एका अनोख्या, चित्तथरारक जगाची

स्रोत: विवेक मराठी    दिनांक09-Jun-2020
|
@ कमांडर (नि.) विनायक शंकर आगाशे

कमांडर (नि.) विनायक शंकर आगाशे १९७१च्या भारत-पाक युद्धात सहभागी होते. त्यांचे वडील दुसऱ्या महायुद्धात इटलीमध्ये लढले होते. त्यानंतर १९४७च्या काश्मीर युद्धात, १९६२च्या भारत-चीन युद्धात आणि १९६५च्या भारत-पाक युद्धातही ते सहभागी होते. कमांडर (नि.) विनायक आगाशे यांचा मुलगा आणि सून दोघेही भारतीय वायुदलात विंग कमांडर आहेत. कमांडर (नि.) आगाशे काही काळ पाणबुडी सेवेतही होते. अतिशय गोपनीयरीत्या आणि मूकपणे काम करणाऱ्या या सुरक्षा व्यवस्थेसाठी काम करतानाचा थरारक, रोमहर्षक अनुभव सांगणारा लेख.


deffince_1  H x
 
मी एक निवृत्त पाणबुडी अधिकारी आहे. माझ्या ऐन उमेदीच्या काळापासून आता खूप लांब आलेला, थकलेला आणि सेवानिवृत्त झालेला अधिकारी. माझी नातवंडे माझ्याकडे बहुधा निरुपयोगी आजोबा म्हणून पाहतात. कारण मी पाणबुडी शाखेमध्ये जे काही केले, त्याबद्दल बोलू शकत नाही किंवा काही करू शकत नाही. तथापि काही काळापूर्वी मी भारतीय नौदलाच्या पाणबुडी शाखेमध्ये, तरुणपणाच्या मस्तीमध्ये फिरणारा, उत्साहाने भरलेला एक अधिकारी होतो याचा माझ्याकडे आता फक्त एकच पुरावा आहे - माझ्या बेडरूममधील एका मखमली पेटीमध्ये ठेवलेले माझ्या पाणबुडीतील गतकाळाइतकेच दुर्लक्षित असलेले नाण्याच्या आकाराचे ‘विशिष्ट सेवा पदक’.

जगातील नौदलात पाणबुडीला साधारणपणे ‘सायलेंट सर्व्हिस’ म्हणून संबोधले जाते. कारण सामान्य माणसाला ती क्वचितच पाहायला मिळते आणि ज्या गोष्टी पाणबुडी शाखेतील अधिकारी करतात, त्या गोष्टी सहसा महाभयंकर (ड्रेकोनियन) अशा 'ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट' अर्थात अधिकृत गुप्तता कायद्याअंतर्गत येत असल्यामुळे सामान्य माणसांच्या नजरेपासून लांबच ठेवल्या जातात. आणि हे योग्यच आहे. कारण पाणबुडी एक प्राणघातक, शांतपणे काम करणारी सामरिक शस्त्रप्रणाली आहे, जी स्वत:च्याच एका मित्रराष्ट्राबरोबर युद्ध सुरू करू शकते किंवा एखाद्याच्या सर्वात वाईट शत्रूशी चालू असलेले युद्ध थांबवू शकते. म्हणूनच, शांततेत किंवा युद्धामध्ये पाणबुडी आपल्या हद्दीत दृष्टीस पडल्याबरोबर किंवा तिच्या आपल्या राष्ट्राच्या तळापासून दूर अशा इतर कोणत्याही ठिकाणी आढळल्यास, सामान्यतः पहिल्या फटक्यात नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. कारण बहुतेक वेळेस ती शत्रूच्या सागरी हद्दीत काहीतरी चिथावणीखोर कृत्ये करत असते. पाणबुडी सर्वसामान्यपणे कुप्रसिद्ध ‘पीपिंग टॉम’ (दुसऱ्याच्या घरावर नजर ठेवणारी) म्हणून ओळखली जाते. पाणबुडी ही नेहमी युद्ध करण्यासाठी रणनीती किंवा डावपेचात्मक अस्त्र (TACTICAL OR STRATEGIC WEAPON) म्हणून वापरली जाते. म्हणूनच तिच्याबद्दल नेहमी द्वेषच बाळगला जातो आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा पाणबुडीला नष्ट करण्याचीच वृत्ती दिसून येते.


इलेक्ट्रिक / डिझेलवर चाललेल्या पाणबुडीतील माणसांचे आयुष्य हे महासागराच्या गूढ आणि काळोख्या खोलीमध्ये लपलेल्या खतरनाक मगरीच्या पोटात राहण्यासारखे असते. बहुतांश वेळेस पाणबुडी सागराच्या पोटात, अंधारात दडून असते आणि क्वचितच काळोख्या रात्री बॅटरी चार्ज करण्यासाठी १० मीटर पाण्याखाली येते.


पाणबुडीत बाहेरून कोणताही आधार (support) न घेता १०० दिवसांपर्यंत गस्तीवर राहण्यासाठी इंधन, वंगण तेल आणि कोरडा शिधा असतो. शक्य तितकी तेथे संपूर्ण इलेक्ट्रॉनिक शांतता असते; व्हीएलएफ (Very Low Frequency)वर कोडित संदेश पाण्याखालून पाठवले किंवा प्राप्त केले जातात.


