जनसेवा हीच ईश्वरभक्ती

विवेक मराठी    14-Jul-2020
Total Views |
@शीतल खोत

तुळजापूर तालुक्यातील अणदूरमधील साहेबराव घुगे यांनी गेल्या १०० दिवसांत ४० अत्यंत गरजू आणि निराधार कुटुंबांसाठी घरपोच जेवण मोहीम राबविली. साहेबराव घुगे हे विवेकचे प्रतिनिधीदेखील आहेत. त्यांनी केलेल्या या सेवा कार्याचा थोडक्यात आढावा...


ghughe_1  H x W

जनसेवा ही ईश्वरभक्ती
बोध यातला उमजू या।
विश्वासाने बंधुत्वाचे
नाते सर्वा सांगू या।।
तुळजापूर तालुक्यातील अणदूरमध्ये साहेबराव घुगे यांनी लॉकडाउनच्या काळात 'घरपोच जेवण मोहिमे'च्या माध्यमातून या ओळी प्रत्यक्षात उतरविल्या.

लॉकडाउनला सुरुवात झाली आणि सर्वच ठिकाणी अनेक निराधार, गरजू लोकांच्या खाण्यापिण्याची आबाळ होऊ लागली. काही ठिकाणी समाजसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन सेवा सुरू केली. तुळजापूर येथील अणदूरमध्ये साहेबराव घुगे आणि सफाई कामगार ग्रामपंचायत कर्मचारी यांनी १०० किशोरवयीन मुला-मुलींना सॅनिटायझर, डेटॉल साबण आणि कोरोना जनजागृती पत्रक यांचे मोफत वाटप केले.

२१ मार्चला सकाळी साडेसात वाजता विश्वनाथ लोंढे नावाचे एक गृहस्थ साहेबराव घुगे यांच्या घरी आले. "आपल्या गावात काही ७ ते ८ म्हातारी मंडळी आहेत, निराधार आहेत, त्यांच्या खाण्यापिण्याची फार आबाळ होत आहे. त्यांना खायला नाही मिळाले तर ते मरतील" असे सांगू लागले. त्यांची ही अवस्था ऐकून साहेबरावांचे मन हेलावले. त्यांनी लगेच "आपण त्यांना तांदूळ देऊ या" असे म्हणून एका दुकानदाराला सांगून त्या सर्व लोकांना तांदूळ द्यायची व्यवस्थाही केली.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ग्रामदेवतेच्या दर्शनाला निघताना साहेबरावांच्या मनात पुन्हा विचार आला - आपण त्यांना तांदूळ देण्याऐवजी शिजविलेले अन्नच दिले, तर! आणि ते तत्काळ दुकानावर पोहोचले. लोंढेमामांकडून त्यांनी त्या सर्व निराधार माणसांची नावे आणि पत्ते घेतले. प्रत्यक्ष जाऊन त्या लोकांची परिस्थिती पाहिली. त्यांची परिस्थिती पाहिल्यावर साहेबरावांच्या लक्षात आले की यांना तांदूळ देऊन काहीच उपयोग नाही. चूल पेटविण्याची ताकदच त्यांच्यात नव्हती. आपण यांना घरपोच जेवणच पुरवावे, असे ठरले आणि १ एप्रिलपासून 'घरपोच जेवण मोहिमे'ला सुरुवात झाली.

१ एप्रिलला सुरू झालेल्या या मोहिमेने ९ जुलै रोजी शंभरी गाठली. साहेबराव घुगे यांनी अणदूरमधील केशव वाचनालय, त्यांचे काही मित्र अनिल अंदूरकर, राहुल राठोड यांना हाताशी घेऊन ही मोहीम राबविली. त्यासाठी एका कुटुंबाकडून डबे सुरू करण्यात आले. त्यात भात, वरण, भाजी, चपाती, शेंगदाण्याची चटणी आणि गोड म्हणून कायम शिरा असा मेनू ठरला. डबे बनवून देणाऱ्या कुटुंबालाही यातून रोजगार मिळाला आणि निराधारांना घरगुती जेवण.

बारा डब्यांपासून सुरू केले ही मोहीम आज शंभरी पार करताना ४० डब्यांपर्यंत पोहोचली आहे. कडक लॉकडाउनमध्ये हा आकडा ५०च्यावरदेखील गेला असल्याचे घुगे सांगतात. या मोहिमेच्या माध्यमातून निराधारांना जेवणाबरोबरच अधूनमधून ORSची पाकिटे, फलाहार म्हणून केळी, सफरचंद, द्राक्ष, कधी श्रीखंडाचे जेवण, कधी आमरसाचे जेवण, तर आषाढी एकादशीच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी, राजगिऱ्याचे लाडूदेखील देण्यात आले. ही निराधार मंडळी जणू त्यांच्या कुटुंबाचा एक भागच बनून गेली. आपल्यालाही यांच्या माध्यमातून एक कुटुंब मिळाले त्याचे समाधान, आनंद या निराधार आजी-आजोबांच्या डोळ्यात त्यांना पाहायला मिळाला.

