भव्य मंदिर, भव्य भारत

स्रोत: विवेक मराठी    दिनांक23-Jul-2020   
|
आपल्याला दैवी गुणांची संपदा निर्माण करायची आहे. प्रत्येक हिंदू व्यक्ती आणि त्या व्यक्तींचा मिळून झालेला समाज दैवीगुण संपन्न करायचा आहे. भग्न मंदिर म्हणजे भग्न भारत, भव्य मंदिर म्हणजे भव्य भारत, ही आपली दिशा आहे.
 

shree ram mandir_1 & 
बाबरी ढाचा कोसळल्यानंतर महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील मोठे नाव असलेल्या एका थोर व्यक्तीशी संवाद करण्याचा योग आला. ते तसे वृत्तीने संघद्वेष्टे नव्हते. ते म्हणाले,"बाबरी मशीद पाडून संघाने आपले काम वीस वर्षे मागे नेले आहे." ते ज्या विचारात वाढले आणि जेवढा हिंदू त्यांना समजला, त्यावरुन त्यांचे म्हणणे बरोबर होते. परंतु आम्ही टिळक, डाॅ. हेडगेवार, श्रीगुरुजी परंपरेत वाढलेले हिंदू असल्यामुळे संघाचा विचार वीस वर्षे मागे जाण्याऐवजी अनेक वर्षे पुढे गेला आहे. दोन विचारधारांच्या आकलनातील हा फरक आहे. तो समजून घेण्यासाठी रामजन्मभूमीमुक्तीचे आंदोलन का सुरू झाले आणि संघ स्वयंसेवक त्यात का उतरले, हे समजून घ्यायला पाहिजे.

स्वामी विवेकानंद एक कथा सांगत असत. बकरीच्या कळपामध्ये सिंहाचा छावा वाढला. बकरीप्रमाणे तोदेखील ब्याॅ, ब्याॅ, करीत असे. या बकरीच्या कळपावर एका सिंहाने हल्ला केला. कळपात आपला भाऊबंद बघून त्याला आश्चर्य वाटले. त्याने त्यालाच उचलले आणि जंगलात निघाला . सिंहाचा छावा खूप घाबरला. सिंह त्याला म्हणाला, "तू बकरीच्या कळपात काय राहातोस, तू सिंह आहेस." तो छावा म्हणाला," मी सिंह कसा असेल, मी बकरी आहे." सिंह त्याला तलावाच्या काठाला घेऊन जातो आणि पाण्यात बघायला सांगतो. तेव्हा त्या छाव्याला लक्षात येते, अरे, मीदेखील सिंहच आहे. त्याला स्वतःची ओळख होते आणि त्याचे आत्मभान जागृत होते. रामजन्मभूमीमुक्ती आंदोलन, हे हिंदुचे आत्मभान जागृत करणारे आंदोलन होते.

हिंदू स्वतःची अस्मिता विसरुन सिंह असून बकरी झाला होता. तो म्हणू लागला होता, 'मी हिंदू नाही, सेक्युलर आहे. मी मानव आहे. मी सर्वधर्म समभावी आहे, वगैरे वगैरे.' कुणाला असे विचारले की याचे अर्थ काय होतात, तर तो आकाशाकडे बघत असे. त्याला असे म्हटले की, हिंदू सेक्युलर नाही काय, हिंदू मानव नाही का, हिंदू सर्व धर्मांचा सन्मान करणारा नसतो काय, या प्रश्नांना उत्तर देणे, त्याला अवघड जाईल. हिंदू असण्याचा न्यूनगंड हे त्याचे एक कारण होते.

दुसरे कारण भिती होते. त्याच्या मनात खोलवर मुसलमानांची भिती दडलेली असते. 'मुसलमान धटिंगण असतो, सामान्य हिंदू भिरु असतो.' हे महात्मा गांधींचे वाक्य तो जगत असतो. मुसलमानांची भिती बाळगणारेच राज्यकर्ते झाले. स्वाभाविकपणे ते हिंदुविरोधी झाले. हिंदुपणाची अस्मिता व्यक्त करायची तर सत्तेचा विरोध सहन करावा लागे, यामुळे हिंदू सोडून काही म्हणा या स्थितीत हिंदू माणूस गेला. त्याच्या मनातील मुसलमानांची भिती काढणे आवश्यक होते. हिंदुविरोधी राज्यसत्तेला हादरविणे आवश्यक होते. 'हिंदू जगे तो विश्व जगेगा' हा आत्मविश्वास निर्माण करणे आवश्यक होते. यासाठी संघ स्वयंसेवक आंदोलनात उतरले.
 
