहे. प्रत्यक्षात, संसर्ग झालेला माणूस बोलताना, शिंकताना किंवा खोकताना त्याच्या तोंडातून उडणाऱ्या सूक्ष्म थेंबात तो विषाणू सामावलेला असतो. हे थेंब साधारणपणे एक ते दहा मायक्रोमीटर इतक्या व्यासाचे असतात. (एक मायक्रोमीटर किंवा 'मायक्रॉन' म्हणजे एक हजारांश मिलीमीटर). शरीरातून बाहेर फेकल्या गेलेल्या अशा थेंबांमधल्या पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होते आणि सहा फुटांपर्यंत जाईपर्यंत त्यांचा व्यास सुमारे निम्मा होतो. पाच मायक्रॉनच्या खालचे थेंब जमिनीवर पडत नाहीत, तर हवेच्या हालचालीनुसार हवेत तरंगत राहतात. अशा रितीने त्यांचे एक बरेचसे अदृश्य धुके निर्माण होऊन हवेत टिकून राहू शकते. इमारतीच्या आत हे घडत असण्याची विशेष शक्यता असते. न्यूयॉर्कमधील डॉक्टरांच्या चर्चेत, इमारतीच्या आत होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण हे बाहेर उघड्यावर होणाऱ्या संसर्गापेक्षा एकोणीसपट अधिक आहे, असा उल्लेख आला आहे.
यावर अनेक उपाय करता येतील. यात नाकातोंडावर मास्क असणे तर महत्त्वाचे आहेच. दुसरे म्हणजे असे धुके निर्माण न होऊ देण्यासाठी हवा वेगाने खेळवत ठेवणे. साध्या पॉवरफुल पंख्याने हे साध्य होऊ शकेल. (वातानुकूलित खोल्यांमध्ये तीच हवा परत परत खेळविली जाते - दर तासाला फक्त वीस टक्के हवा नवीन घेतली जाते. विमानातही हेच केले जाते. हे धोक्याचे आहे.) दुसरे म्हणजे अल्ट्राव्हायोलेट 'सी' रेंजमधला प्रकाश वापरून हवेतला विषाणू नष्ट करणे. अल्ट्राव्हायोलेट 'सी' रेंज म्हणजे सुमारे १०० ते २८० नॅनोमीटर तरंगलांबीचा (वेव्हलेंग्थचा) प्रकाश. (एक नॅनोमीटर म्हणजे एक हजारांश मायक्रोमीटर). याच्या वेगळ्या ट्यूबलाइट्स मिळतात. औषध उद्योगात इंजेक्शनचे पाणी निर्जंतुक करण्यासाठी किंवा खोल्या निर्जंतुक करण्यासाठी या ट्यूबलाइट्स वापरल्या जातात. हॉस्पिटलमधली ऑपरेशन थिएटर्स तसेच अतिदक्षता विभाग निर्जंतुक ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. भारतात हे तंत्रज्ञान अनेक वर्षे आहे. यातला मुख्य धोका म्हणजे २५४ नॅनोमीटरचा असा प्रकाश फार काळ अंगावर पडणे हे मानवाला धोकादायक असते. त्यातून डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो, तसेच दीर्घकाळ हे चालल्यास कॅन्सरची शक्यता असते. यासाठी असा प्रकाश वापरताना त्या खोलीतील माणसांना बाहेर काढणे आवश्यक असते. दुसरा एक मार्ग म्हणजे, माणसाच्या डोक्याच्या उंचीहूनही वर, किमान सात फुटांच्या वर असा प्रकाश देणाऱ्या ट्यूबलाइट्स लावणे आणि अशी निर्जंतुक झालेली हवा पंखा लावून खोलीभर खेळती ठेवणे. याने पूर्ण निर्जंतुकीकरण झाले नाही, तरी विषाणूचे प्रमाण प्रचंड कमी होऊ शकते.
आता यूव्ही-सीमधल्या, २२२ नॅनोमीटर आणि त्याच्या खालच्या वेव्हलेंग्थ्स या मानवाला धोकादायक नाहीत असे नवे विज्ञान पुढे आले आहे. पण त्याला अजून अमेरिकन सरकारने मान्यता दिलेली नाही आणि त्याच्या ट्यूबलाइट्स वगैरे अजून बाजारात आलेल्या नाहीत.

