भारताला योग्य वेळी मिळालेले अजोड नेतृत्व - पी.व्ही. नरसिंहराव

स्रोत: विवेक मराठी    दिनांक01-Jul-2020
|
@आशुतोष ठोंबरे

p v narsimha rao_1 &
 
नुकत्याच झालेल्या 'मन की बात' कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव यांची आठवण काढुन त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. एका वेगळ्या विचारधारेच्या दिवंगत नेत्याला आदरांजली वाहणे, ही आपल्या सर्वांसाठी आश्चर्यचकित करणारी बाब आहे. अशा या दिवंगत पंतप्रधानाबद्दल आजच्या पिढीला थोडी माहिती द्यावी आणि मागील पिढीतील लोकांना त्यांच्या कार्याची उजळणी करू द्यावी, यासाठी हा अट्टाहास.


तत्कालीन निजाम राजवटीत (आजच्या तेलंगण राज्यात) २८ जून १९२१ रोजी पी.व्ही. नरसिंहराव यांच्या जन्म झाला. त्यांच्या जन्मगावी शिक्षणाची सुविधा नसल्याने त्यांनी काटकुरू या गावी प्राथमिक शिक्षण घेतले. निजाम राजवटीत होणाऱ्या जाचाला प्रत्युत्तर म्हणुन वयाच्या १०व्या वर्षांपासून 'वंदे मातरम्' या आंदोलनात सहभाग घेतला. बालपणातील या कृत्यामुळे त्यांना शिक्षणासाठी नागपूर आणि मुंबई येथे जाऊन कला शाखेचे व वकिलीचे शिक्षण घ्यावे लागले. तेव्हापासून महाराष्ट्राशी जुळलेले त्यांचे संबंध आयुष्याचा अंतिम क्षणापर्यंत राहिले. याच काळात त्यांनी निजाम राजवटीत आपली स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवली.

१९४०च्या दशकात नरसिंहराव यांनी 'पी व्ही' या नावाने काकटीय पत्रिका या नियतकालिकात संपादकीय लेखन केले. किमान १० भारतीय आणि ७ विदेशी भाषा येणारे हे विचारवंत राजकारण, लेखन अशा विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळविणारे राजकीय नेतृत्व होते. त्यांनी स्वत: एका मराठी पुस्तकाचे भाषांतरही केले आहे.

१९४८मध्ये निजाम राजवटीच्या भारतातील विलीनीकरणानंतर 'पी.व्ही.' भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. हळूहळू ते राजकारणात स्थिरावले. १९५७पासून पी.व्ही. आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्री या पदांवर नियुक्त झाले. भू-सुधारणा कायदा निर्माणकर्ते, राजकारणात सर्वस्पर्शी नेतृत्व म्हणुन ते पुढे आले. स्व. इंदिराजी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काँग्रेसमध्ये नवीन विचारप्रणाली अस्तित्वात आणली. दक्षिण भारतात काँग्रेसचा नवीन चेहरा उदयाला आला.
१९७७मध्ये आणीबाणीनंतरच्या काळात दक्षिण भारतात काँग्रेसला तारणारे एक ज्येष्ठ नेते असणारे पी.व्ही. पुढे भारताचे परराष्ट्र मंत्री झाले. १९८२मध्ये राष्ट्रपती निवडणुकीत पी.व्हीं.चे नाव आघाडीवर होते. परंतु काही राजकीय घडामोडींमुळे त्यांना हे पद मिळाले नाही. कदाचित भविष्यातील भारताला त्यांची गरज होती, या कारणामुळे ते राष्ट्रपती होऊ शकले नाहीत. पुढे त्यांना स्व. इंदिराजी आणि स्व. राजीवजी यांच्या काळात संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री आणि गृहमंत्री ही पदे सांभाळावी लागली. याच काळात त्यांनी नागपूरजवळील रामटेक लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. रामटेकमधील कालिदास संस्कृत विद्यापीठ ही पीव्हींचीच भेट आहे. आंध्र प्रदेशातील एका राजकीय नेत्याने महाराष्ट्रातील मतदारसंघाचे नेतृत्व करावे, ही पहिलीच घटना असावी.
 
१९८९मध्ये काँग्रेस पक्षाला विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली. त्यानंतर झालेल्या १९९१च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर बदललेल्या राजकीय पटलामुळे पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेच्या सारिपाटात सर्वात समोर होती. केवळ ३० जागांच्या कमतरतेमुळे काँग्रेसला काही पक्षांशी सत्तेसाठी समझोते करावे लागले. पक्षनेतृत्वाची हत्या झाल्याने पी.व्ही. नरसिंहराव यांनी राजकीय संन्यासाचा विचार सोडून पक्षाचे, पर्यायाने देशाचे नेतृत्व केले.
जगाच्या राजकारणात त्या वेळेस रशिया-अमेरिका शीतयुद्ध, सद्दाम हुसेन याची हुकूमशाही, जर्मनीचे विलीनीकरण आणि रशियाचे विभाजन असे वातावरण निर्माण झाले होते. भांडवलशाहीचा वाढता प्रभाव आणि साम्यवादाचा ऱ्हास यामुळे भारतीय अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. भारतात निर्माण होणारे त्रिशंकू सरकार म्हणजे आगीत तेल ओतल्यासारखे झाले होते. अशा या परिस्थितीत एका ७० वर्षीय विचारवंताकडे देशाचे नेतृत्व आले.