रामजन्मभूमीवर मंदिर बांधणे, ही प्रतिकात्मक लढाई झाली. हिंदू तत्वज्ञान हे सांगते की, देव देवळात नसतो आणि मूर्तीतही नसतो, तो चराचर सृष्टीत असतो. तो चैतन्यमय आहे. त्याचा निवास प्रत्येक प्राणीमात्रात आहे. मंदिर बांधल्याने देवाची पूजा होते, असे हिंदू तत्वज्ञान सांगत नाही, मग मंदिर कशाला हवे?

मंदिर एवढ्यासाठी हवे की, ईश्वर हा निर्गुण निराकार असतो. निराकाराची पूजा सर्वांना शक्य होत नाही. ईश्वर हा पवित्र, विमल, निःष्कलंक, नित्यशुद्ध असतो. तो प्रतीकात बघावा लागतो. ते प्रतीक म्हणजे देवाची मूर्ती. आपण पूजा त्या देवाच्या मूर्तीची करतो. ईश्वराचे पावित्र्य, निर्मलता, शुद्धता, आपल्यात यावी, यासाठी भक्तीभावाने त्याची पूजा करायची असते. अशी पूजा करुन समाजातील काही थोर व्यक्ती इतक्या मोठ्या होतात की, त्या ईश्वरसदृश्य वाटू लागतात.
 
