आम्ही कृतज्ञ आहोत आणि सजगही ...

26 Jul 2020 21:25:41

@ शंतनु शरद पांढरकर

शत्रू डोक्यावर तोफा, रसद घेऊन सुरक्षित ठिकाणी बसलेला, LOC न ओलांडण्याचा दबाव, जगभरातून भारताच्या गळ्याला नख लावण्याचे होणारे कारस्थान अशा परिस्थितीत भारतीय सैन्याने प्रचंड बलिदान देत 'ऑपरेशन विजय'मध्ये मिळवलेल्या यशाचा स्मृतिदिन, 'कारगिल विजय दिवस '.


21 Years of Kargil Vijay  

द्रास येथील कारगिलच्या युद्धस्मारकावर कोरलंय की ,

'This memorial is a testimony of the supreme sacrifice made by the Indian soldiers while restoring the 'Izzat' of our motherland .

This memorial is dedicated to the Martyred soldiers who gave their today for our tomorrow.'

याहून मोठं काय असू शकतं, तिथे तर निरंतनपणे चिरंजीवी अशी ज्योत जळतेच आहे. आपली जबाबदारी, आपलं काम, काय करतोय याची जाणीव लख्ख करून घ्यावी असा आजचा दिवस.

माझ्या पिढीने अनुभवलेला पहिला संघर्ष म्हणजे कारगिलचा संघर्ष, त्यालाही २१ वर्षे झालीत, या काळात आसेतुहिमाचाल पसरलेल्या या भूमीतील नद्यांमधून किती पाणी वाहून गेले याचा हिशोब नाही. देशाच्या, समाजाच्या इतिहासात २०-२५ वर्षांत नवीन पिढी येते असं मानतात, बरंच काही बदललं कारगिल युद्धानंतर, आपल्यालाही देश म्हणून बरंच काही उमगलं. ९८ सालापर्यंत थंडीच्या काळात LOCच्या कारगिल आणि द्रास येथील चौक्या दोन्ही बाजू रिकाम्या करून खाली येत, पण पाकिस्तानने घात करून आपले सैन्य आतंकवादी म्हणून घुसवले, त्यानंतर चौक्या रिकाम्या करून समोरच्यावर अंध विश्वास ठेवून खाली येण्याची परंपरा तुटली. हुतात्मा झालेल्या कोणत्याच भारतीय सैनिकाचे शव घरी देण्यात येत नसे, कोणाचा शर्ट कुठे जायचा तर कोणाची टोपी कुठे जायची आणि घरचे आयुष्यभर त्या आठवणीला जपून ठेवायचे, अटलजींनी निर्णय बदलविला हुतात्मा सैनिकांचे अंतिम संस्कार घरी करण्यात येऊ लागले, छोटासा बदल पण राष्ट्रप्रेमाची ज्योत देशभरात गावोगावी पेटवून गेला.

 

भारत आणि पाकिस्तान यांच्या या संघर्षाला १९९८ साली झालेल्या अणुस्फोटांची पार्श्वभूमी होती, अनेकांनी अणुयुद्धापर्यंतचे वेगवेगळे कयास मांडले. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ कांगावा करत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष असलेल्या बिल क्लिंटन यांच्याकडे पोहोचले आणि भारतीय पंतप्रधानांचा फोन खणाणला. अनेक मंडळी बॅग भरून ठेवतात अमेरिकेचे बोलावणे आले तर जाण्यासाठी, पण अटलजींनी 'शेवटचा घुसखोर भारतीय हद्दीतून मागे गेल्याशिवाय कोणाशी कोणतीही चर्चा केली जाणार नाही.' हे स्पष्ट केलं आणि पाकिस्तानला अमेरिकेची दटावणी ऐकून घेत परतावं लागलं. अणुयुद्धाच्या चर्चेत शांती राहावी यासाठी भारताने केलेल्या संयमाचेही कौतुक जगाने केले, जगाच्या पटलावर पाकिस्तानला एकटं पाडण्यात भारताला यश मिळालं. आतंकवादी मानसिकतेची 'जननी' कुठं असेल, तर पाकिस्तानात, हे जगाला पटायला लागलं त्याची सुरुवात इथं झाली.


21 Years of Kargil Vijay  

या युद्धानंतर एकूणच आढावा घेण्यासाठी के. सुब्रह्मण्यम यांच्या अध्यक्षतेखाली समिती बनली, हे के. सुब्रह्मण्यम म्हणजे आजच्या आपल्या विदेश मंत्री असलेल्या श्री. एस. जयशंकर यांचे पिताश्री. ज्या परिस्थितीमुळे, ज्या लुपहोल्स म्हणता येतील अशा गोष्टींमुळे कारगिल घडलं ते टाळण्यासाठी त्यांनी अनेक शिफारशी केल्यात. संरक्षण खर्च, विविध एजन्सीजमधील सुसूत्रता वाढविणे, एकसूत्रता आणणे, गुप्तचर यंत्रणेतील बदल, सीमा सुरक्षा असे अनेक मुद्दे यात हाताळले होते. त्यामुळेच संरक्षणासंदर्भात चार विविध टास्क फोर्स बनविण्याचा निर्णय झाला, सर्व बाजूंनी मिळणाऱ्या माहितीच्या एकसूत्रतेसाठी मल्टीएजन्सी सेंटर सुरू करण्यात आले, तांत्रिक माहितीच्या एकसूत्रतेसाठी NTROची स्थापना करण्यात आली, या आणि अशा कृत्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी पहिल्यांदा इकॉनॉमिकल इंटेलिजन्स युनिट स्थापण्यात आले. ज्यावेगाने विशेषतः २००४नंतर हे सर्व होणे अपेक्षित होतं ते तसं घडलं का ही चर्चा अप्रस्तुत असली तरी २०११ सालच्या नरेशचंद्र समितीने सुब्रह्मण्यम समितीनुसार अनेक असेच मुद्दे परत मांडले. २०१८मध्ये Defence Planning Committeeची स्थापना, गेल्या वर्षी तिन्ही सैन्य दलांमध्ये एक समान धागा असावा म्हणून CDS या पदाची करण्यात आलेली निर्मिती, शस्त्रास्त्र खरेदीतील पद्धतीत बदल असे अनेक चांगले बदल झालेत, होतायेत. तरीही पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी म्हणतात त्याप्रमाणे Scale, Speed, Span याही बाबतीत महत्वाचा ठरतो. येत्या काळात नवीन आव्हानांना पेलू शकू अशी तयारी केवळ संरक्षण क्षेत्रातच नाही, तर एक नागरिक म्हणूनही आपल्याला करावी लागेल हे नक्की.

