राहुल गांधी कोण? अहमदशहा की हॅम्लेट?

स्रोत: विवेक मराठी    दिनांक26-Jul-2020   
|

काँग्रेस पक्षाच्या सर्वोचस्थानी राहुल गांधी आहेत. त्यांना त्यांचे सर्वोच्च स्थान सोडायचे नाही, किंबहुना काँग्रेस पक्ष हा घराणेशाहीचाच पक्ष झालेला आहे, हे जगजाहीर आहे. आपल्या सर्वोच्च स्थानाला धक्का लागता कामा नये, पक्षाची नाव डुबली तरी चालेल असे एककलमी धोरण त्यांनी आखले आहे, हे त्यांच्या कृतीतून दिसत आहे. 

rahul_1  H x W:

भाजपाने २०१४च्या निवडणुकीत 'काँग्रेसमुक्त भारत' ही घोषणा दिली. निवडणूक प्रचाराच्या काळात नरेंद्र मोदी यांनी या घोषणेचा वारंवार उच्चार केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या घोषणेला तेव्हा फारसे गंभीरपणे घेतले नाही, परंतु आता मात्र ही घोषणा त्यांनी गंभीरपणे घेतली
असून काँग्रेसमुक्त भारत करण्याचे त्यांनीच ठरविलेले दिसते. काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या जबाबदारीतून त्यांनी नरेंद्र मोदी यांना मोकळे केले असून, हे काम त्यांनी स्वतःच्या डोक्यावर घेतलेले आहे. काँग्रेस पक्षाचा घराणेशाहीतील राजपुत्र असे काम का करील? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होईल. राहुल गांधी यांचा सध्याचा राजकीय प्रवास पाहिला, तर ते देशाला वेगाने काँग्रेसमुक्त करण्याच्या मार्गावर चालले आहेत, असेच म्हणावे लागेल.

२०१९मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांचे आणि त्याअगोदर कर्नाटकचे राज्य काँग्रेसकडे गेले. काँग्रेसमुक्त भारतला एक अडसर निर्माण झाला. राहुल गांधींनी प्रथम कर्नाटक राज्य घालविले, त्यानंतर मध्य प्रदेश आणि आता राजस्थान त्या वाटेवर आहे. मध्य प्रदेशात युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंड केले. एक साधे राज्यसभेचे तिकीट त्यांना पाहिजे होते, काँग्रेस हाय कमांडने ते नाकारले. पक्षात आपल्या वाढीला पूर्णविराम झालेला आहे, हे ज्योतिरादित्य शिंदे यांच्या लक्षात आले आणि त्यांनी पक्ष सोडला. नुसता पक्ष सोडला असे नाही, तर ते भाजपात दाखल झाले. राजस्थानात गेहलोत आणि पायलट यांच्यात सत्ता स्थापन झाल्या दिवसापासूनच सत्तासंघर्षाला सुरुवात झाली. सचिन पायलट युवा नेते आहेत. त्यांना मुख्यमंत्री कारण्याऐवजी जुन्या पिढीतील अशोक गेहलोत यांना मुख्यामंत्री करण्यात आले. सचिन पायलट यांच्याही लक्षात आले की काँग्रेस पक्षात वाढण्याची आपल्याला जागा नाही, म्हणून त्यांनी बंडाचे निशाण उभारले. तेही आता भाजपाच्या वाटेवर आहेत.

ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट आणि राहुल गांधी हे जवळजवळ सारख्या वयाचे आहेत. नेहरू-गांधी घराण्याच्या व्यक्तीला सोडून कोणालाही फारसे वाढू द्यायचे नाही, असा परिवार पार्टीचा नियम आहे. हे दोन्ही युवा नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला आव्हान देणारे ठरतील, म्हणून
त्यांना दूर करणे आवश्यक होते. ज्योतिरादित्य शिंदे यांचे वडील माधवराव शिंदे यांचेदेखील पक्षातील स्थान एकेकाळी असेच होते, ते विमान अपघातात गेले. सचिन पायलटचे वडील राजेश पायलट यांचेदेखील स्थान एकेकाळी असेच होते, ते कार अपघातात गेले. इटली आणि फ्रान्स यांचा १८-१९व्या शतकातील राजकीय इतिहास जर आपण पहिला, तर सत्तेला प्रतिस्पर्धी असणारे असेच मरत. सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्वतंत्र मार्ग चोखाळून सत्तेच्या राजकारणात टिकून राहण्याचा निर्णय घेतलेला आहे.