बंदरात असताना पाणबुड्यांकडे टॉर्पेडो, अवजड यंत्रसामग्री आणि त्यासारख्या वस्तू लोड करण्यासाठी वरच्या बाजूला हॅच (उघडणारे झाकण) असले, तरी पाणबुडीमध्ये कर्मचाऱ्यांचा नियमित प्रवेश सामान्यतः कोनिंग टॉवरमधील सरळ खाली जाणाऱ्या शिडीनेच असतो. आत गेल्यावर एका उंच माणसासाठी जेमतेम सरळ उभे राहण्याइतकीच जागा असते. बोटीच्या ‘कॅप्टन’शिवाय कोणालाही स्वत:चा वेगळा बिछाना नसतो. उर्वरित भागात स्लीपिंग क्वार्टरमध्ये आठ तास पाळीपाळीने जेथे जागा मिळेल तेथे झोपायचे असते. जागृत अवस्थेत एक जण नेहमी ड्युटीवर असतो. आॅफ ड्युटी असून जे सैनिक झोपलेले नसतात, त्यांना काहीतरी दुसरे काम दिलेले असते - टेहळणी करणे, त्याची नोंद ठेवणे, देशाच्या छुप्या सेवेत लागणारी आपली शस्त्रे-अस्त्रे घासून पुसून सतत सज्ज ठेवणे यासारखी सतत कामे चालू असतात.


पाणबुडीमध्ये प्रायव्हसी नसते, कारण जागेअभावी पाणबुडीच्या जटिल प्रणालीची एक किंवा इतर नियंत्रणे वॉल्व्ह इत्यादी शौचालयातही वर-खाली-बाजूला कुठेतरी असतात. शौचालयात बसून राजा सॉलोमन यांच्यासारखा सखोल चिंतनात असताना, कुणीतरी नौसैनिक 'एक्स्क्यूज मॉइस, सिल्वूप्ले'सारखे क्षमा वगैरे न मागता शौचालयात एखादा वाॅल्व्ह आणि स्विच चालू किंवा बंद करण्यासाठी येत असतो.


पाणबुडीत गोड्या पाण्याची कायमची कमतरता असते आणि म्हणूनच शौचालयात नेहमी समुद्राचे पाणीच वापरावे लागते. या समुद्राच्या पाण्याने व त्यातील मिठाच्या स्फटिकांनी पार्श्वभागास आणि पृष्ठभागास पाणबुडीस्थित नौसैनिकांना कायमस्वरूपी ‘धोबीची खाज’ दिलेली असते; त्यातल्या त्यात समाधान एवढेच असते की एखाद्यास दात घासण्याची आणि केस कापण्याची गरज नसते आणि म्हणूनच सर्व पाणबुडी सैनिक समुद्रात असताना कॅरिबियनचा समुद्री चाचा ‘डेव्ही जोन्स’सारखेच दिसतात.


पाणबुडीमध्ये सर्वात जास्त भयंकर बाब काय असेल तर ती म्हणजे पाणबुडीत आग लागणे. आगीमुळे मृत्यू, आगीच्या किंवा बॅटरीच्या धुरामुळे दम कोंडून मृत्यू येणे. तेथे पळून जायला कुठेही जागा नाही आणि एकदा पाण्याखाली गेल्यानंतर पाण्यात उडी मारून पळून जाणे शक्य नाही. पाणबुडीला पृष्ठभागावर येणे बहुतेक वेळेस अशक्य असते, कारण तुम्ही नेहमीच चुकीच्या जागी (शत्रूच्या गोटात) असता आणि जर त्यांनी (शत्रूने) ते पाहिले किंवा तुम्हाला पकडले, तर एक आंतरराष्ट्रीय राजकीय पेच निर्माण होऊ शकतो. पाणबुडीला लागलेल्या आगीमुळे बहुधा भीषण परिणाम घडतात. म्हणूनच म्हटले जाते की, सबमरीनर्स (सबमरीनमध्ये काम करणारे) सहसा एक 'भीषण सुंदर' असे जीवन जगतात. ‘Que Serra Serra' (के सरा सरा) या गाण्याप्रमाणे, जे होईल ते होईल किंवा जो होगा देखा जायेगा, बाकीची देवाला काळजी.


ऑफिशियल सिक्रेट अ‍ॅक्टमध्ये आपण जवळपास २५ वर्षं बांधलेले असतो आणि म्हणूनच मी कदाचित सरकारी / गुप्तहेर खात्याच्या क्रोधाची वक्रदृष्टी न पडता एखादी जुनी गोष्ट सांगू शकेन, केवळ ही पाण्याखालील गूढ पण मूक सेवा नियमितपणे काय करते याची कल्पना देण्यासाठी.


सप्टेंबर / ऑक्टोबर १९८६ दरम्यान मी आयएनएस / एम वागली, डिझेल इलेक्ट्रिक ‘फॉक्सट्रॉट’ वर्ग पाणबुडी (आताच्या अणुपाणबुडीच्या तुलनेत पुरातन) बोटीचा कॅप्टन (Commanding Officer) होतो. विशाखापट्टणममधील कमांड मेसच्या हिरव्यागार हिरवळीवर ‘कमांड रिसेप्शन’ची एक मोठी पार्टी चाललेली होती आणि प्रत्येक जण त्यांच्या ड्रिंकचा आनंद घेत होता. कोणीतरी मला सांगितले की कॅप्टन सुरेश (पाणबुडी शाखा) माझा शोध करीत आहेत. मी कॅप्टन सुरेशला भेटताच त्याने मला तातडीने सी-इन-सी (कमांडर इन चीफ)च्या कार्यालयात यायला सांगितले. सी-इन-सीच्या कार्यालयात ध्वज अधिकारी (Flag Officer) सबमरीन्स आणि चीफ ऑफ स्टाफ होते. सी-इन-सी, व्हाइस अॅडमिरल चोप्रा यांनी मला विचारले की "मी ताबडतोब Operational Missionवर (कामगिरीवर) जायला तयार आहे का? अर्थात ही सूचना-कम-हुकूमच असतो आणि त्याला तितके प्रचंड सबळ कारण असल्याशिवाय नाही म्हणायचे नसतेच. मला चीफ ऑफ स्टाफकडून माहिती देण्यात आली आणि मी ताबडतोब पार्टी सोडली आणि 'वागली' पाणबुडीवर गेलो.


