जनसेवा हीच ईश्वरसेवा

विवेक मराठी    02-Jul-2020
Total Views |
@सुरेश हावरे

'श्रद्धा- सबुरी' हे साईबाबांचे ब्रीद आपण सर्वच जाणतो. पण याचबरोबर बाबांनी सेवेची जोड दिली आहे.
श्रद्धेबरोबर सबुरी असेल, तर कोणत्याही कामात परिपूर्णता येईल. या दोन्हीतील मेळ मानवजातीच्या कल्याणासाठी अत्यंत आवश्यक आहे. या दोन्हींइतकंच सेवेचंही महत्त्व आहे. बाबांच्या जीवनकार्यात त्यांनी लीलेसोबत अनेक सेवाकार्य केली आहेत.‌ साईबाबांची हीच शिकवण शिर्डी संस्थानांच्या मार्फत अखंडपणे चालू आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावातही संस्थानातर्फे अनेक सेवाकार्ये चालू आहेत.


pandharpur ashadhi ekadas

 
कोणत्याही कामात भक्ती आणि श्रद्धा असेल, तर त्या कामाची शक्ती शतपटींनी वाढते. मी शास्त्रज्ञ असलो, तरी सश्रद्ध आहे. कारण विज्ञान आणि श्रद्धा या गोष्टी परस्परांना पूरक आहेत, असं मी मानतो. कोट्यवधी भक्तांची साईबाबांवर नितांत श्रद्धा आहे. त्यांच्या मनातल्या या भक्तीचं सेवेत रूपांतर झालं, तर गोरगरिबांचं कल्याण सहजतेने साधता येईल. निरपेक्षपणे केलेली सेवा हीच बाबांची पूजा आहे, असं मला वाटतं आणि सेवेच्या माध्यमातूनच आपली पूजा बाबांच्या चरणापर्यंत पोहोचेल अशी माझी श्रद्धा आहे.

माझ्या स्वभावाची बैठक वैज्ञानिकाची आहे. बुद्धी आणि तर्क यांच्या निकषावर पटत असेल तरच कुठलीही गोष्ट स्वीकारावी, असं मला वाटतं; पण जीवनात अनेक गोष्टी श्रद्धेशी निगडित असतात, भावनेशी निगडित असतात. देव, देश, धर्म या श्रद्धेशी संबंधित अशा गोष्टी आहेत. अशा बाबतीत श्रद्धा असलीच पाहिजे. श्रद्धेशिवाय माणूस म्हणजे पशू होय. तुम्ही शास्त्रज्ञ, व्यावसायिक किंवा नोकरदार असं काहीही असलात, तरी श्रद्धा असेल तर त्या त्या क्षेत्रात अधिक चांगलं काम होऊ शकतं, असा माझा अनुभव आहे. बाबांनी श्रद्धेवरच भर दिला, पण त्याच वेळी सबुरीलाही तितकंच महत्त्व असल्याचं सांगितलं. आजकाल आपल्याला सगळ्या गोष्टी झटपट हव्या असतात. पण कोणतीही गोष्ट हवी असेल, तर त्यासाठी तितका वेळ द्यावा लागतो. त्यामुळे सबुरीही तितकीच महत्त्वाची आहे. श्रद्धेबरोबर सबुरी असेल, तर कोणत्याही कामात परिपूर्णता येईल. या दोन्हीतील मेळ मानवजातीच्या कल्याणासाठी अत्यंत आवश्यक आहे. या दोन्हींइतकंच सेवेचंही महत्त्व आहे. लोकांच्या साईबाबांप्रती असलेल्या भक्तीला सेवेची जोड द्यावी आणि सेवेच्या माध्यमातून काम उभं करावं, हा ही जबाबदारी स्वीकारण्यामागचा माझा मुख्य हेतू होता.