राजकीय पक्षाचा सर्वोच्च नेता म्हणून राहुल गांधी यांना या दोन्ही नेत्यांना पक्षात सामावून घेणे आवश्यक होते. त्याऐवजी ते म्हणाले की, ज्यांना पक्ष सोडून जायचे आहे, त्यांनी खुशाल जावे. त्याचा दुसरा अर्थ असा झाला की माझ्या नेतृत्वाला प्रतिस्पर्धी नको, सर्वोच्च स्थानी मीच आहे आणि मीच राहणार. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंडखोरी केली, तेव्हा शरद पवार स्वस्थ बसले नाहीत, त्यांनी पुतण्याची समजूत काढली, राजकीय तडजोडी केल्या आणि त्यांना परत स्वगृही आणले. प्रत्येक राजकीय पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला असे काम करावे लागते. मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी पार्टीतही नेतृत्वाचे वाद निर्माण झाले. मुलायमसिंग यादव यांनी ते कौशल्याने सोडविले, अखिलेश यादव पक्षाचे नेते झाले. करुणानिधींच्या डीएमकेच्या पक्षातही सत्तासंघर्ष झाला. करुणानिधींनीही त्यातून मार्ग काढला.

राहुल गांधी शोले चित्रपटातील जेलरप्रमाणे म्हणतात की, "आधे इधर, आधे उधर, बाकी मेरे पीछे." आधे इधर, आधे उधर गेल्यानंतर बाकी राहते
शून्य, हे राहुल गांधी लक्षात घेत नाहीत.

राहुल गांधींनी एकच विषय स्वतःचा केला आहे, तो म्हणजे मोदींना मीच पर्याय आहे हे बिंबविण्याचा. मोदींविरुद्ध सतत बोलत राहणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. कोरोनाचा विषय असो, गलवान खोऱ्याचा विषय असो, स्थलांतरित मजुरांचा विषय असो, आर्थिक पॅकेजचा विषय असो, शस्त्रखरेदीचा विषय असो.. राहुल गांधी प्रत्येक विषयावर तोंडसुख घेत राहतात. मोदींना प्रश्न विचारण्याची आणि आव्हान देण्याची क्षमता माझ्यातच आहे, हे त्यांना सिद्ध करायचे आहे. मोदी राहुल गांधींचे नाव चुकूनही घेत नाहीत. राहुल गांधी मोदींच्या खिजगणतीतही नसतात.

काही वर्षांपूर्वी लोक राहुल गांधींना पप्पू म्हणत असत. आता त्यांचे वय वाढल्यामुळे कुणी त्यांना पप्पू म्हणत नाहीत. त्यांच्या नेतृत्वाविषयी गंभीरपणे लेखन करणारे पत्रकार मात्र वेगवेगळे शब्दप्रयोग करतात. १८ जुलै २०२०च्या टेलिग्राफमध्ये 'डिक्लाइन ऑफ दि काँग्रेस - लेसन फ्रॉम दि मुघल' या शीर्षकाचा लेख आहे. हा प्रखार सिंग यांचा लेख आहे. लेखकाने इतिहासकार यदुनाथ सरकार यांना २-३ वेळा उद्धृत केले आहे. १७४८ साली अहमदशहा दिल्लीला तख्तावर बसला. हा अहमदशहा सामान्य कुवतीचा आणि राजनीतीचे फारसे शिक्षण न झालेला होता. त्याच्या राज्यकाळात साम्राज्याचा नैतिक आणि प्रशासकीय ऱ्हास वेगाने झाला. आजचा काँग्रेस पक्ष मोघल घराण्याच्या शेवटच्या कालखंडातील पक्ष झालेला आहे. लेखकाला हे सुचवायचे आहे की, राहुल गांधी आजचे अहमदशहा आहेत.


rahul_1  H x W:

जी.आर. गोपीनाथ यांचा 'राहुल गांधी इज नो किंग लिअर, ही इस हॅम्लेट' हा लेख - पप्पू हा शब्द गेला आणि आता हॅम्लेट हा शब्द आला. किंग लिअरवरून नटसम्राट हे नाटक लिहिले गेले आहे. सगळे काही देऊन टाकल्यानंतरची शोकांतिका या नाटकात आहे आणि बापाचा खून करून गादी बळकाविणाऱ्याशी आईने लग्न केले, या सावत्र बापाला ठार मारायचे की नाही या संभ्रमात पडला आहे. 'टु बी और नॉट टु बी' हा त्याचा संवाद
जगप्रसिद्ध आहे. हे करू की ते करू, अशा कैचीत सापडलेल्या माणसाला हॅम्लेट म्हणतात. राहुल गांधी हे करू, का ते करू अशा संभ्रमात पडले आहेत. देश आरोग्य संकटात आहे, चिनी आक्रमणाच्या संकटात आहे, आर्थिक संकटात आहे, अशा वेळी केवळ टीका उपयोगाची नसते. शिव्या घालण्यासारखे सोपे काम जगात कुठलेच नाही. काय करायला पाहिजे, कसे करायला पाहिजे, केव्हा करायला पाहिजे, याचे मार्गदर्शन करावे लागते.