पुढच्या ३ तासांत सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या कामगिरीसाठी बोटीवर परत बोलावण्यात आले. १२ क्लिअरन्स डायव्हर्सच्या तुकडीसह ४ जेमिनी (इंफ्लॅटेबल रबर बोट्स)सह ताजा शिधा - अन्नधान्य, भाज्या इ. पाणबुडीत साठवला गेला. टॉर्पेडो डागण्यासाठी तयार करण्यात आले. 'वागली' समुद्रासाठी तयार झाली आणि आम्ही चूपचापपणे बंदर सोडले. इतक्या गुपचूपपणे की आम्ही केव्हा गेलो तेसुद्धा बाजूच्या जहाजाला कळले नाही.


माझ्या कामगिरीचा आदेश (sailing order) एका वरवर साधारण दिसणाऱ्या (operational patrol) 'सर्वसाधारण गस्ती'साठी होता. मात्र विविध प्रकारच्या तांत्रिक छुप्या माहितीचे संकलन, समुद्रशास्त्रातील नैसर्गिक बदलांची माहिती करून घेणे, बंदरांमध्ये छुप्या तऱ्हेने प्रवेश कसा करता येईल, प्रत्येक प्रकारच्या जहाजांच्या ध्वनी व चुंबकीय (acoustic and magnetic signature) स्वाक्षर्‍याचे निरीक्षण करणे, रेडिओ आणि रडार इंटरसेप्ट्स, सागरी धमकीच्या परिस्थितीचे मूल्यांकन, घुसखोरी किंवा गुप्तचर यंत्रणेची हद्दपारी… ..आणि अशीच अनेक मूलत: हेरगिरीमध्ये मोडणारी विशिष्ट ध्येये त्यामागे होते. ही कामगिरी सुमारे ३० दिवसांपर्यंत हेरगिरी करण्याची होती. आम्हाला पाण्याच्या पृष्ठभागाखालूनच शत्रूच्या किनारपट्टीत लपून जाणे आणि तीव्र जोखीम व सावधगिरीने कार्य करणे हा आदेश होता. त्या वेळी तो देश आपल्याबरोबर युद्ध करत नव्हता किंवा त्यांच्याबरोबर आपले कोणतेही शत्रुत्व नव्हते. परंतु हेरगिरीच्या अस्थिर अंडरवर्ल्डमध्ये, आजचा मित्र उद्याचा शत्रू असू शकतो आणि म्हणूनच शत्रूंबरोबर मित्रांचाही मागोवा ठेवणे हे आमचे कार्य होते. जर पकडले गेलो असतो, तर आत्मसमर्पण करणे किंवा आम्ही भारताचे लोक आहोत म्हणून पांढरा झेंडा दाखवणे हा पर्यायच आम्हाला दिलेला नव्हता, हे आम्ही जाणून होतो. आम्ही जर त्यांच्या दृष्टिक्षेपात आलो, तर ते आम्हाला नष्ट करतील आणि पीपिंग टॉम्सवर दया दाखवली जाणार नाही. सैन्याच्या गोरखा रेजिमेंट, ‘काफर भांडा मर्नू रामरो’ किंवा ‘भ्याडपणासारखे शरण जाणे आणि बडबड करण्यापेक्षा मरणे बरे’ या घोषणेचे आमच्याशी बरेच साम्य होते.


आम्ही १०० मीटरची खोली ठेवत शत्रूच्या मुख्य आणि महत्त्वाच्या बंदराजवळ जायचे ठरवले होते. माझे विभागीय प्रमुख, लेफ्टनंट कमांडर रॉबिन परेरा (Executive Officer अधिशासी अधिकारी), पीसी अग्रवाल (इंजीनियरिंग ऑफिसर) आणि लेफ्टनंट श्रीकांत (इलेक्ट्रिकल ऑफिसर) यांची मी बैठक बोलावली. त्यांना आपल्या कामगिरीचे उद्दिष्ट, आपल्याला काय लपाछपीचा खेळ खेळायचा आहे ते समजावून सांगणे, माझ्या मनात काय आहे ते सांगणे आणि त्यांचा त्याबद्दल सल्ला काय आहे ते जाणून घेणे, हा त्या बैठकीचा उद्देश होता. पाणबुडीवर आम्ही एकसंघच काम केले आणि त्या सर्वांनी असंख्य कामांमध्ये असलेले आपले कौशल्य, ज्ञान उत्साहाने पणाला लावून संपूर्ण सहकार्य दिले. त्यांचे नेमून दिलेले काम करण्यासाठी त्यांना कधीही कोणतीही आठवण करून द्यावी लागत नसे.


चर्चा आणि विचारविनिमयानंतर असे ठरवले गेले की आम्ही सूर्यास्तापूर्वी शत्रूच्या प्रादेशिक (Territorial) सागरी सीमेवर जाण्यासाठी १०० मीटर खोलीवर शांत गतीने पुढे जाऊ. त्यानंतर सूर्यास्तापूर्वी शत्रूच्या सागरी सीमेच्या किनाऱ्यावर आपल्या विहित जागी जाऊन स्थानापन्न होऊ. त्यानंतर सूर्यास्तानंतर पाण्यात १०० मीटरवरून ५० मीटर खोलीपर्यंत वर येऊ आणि शत्रूच्या सागरी हद्दीत प्रवेश करून टेहळणी करू. कॉन्टिनेन्टल शेल्फ खूपच उताराचे (Gradient) असल्यामुळे (किनाऱ्यापासून पाण्याची खोली झपाट्याने वाढत जात असल्यामुळे) आमच्या लक्ष्य क्षेत्राच्या नॅव्हिगेशन चार्टवर पाण्याची खोली ‘बॉटमलेस’ (तळ सापडत नाही इतकी) किंवा १००० मीटरपेक्षा जास्त म्हणून दर्शवली होते.


पाणबुडी साध्या ‘आर्किमिडीज’ तत्त्वावर चालते. एकदा पाण्याखाली गेले तर ती शून्य ट्रिम (म्हणजेच पाण्याच्या पातळीला समांतर शून्य अंशाच्या कोनात) किंवा

क्षितिजाशी समांतर (horizontal) पाणबुडीच्या पुढे आणि मागे असलेल्या टाक्यांत पाणी भरून जड होऊन किंवा कॉम्प्रेस्ड हवेने पाणी टाक्यातून बाहेर टाकून म्हणजे हलके होऊन राखली जाते.


