राममंदिर उभारणी ही राष्ट्रचेतनेची पुनर्जागृती

स्रोत: विवेक मराठी    दिनांक29-Jul-2020   
|
रामजन्मभूमी न्यास कोषाध्यक्ष गोविंददेवगिरी यांची विशेष मुलाखत
 
दि. ५ ऑगस्ट रोजी राममंदिर भूमिपूजनाचा सोहळा कसा होणार? पंतप्रधानांसह कोण भाषण करणार? कसं व कधीपर्यंत उभं राहणार राममंदिर? त्याची वैशिष्ट्यं काय असणार? सर्वसामान्य भारतीयदेखील मंदिरउभारणीत कशा प्रकारे योगदान देऊ शकणार? स्वतंत्र भारताच्या इतिहासात या सोहळ्याचं महत्त्व काय? या सोहळ्यात ‘अयोध्येच्या भेटीला सह्याद्री’ कसा जाणार?.. या व यासह असंख्य प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी वाचा रामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंददेवगिरी महाराज यांची सा. ‘विवेक’ने घेतलेली ही विशेष मुलाखत.

shree ram_1  H

हिंदू समाजाने जवळपास पाच दशकं पाहिलेलं स्वप्न आता पूर्णत्वाच्या दिशेला जाताना दिसत आहे. परंतु यासाठी मोठा संघर्षही करावा लागला आहे, अनेकांचा त्याग, बलिदान यासाठी झालं आहे. यानंतर आता या टप्प्यावर आल्यावर काय भावना आहेत?

एका इतिहासकाराने असं लिहून ठेवलं की, हिंदूंचा गेल्या एक हजार वर्षांचा इतिहास हा पराभवाचा इतिहास आहे. परंतु हे खरं नाही. हे खरं नाही, हे सिद्ध करण्यासाठीच स्वा. सावरकरांनी ‘सहा सोनेरी पाने’ लिहिली आणि हा इतिहास पराभवाचा नव्हे तर विजयाचा आहे, हे दाखवून दिलं. रामजन्मभूमीच्या विषयात बोलायचं, तर गेली पाचशे वर्षं या आसेतुहिमाचल राष्ट्राने आपलं आराध्य दैवत म्हणून ज्या श्रीरामाला गौरवलं, त्याचं त्याच्या जन्मभूमीवर असलेलं मंदिर उद्ध्वस्त झाल्यानंतर आम्हाला सातत्याने संघर्ष करावा लागला. त्यातील चांगली गोष्ट एकच की, इसवी सन १५२८मध्ये हे मंदिर उद्ध्वस्त झाल्यानंतर हा संघर्ष सतत चालू राहिला. मंदिर उद्ध्वस्त होत असतानाही संघर्ष झाला आणि त्यानंतरही होतच राहिला. यामध्ये सर्वांनी सहभाग घेतला. सर्वप्रथम नागा साधूंनी संघर्ष केला, त्यानंतर क्षत्रिय राजांनी केला, काही राण्यांनी केला. या सर्व पार्श्वभूमीवर हा सुवर्णक्षण म्हणजे आपल्या पुनरात्मविश्वासाच्या हुंकाराचं प्रतीक आहे! असंख्य अत्याचारांनंतर, स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे, भारतमाता जागी होते आहे. आता ती केवळ जागीच झाली नसून ती उभी होते आहे आणि या विश्वाला आमचं भविष्य हे विजयाचं असेल, हेच ती दाखवून देत आहे. माझ्या दृष्टीने दि. ५ ऑगस्टचा कार्यक्रम हे केवळ त्या मंदिराचं भूमिपूजन नसून आमच्या राष्ट्राच्या आत्मविश्वासाची पुनर्जागृती आहे. राष्ट्रीय चैतन्याची मुहूर्तमेढ पुन्हा रोवली जात आहे आणि त्यामुळे हा क्षण आपल्या इतिहासात एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे.

राम हे केवळ हिंदूंचा एक देव नव्हेत, तर या सबंध राष्ट्राचं प्रतीक आहेत, एक राष्ट्रपुरुष आहेत, अशी मांडणी आपण करतो. या विचाराबद्दल काय सांगाल?

