पंडितकाका - अभियांत्रिकीचे कर्मयोगी

विवेक मराठी    14-Jul-2020
Total Views |
@शब्दांकन - हेमंत कुलकर्णी

@लेखन - कौशिक श्रोत्री

इचलकरंजी शहराचे आधुनिक यांत्रिकी-अभियांत्रिकीचे जनक, अभियांत्रिकी जगणारे आणि इचलकरंजीचे नाव जगाच्या नकाशावर कोरणारे जेष्ठ उद्योगपती पंडितराव दाजी कुलकर्णी ह्यांना ६ जुलै २०२०ला देवाज्ञा झाली आणि त्यांच्या एक-एक आठवणी, त्यांनी पेरलेले अभियांत्रिकीचे बीज आणि त्याचे झालेले वटवृक्ष, त्यांचा संपूर्ण जीवनक्रम मनात उलगडू लागला.
 

industriali _1  

इचलकरंजीपासून दोन किलोमीटरवर असलेल्या माणकापूर (कर्नाटक) येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात ०४ जुलै १९२८ला पंडितराव दाजी कुलकर्णी ह्यांचा जन्म झाला. अतिशय साध्या घरात आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांचे बालपण गेले. त्यांना पाच भाऊ आणि तीन बहिणी होत्या. लहानपणापासूनच ते चिकित्सक, अभ्यासू आणि कष्टाळू होते. त्यांचे शालेय शिक्षण इचलकरंजीला येथे झाले. अकरावीपर्येंत शिकल्यावर ते पुढे बी.एससी.चे शिक्षण पूर्ण करायला सांगलीमध्ये विलिंग्डन कॉलेजमध्ये गेले. तिथे शिकत असताना त्यांना कागदी शिक्षणापेक्षा व्यवहारी शिक्षण खूप महत्त्वाचे वाटू लागले. प्रत्यक्ष कार्यप्रणालीवर त्यांचा प्रचंड विश्वास होता, म्हणून ते शिक्षण झाल्यावर परत इचलकरंजीला आले.

व्यवसायाचा श्रीगणेशा

त्यांचे ज्येष्ठ बंधू शंकरराव कुलकर्णी उर्फ आप्पा यांनी सुरू केलेल्या ‘कुल्को इंजीनिअरिंग वर्क्स’ ह्या कंपनीसाठी पंडितकाका जॉब वर्कची कामे करत होते. एखादे काम कामे वेळेत आणि कमी खर्चात कसे करायचे, ह्याचे तंत्र त्यांना चांगलेच समजले होते. त्यातून त्यांनी उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवण्यास सुरुवात केली. त्याबरोबरच सुरुवातीला घरोघरी जाऊन सुऱ्या-कात्र्यांना धार लावणे अशी कामे करून त्यातून त्यांनी अर्थप्राप्तीची सुरुवात केली. त्या कामातून मिळालेल्या मोबदल्यामधून पंडितकाका ह्यांनी स्वतःचे लेथ मशीन विकत घेतले.

१९५३ साली त्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘फ्युएल इन्स्ट्रुमेंट्स अँड इंजीनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड (एफ.आय.इ)’ ही कंपनी सुरू केली. त्याचबरोबर ठाणे येथील ‘फ्युएल इंजेक्शन’ नावाच्या कंपनीच्या कामांची सुरुवात केली. नंतर १९६१च्या दरम्यान त्यांनी ‘हार्डनेस टेस्टर’ नावाचे, कास्टिंगचा हार्डनेस मोजण्याचे मशीन भारतात सर्वप्रथम बनवले. तेव्हा पोलंड आणि झेकोस्लोव्हाकिया या युरोपीय देशांमधून हार्डनेस टेस्टर भारतात आयात होत होते. मशीन करण्याची पूर्ण प्रेरणा त्यांना ‘कुल्को इंजीनिअरिंग वर्क्स’मध्ये काम करत असताना मिळाली. स्वतःचे उत्पादन बाजारात यावे हा त्यामागचा त्यांचा विचार होता. त्यानंतर त्यांनी रॉकवेल हार्डनेस, विकर्स ही हार्डनेस टेस्टिंग मशीनची रेंज बनवली.

व्यावसायिक दौरे

कंपनी स्थिरस्थावर झाल्यावर १९६५च्या पुढे व्यावसायिक कामांसाठी त्यांनी पोलंड, हंगेरी, झेकोस्लोव्हाकिया, रशिया, ऑस्ट्रिया, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, जपान, अमेरिका इ. देशांना भेटी दिल्या. विविध अभियांत्रिकी व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना आणि लोकांना भेटून ते ओळखी वाढवू लागले. नवीन तंत्रज्ञानाच्या मेळाव्यांना ते जात होते. स्वतःचे ज्ञान वाढवत होते. त्यांच्याकडे असलेला माहितीचा संग्रह आणि त्यांची इंजीनिअरिंगची आवड (पॅशन) वाखाणण्याजोगी होती.