संसर्गित माणसाच्या विष्ठेतूनही करोना विषाणू बाहेर टाकला जात असतो. उपचार घेऊन बरा झालेल्या माणसाकडूनही, पुढचे सहा ते दहा दिवस हे होत राहू शकते. उघड्यावर विष्ठा विसर्जन होत असल्यास असा विषाणू भूमी-अंतर्गत पाण्यात मिसळू शकतो. नगरपालिकांतर्फे जे घरच्या पाणीपुरवठ्याचे शुद्धीकरण केले जाते, त्या प्रक्रियांनी हा विषाणू नष्ट होतो, त्यामुळे त्या दृष्टीने धोका नाही. पण ग्रामीण भागातील नद्यांचे किंवा विहिरींचे, प्रक्रिया न झालेले पाणी अशा प्रकारे दूषित असू शकते. नाकाच्या किंवा तोंडाच्या वाटेने त्यातून विषाणू-संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे ते पाणी पिणे, वापरणे, तसेच त्यात पोहणे हे सध्याच्या साथीच्या काळात टाळावे.


corona_1  H x W
हवा आणि अन्नपदार्थ या बाह्य वस्तूंशी संबंध येणारे मानवाचे सर्व अंतर्गत पृष्ठभाग (तोंड, नाक, पोट इत्यादी) हे म्यूसिन आणि ग्लायकॅन नावाच्या साखरेसारख्या संयुगांनी बनलेल्या 'जेली'ने मढविलेले असतात. जंतूंना बाहेर ठेवणे हे त्यांचे महत्त्वाचे काम असते. पण हे काम व्यवस्थित चालू राहण्यासाठी त्यांना पाण्याची आणि आर्द्रतेची गरज असते. हे न झाल्यास जंतूंना अडसर करण्याचे त्यांचे काम व्यवस्थित होत नाही. त्यामुळे सध्याच्या साथीत घसा/तोंड कोरडे न पडू देणे महत्त्वाचे आहे. तसेच इमारतींच्या अंतर्भागातली सापेक्ष आर्द्रता किमान ५०% असणे महत्त्वाचे आहे. जसजसे तापमान वाढते, तसतशी पाणी सामावून घेण्याची हवेची क्षमताही वाढत जाते. उदा., ५ सेंटिग्रेडला हवा सॅच्युरेट करण्यासाठी जितके पाणी लागते, त्याच्या पाचपट पाणी २५ सेंटिग्रेडला लागते, हा मुद्दा लक्षात घेतला जावा.
मधुमेह्यांसाठी खास सूचना - अनियंत्रित मधुमेहामध्ये कोरोनाच्या मृत्यूंचे प्रमाण जवळजवळ दुप्पट होताना दिसत आहे. मधुमेहामध्ये रक्तातील शर्करेकडे सतत लक्ष ठेवावे लागते. 'काही महिन्यांतून एकदा', लॅबकडून ते करून घेऊन भागत नाही. स्वतःचा ब्लड शुगर मीटर जवळ ठेवून आठवड्यातून अनेकदा, सकाळी अन्नप्राशनाआधी (९०पेक्षा कमी) आणि रात्रीच्या जेवणानंतर २ तासांनी (१५०च्या खाली), तसेच दिवसातून कधीही एकदा (रँडम) १५०च्या खाली असे रक्तशर्करेचे आकडे असावे लागतात. पिष्टमय पदार्थांच्या सेवनावर कडक नियंत्रण ठेवावे लागते. व्यायामानेही रक्तशर्करा खाली नेता येते. कृपया याकडे कडक लक्ष पुरविणे. याने धोका पुष्कळ कमी होईल.


अमेरिकेत एक नवीन तंत्रज्ञान पुढे आले आहे. फोर्ड कंपनीने पोलिसांच्या गाड्या, ज्याच्यात पोलीस दिवसभर असतात, त्या निर्जंतुक करण्यासाठी त्यांचा अंतर्भाग ५६ सेंटिग्रेडला पंधरा मिनिटे गरम करणारी सिस्टिम बनविली आहे. गाडीचे कूलंट वाफ करून यासाठी वापरले जाते. सिस्टिम चालू करून माणूस त्यातून बाहेर पडतो आणि गाडी सील होते. पंधरा मिनिटांनी निर्जंतुक गार हवा सोडून गाडी थंड करून वापरली जाते. फोर्डच्या गाड्यांचा अंतर्भाग ८० सेंटिग्रेडपर्यंत खराब होत नाही. हे भारतात कसे वापरता येईल याचा विचार केला जावा.
अशा अनेक प्रकारांनी आपण आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना सुरक्षित ठेवू शकता.