लीला आणि सेवा हे बाबांच्या जीवनाचे दोन ठळक भाग आहेत. बाबांनी त्यांच्या जीवनात भक्तोद्धारासाठी अनेक लीला केल्या. त्या लीला सर्वपरिचित आहेत. पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर बाबांनी सेवाही केली आहे. त्यांनी लोकांसाठी भिक्षा मागितली, अन्न शिजवलं, दळण दळलं, भुकेलेल्यांना जेवू घातलं, रुग्णांची सेवा केली, वृक्षारोपण केलं, गोरक्षा केली. त्यांनी सांस्कृतिक कला आणि परंपरा जोपासली. ते छोट्या मुलांशी खेळले. हातात झाडू घेऊन त्यांनी स्वच्छता केली. असे सेवेचे अनेक प्रसंग बाबांच्या जीवनात आहेत. बाबांनी समाजहितासाठी श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र दिला, तसे सेवेच्या आचारधर्माचे धडेही घालून दिले. या सेवा कार्याची आणि बाबांच्या प्रेरणेने चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मी 'साई अर्पण सेवा' या मासिकाचा प्रयोग केला.
बाबांचं काम करणं म्हणजे गोरगरिबांची सेवा करणं हा धागा पकडून मी या कामाला सुरुवात केली. भक्त हा विषय केंद्रस्थानी ठेवून मी आणि विश्वस्त मंडळाने सगळ्या योजना राबविल्या. भक्तांना बाबांचं सुखमय, समाधानकारक दर्शन सुलभतेने मिळावं, यासाठीच जास्तीत जास्त सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. रुग्णसेवेला बाबांच्या जीवनात खूप महत्त्वाचं स्थान होतं, ते लक्षात घेऊन संस्थानतर्फे दोन अद्ययावत हॉस्पिटल्स उभारण्यात आली आहेत. या दोन्ही हॉस्पिटल्सच्या कार्याचा मी विशेषत्वाने उल्लेख करीन. साईनाथ जनरल हॉस्पिटलमध्ये १ जानेवारी २०१७पासून रुग्णांवर मोफत औषधोपचार केले जातात, तर साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कमी उत्पन्न गटातील रुग्णांवर नि:शुल्क आणि इतरांवर अत्यल्प दरात उपचार केले जातात, याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. 'महात्मा फुले जन आरोग्य योजना' येथे लागू असून पिवळी व केशरी शिधापत्रिका असणाऱ्या गोरगरिबांची सर्व ऑपरेशन्स विनामूल्य केली जातात. पांढरी शिधापत्रिका असणाऱ्यांना कमीत कमी शुल्कात औषधोपचार मिळतो.
बाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भक्तांना प्रसादरूपाने मोफत भोजन दिलं जातं. रोज ७० ते ८० हजार भक्तांना ही सेवा १२ तास उपलब्ध करून दिली जाते, तीही विनामूल्य. प्रसादालयातलं अन्न सोलरवर शिजवलं जातं, त्यामुळेच याचं वर्णन 'ग्रीन किचन, मेगा किचन' असं केलं जातं.