p v narsimha rao_1 &
पी.व्ही. स्वत: राजकारणातील प्रगाढ पंडित होते. त्यांना राजकारणासह अर्थकारणाची घडी बसवायची होती. या क्षणीच त्यांना जनतेने पाच लाखांचे भरघोस मताधिक्य दिले होते. या मत्याधिक्याचा 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्ये उल्लेख आहे. एवढ्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी त्यांनी प्रथमत: माजी रिझर्व्ह बँक गव्हर्नर आय.जी. पटेल यांना अर्थ मंत्रालयात कार्य करण्यासाठी विचारले, परंतु त्यांनी नकार दिला आणि त्यानंतर सक्रिय राजकारणात नसणारे परंतु भारतीय अर्थव्यवस्थेची जाण असणारे मनमोहनसिंग यांना त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आले. पी.व्हीं.च्या या दूरदृष्टीमुळे त्यांना 'आधुनिक भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक' म्हणतात.
 
१९९२मध्ये भारतीय शेअर बाजारात आमूलाग्र बदल करण्यात आले. सरकारी नियंत्रण आणि भागभांडवल कमी करण्यात आले. रुपयाची घसरण थांबविण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. भारतीय इतिहासातील ती सर्वात मोठी मंदी होती. शेअर बाजारामार्फत सरकारी कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीसाठी प्रयत्न झाले. खाजगीकरण आणि उदारीकरण करून अर्थव्यवस्थेला बळकटी दिली गेली. हर्षद मेहता यांनी केलेले घोटाळे पुन्हा घडू नयेत, यासाठी SEBI, NSE यांची स्थापना करण्यात आली. याच वेळेस सरकारला अस्थिर करण्याचे प्रयत्न झाले. त्या प्रयत्नांना रोखण्यासाठी पी.व्हीं.नी काही गोष्टी घडवून आणल्या, त्या बाबींना राजकीय विरोधकांनी पुढे स्वार्थासाठी भागभांडवल म्हणून वापरले.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंतसिंग यांच्या समर्थनाने राज्यातील आतंकवादाचा नाश, हजरतबलवरील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर, विमान अपहरणातून प्रवासांची बिनशर्त सुटका, इस्रायलशी मैत्रिपूर्ण संबंध, पूर्वेकडे चला ही योजना, संरक्षण खर्च वाढ अशी अनेक कामे पी.व्हीं.नी हातावेगळी केली.
 
 
डिसेंबर १९९२मध्ये अयोध्येत होऊ घातलेला हिंसाचार पी.व्हीं.च्या नेतृत्वामुळे टळला. १९९८मधील पोखरण अणुचाचणीचे जनकसुद्धा पी.व्ही.च होते. अटलजी आणि सुब्रह्मण्यम स्वामी यांच्यासारख्या विरोधी नेतृत्वाला त्यांनी आपल्या राष्ट्रहिताच्या कार्यात सहभागी करून घेतले. टाडा कायद्याची अंमलबजावणी, लातूर भूकंपग्रस्तांसाठी केलेले मदतकार्य यासुद्धा त्यांच्या सरकारच्या काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत.
बहुतांश राष्ट्रहिताच्या घटना घडल्यावरही झामुमो खासदार खरेदी प्रकरण, पुरुलियामधील शस्त्रास्त्रे प्रकरण, चंद्रास्वामी प्रकरण, मुंबई बाॅम्बस्फोट आणि अयोध्या प्रकरण यामुळे नरसिंहराव सरकारला पायउतार व्हावे लागले. नंतर १९९७पर्यंत पी.व्ही. लोकसभेत खासदार म्हणून आपली उपस्थिती दर्शवीत होते. जीवनाच्या या क्षणापर्यंतचा पूर्ण प्रवास पी.व्ही. यांनी 'इनसायडर' या आत्मचरित्रात विस्तृतपणे मांडला आहे.

गांधी परिवाराशी एकनिष्ठ असणाऱ्या काँग्रेसी नेत्यांनी नंतर पी.व्हीं.कडे दुर्लक्ष केले. अंतिम क्षणापर्यंत पी.व्हीं.ना अपेक्षित मान मिळाला नाही. विरोधी नेतृत्वाने म्हटल्यावरही भारतरत्न पुरस्कार त्यांना देण्यात आला नाही. आज ज्या सुधारणेचे श्रेय काँग्रेस घेते, ते सर्व देणे पी.व्ही. नरसिंहराव यांचे आहे, ही कोणीही विसरू नये.
२३ डिसेंबर २००४ला पी.व्हीं.नी शेवटच्या श्वास घेतला. त्यांचा पार्थिव देहसुद्धा काँग्रेसने दिल्लीतील कार्यालयात ठेवू दिला नाही. शेवटी त्यांच्यावर हैदराबाद येथे अंतिम संस्कार झाले. गेल्या १६ वर्षांत पी.व्हीं.चे नाव पहिल्यांदा आज देशाच्या नेतृत्वाने घेतले. यामुळे पी.व्हीं.ना ही शब्दांजली वाहावी, यासाठी हा छोटासा प्रयत्न.

आशुतोष ठोंबरे
८१४९०००८७०