अष्टपैलू व्यक्तिमत्व !

विवेक मराठी    13-Jul-2020
Total Views |
 @अजय हातेकर
 
चित्रकार, कलासमीक्षक, वारली चित्रशैलीचे अभ्यासक, वार्ताहर, उपसंपादक आणि सेवानिवृत्तीनंतर आता मुक्त पत्रकार एवढे सगळे पैलू एकाच व्यक्तीत असणे विरळेच. सहकारी व गुरू या दोन्ही नात्यांनी आमचे ऋणानुबंध जुळले. ज्येष्ठ स्नेही, मार्गदर्शक संजय देवधर यांनी आज दि. १३ जुलै रोजी वयाची ६१ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांच्यातील मला भावलेल्या व्यासंगी व्यक्तिमत्त्वाचे हे शब्दचित्र.
 

sanjay_1  H x W 

नाशिकमध्ये मध्यमवर्गीय परिवारात १३ जुलै १९५९ रोजी संजय देवधर यांचा जन्म झाला. त्यांचे पणजोबा प्राणाचार्य कृष्णशास्त्री देवधर प्रख्यात वैद्य होते. त्यांची ख्याती सर्वदूर पसरलेली होती. रविवार पेठेतील त्यांचा वाडा असलेल्या गल्लीला त्यांच्या सन्मानार्थ तत्कालीन नगरपालिकेने देवधर गल्ली असे नाव दिले. अशा घराण्यात जन्मलेल्या संजय देवधर यांना चित्रकलेची उपजत आवड होती. पेठे विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी चित्रकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याचे ठरवले. नाशिक कलानिकेतन या संस्थेत त्यांनी एक वर्षाचा फाउंडेशन कोर्स पूर्ण केला. नंतर उपयोजित कलेचे उच्चशिक्षण घेण्यासाठी मुंबईतील बांद्रा स्कूल ऑफ आर्टमध्ये व जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. विशेष गुणवत्तेसह पदविका पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबईत 'डायमेन्शन्स'मध्ये आणि 'आकार जाहिरात एजन्सी'मध्ये नोकरीचा अनुभव घेतला. नाशिकला परतल्यावर दैनिक गावकरीमध्ये ते रुजू झाले. कलाविभागात विविध लेखांची, कथांची शीर्षके, कथाचित्रे, मांडणी यात त्यांनी वेगळा ठसा उमटवला. १९८४पासून गावकरी प्रकाशन समूहाच्या साप्ताहिक गावकरी, रसरंग, अमृत मासिकाची मुखपृष्ठे व सजावट केली. आस्वाद व मधुरा या पुरवण्या अधिक आकर्षक, वाचनीय करण्याचे काम त्यांनी सातत्याने केले.

संजय देवधर यांचे सहकारी म्हणून काम करण्याची काही वर्षे संधी मिळाली. त्यातून मैत्री झाली व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा जवळून परिचय झाला. गावकरीचे काम सांभाळून देवधर लोकहितवादी मंडळ, कलाक्षेत्र दृश्यकला आस्वाद केंद्र, नाशिक कलानिकेतन या व अन्य संस्थांवर पदाधिकारी म्हणून काम बघत. तेथे कलाविषयक विविध उपक्रम राबवण्यात त्यांचा पुढाकार होता. ज्येष्ठ चित्रकार शिवाजी तुपे, पंडित सोनवणी, आनंद सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय चित्रकार संमेलन, राज्यस्तरीय चित्रप्रदर्शन व कलामेळावा घेण्यात आले. ते खूप गाजले. विद्यार्थ्यांपासून व्यावसायिक कलाकारांना त्यात सहभागाची संधी मिळाली. अशा उपक्रमांबरोबरच ते सातत्याने कलासमीक्षा करायला लागले. अनेक कलाकारांना आपल्या लेखणीने प्रसिद्धी देऊन प्रकाशझोतात आणले. केवळ चित्रकलाच नव्हे, तर शिल्पकला, संगीत, नृत्य, गायन, नाट्य अशा विविध कलांचा परामर्श ते घेत राहिले. विविध ठिकाणी कलाविषयक प्रात्यक्षिके, व्याख्याने व स्पर्धा परीक्षक म्हणूनही सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा सतत सहभाग राहिला आहे. सर्वसामान्य वाचकांना, रसिकांना विविध कलांचा रसाळ परिचय करून देण्याचे व्रत त्यांनी अंगीकारले. पुढे वार्ताहर, उपसंपादक म्हणूनही त्यांची कारकिर्द बहरली.