प्राचीन काळात हे स्थान श्रीकृष्ण आणि श्रीरामाने प्राप्त केले. 'श्रीकृष्ण एक राष्ट्रनिर्माता' या विषयावर पुरोगामी विचारवंत नरहर कुरुंदकर यांचे भाषण आहे. ते यूट्यूबवर उपलब्ध आहे. आपण भगवान रामाचा विचार करतो आहोत, त्याला विष्णूचा अवतार लोकांनी मानले. रामाने स्वतःला असे कधी मानले नाही. माझे नाव राम असून, मी कौशल्येचा आणि दशरथाचा पुत्र आहे, असाच परिचय रामाने दिला आहे. रामाच्या जीवनात चमत्काराच्या कथा नाहीत (अहिल्येचा अपवाद) पुत्र, भाऊ, मित्र, पती, आणि राजा, याबाबतीत रामाने मानवी जीवनात आदर्श निर्माण केलेला आहे. राम मानव असल्यामुळे रामचरित्रामध्ये काही गोष्टी खटकणार्या आढळतात. त्यामुळे रामाचे मानवीपण उत्तम प्रकारे सिद्ध होते. राम, देव झाला, कारण त्याने जीवनभर देवत्वाचा व्यवहार केला, त्यात तडजोडी केल्या नाहीत. रामकथा ही तशी शोकांतिका आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर दुःख आहे. या दुःखाने राम खचून गेला नाही त्याच्याशी तो लढत राहिला आहे.
मनुष्यजीवन हे तसे दुःखमयच असते. त्याचे विस्तृत वर्णन राम ज्या ईश्वाकू कुळातील आहे, त्या ईश्वाकू कुळातील भगवान गौतम बुद्धांनीच केले आहे. हे दुःखमय जीवन रामाप्रमाणे धैर्याने जगायचे असते. आपली दुःखे रामाच्या दुःखापुढे शीतल वाटू लागतात. यासाठी रामकथा प्रत्येकाच्या ह्रदयात जाऊन बसलेली असते. ज्याला राम माहीत नाही, त्याला हिंदू म्हणता येणार नाही. रामभाव जागृत करणे म्हणजे हिंदू अस्मिता जागृत करणे होय. हे ज्यांना समजले आणि समजत, ते अग्रेसर होतात आणि ज्यांना समजतच नाही, ते पुरोगामी होतात.
राम आमच्या राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहे. या रामाचा जन्म अयोध्येत झाला. जन्मस्थानावर श्रीरामाचे भव्य मंदिर होते. ते आक्रमक इस्लामी बाबराने फोडले. ते एवढ्यासाठी फोडले की, त्याला हिंदू अस्मिता मारुन टाकायची होती. ते मंदिर फोडले गेले, कारण हिंदू रामाला विसरला. रामाच्या दैवी गुणांची आराधना करण्याऐवजी त्याने तामसी गुणांची आराधना केली. जातींची उतरंड निर्माण केली, अस्पृश्यता निर्माण केली, ह्रदयात राम असणार्या माणसाला त्याने अस्पृश्य केले. अत्यंत वाईट कर्मकाडांत तो अडकला, हाच धर्म आहे, हे सांगू लागला. पुरोहितांनी वेगवेगळी कर्मकांडे, पूजा, व्रतवैकल्ये शोधून काढली, ती लोकांच्या माथी मारली. स्वतःच्या पोटापाण्याची व्यवस्था केली. रामाचे विस्मरण झाले की, दैवी गुणांचे विस्मरण होते, आसुरी गुणांचा प्रभाव वाढत जातो. या आसुरी गुणांचे विस्तृत वर्णन भगवंतांनी गीतेच्या सोळाव्या अध्यायात केले आहे. या आसुरी गुणात आपण हिंदू जगू लागलो. त्यामुळे तमोगुणी बाबराला यश मिळत गेले. बाबर गेला, बाबराचे घराणे गेले, पण बाबराचे वारस काही संपले नाहीत. ते म्हणू लागले की, अयोध्येत रामाचा जन्म झाला याला काही पुरावा आहे का? मुळात राम नावाची व्यक्ती झाली, हे खरे आहे का? खरी अयोध्या अफगाणिस्तानात किंवा थायलंडमध्ये आहे. मंदिर बांधून काय होणार आहे? कोरोना जाणार आहे का? देशाला मंदिरापेक्षा रुग्णालयाची गरज आहे, अयोध्येत रुग्णालय बांधले गेले पाहिजे. मंदिराच्या शेजारी मशीद बांधली पाहिजे, ते सर्वधर्मसमभावाचे प्रतीक होईल. बाबरी वारसा जपणारे, यापेक्षा वेगळे बोलू शकत नाहीत. बाबराचे रक्त त्यांच्या धमण्यात आहे का, ते नाही सांगता येणार. पण विकृतीचे विष त्यांच्या डोक्यात आहे. हे न सांगताच आपल्या लक्षात येते. त्याच शिवाय का, मंदिर बांधल्यामुळे कोरोना नाहिसा होईल का, असे वाक्य उच्चारले जाणार नाही. या विकृतीचे हालाहल पचवून नीलकंठ बनून, हातात त्रिशूल घेऊन, त्रिनेत्रधारी बनून आपण उभे आहोत.
आता भूमीपूजनाचा कार्यक्रम ठरलेला आहे. योग्य वेळी रामजन्मस्थानावर रामाचे भव्य मंदिर उभे राहील. ते केवळ मूर्तिपुजेचे स्थान असणार नाही. ते आपल्या राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असेल. जगातील सर्व राष्ट्रे आपल्या राष्ट्रीय प्रतीकांचे रक्षण करतात. या प्रतीकांतून त्या त्या देशांची राष्ट्रीय अस्मिता प्रगट होत असते. न्यूयॉर्क येथे उभा असलेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे अमेरिकन अस्मितेचे प्रतीक आहे. रश्मोर पर्वातावर अमेरिकन राष्ट्र निर्मात्यांची शिल्पे आहेत. ही अमेरिकेच्या अस्मितेची प्रतीके आहेत. फ्रान्समध्ये बॅस्टाइल तुरुंग ज्याजागी होता, त्याजागी आता भव्य स्तंभ उभा आहे. नोटरड्रेन, रिम्स कॅथेड्रल, फ्रान्सच्या राष्ट्रीय अस्मितेचा तो प्रतीक आहे. इंग्लंडचा विंडसर कॅशल, कॅन्टेरबरी कॅथेड्रल, ही इंग्लंडच्या अस्मितेची प्रतीके आहेत. भारतीय अस्मितेचे प्रतीक सोमनाथ, आयोध्या, मथुरा आणि काशी आहे, बाकी सर्व प्रतीके ताजमहालासहित आक्रमकांच्या स्मृती आहेत.
या स्मृती ठेवल्या पाहिजेत, कारण आसुरी गुण संपन्न झाल्यानंतर काय होते, याची ही स्मारके आहेत. आता आपल्याला दैवी गुणांची संपदा निर्माण करायची आहे. प्रत्येक हिंदू व्यक्ती आणि त्या व्यक्तींचा मिळून झालेला समाज दैवीगुण संपन्न करायचा आहे. भग्न मंदिर म्हणजे भग्न भारत, भव्य मंदिर म्हणजे भव्य भारत, ही आपली दिशा आहे. आनंदाची गोष्ट अशी आहे की, विवेकानंदाच्या कथेत बकरी झालेला सिंह आता वनराज सिंह बनू पाहत आहे. त्याला अडविण्याची कोणाची छाती आहे...

      - रमेश पतंगे