असे मार्गदर्शन करण्यासाठी स्वतःचा विचार असावा लागतो, स्वतःची दृष्टी असावी लागते. त्यासाठी मनन, चिंतन, वाचन, अभ्यास सतत करत राहावा लागतो. काँग्रेस पक्षाची एक विचारधारा आहे, तिचा पाया स्वातंत्र्यचळवळीने घातला गेलेला आहे, महात्मा गांधींचे त्यातील योगदान पर्वताएवढे मोठे आहे या विचारधारेच्या पुण्याईवर काँग्रेसला सत्ता मिळत गेली. राजकीय विचार हे नेहमी परिस्थितिसापेक्ष असतात. परिस्थिती बदलली की त्यात योग्य ते बदल करावे लागतात. मूलभूत सिद्धान्त आणि परिस्थितिसापेक्ष विचार यात फारकत करावी लागते. ५० आणि ६०च्या दशकातील तुणतुणे जर वाजविले, तर ते बेसूर होते. नवीन परिस्थितीत नवीन विचार घेऊन पुढे जावे लागते. ही क्षमता राहुल गांधींकडे नाही.

पक्षाला वैचारिक दिशा देणे ही पक्षाच्या सर्वोच्च नेत्याचे काम असते. नरेंद्र मोदी हिंदुत्वाचे तुणतुणे वाजवीत बसलेले नाहीत. त्यांना हे समजले की लोकांना आता विकासाची फळे पाहिजे आहेत, विकास त्यांच्या दारी गेला पाहिजे. नरेंद्र मोदी यांनी तशी धोरणे आखली. मागेल त्याला वीज, घरोघरी शौचालये, खेडोपाडी गॅस सिलेंडर, रस्ते जोडणी, शेती विकास, लघुउद्योग विकास, कौशल्य विकास अशा अनेक बाबतीत त्यांनी भरारी मारलेली आहे. राहुल गांधी सेक्युलॅरिझमच्या डबक्यात अडकलेले आहेत. सामान्य जनतेला सेक्युलॅरिझम कशाशी खातात याच्याशी काही कर्तव्य नाही, त्यांना विकास हवा आहे, विकासात सहभाग हवा आहे आणि विकासाचा लाभदेखील हवा आहे, असे काम नरेंद्र मोदी करतात म्हणून त्यांच्याविरुद्ध जेव्हा राहुल गांधी जीभ सैल सोडून बोलतात, तेव्हा लोकांसमोर प्रश्न पडतो की, जो माणूस अहोरात्र कष्ट करतो आहे, त्याला हा हॅम्लेट शिव्या का देतो?

राहुल गांधी सल्लागारांनी शोधलेल्या घोषणा वापरतात. हे सल्लागार व्यावसायिक आहेत. जो पैसे देईल त्याला ते बांधलेले असतात. त्यांची बांधिलकी निष्ठेशी नसते. पतिव्रतेचा त्यांचा गुणधर्म नसतो. ते बाजारात बसलेले आहेत, जो पैसे देईल तो त्यांचा पती. अशांचे सल्ले किती ऐकायचे आणि त्याला किती महत्त्व द्यायचे, याचा नेत्याने विचार केला पाहिजे. तो विचार करण्याची क्षमता असेल, तर विचार केला जाईल. घराणेशाहीचे दिवस आता संपत चाललेले आहेत. नवीन पिढीला नेहरू-गांधी घराण्याचे आकर्षण वाटण्याचे काही कारण नाही. त्यांच्या आकांशा वेगळ्या आहेत, त्यांचे विचार वेगळे आहेत, त्यांची स्वप्ने वेगळी आहेत. आपण गांधी आहोत हे विसरून आपण राहुल आहोत, सामान्य जनतेचे प्रतिनिधी आहोत, घराण्याचे नव्हे, हे त्यांना समजले पाहिजे. हे समजले नाही, तर काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या दिशेने ते वेगाने जातील यात शंका नाही.

vivekedit@gmail.com