युनिव्हर्सल टेस्टिंग मशीनचा उदय

परदेशदौरा करून ते परत भारतात आले. १९७०च्या दरम्यान त्यांनी भारतात आयात होणाऱ्या मशीन्सचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी आयात होणाऱ्या मशीन्सना पर्याय म्हणून ‘युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन (U.T.M)’ भारतात प्रथम बनवले. १९७५ साली ‘इम्टेक्स’ (Indian machine tool exhibition) मुंबई येथे हे मशीन प्रदर्शित केले. त्या मशीनला भारत सरकारकडून १९७६ साली ‘इम्पोर्ट सबस्टिट्यूट’ पुरस्कार मिळाला. १९७१नंतर त्यांनी ‘डायनॅमिक बॅलन्सिग’ आणि ‘इंपॅक्ट टेस्टिंग’ मशीन बनवले. एफ.आय.ई.मध्ये टेस्टिंग मशीनचा वेगळा विभाग सुरू केला. पूर्ण भारतात ‘फाय’ ही टेस्टिंग मशीन्स बनवणारी प्रख्यात कंपनी बनली.


industriali _1  

फाय फाउंडेशन पुरस्काराचा उगम

पुढे १९७०च्या दरम्यान त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील सर्वोतम काम करणाऱ्या लोकांना पुरस्कार देण्यास सुरुवात केली. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकनायक जयप्रकाश नारायण ह्यांना न्यायमूर्ती एम.सी. छागला ह्यांच्या हस्ते १९७६ला मुंबईला जसलोक हॉस्पिटलमध्ये जाऊन तब्बल एक लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात आला होता. अशा रितीने ‘फाय फाउंडेशन’ ह्या पुरस्काराचा श्रीगणेशा झाला होता. स्वतःला सिद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार दिला जात होता. त्याचबरोबर सध्या असलेला ‘सी.एस.आर. (Corporate social responsibility) फंड’ची मूळ संकल्पना पंडितकाका ह्यांनी १९७०च्या दरम्यानच ‘फाय फाउंडेशन’चे पुरस्कार देऊन सुरू केली होती. बंगळुरूला दर दोन वर्षांनी होणाऱ्या आशियाचे सर्वात मोठे असे अभियांत्रिकीचे प्रदर्शन इम्टेक्स (Indian machine tool exhibition)ला नवीन तंत्रज्ञानाला, मशीनला आणि संकल्पनांना फाय फाउंडेशनच्या पुरस्काराने गौरवले जात होते. आजदेखील इम्टेक्सला फायचा पुरस्कार सुरू आहे. केवळ गुणवत्ता पारखूनच हे पुरस्कार दिले जाऊ लागले. सुरुवातीला पुरस्कार सोहळे मुंबईला पार पडत होते. नंतर पुण्याला त्याचे वितरण होऊ लागले. अखेर ते इचलकरंजी येथे होऊ लागले. पुण्यात पुरस्कार सोहळा असताना शंतनूराव किर्लोस्कर ह्यांना फायचा पुरस्कार दिला गेला होता. इचलकरंजीमध्ये पुरस्कार सोहळ्यादरम्यान भारतातली विविध क्षेत्रांतली ख्यातनाम मंडळी येत असत. काही वर्षांनी, स्थानिक पातळीवर स्वतःला सिद्ध करणाऱ्या व्यक्तीलादेखील फायचा पुरस्कार दिला जाऊ लागला. अशा पुरस्कार सोहळ्यामुळे इचलकरंजीचे नाव सर्वत्र प्रसिद्ध झाले.

राजकारणात प्रवेश

स्वतःचा अभियांत्रिकीचा व्यवसाय वाढत असताना पंडितकाका काही काळ इचलकरंजी शहराच्या नगराध्यक्षपदावर निवडून आले होते. त्यांची राजकीय कारकिर्द खूप गाजली होती. विशेष म्हणजे ते नगराध्यक्ष असताना इचलकरंजीला पन्नासावे अ.भा. मराठी साहित्य संमेलन झाले होते. तेव्हा पु.ल. देशपांडे ह्यांनी पंडितकाकांच्या कार्याचे केलेले वर्णन बरेच गाजले होते. तीन वर्षे ते राजकारणात होते. पण ते राजकारणात रमले नाहीत. त्यांना अभियांत्रिकी उद्योगच प्रिय होता. पुढे त्यांनी १९७७ला आपल्या पदाचा राजीनामा दिला.