आज कारगिल युद्धाच्या २१ वर्षानंतरही, फाळणीनंतर ६ तपे उलटल्यावरही पाकिस्तानशी असलेले भारताचे संबंध किंवा पाकिस्तान सुधारेल या मांडणीत फार तथ्य नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण पाकिस्तान या राष्ट्राचा गाभाच भारतविरोध किंवा हिंदूविरोध राहिला आहे, अशा मांडणीवर उभी असलेली राष्ट्रे कालौघात किती टिकणार? त्यांची शकलंच होतात. बरं या टोळीचे सत्ताकेंद्रही एक आहे, तर तसेही नाही, भारतविरोध जपत जनतेला गवत खाण्याचा सल्ला देणारे आणि गाढवांची निर्यात करून पैसे जमवणारे नेतृत्व जिथे कालही होते आणि आजही आहे अशा मंडळींना त्यांच्या योग्यतेनेच नवीन भारत वागवेल यात शंका बाळगण्याचे कारण नाही .

 

21 Years of Kargil Vijay  

 

कॅप्टन अनुज नय्यर

याच कारगिलच्या युद्धात बरोबर २१ वर्षांपूर्वी हिमालयाच्या शिखरांत मातृभूमीसाठी वयाच्या २३व्या वर्षी सर्वोच्च बलिदान करणाऱ्या कॅप्टन अनुज नय्यर यांना दिलेल्या महावीर चक्राच्या Citationचा अंत 'Captain Anuj Nayyar displayed indomitable resolve, grit and determination and motivated his command by personal example acting beyond the call of duty and made the supreme sacrifice in true traditions of the Indian Army.' या शब्दांनी केला गेला आहे .

 

वारसा आणि वसा इथे इथे व्याख्यांकीत होतो, २३ हे तसं काही जायचं वय नाही, पण तो तरुण गेला. तुमच्या आमच्यासाठी, देशासाठी …!

 

कारगिल युद्धात घराघरांतून असे ५००हून अधिक अनुज आणि अग्रज आम्ही गमावलेत. 'स्वातंत्र्य फुकटात जपलं जात नाही', इतर सर्व सावळ्या गोंधळात हे विसरायची आपल्याला परवानगी नाही, कधीच नाही, कारगिलचा धडा, कारगिल संघर्षाची किंमत काय असेल तर ही आहे, कशी मोजणार ?
 

याउपरही कारगिल विजयाचे महत्त्व मोठं आहे, विसाव्या शतकातील स्वतंत्र भारताच्या इतिहासात १ इंच जमीन न गमावता साकारलेला विजय म्हणजे कारगिलचा विजय… !

जे आमचे सैनिक युद्धात कमावतात तेच आम्ही वाटाघाटींच्या टेबलावर गमावतो या तथ्यास तिलांजली देणारा विजय म्हणजे कारगिलचा विजय…!

युद्ध लढायचे असते, जिंकायचे असते ते ताब्यातील जमीन गमावण्यासाठी नाही हे ठसविणारा, काळाच्या कपाळावरही अमीट अशी रेषा उमटविणारा विजय, मला तुम्हांला सजग करणारा विजय नव्या भारताची पायाभरणी करणारा विजय म्हणजे कारगिलचा विजय…!

 

२१ वर्षे झालीत, आम्ही ऋणी आहोत, आम्ही विनम्र आहोत, आम्ही जागे आहोत, आम्ही सजग आहोत.

या देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या प्रत्येकाला, या समाजासाठी वैयक्तिक सुखे बाजूला सारून सर्वस्वाचा होम करणाऱ्या प्रत्येक वेड्याला, 'हा देश विजयी व्हावा, अजिंक्य राहावा' म्हणून आपापल्या परीने खारीचा वाटा उचलणाऱ्या प्रत्येक हमालाला आणि अशा पिढ्या जन्मास घालणाऱ्या इथल्या परमपवित्र मातीला वंदन करत 'कारगिल विजय दिना'च्या शुभेच्छा देण्याचा हा दिवस…!

 

या युद्धात सर्वोच्च बलिदान करणाऱ्या, या देशाच्या कामी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला, भावनेला, विचाराला विनम्र अभिवादन …!

हे राष्ट्र चिरायू होवो , हे राष्ट्र 'अखंड' होवो..!

@ शंतनु शरद पांढरकर

Powered By Sangraha 9.0