सूर्यास्त झाल्यावर आम्ही १०० मीटर खोलीवर, शून्य ट्रिमच्या स्थितीत होतो. किमान यंत्रणा चालवत होतो, जेणेकरून शांत राहायचा प्रयत्न करत होतो. पाण्यातून तयार होणारा कोणताही आवाज पाणबुडीचा वाईट शत्रू आहे, कारण ध्वनी पाण्याखाली वेगाने आणि सर्वदूरपर्यंत प्रवास करतो आणि त्याने आपल्या शत्रूला इशारा मिळू शकतो.


'सोनार’ वापरून प्राप्त झालेल्या समुद्राच्या पृष्ठभागाच्या चित्रामध्ये ४ ट्रोलर्स, ३ व्यापारी जहाजे आणि शत्रूच्या २ युद्धनौका - बहुधा फ्रिगेट्स दिसत होत्या. आम्ही शांत शार्कप्रमाणे, किनाऱ्याच्या जास्तीत जास्त जवळून आणि जवळ असलेल्या शत्रूच्या जहाजांना टाळत आत गेलो आणि ठरल्यानुसार ५० मीटर खोलीपर्यंत वर आलो. माझे नौसैनिक शांतपणे त्यांची पाळत ठेवण्याची आणि रणनीतिकारक गुप्त माहिती गोळा करत असत. घड्याळाची टिकटिकसुद्धा मोठा आवाज वाटेल इतकी शांतता राखलेली होती आणि त्यात काळ वेगाने पुढे सरकत होता. मी पाणबुडीचे केंद्र असलेले कंट्रोल रूम ऑफिसर आॅफ द वाॅचकडे (O.O.W.कडे) सुपुर्द केले आणि एक छोटीशी डुलकी काढण्यासाठी कंट्रोल रूमपासून काही फूट अंतरावर माझ्या केबिनवर परतलो.


पहाटे दोनच्या सुमारास, मला अंतःप्रेरणेने ट्रिममध्ये किंचित बदल झाल्याचे जाणवले (पाणबुडीचे नाक वर येत होते). बदललेल्या स्थितीची मला कल्पना देण्यासाठी आॅफिसर आॅफ द वाॅचने मला सूचना करण्यापूर्वीच मी माझ्या बंकवरून उठलो आणि ताबडतोब कंट्रोल रूमकडे गेलो. तेथे असलेल्या उपकरणांच्या तबकड्यांकडे पाहताना माझ्या लक्षात आले की काही विचित्र कारणास्तव आमची खोली कमी होत आहे आणि आम्ही हळूहळू समुद्राच्या पृष्ठभागाकडे येत आहोत.


“स्लो अहेड, पोर्ट अॅण्ड स्टारबोर्ड मोटर्स, बोथ प्लेन्स टू डाइव्ह” मी आज्ञा दिली. आॅफिसर आॅफ द वाॅचने माझी आज्ञा प्रोपल्शन कंट्रोलरकडे पुन्हा केली. नियंत्रण प्लेन्स (विमानातील लिफ्टप्रमाणेच) प्रोपेलर्सच्या अगदी थोड्या अंतरावर असतात आणि म्हणूनच प्रोपेलर्सच्या प्रवाहामुळे प्लेन्स अधिक प्रभावी ठरतात. प्रोपेलर्सचा जोर वाढल्याने मला कंपने जाणवू लागली, पण तरीही पाणबुडी हळूहळू स्वत:होऊन वर जात राहिली. "फ्लड कॉम्प-२ (पाणबुडीच्या समतोल राखण्यासाठी त्यात दोन Compensating Tanks असतात.) - दोन क्रमांकाच्या कप्प्यात / टाकीत अर्धा टन पाणी भरा" मी आज्ञा केली. २ क्रमांकाच्या टाकीमध्ये पाणी भरण्याची जबाबदारी असलेले वरिष्ठ नाविक - पॅनेल चीफला (त्यांचे नाव महाजन होते.) आॅफिसर आॅफ द वाॅचने कर्तव्यदक्षपणे ते उद्धृत केले .


“फ्लड कॉम्प-२ अर्धा टन” मी आदेशाची पुनरावृत्ती केली. समोरासमोर असलेल्या पॅनेलवरील ट्रिम इंडिकेटरचा संदर्भ घेऊन पाणबुडी Horizontal आणण्यासाठी प्लेन-नियंत्रण करणारे Coxswain Chief P.O. पाटील झगडत असल्याचे मला दिसले. पाणबुडी ट्रिम हे विमानाच्या जॉय स्टिकप्रमाणे पुल-पुश कंट्रोलचा वापर करून फॉरवर्ड आणि आफ्ट प्लेनद्वारे नियंत्रित केले जाते.


हायड्रो-डायनामिक्स आणि सबमरीन नियंत्रण यंत्रणा व्यवस्थित काम करत असल्याचे दिसत नव्हते. 'वागली' नियंत्रणाला विचित्र आणि हळूहळू प्रतिसाद देत होती. जर हे असेच चालू राहून आम्ही पृष्ठभागावर आलो असतो, तर त्याचे परिणाम गंभीर आणि अकल्पनीय झाले असते. या धोकादायक परिस्थितीत जाण्याच्या कल्पनेने मला वातानुकूलन काम करत असूनही घाम फुटू लागला.