sai baba_1  H x
रुग्णसेवा आणि अन्नदान याबरोबरच शिक्षणाकडेही संस्थानचं लक्ष आहे. संस्थानतर्फे दोन विद्यालयं, एक कनिष्ठ महाविद्यालय, एक वरिष्ठ महाविद्यालय आणि एक आय.टी.आय. संस्था चालविली जाते. यात सुमारे ६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आय.टी.आय.मध्ये ११ ट्रेड्स असून ४५० विद्यार्थी आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश दिले जातात. त्यामुळे तिथे भ्रष्टाचाराचा किंवा वशिलेबाजीचा प्रश्नच येत नाही. मुख्य म्हणजे या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणानंतर प्लेसमेंट दिली जाते. आतापर्यंत ९० टक्के विद्यार्थ्यांना यातून नोकरी मिळाली आहे. प्लेसमेंट देणारी ही एकमेव आय.टी.आय. संस्था असेल. संस्थानचं ज्युनिअर कॉलेज असून सिनियर कॉलेजही सुरू झालं आहे.
माझे वडील माळकरी होते. ते पंढरपूरला नेहमी जात असत. आई धार्मिक वृत्तीची होती. दोघांनाही सामाजिक कामाची आवड होती. कीर्तन-प्रवचनासारख्या कामात घरातले सर्व जण सहभागी होत होते. घरात भाविकांचा, वारकऱ्यांचा नेहमी वावर असे. त्यामुळे मला धार्मिकतेचे व सामाजिकतेचे धडे घरच्या घरीच मिळाले. श्रद्धा हा माणसाचा स्थायिभाव आहे. आजारी पडल्यावर ज्याच्यावर श्रद्धा असेल अशा डॉक्टरकडेच आपण जातो. शास्त्रावर श्रद्धा असावी लागते, अन्यथा ज्ञान अपूर्ण राहतं. त्यात विसंगती, अंतर्विरोध निर्माण होतो. भक्तीला सेवेत रूपांतरित करायचं असं म्हणताना काम आणि सेवा यातला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. पाणी आणि तीर्थ यातला फरक आपल्याला मंदिरात गेल्यावर कळतो. शास्त्राच्या दृष्टीने दोन्ही पाणीच आहे. H20 असंच त्याचं पृथ:करण होईल. पण प्रत्यक्षात दोन्हींचं महत्त्व वेगवेगळं आहे. पाणी हे पाणी आहे. तीर्थाचं पावित्र्य त्याला येणार नाही. अन्न व प्रसाद, गाणं व आरती यात फरक काय आहे? तर पाण्यात भक्ती मिसळली की त्याचं तीर्थ बनतं. अन्नात भक्ती मिसळली की त्याचा प्रसाद बनतो. गाण्यात भक्ती मिसळली की त्याची आरती होते. तसंच काम आणि सेवा यांच्यातही फरक आहे. कामात भक्ती मिसळली की त्याची सेवा बनते. त्याचबरोबर तीर्थ पळीभर असतं, पण मनाच्या शुद्धीकरणाला तेवढंच पुरतं. मला एक ग्लासभर तीर्थ द्या, असं कोणी म्हणत नाही. कामाचं आणि सेवेचंही तसंच आहे. कणभर सेवा जे करू शकते ते मणभर काम करू शकत नाही. कोणत्याही कामात भक्ती मिसळली तर त्याची ताकद शतपटीने वाढते. या सेवेच्या आधारावर शिर्डीचा चेहरा अधिक सेवाभिमुख व समाजाभिमुख करणं हे माझं उद्दिष्ट होतं.

'रक्तदान' योजना, 'साई सेवक' योजना, 'साई अगरबत्ती' आणि 'स्वच्छ शिर्डी' या माझ्या महत्त्वाकांक्षी योजना. येणाऱ्या भक्तांना रक्तदान करण्याचं आवाहन संस्थानने केलं. अशा भक्तांना थेट दर्शन व प्रमाणपत्र देण्याची तरतूद केली. त्यामुळे 'तिरुपतीला केशदान, तसं शिर्डीला रक्तदान' अशी एक प्रथा निर्माण होत आहे. सध्या या योजनेतून रोज १५० युनिट रक्त उपलब्ध होतं. लवकरच ते रोज ५०० युनिट प्रमाण गाठेल, असा मला विश्वास वाटतो. मंदिराप्रमाणेच भक्तनिवासाजवळ किंवा प्रसादालयाजवळ रक्तदानाची सोय निर्माण करण्यात येत आहे. अनेक स्वयंसेवी व शासकीय रक्तपेढ्यांना या कामात जोडून घेतलं आहे. त्यांच्याद्वारे जमलेलं रक्त गरजूंना मोफत पुरवलं जातं.


sai baba_1  H x
'साई सेवक योजना' हीदेखील अशीच सेवाभावी भक्तांच्या सहभागाने राबविली जाणारी योजना आहे. यात भक्तांना सात दिवस मंदिराच्या व्यवस्थेत सेवा देण्याचं आवाहन केलं जातं. त्यांच्या वेळानुसार त्यांची नोंदणी केली जाते. २१ जणांचा एक गट असे १० गट प्रत्येक आठवड्यात शिर्डीत मुक्काम करून मंदिर परिसरात रुग्णालय, प्रसादालयात सेवा देतात. त्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था संस्थानतर्फे विनामूल्य केली जाते. आवाहन केल्यानंतर पहिल्याच दिवशी ११ हजार भक्तांनी साई सेवकाच्या कामासाठी नाव नोंदवलं आहे. या सेवकांना मंदिरातर्फे पोशाख दिला जातो, छोटसं प्रशिक्षण व शपथ दिली जाते आणि आठवड्याच्या शेवटी प्रमाणपत्रही दिलं जातं. शेगावच्या गजानन महाराज संस्थानच्या धर्तीवर ही योजना राबविण्यात येत आहे.
 