भगवान श्रीराम हे आमच्यासाठी तर भगवान आहेतच. परंतु एक असाही वर्ग आहे - उदा., आमचे आर्यसमाजी बंधू, जे रामाला देव मानत नाहीत परंतु एक महानतम मानव म्हणून ते रामाची पूजा करतात, आदराने पाहतात. भारतीय संस्कृतीच्या जीवनादर्शांपैकी एक भगवान श्रीराम आहेत, ही गोष्ट तर निर्विवाद आहे आणि आसेतुहिमाचल या देशातील प्रत्येक स्थानी श्रीरामाचं अत्यंत आदराने स्मरण केलं जातं. कधीही कुणीही केला नसेल इतका या देशाचा प्रवास त्या काळामध्ये त्यांनी केला. केवळ भौगोलिकदृष्ट्याच प्रवासच नव्हे, तर सर्व घटकांशी संवाद साधत त्यांनी एक सात्त्विक शक्ती या माध्यमातून उभी केली. या सात्त्विक शक्तीच्या जागृतीतून त्यांनी सर्व पापांचा अंधकार नष्ट केला. त्यामुळे ते संपूर्ण मानवतेचंच प्रतीक आहेत. विश्वाचं मांगल्य साकार करण्याकरिता जेव्हा प्रतिकार करावा लागतो, तेव्हा कशा प्रकारे शक्तीची जागृती आणि संकलन करावं लागतं, याचे ते दिशादर्शक आहेत. हे सर्व करतानाच त्यांच्या मनात कोणतंही क्रौर्य नाही, तर अवघ्या विश्वाबद्दल, मानवजातीबद्दल प्रेम आहे. त्यात कोणताही भेदभाव नाही. त्यामुळे ते भारताचे महापुरुष आहेतच, तसेच संपूर्ण विश्ववंदनीय असे महापुरुषदेखील आहेत. त्यामुळे अयोध्येत उभं राहणारं मंदिर हे संपूर्ण विश्वाला प्रेरणा देणारं मंदिर ठरेल.

या राममंदिराचं भूमिपूजन ५ तारखेला होईल. यानंतर या मंदिराची उभारणी आणि त्याची दिशा कशी असेल? शिवाय, या वास्तूची वैशिष्ट्यं काय असतील?

प्रयागच्या कुंभामध्ये कांची महाराज, देवहारा बाबा, अशोक सिंघल, महंत अवैद्यनाथ या सर्वांनी मिळून राममंदिराच्या वास्तूचं जे प्रारूप ठरवलं होतं त्याच प्रकारचं असावं, असा आमचा एकूण विचार राहिला आहे. तथापि काळाची प्रगती लक्षात घेता आता त्याला अधिक भव्यता असावी, म्हणून त्याची उंची १२८ फुटांवरून १६१ फुटांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. आधी या वास्तूला ३ शिखरं असणार होती आता ५ शिखरांपर्यंत ही वास्तू वाढवण्यात येणार आहे. हे सर्व जवळपास निश्चित झालेलं आहेच. या कोरोना महामारीमुळे हे सर्व नियोजन लांबणीवर पडत गेलं होतं. जर या महामारीचं संकट नसतं, तर ५ तारखेचा कार्यक्रम म्हणजे एक कुंभच झाला असता. आम्ही कदाचित आणखी काही महिने थांबलो असतो, तर तसं करणं शक्य झालंही असतं. परंतु या लोभापायी आपण आता आणखी विलंब करता कामा नये, श्रीरामाचा विजनवास लवकर संपवून त्यांना लवकरात लवकर भव्य मंदिरात पुन्हा प्रतिष्ठित करावं, हे आपलं कर्तव्य आहे. म्हणूनच हा सोहळा या कोरोनाच्या काळातही होतो आहे आणि पंतप्रधानांनी या सोहळ्याला येण्याचं मान्य केलं, हीदेखील फार आनंदाची गोष्ट आहे.