"कंपार्टमेंट्सची तपासणी करा" असा आदेश मी दिला. माझा आवाज तणावग्रस्त आणि कंट्रोल रूमच्या आवाजाच्या मर्यादेपेक्षा खूपच जास्त होता. दक्षता दलाच्या अधिकाऱ्याने इंटरकॉमवर माझ्या आज्ञेची पुनरावृत्ती केली. मला जहाजावरील प्रत्येक माणूस पाणबुडीच्या प्रत्येक भागास नखशिखांत आणि डावी-उजवीकडे कसून पाहणाऱ्या पहारेकऱ्यांप्रमाणे फिरत असल्याची कल्पना आली. एक-एक करून त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्थानकांमधून ‘ऑल करेक्ट’ नोंदवण्यासाठी कॉल केला. शेवटच्या माणसाने कॉल करेपर्यंत ओ.ओ.डब्ल्यू.ने चेक सूची तपासली.


“सर्व कंपार्टमेन्ट्स बरोबर चेक केले” अशी माहिती त्यांनी दिली. मी ओ.ओ.डब्ल्यू.कडून कॉन ताब्यात घेतल्यापासून काही मिनिटे उलटून गेली होती. मला माझ्या केसांवर घाम जाणवू लागला होता. मला माझ्या आजूबाजूच्या लोकांपेक्षा थंडी वाजत होती. मी ऑर्डर दिली, “फ्लड कॉम्प-२, एक टन” (२ क्रमांकाच्या टाकीत १ टन पाणी भरा.)


कॅप्टनने आपत्कालीन परिस्थितीत डोके बर्फासारखे थंड ठेवण्याची अपेक्षा होती आणि इथे मला एकदम घाम फुटला होता. मी स्वत:वर नियंत्रण ठेवण्यासाठी माझ्या मुठी आवळल्या. “फ्लड कॉम्प-२ एक टन” मी परत गरजलो. ही पाणी आत घेण्याची प्रक्रिया बराच काळ चालू होती, परंतु 'वागली' हळूहळू वरच येत होती.


शेवटी "वागली, प्रिये, माझे ऐक", मी पाणबुडीशी हळूच निःशब्दपणे बोललो आणि माझ्या आंतरिक शक्तीने स्वत:हून वर जाण्यापासून रोखण्यासाठी विनवणी केली. असे वाटले की प्रिय 'वागली'ने खरेच माझे म्हणणे ऐकले. खूप हळूहळू तिने वर जाणे बंद केले आणि ती खाली जाऊ लागली.


"५० मीटर खोलीवर परत जा", मी आदेश दिला. एक्स-ओने माझी आज्ञा पुन्हा उच्चारली. माझ्या तणावात Ex. O. रॉबिन आलेला मला जाणवलाही नाही. त्याने शांतपणे येऊन ओ.ओ.डब्ल्यू.कडून पदभार स्वीकारला होता, हे माझ्या लक्षात आले नाही. मी आतापर्यंत रोखून ठेवलेला श्वास हळूहळू सोडला, माझ्याशेजारी रॉबिन असणे हे खूप धीर देणारे होते.


परत ५० मीटर खोलीवर स्थानापन्न होण्यासाठी आमच्या पूर्वीच्या शांत गतीने गस्त घालण्यास सुमारे तीस मिनिटे लागली. आम्ही समुद्रातून २५ टन अतिरिक्त पाणी टाकीत घेतले होते. मला त्यामागचे कारण समजू शकले नाही. मला असे आढळले की इजीनिअर आॅफिसर अ‍ॅगी आणि इलेक्ट्रिकल आॅफिसर श्रीकांतसुद्धा शांतपणे कंट्रोल रूममध्ये आले होते आणि मागे शांतपणे उभे होते.


"ओ.ओ.डब्ल्यू. टेक ओव्हर" असा आदेश दिला. ओ.ओ.डब्ल्यू.ने प्रत्युत्तर दिले "ओव्हर". मी दोन ग्लास थंड पाणी प्यायलो. पाणी पितानाही माझी विचारधारा पुढे चालत होती. मी वॉर्ड रूममध्ये माझ्या मागून येण्यासाठी माझ्या टीमच्या प्रमुखांना आदेश दिले. माझ्या टीमच्या कर्णधारांच्या चेहऱ्यावर, "काय झाले?" असे प्रश्नचिन्ह मला दिसत होते.


मी हसलो. तेही माझ्याबरोबर हसले. कदाचित तणाव शिथिल झाला म्हणून असेल. ‘'होतं असं कधीकधी'’, मी काहीशा बेफिकिरीने खांदे उडवत टिप्पणी केली. "विश्रांती घ्या, आपण प्रतीक्षा करू या आणि पाहू या" असे सुचवीत मी माझ्या स्वतःच्या बंकवर परत गेलो.


अगदी तब्बल एका तासानंतर, वागलीने या वेळी उलट दिशेने पुन्हा गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. तिने खोल जाण्यास सुरुवात केली. ती हळूहळू खोली वाढवत होती. मी माझ्या केबिनमध्ये असलो, तरी हे मला कळले आणि कंट्रोल रूममध्ये ओ.ओ.डब्ल्यू.ने ताबडतोब ‘अ‍ॅक्शन स्टेशन’साठी क्लेक्सन (बिगुल) वाजवला. सर्व क्रू मेंबर्स, अगदी झोपी गेलेलेसुद्धा, आपापल्या कामाच्या ठिकाणाकडे धावले.


एक्स.ओ. रॉबिन अगदी माझ्या मागे कंट्रोल रूममध्ये आला होता. माझ्या डोळ्याच्या कोपऱ्यातून मला दिसले की अ‍ॅगी आणि श्रीकांतसुद्धा कोपऱ्यात उभे होते, थांबून पाहत होते. मी प्रभारी माणूस होतो आणि प्रत्येकाचे माझ्यावर लक्ष होते. प्रत्येकाची अपेक्षा होती की मी 'वागली'कडून आपले काम करून घ्यावे. पण वागली गैरवर्तन करीत होती.


त्वरित आम्ही एका उलट्या प्रक्रियेत गेलो, एका तासापूर्वी केलेल्या सर्व कामांच्या बरोबर उलट. कॉम्प-२मधून पाणी बाहेर टाकण्यास सर्व पंप सुरू करण्यात आले, 'वागली'ला हलके बनवण्यासाठी सुरुवात केली. परंतु हे सर्व चालू असूनही वागली हळूहळू अधिक अधिक खाली जात राहिली.