भक्तांकडून समाधीवर वाहिल्या जाणाऱ्या फुलांचं करायचं काय? हा प्रश्न होता. फुलांवर बंदी आणावी असाही एक विचार होता. साईबाबांच्या समाधीवर दररोज २ ते ३ टन फुलं वाहिली जातात. या फुलांमध्ये भक्तांच्या भावना गुंतलेल्या असतात. त्यामुळे ती फेकून दिली जाऊ नयेत असं सर्वांचंच मत होतं. त्यामुळे या फुलांपासून अगरबत्ती निर्माण करण्याचा यशस्वी प्रयोग आम्ही केला. शिर्डीच्या पंचक्रोशीत या फुलांची शेती करणारे शेकडो शेतकरी आहेत. हार, गुच्छ बनवणारे, ते विकणारे अशा अनेकांसाठी तो उदरनिर्वाहाचा एक आधार आहे. त्यामुळे बंदी आणणं हा व्यावहारिक पर्याय नव्हता. आज अगरबत्ती उद्योगात २०० महिलांना रोजगार मिळाला आणि भक्तीचा सुगंध अगरबत्तीच्या माध्यमातून जगभर पसरला. माझा चौथा महत्त्वाकांक्षी प्रयोग होता शिर्डी स्वच्छ करण्याचा. राष्ट्रपती महोदय व मा. पंतप्रधान या दोघांनीही त्यांच्या झालेल्या भेटीत स्वच्छ शिर्डीचा आग्रह धरला होता. म्हणून हा माझा अग्रक्रमाचा विषय होता. शिर्डी नगर पंचायतीच्या सहकार्याने व संस्थानच्या आर्थिक तरतुदीने आम्ही मार्ग काढला आणि आता दिवसातून दोनदा संपूर्ण शिर्डी स्वच्छ केली जाते. घन कचरा व्यवस्थापनाचा प्रकल्पही उभा राहतो आहे. त्यातून खतनिर्मिती, गॅसनिर्मिती, वीजनिर्मिती होऊ शकते. मी या विषयात एवढा गुंतला गेलो की कचरा व्यवस्थापन हा माझ्या अभ्यासाचा विषय बनला. एक मॉडेल प्लँट शिर्डीत उभारल्यावर मला सिद्ध करून दाखवायचं आहे की कचरा ही समस्या नसून ती संपत्ती आहे. सर्वांनी त्याबाबत आपला दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. आज सर्वत्र कचरा पेटलेला आहे. त्यावर राजकीय किंवा प्रशासकीय या दोनच मार्गांनी उपाय शोधला जात आहे. खरी गरज आहे ती विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मार्गाने उपाय शोधण्याची.


sai baba_1  H x
जगभरातल्या साई परिवाराला एकत्र आणण्याचं आणखी एक स्वप्न माझ्या नजरेसमोर आहे. जगात ४३ देशांत ४५०पेक्षा जास्त साईमंदिरं आहेत, तर भारतात ८००० ठिकाणी साईमंदिरं आहेत. साईपरिवाराचा हा विस्तार पाहिला, तर या साई भक्त चळवळीला व्हॅटिकनचं स्वरूप येऊ शकतं. या सगळ्यांना एका समान सूत्रात गुंफून त्यांना एक समान कार्यक्रम देण्याचं व वर्षातून त्यांचा एक महामेळावा घेण्याचा मानस आहे. या प्रयत्नातून गेली दोन वर्ष डिसेंबरमध्ये 'जागतिक साईमंदिर परिषद' भरविण्यात आली. त्यात २२ देशातून विविध मंदिरांचे ४ हजार प्रतिनिधी सहभागी झाले होते. एका परिषदेला भारताचे उपराष्ट्रपती मा. वेंकय्याजी नायडू हे आवर्जून उपस्थित होते.