shree ram mandir_1 &

कोरोनाचं संकट आटोपलं की त्यानंतर सर्व जनतेला साद घालण्याकरिता, सुमारे सहा कोटी परिवारांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्याची मोहीम आखण्याची योजना आहे. या मंदिर उभारणीसाठी सामान्यातील सामान्य व्यक्तीला अगदी दहा रुपयांचं योगदानसुद्धा देता यावं, असाही विचार यामध्ये आहे. मोठ्या रकमा असतीलच, परंतु प्रत्येक भारतीयाला यामध्ये योगदान देता यावं, या हेतूने आपण दहा रुपयांपासून सुरुवात करणार आहोत. या मंदिराचा व परिसराचा विकास करताना आमच्याकडे असलेल्या ७० एकर भूमीचा विस्तार करून १०८ एकरांपर्यंत करण्याचाही आमचा विचार आहे. जवळपासच्या लोकांना विनंती करून, त्यांच्याकडून दानरूपाने जागा घेऊन, आवश्यकता भासल्यास ती विकत घेऊन या जागेचा विस्तार करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर या परिसर विकासात आपल्या देशातील प्रत्येक प्रांताचा विचार करण्यात येईल. म्हणजेच, येथील वास्तू या एकाच प्रकारच्या नसतील, विविध प्रांतांच्या शैली त्यामध्ये समाविष्ट असतील. तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे, मंदिर उभारणी पुढील तीन वर्षांच्या आत होऊ शकते. परंतु आम्ही तीन वर्षं गृहीत धरतो आहोत, त्याची साडेतीन वर्षं होणार नाहीत हे मात्र निश्चित आहे. त्या आतच हे काम पूर्ण होऊन श्रीराम मंदिरात विराजमान होतील.

रामजन्मभूमी न्यासाची आणि तीर्थक्षेत्र न्यासाची यापुढील काळातील भूमिका कशी असेल? मंदिर उभारणीतील आणि प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतरच्या काळातील..

रामजन्मभूमी न्यासाने त्यांच्याकडे असलेल्या सर्व वस्तू, निधी इ. सर्व गोष्टी आमच्याकडे हस्तांतरित केल्या आहेत. आता हे सर्व नीट सुरू झालं की हा न्यास विसर्जितही होऊन जाईल, असं मला वाटतं. तीर्थक्षेत्र न्यासाचं काम तर सुरूच राहणार आहे. तीर्थक्षेत्र न्यासाचं काम काही साडेतीन वर्षांत पूर्ण होणार नाही. केवळ मंदिराच्या उभारणीचं काम तीन वर्षांचं आहे. परिसराचा विकास तोपर्यंत सावकाशीने चालेल आणि मंदिर निर्माण झाल्यानंतर त्याला अधिक वेग येईल. त्यामुळे तीर्थक्षेत्र न्यासाचं काम नंतरही चालूच राहणार आहे.

५ ऑगस्टच्या कार्यक्रमाविषयी बरीच मतमतांतरं, टीकाटीप्पणी सध्या होत आहे. उदा., दूरदर्शनवर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येऊ नये, कोरोनाच्या काळात असा कार्यक्रम का घेण्यात येतोय, पंतप्रधानांनी या कार्यक्रमाला जाणं हे धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे, वगैरे.. या सगळ्यावर काय प्रतिक्रिया द्याल?

आपल्या देशात काही मतप्रवाह असे आहेत, ज्यांना हिंदूंची अस्मिता उभी राहत असलेली बघवत नाही. त्यांना या देशाचं भलं बघवत नाही. किंबहुना, कधीकधी ही मंडळी अशा प्रकारे बोलतात की हे आपल्या देशाचे आहेत की परदेशाचे प्रतिनिधी म्हणून काम करतायत, असा प्रश्न पडतो! यामध्ये तुकडे तुकडे गँग, ‘ल्युटीयन्स’, साम्यवादी मंडळी आणि एमआयएमसारखी मंडळी यांचा समावेश होतो. त्यांची विचारसरणी अशीच आहे, त्यामुळे हे लोक असंच काहीतरी बोलत राहणार. त्याकडे लक्ष देण्याची गरज मला वाटत नाही. तसंच ‘सेक्युलर’ विचार हा लालकृष्ण अडवाणींनी वापरलेला शब्द - ‘पॉझिटिव्ह सेक्युलॅरिझम’च्या दृष्टीने घ्यायला हवा. म्हणजे, सर्वांचं कल्याण साधणाऱ्या एखाद्या धार्मिक स्थळीदेखील आपण आस्थेने जायला हरकत नाही, असं शासनातील लोकांनाही वाटायला हवं. त्यामुळे सर्वधर्मसमभाव असा त्याचा अर्थ घेतला तरीही ही उभारणी करण्यास, त्यासाठी तेथे जाण्यास हरकत काय आहे? दुसरी गोष्ट ही की यात धर्माचा मुळात संबंधच नाही. आमच्या राष्ट्रावर आक्रमण करणाऱ्या लुटारू लोकांनी आमच्या पवित्र वास्तू नष्ट केल्या, त्या वास्तूंचं हे पुनरुज्जीवन आहे. म्हणूनच, राष्ट्रावर आक्रमकांनी लावलेल्या कलंकाच्या परिमार्जनाचा हा राष्ट्रीय उत्सव आहे, अशा दृष्टीने मी या सोहळ्याकडे पाहतो.