जरी पंप त्यांच्या रेट केलेल्या क्षमतेवर कार्य करीत असले, तरीही यासारख्या स्थितीत प्रत्येक मिनिट दहा मिनिटांसारखे असते. डेप्थ गेजवरील सुई लाल निशाणाच्या दिशेने सतत जात राहिली. रेड मार्कने crushing खोली, 'यापुढे मृत्यू' दर्शविणारी खोली असे एक एक टप्पे पार करायला सुरुवात केली. कंट्रोल रूममधील प्रत्येक दृष्टी खोली दर्शवणाऱ्या सुईकडेच अनिमिष नेत्राने पाहत होती. ती सुई हळूहळू लाल चिन्हाकडे सरकत होती. आणखी ५० मीटर आणि 'वागली' त्याच्या चिरडून जाण्याच्या खोलीवर पोहोचेल. म्हणजे आपल्या सभोवतालच्या पाण्याच्या दाबाने चिरडलो जाणार. 'वागली'वर इतका दबाव येईल की एखादे अंडे चिरडून गेल्यासारखे आपल्याला समुद्राच्या तळाशी त्वरित निर्वाण मिळेल.


परिस्थिती इतकी ताणली गेली होती की, माझ्या तोंडचे कोणतेही शब्द हे त्रिकालाबाधित सत्य म्हणून लोकांनी स्वीकारले असते. मी दिलेला प्रत्येक आदेश सर्व जण विचार, सूचना किंवा मतभेद न करता जसाच्या तसा ताबडतोब अमलात आणतील अशी स्थिती होती. माझ्या घाईघाईने घेतलेल्या एखाद्या चुकीच्या निर्णयाने 'वागली' आणि तिच्यातील नौसैनिक यांना कायमची जलसमाधी मिळेल अशी स्थिती निर्माण झाली होती आणि आमचे प्राण एखाद्या अत्यंत नाजूक अशा तंतूवर अवलंबून होते. डेप्थ गेजवरील सुई लाल चिन्हापासून केवळ १० मीटर वर होती.


"सेंटर ग्रूपच्या टाक्यांमध्ये हवा फुंकण्यासाठी तयार राहा", मी आदेश दिला. सेंटर ग्रूप गिट्टी ही प्रमुख गिट्टीची टाकी आहेत, ज्यातून सर्व पाणी बाहेर टाकले गेले तर 'वागली' त्वरित पाण्यात बुडवलेल्या हवेच्या फुग्यासारखी एकदम वरच्या दिशेने उधळली जाईल किंवा पाण्याखालून डागल्या जाणाऱ्या पोलारिस या आण्विक क्षेपणास्त्राप्रमाणे सरळसोट आकाशाकडे उंचावेल. माझी ऑर्डर शक्य तितक्या शांततेने होती. माझ्या हातात असलेला हा शेवटचा पर्याय (ट्रम्प कार्ड) होते. "तयार राहा आणि मी म्हणेन 'आत्ता (NOW)' त्या क्षणी कृती करा" मी खांद्यावर हात ठेवून पॅनेल चीफ महाजनींना (हाय प्रेशर एअर पॅनेलचा प्रभारी वरिष्ठ नाविक) सांगितले. उच्च दाबाच्या बाटल्यांमध्ये २०० किलो प्रतिचौ.सेमी इतका दाब असतो. (घरगुती गॅस सिलिंडरशी तुलना‌ करायची, तर त्यात प्रति चौ.इंचामध्ये ८-१० पौंड इतका दाब‌ असतो.)


कंट्रोल रूमच्या अगदी गच्चडी असलेल्या छोट्या जागेत माझे कुजबुजणेसुद्धा किंचाळल्यासारखे सर्वांना ऐकू येत होते. मी रॉबिनकडे पाहिले. पण तो शांत आणि धीरोदात्त होता, डोळे चमकदार आणि स्थिर, कोणत्याही भय-भीतीचा लवलेशही नाही. 'मी तुझ्याबरोबर आहे कॅप्टन’ ’असे सांगण्यासाठी त्याने काही मिलिमीटरने डोके हलवले. माझ्या तारुण्यातील अनुभवामुळे आणि शहाणपणाने मला जे काही करायचे आहे ते करण्याची हिम्मत दिली. जर मी मध्यभागी असलेल्या गिट्टीच्या टाक्या उडवल्या, तर 'वागली' एकदम समुद्राच्या पृष्ठभागावर येईल आणि त्यानंतर शत्रूच्या सीमेच्या आत पृष्ठभागावर आलेली पाणबुडी म्हणजे हातात आलेले लंगडे सावज असल्यासारखे होईल. आपल्या देशासाठी ती एकाच वेळी प्रलयकारक व लाजिरवाणी परिस्थिती असेल. आता माझ्याजवळ बुडत्याला काडीचा आधार किंवा ‘हॉब्सन्स चॉइस’ म्हणजेच एवढाच शेवटचा पर्याय उरला होता.


कंट्रोल रूममधील प्रत्येकाचे डोळे ‘खोलीमापक' सुईवर होते. मला कल्पना होती की 'वागली' पाणबुडीवरील प्रत्येकावर कंट्रोल रूमच्या व्यतिरिक्त असलेल्या प्रत्येक क्रू स्टेशनमध्ये प्रचंड दबाव होता आणि समुद्राची देवता वरुणदेवाला सर्व जण एकांतात प्रार्थना करत असतील की "हे वरुणदेवा, आमच्या कर्णधाराला सद्बुद्धी, धैर्य आणि आत्मविश्वास दे आणि 'वागली'ला आमच्या प्रार्थनेनुसार काम करण्याची प्रेरणा दे."