या ४० कुटुंबांमध्ये वयस्कर मंडळी, ज्यांना सांभाळायला कोणी नाही, ज्यांची मुले बाहेरगावी आहेत, ज्यांना एकच मुलगी आहे आणि ती लग्न होऊन दुसऱ्या गावी गेलेली आहे, अशा कुटुंबांचा समावेश आहे.

जसजशी लोकांमध्ये या मोहिमेची माहिती पसरत गेली, तसतशी लोकांकडूनही काही निराधार, गरजू लोकांची नावे येऊ लागली. जनकल्याण समिती, धाराशिवचाही यात सहभाग लाभला. दहा दिवस पुरेल एवढे धान्यसाठ्याचे किट समितीकडून देण्यात आले. जे आपल्या घरी धान्य शिजवू शकतात, अशा कुटुंबांना ही किट्स वाटण्यात आली.

ghughe_1  H x W
 
या मोहिमेमुळे समाजाचे दातृत्वही पाहता आले. स्वतःहोऊन पुढे येऊन काहींनी एक दिवसाची, तर काहींनी दोन दिवसांची सेवा दिली. हळूहळू लोकांचा यातील सहभाग वाढला आणि केशव वाचनालय, साहेबराव घुगे हे फक्त माध्यम म्हणून उरले. "पुढाकार झाला की समाज पाठी उभा राहतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही मोहीम" असे घुगे सांगतात.

या मोहिमेसाठी अनेकांनी आर्थिकदृष्ट्याही सहकार्य केले. शासनाचे मानधन घेणारी रुक्मिणी गायकवाड ५०० रुपयांची नोट घेऊन वाचनालयात आली. "आमच्याकडून या मोहिमेला ३००० रुपये देऊ इच्छितो" असे म्हणून तिने त्यातील हे ५०० रुपये साहेबरावांच्या हातावर ठेवले. किशोर मुळे या अंध व्यक्तीने १००० रुपयांची मदत दिली. या मोहिमेच्या माध्यमातून आपण दिलेली सेवा खरोखर गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचते, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाल्याने नागनाथ कवाडे या दिव्यांगाने आषाढीच्या दिवशी ५० डझन केळी याच मोहिमेमार्फत दिली.

या मोहिमेचे एक लाभार्थी महादेव वाघमारे यांच्याविषयी सांगताना साहेबराव म्हणतात, "१ एप्रिलला जेव्हा आम्ही त्यांच्या घरी गेलो, तेव्हा ते बिछान्यात पडून होते. आम्ही त्यांना म्हटलं, "महादेवमामा, जेवण आणलंय, खाऊन घ्या." तेव्हा फक्त हात वर करून "खातो बाबा" एवढाच काय तो आवाज त्यांच्या तोंडून आला. त्यांची प्रकृती खूप खालावली होती. त्यांना उठताही येत नव्हतं आणि बोलताही येत नव्हतं. पण आज त्यांची स्थिती सुधारली आहे, ते स्वतः उठून बसतात, फिरतात. आम्ही जर त्यांच्यापर्यंत पोहोचलो नसतो, तर त्या आजोबांचं काय झालं असतं हे न बोलेलंच बरं! अशा अनेक आजी-आजोबांना मरणाच्या दारातून परत आणण्याचं मोलाचं कार्य आमच्या हातून घडलं, ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे."

संकटाच्या काळात माणसाने माणसासाठी उभ्या केलेल्या या कामाचा मोठा आनंद यातून साहेबरावांना मिळाला. 'सेवा परमो धर्म' हे वाक्य प्रत्यक्ष आचरणात आणल्याचे समाधान त्यांना मिळाले. ते म्हणतात, "आम्ही खूप काही केलं असं नाही म्हणणार, पण जे केलं, त्याचा मोठा आनंद आहे, हे नक्की."

आम्ही काहीतरी वेगळे करतो आहोत, असा कुठलाही भाव त्यांच्या बोलण्यात जाणवला नाही. उलट शंभराव्या दिवशीदेखील आजच पहिला दिवस असल्याच्या उत्साहात ते सेवा कार्य करीत आहेत आणि पुढेही करीत राहणार आहेत.

विवेक परिवारातर्फे त्यांच्या या सेवा कार्याला शुभेच्छा!

- शीतल खोत
९५९४९६१८५८