 Sanjay Deodhar is an all 

२००५ साली लोकहितवादी मंडळातर्फे वारली चित्रकलेची एक कार्यशाळा देवधर यांनी आयोजित केली. वारली कलेने मोहित होऊन त्यांनी पुढे या कलेचा अधिक अभ्यास करून संशोधन केले. त्यासाठी ते मोखाडा, जव्हार, तलासरी, डहाणू, सिल्वासा या भागातील अनेक पाड्यांवर गेले. वारली चित्रशैलीचे जाणकार, संशोधक डॉ. गोविंद गारे यांच्या संपर्कात आल्यानंतर आदिम कलेचे पितामह जिव्या सोमा मशे यांच्याशी भेट झाली. देवधरांनी प्रत्यक्ष त्यांच्याकडून ११०० वर्षांची कलापरंपरा, आदिवासी संस्कृती, निसर्गावर आधारित साधीसोपी जीवनशैली याविषयी जाणून घेतले. मशे यांच्याकडून वारली चित्रांमधले बारकावे, तपशील त्यांना शिकता आले. अनेक आदिवासी कलाकारांकडून कलेचे विविध पैलू उलगडत गेले. नंतर ही कला सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यशाळा सुरू केल्या. एका कार्यशाळेत मीदेखील सहभागी झालो व त्यांच्याकडून वारली कला आत्मसात केली. पुढे त्यांच्या नाशिकसह राज्यात व राज्याबाहेर अनेक ठिकाणी त्यांच्या वारली चित्रकार्यशाळा झाल्या. अजूनही होतात. हे कलासंचित रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संजय देवधर यांनी २००८ साली प्रथमतः 'वारली चित्रसृष्टी' हे पुस्तक लिहून प्रकाशित केले. पुढील काही वर्षांत या पुस्तकाच्या ४ सचित्र आवृत्त्या कल्पक प्रकाशनाने रसिकांपर्यंत पोहोचवल्या. 'वारली आर्टवर्ल्ड' या इंग्लिश पुस्तकाच्याही दोन आवृत्त्या निघाल्या व परदेशातही पोहोचल्या. त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतो. अनेक परदेशी पर्यटक नाशिकला येऊन देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली वारली कलेचे धडे गिरवतात.

दरम्यान अनेकांच्या मागणीवरून देवधरांंनी 'वारली चित्रसहल' हा अनोखा उपक्रम सुरू केला. एक दिवसाच्या या सहलीत जव्हार, रामखिंड, पाथर्डी येथील पाड्यांवर आदिवासींची जीवनशैली अनुभवता येते, वारली चित्रांची प्रात्यक्षिके बघता येतात. डहाणूजवळ कलमीपाडा येथील मशे यांच्या घराला, तसेच गंजाड येथे मशे परिवाराने तयार केलेल्या वारली चित्रसंग्रहालयाला भेट देऊन या आदिम कलेविषयी अधिक माहिती मिळते. संजय देवधर यांनी आपले गुरू पद्मश्री जिव्या सोमा मशे यांना नाशिकला आणले होते. वैराज कलादालनात त्यांचे चित्रप्रदर्शन व प्रात्यक्षिक आयोजित केले. त्याला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वास्तुविशारद अरुण काबरे, सागर काबरे यांचे या कामी सहकार्य मिळाले. अनेक वारली युवकांना देवधर नेहमीच विविध संधी व कामे मिळवून देतात. मविप्र समाजाच्या इगतपुरी येथील केपीजी महाविद्यालयात झालेल्या राज्यस्तरीय आदिवासी साहित्य अधिवेशनात 'वारली चित्रकला - काल, आज व उद्या' हा शोधनिबंध सादर केला. संजय देवधर यांचे हे विपुल कार्य इतरांना प्रेरणादायक ठरेल.
 

विश्वविक्रम आणि विविध पुरस्कार !
 
दोन वर्षांपूर्वी संजय देवधर यांनी वारली चित्रकलेत दोन विश्वविक्रम प्रस्थापित केले. ११०० पेक्षा जास्तजणांना ऑन द स्पॉट वारली चित्रस्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले. आर. पी. विद्यालयात झालेल्या या उपक्रमात ५ ते ७५ वयोगटासाठी आठ गटात स्पर्धा झाली. ५० हजार रुपयांची एकूण ८० पारितोषिके वितरित करण्यात आली. यावेळी सर्वाधिक सहभागाबद्दल जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड तर चित्रातून सामाजिक संदेश दिल्यामुळे वंडरबुक वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आले. लायन्स क्लब, जैन संघटना, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व अन्य संस्थांंचे मोलाचे सहकार्य लाभले. आदिवासी वारली कलेतील विविधांगी योगदानाबद्दल दखल घेऊन राज्य सरकारतर्फे मागील वर्षी संजय देवधर यांना राज्यस्तरीय आदिवासी सेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी, आदिवासी विकास विभागाचे मंत्री प्रा. अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय पत्रकारितेच्या वाटचालीत, अ.व.पठाण पुरस्कार, पत्रकारभूषण, उत्कृष्ट कलासमीक्षक, नाशिक भूषण, समाजभूषण आदी अनेक मानसन्मान देवधर यांना मिळाले आहेत. ते सातत्याने वारली कलेवर सचित्र व्याख्यानेही देतात. विशेष म्हणजे आपल्याच कलेचा विसर पडलेल्या पेठ तालुक्यातील वारली युवकांना त्यांचीच कला संजय देवधर यांनी शिकवली व महत्व पटवून दिले.आजवरच्या वाटचालीचे श्रेय ते आपले आईवडील, पत्नी सुचित्रा तसेच ज्यांनी कलेचे, पत्रकारितेचे संस्कार केले अशा सर्वांना देतात. त्यांची मुलगी सुप्रिया फ्रवशी इंटरनॅशनल स्कुलमध्ये फ्रेंच विभागप्रमुख आहे. मुलगा सुयश अमेरिकेत फार्मसी विभागात एमएस पूर्ण करून आता पीएचडी करीत आहे.
 
 
अजय हातेकर
 
९४२३९६२३२४