व्यवसायाचा विस्तार

१९७७ला बंगळुरू येथे अशोक साठे ह्यांच्याबरोबर भागीदारीत प्रगती इंजीनिअरिंगची स्थापना झाली. त्या कंपनीमध्ये सी.एन.सी. मशीनला लागणारे ऑटोमॅटिक टूल टरेट व कॉपी टर्निंग लेथ आणि कॉपी टर्निंग स्लाइड इत्यादी उत्पादने बनवायला सुरुवात झाली. १९९०नंतर व्ही.एम.सी. मशीनला लागणारे ऑटोमॅटिक टूल टरेट चेंजर (ए.टी.सी)ची सुरुवात झाली. सध्या बंगळुरू, इचलकरंजी आणि शांघाय (चीन) येथे या कंपनीचा विस्तार झाला आहे.

१९७८-८०ला त्यांनी जयसिंगपूरला एल.के. आकिवाटे इस्टेटमध्ये ‘ऑटोपार्ट्स’, ‘सरोज इंजिनिअर्स’, ‘फ्लूडलाईन’, ‘सरोज इंजीनिअरिंग उद्योग’ ‘इचलकरंजी इंजीनिअरिंग सेंटर प्रा.लि.’, ‘डायमंड टूल्स’ तसेच आपल्या सर्व ग्रूप कंपन्यांना एस.पी.एम. (Special purpose machine) पुरवण्यासाठी ‘एस.पी.एम टूल्स’ अशा विविध कंपन्यांचा शुभारंभ केला. त्याच्याबरोबरीने काळाची गरज ओळखून फाउंड्री उद्योगात पदार्पण केले. ‘फाय स्पेरोटेक’ आणि ‘ऑटोपार्टस’ फोर्जिंग डीव्हिजनची, तसेच अल्युमिनियम डाय कास्टिंगची सुरुवात झाली. काळाची गरज ओळखून जयसिंगपूरला त्यांनी वाहन उद्योगाला लागणाऱ्या सुट्या भागांचे मशीनिंग सुरू केले. भारतात असलेल्या बजाज, टीव्हीएस, हिरो होंडा, यामाहा, सुझुकी, बीएमडब्लू आणि ट्रायम्फ अशा विविध कंपन्यांच्या इंजीनचे महत्त्वाचे सुटे भाग जयसिंगपूरमध्ये तयार होऊ लागले. १९८४नंतर बजाज ऑटोच्या कामांना वेग येऊ लागला. १९८७ला फियाटचे काम सुरू झाले. प्रीमिअर पद्मिनी, तसेच ‘वन वन एट एन.इ.’ ह्या गाडीच्या इंजीनचे सुटे भाग जयसिंगपूरला बनवले जात होते.

नवीन उत्पादने आणि निर्यात

१९८८ला ‘कार वॅशिंग’ आणि ‘व्हील बॅलन्सिंग’ ही दोन नवीन उत्पादने एफ.आय.ई.मध्ये विकसित करण्यात आली होती. ह्या उत्पादनाची रशियाकडून निर्यातीसाठी एफ.आय.ई.ला मागणी आली होती. १९९१-९२अखेरपर्यंत ही मागणी अखंड सुरू होती. रशियाला भारतात केलेले उत्पादन निर्यात होऊ लागल्याने १९८८नंतरचा काळ एफ.आय.ई.साठी सुवर्णकाळ ठरला. पूर्ण ग्रूपची भरभराट झाली.

भारतात १९९३नंतर सर्व नावाजलेल्या दुचाकी ऑटोमोबाईल कंपन्यांच्या इंजिनांचे सुटे भाग एफ.आय.इ. ग्रूपमध्ये तयार होऊ लागले होते. इंजीनला लागणारे प्रिसीजन पार्ट सर्व ऑटोमोबाईल कंपन्या आयात करत होत्या. ते सर्व परदेशी बनावटीचे सुटे भाग भारतात बनवले. टीव्हीएस सुझुकी जपानमधून इंजीनचे सुटे भाग आयात करत होती. ते सर्व सुटे भाग नंतर एफ.आय.इ. ग्रूपकडे आले. १९९६नंतर जयसिंगपूरला ग्रूपचा व्यवसाय वेगाने वाढू लागला. सरोज इंजीनिअर्समध्ये हिरो होंडा, यामाहा, सुझुकी, बीएमडब्ल्यू आणि बजाज यांच्या इंजिनांचे सुटे भाग बनवले जाऊ लागले. आजही तिथे सुटे भाग काही लाखात बनवले जात आहेत. फ्लूडलाईनमध्ये पीआयजिओ (थ्रीव्हीलर)च्या रिक्षांना लागणाऱ्या सुट्या भागांचे मशिनिंग सुरू झाले. हे सर्व सुटे भाग जयसिंगपूरमधून संपूर्ण देशभर जात आहेत.