आतापर्यंत वेगाने लाल निशाणाच्या दिशेने जात असलेली खोलीमापक सुई आता अगदी हळूहळू जाऊ लागली होती. अत्यंत ताणलेल्या धातूमधून जसे आवाज येतात, तसे चित्रविचित्र आवाज 'वागली' काढत होती. सर्व खलाशी अ‍ॅक्शन स्टेशनवर होते. माझ्या पोटात मोठा खड्डा पडला होता आणि तणावामुळे शरीरातील अॅड्रेनालिन वाढून माझी नाडी घोड्याच्या वेगाने धावत होती. माझ्या हृदयात खोल कुठेतरी मला अतीव एकटेपणा व वेदना जाणवत होती. मी घाबरलो होतो, पण तसे दर्शवणे मला शक्य नव्हते. कारण मी या संपूर्ण टीमचा धैर्यधर आणि सागरासारखा शांत असा प्रमुख असलो पाहिजे (निदान दिसलो तरी पाहिजे).


तसे दिसण्यासाठी मी खोल श्वास घेतला, छाती फुगवली आणि आपले पोट आत घेतले आणि सर्वांना आश्वासक वाटेल असे हसलो. खोलीमापक सुईने धोक्याची लाल खूण (रेड मार्क फाॅर ‘क्रशिंग डेप्थ’) गाठली. पण माझ्या अंतर्मनातील आवाजाने मला सांगितले 'आता नको, थांबा’. काही सेकंदच गेले असतील, पण ते सेकंदसुद्धा तासांसारखे भासत होते. पण 'वागली'ने बहुधा माझा आतला आवाज ऐकला. खोलीमापक सुई अचानक लाल निशाणावर थांबली आणि ती तशी अर्ध्या-एक मिनिटासाठी थांबली. मात्र हे अर्धे मिनिटसुद्धा एखाद्या युगासारखे भासत होते. यानंतर ही खोलमापक सुई अचानक उलटी फिरू लागली. मी रोखून धरलेला श्वास सोडला आणि परत एक दीर्घ श्वास घेतला. बर्‍याच काळापासून माझा श्वासोच्छवास बंद असल्याची भावना मला होत होती आणि आता माझा श्वास मोकळा झाल्याची मला संवेदना होऊ लागली. मग 'वागली' वर येऊ लागली. प्रथम अगदी हळूहळू आणि नंतर अधिक वेगाने ती पुढे येऊ लागली.


वागली परत नियंत्रणाखाली येण्यासाठी - म्हणजेच फार वेगाने वर पृष्ठभागाकडे जाऊ नये, म्हणून टाक्यांमध्ये पुन्हा पाणी भरण्याचे आदेश देण्यात आले. १५-२० मिनिटांच्या सर्वच्या सर्व नौसैनिकांच्या उत्कंठावर्धक आणि उत्साहवर्धक कामामुळे आम्ही परत १०० मीटर आणि नंतर ५० मीटर खोलीवर आलो. सर्वांच्या चेहऱ्यावर आता समाधान आणि सुटकेचे स्मितहास्य होते. अशा बिकट परिस्थितीत गर्भगळीत न होता आपली बुद्धी स्थिर ठेवणाऱ्या धैर्यवान नेत्यांच्या परंपरेत जन्माला आलेल्या करड्या लष्करी अधिकाऱ्यांसारखे असणारे रॉबिन, अ‍ॅगी आणि श्रीकांत हे धैर्यवान सहकारी असणे ही माझ्यावर देवाची कृपाच होती.


जरी 'वागली' नुकतीच अज्ञात आणि कल्पनातीत अशा भयानक आजारातून उठली होती, तरी त्यावरचे सर्व लढाऊ आणि धाडसी नौसैनिक आता आपले दिलेले मिशन पूर्ण करण्यास तयार होते. कारण नेमून दिलेले काम अर्धवट सोडून पळून जाणे हे कुणाच्या रक्तात नव्हतेच. प्रत्येकी चार क्लिअरन्स डायव्हर्स असलेल्या चार रबरी बोटी (जेमिनी) भर मध्यरात्री शत्रूच्या किनाऱ्याजवळ - अगोदर ठरलेल्या चार ठिकाणी पाठवण्यात आल्या.


पाण्याची खोली, समुद्रतळाच्या मातीची स्थिती, भरती-ओहोटीची पातळी, किनाऱ्यावर असलेली वस्ती, शत्रूच्या किनाऱ्यावर गस्त घालणाऱ्या चौक्या, हल्ला करायचा झाला तर येऊ शकणारे संभाव्य अडथळे अशी सर्व माहिती काढण्यासाठी हे १६ जण पाठवले होते. दोन रात्रींनंतर परत भर मध्यरात्री त्यांना पाणबुडीवर घेण्यात आले. आम्ही आमचे ध्येय संपूर्ण गुप्तेतेने पूर्ण केले आणि खुल्या समुद्रासाठी प्रयाण केले. काही काळाने आम्ही महासागरात आंतरराष्ट्रीय हद्दीत परत आलो. आंतरराष्ट्रीय जलवाहतूक मार्गापासून दूर गेल्यावर मी 'अमेथिस्ट' (नेमलेले काम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठीचा कोड शब्द) रेडिओ केला आणि विशाखापट्टणमकडे कूच केले. ३२ तासांनंतर भारतीय नौदलाच्या एस्कॉर्टने आमच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या संरक्षणाखाली आपल्या सागरी हद्दीत प्रवेश करून आम्ही पृष्ठभागावर आलो आणि एस्कॉर्टसह होम पोर्टकडे (विशाखापट्टणम) परत सुरक्षितपणे प्रस्थान केले.


अर्थात नौदलातील आनंदी कथा होम पोर्टमध्ये अशा अचानक संपत नाहीत. तेथे तातडीने न्यायालयीन चौकशी होते. सर्वांना कसून प्रश्न विचारले गेले आणि आमच्या कृती, सामर्थ्य, निर्णयक्षमता, कणखरपणा आणि कमकुवतपणाचे पुनरावलोकन करण्यासाठी (आजच्या भाषेत SWOT Analysisसारखे) सर्वांकडून - विशेषत: रॉबिन, अ‍ॅगी, श्रीकांत आणि माझ्या स्वत:कडून पूर्ण चौकशी होऊन निवेदने घेण्यात आली. वागलीचे संवेदक (सेन्सर) बाहेर काढले गेले आणि त्यांचे विश्लेषण केले गेले. सबमरीन शाखेच्या वरपासून खालपर्यंत प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे होते की काहीही चुकीचे नसताना वागलीने असे गैरवर्तन(?) वारंवार का केले? याव्यतिरिक्त आम्ही संकलित केलेल्या डेटासाठी इंटेलिजन्स डिब्रीफ (विश्लेषण)ही होती.


पोसायडॉन या ग्रीक समुद्रदेवतेच्या विचित्र वर्तनाबद्दल सर्व प्रकारच्या अफवा आहेत. (म्हणजे या देवतेला नाराज करणाऱ्या जहाजांना ही देवता वादळात पाठवून जहाजबुडी करवते किंवा जहाजांचे अपघात होतात, असे समजले जाते). अर्थात यावर आता कुणी विश्वास ठेवत नाही.


आम्ही जिथे गेलो होतो त्या ठिकाणी परत गुप्त तपासणी केली गेली. निष्पाप दिसणाऱ्या मत्स्यहारांच्या होडक्यांत (फिशिंग ट्रॉलर्समध्ये) जटिल समुद्रशास्त्रीय उपकरणे नेऊन तेथील परिस्थितीचे गुपचूप विश्लेषण केले गेले.


शेवटी हे उघड झाले की हा भाग समुद्रतळातील ज्वालामुखी स्फोट होण्याचा धोका प्रदेश होता. समुद्राच्या तळावर ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने 'वागली' वर उचलली गेली आणि त्याची भरपाई म्हणून आम्ही समुद्राचे २५ टन अतिरिक्त पाणी टाक्यात घेतले. आम्ही पुढे जात असताना ज्वालामुखीच्या क्षेत्राबाहेर पाण्याचे तापमान, क्षारता आणि घनता अचानक बदलली असावी, ज्यामुळे 'वागली' खूपच अनियंत्रित झाली आणि तळाशी जाऊ लागली.


ज्या भागात आम्ही गुप्त तपास करायला गेलो, त्या भागात खोल समुद्रातील ज्वालामुखीय प्रक्रिया आणि पाणबुडीचे काम धोक्यात आणणारे अनपेक्षित आणि आडाखे चुकवणारी असंख्य समुद्रशास्त्रीय वैशिष्ट्ये अस्तित्वात आहेत आणि त्यामुळे आपल्या पाणबुडींवर अनाकलनीय परिणाम होऊ शकतात, हा धडा सर्वांना मिळाला. पुढे बर्‍याच वर्षांनंतर २००४मध्ये अशीच खोल समुद्र ज्वालामुखीच्या प्रक्रियेमुळे विनाशकारक त्सुनामी आली होती. आणि त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की त्सुनामी येण्याच्या वेळी आपली कोणतीही पाणबुडी आणि त्यात असणारे शूर नौसैनिक त्या भागात भटकत नव्हते.


मी काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालो असलो, तरी नौदलाकडून फॉक्सट्रॉट वर्ग पाणबुडीतील शेवटच्या आयएनएस 'वागली'च्या सेवानिवृत्तीच्या (Decommissioning) कार्यक्रमास मला बोलावण्यात आले होते. तेथे अनेक तरुण, उत्साही आणि हुशार, कडक पोशाख घातलेल्या पाणबुड्यांतील नौसैनिकांची परेड होती. 'वागली'सुद्धा आता माझ्यासारखी महासागराच्या खोल अंधाऱ्या कोपऱ्यात गस्त घालण्यासाठी आणि तेथून आम्हाला झगमगाटाच्या जगात परत आणण्यासाठी खूप जुनी-पुराणी झाली होती. माझ्या जुन्या जहाजांच्या काही सोबतींसह आम्ही 'वागली'च्या प्रांगणात गेलो, तिला प्रेमाने स्पर्श करत तिच्या आसपास जात जुने दिवस आठवत होतो, माझ्या आयुष्याच्या ऊर्जित आणि तारुण्याच्या काळातील आनंदी, समृद्ध आणि अभिमानाच्या एकत्रित आठवणींनी माझे मन भरले होते.


आमच्या वेळचे सर्व धाडसी पुरुष आता निवृत्त झाले आहेत आणि आता जगभरात विखुरले आहेत. त्यांच्यातील काही आता जिवंतही राहिले नाहीत. पण बाकी माझ्यासारख्या सर्व लोकांना या गूढ जगाची सुंदर अशी आठवण परमेश्वरचरणी विलीन होईपर्यंत राहीलच.


नंतर मी जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर काम केले. पण पाणबुडी सेवेमध्ये असलेला परस्परांमधील जिव्हाळ्याचा, स्पिरिट डी कॉर्प्सचा, रोमँटिक साहसातील अनुभवाचा आनंद मला कुठेही मिळाला नाही. आम्ही क्षुद्र हेवे-दावे-मत्सर यांपासून दूर होतो. मला आठवते की एका रात्री आवाजरहित स्थितीत हळूहळू मार्गक्रमण करणाऱ्या दुसर्‍या एका पाणबुडीवर मी शांत समुद्रात चमकणाऱ्या चंद्रकिरणांचे प्रतिबिंब पाहत उभा होतो, तेव्हा मला एक अनोखी जाणीव झाली की 'खाली पाणबुडीत असलेला प्रत्येक माणूस माझा भाऊ होता.'


आजही मी जेव्हा जगाच्या पाठीवर कुठेही पाणबुडीचा बॅज परिधान केलेला कोणत्याही देशाचा नौसैनिक पाहतो, तेव्हा त्याच्याशी हस्तांदोलन करण्यास विसरत नाही.

vsagashe_ [email protected]

(विशेष सेवा‌ पदकप्राप्त)