पुढे त्यांचा व्यवसाय प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत गेला. अनेक तरुणांसाठी व इंजीनिअरिंग व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी पंडितराव आदर्श ठरू लागले. सर्व तरुण वर्गावर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडत होता.

नवीन व्यावसायिक संधी

१९९९च्या दरम्यान ‘केहीन कॉर्पोरेशन’ ही जपानची एक मोठी कंपनी भारतात त्यांचा प्लांट चालू करण्याच्या तयारीत होती त्या कंपनीने भारतात खूप कंपन्यांचा अभ्यास केला. त्या कंपनीचे अधिकारी बजाज ऑटोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटायला आले. बजाजच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केहीनच्या टीमला एफ.आय.इ.चे नाव सुचवले. त्या कंपनीचे अधिकारी पंडितराव ह्यांना भेटायला आले आणि नंतर ‘केहीन-फाय’ नावाची कंपनी पुण्यात चाकणला जन्माला आली. तिथे दुचाकी गाड्यांना लागणाऱ्या ‘कार्बोरेटरची’ जोडणी सुरू झाली. त्यासाठी अल्युमिनियम, झिंक आणि ब्रास ह्या धातूमध्ये लागणारे महत्त्वाचे सुटे भाग इचलकरंजीला ‘फाय’मध्ये काही लाख संख्येने तयार होऊ लागले. बघता बघता हा व्यवसाय प्रचंड वेगाने वाढला आणि भारतात व जगात दुचाकी गाड्यांना हा भाग जोडला जाऊ लागला. तेव्हा पंडितकाका ह्यांची वयाची सत्तरी पूर्ण झाली होती. ज्या वयात इतर लोक निवृत्तीचा विचार करून आयुष्य मजेत जगण्याचे नियोजन करत असतात, तेव्हा पंडितकाकांनी कार्बोरेटरला लागणाऱ्या क्रिटिकल पार्टचे मशीनिंग सुरू करून पुरवठा करण्याचे शिवधनुष्य उचलले. सतत काम आणि नवीन गोष्टींचा शोध घेत असल्यामुळे कामामधून निवृत्ती त्यांना माहीतच नव्हती. फायमुळे इचलकरंजी आणि आजूबाजूला असलेल्या परिसरात प्रचंड रोजगारनिर्मिती होऊ लागली.

स्वभाव

पंडितकाकांचा वाचनाचा व्यासंग प्रचंड होता. त्याचबरोबर प्रत्येक काम ते पूर्णत्वास घेऊन जात होते. फायमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचारिवर्गासाठी त्यांनी डॉक्टरदेखील नेमले होते. कंपनीमध्ये सर्व कामगारांना त्यांनी लूना वाटल्याचा किस्सा प्रसिद्ध झाला होता.

कुठल्याही विषयाच्या मुळाशी जायला त्यांना आवडत होते. व्यवसाय करत असताना आर्थिक शिस्त आणि उत्पादन होणाऱ्या वस्तूची गुणवत्ता ह्या दोन गोष्टींकडे पंडितकाका ह्यांचे बारीक लक्ष होते. उत्पादन खर्च कमी करून गुणवत्ता कशी वाढवता येईल ह्यावर त्यांचा सतत विचार सुरू होता. ते हजरजबाबी आणि मिश्कील होते. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. ते कुटुंबवत्सल होते. आपल्याबरोबर इतर लोकांचेदेखील भले व्हावे हा त्यांचा कटाक्ष असायचा. त्यांच्या भौतिक गरजादेखील खूप कमी होत्या. ते पूर्णपणे शाकाहारी होते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा मंत्र त्यांनी कायम जपला. अखेरपर्यंत त्यांनी स्वतःच्या आवडत्या अभियांत्रिकी क्षेत्रात स्वतःला गुंतवून घेतले होते. त्यांच्या ह्या वाटचालीत त्यांचे पुतणे एस.व्ही. कुलकर्णी, त्यांचे ज्येष्ठ जावई अरविंद देशपांडे, अजित कुलकर्णी, मनोज लक्ष्मेश्वर, तसेच त्यांचे सहकारी डॉ. जयंत पडते ह्यांचा खूप मोठा वाटा आहे. पंडितकाकांची तिसरी पिढी ह्या उद्योग समूहाची धुरा सध्या यशस्वीपणे सांभाळत आहे.

‘कर्मण्येवाधिकारस्ते..’ म्हणजेच अखंड कर्म करत राहण्याचा मंत्र त्यांनी आयुष्यभर जपला. त्यांच्या जाण्याने इचलकरंजीमध्ये औद्योगिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी न भरून निघणारी आहे.


शब्दांकन - हेमंत कुलकर्णी
लेखन - कौशिक श्रोत्री