अयोध्येच्या भेटीला सह्याद्री
 
दि. ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या राममंदिर भूमिपूजन सोहळ्यास महाराष्टातून रायगड, वढू बुद्रुक तसंच आळंदी येथून माती नेण्यात येणार असल्याचीही माहिती गोविंददेवगिरीजी महाराज यांनी सा. ‘विवेक’शी बोलताना दिली. रायगड हे अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधिस्थळ तसंच हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी, तर वढू बुद्रुक ही स्वराज्यासाठी – स्वधर्मासाठी प्राणांचं बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची समाधी होय. याशिवाय, आळंदी येथील अजानवृक्षाची मातीदेखील अयोध्येला रवाना होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

या कार्यक्रमाला कुणाला आमंत्रित करण्यात आलं आहे किंवा नाही, याबाबतही वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या, त्यावर प्रतिक्रिया येत होत्या. उदा., सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलावण्यात आलं आहे किंवा नाही, इत्यादी. प्रत्यक्षात कुणाकुणाला बोलावण्यात आलं आहे?

या सर्वांना बोलावण्याबाबत असा विचार आम्ही याआधी केला होता. मात्र, त्यांची संख्या लक्षात घेता, इथे साधुसंतांची संख्या लक्षात घेता, ज्यांनी ज्यांनी या मंदिराच्या निर्मितीकरिता जिवापाड मेहनत केली, त्याही लोकांना कृतज्ञता म्हणून बोलावणं आवश्यक आहे, हे लक्षात घेता ही संख्या वाढवणं योग्य ठरलं नसतं. त्यामुळे कोणत्याच मुख्यमंत्र्यांना न बोलावणं हाच चांगला उपाय दिसत होता. म्हणूनच आम्ही न्यासातर्फे कुणालाही निमंत्रण पाठवलेलं नाही. पदसिद्ध असल्यामुळे केवळ त्याच राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, खासदार, आमदार, तेथील विश्वविद्यालयाचे कुलगुरू या सर्वांची उपस्थिती कार्यक्रमात अपेक्षित आहे. त्यांना निमंत्रणं पाठवण्यातही आली आहेत. या व्यतिरिक्त केवळ देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनाच निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत.

मग ५ तारखेच्या कार्यक्रमाचं नेमकं स्वरूप कसं असेल?

आमच्या पूजा तिथे आत्ताही सुरूच आहेत. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून जन्मभूमीवर सुरू असलेली पूजा अजूनपर्यंत थांबलेली नाही. ती तशीच, अधिक वेगाने सुरू राहणार आहे. भूमिपूजन सोहळ्याच्या दिवशी होणारी पूजा यात शेवटची पूजा असणार आहे. ती सकाळी ९पूर्वी सुरू होईल. दुपारी साडेबारापर्यंत ती चालेल. पंतप्रधान अंदाजे सव्वाबाराच्या सुमारास त्या ठिकाणी येतील. ते हनुमानगढीमध्ये हनुमानाचं दर्शन घेतील, आज श्रीराम ज्या ठिकाणी विराजमान आहेत, त्या तात्पुरत्या मंदिरात जाऊन दर्शन घेतील, पंतप्रधानांच्या हस्ते तिथे वृक्षारोपण होईल व त्यानंतर साडेबारापर्यंत पंतप्रधान मुख्य पूजेसाठी बसतील. ही पूजा साधारणपणे वीस मिनिटांत होऊन १२.४४च्या सुमारास ही पूजा आटोपेल. हा क्षण मुहूर्ताच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे १२.४४ वाजता प्रतिष्ठापनेचा संकल्प होईल.

त्यानंतर पूजेची सांगता होऊन मग पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतील, या कार्याला शुभेच्छा देतील व काही वक्त्यांची भाषणं होतील. यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीनच वक्ते असतील. न्यासाच्या वतीने केवळ आमचे अध्यक्ष नृत्यगोपालदास महाराज बोलतील.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात, १९४७नंतर गेल्या बहात्तर–त्र्याहत्तर वर्षांचा एकूण कालखंड लक्षात घेता, या भूमिपूजन सोहळ्याचं महत्त्व आपल्याला कशा प्रकारे विशद करता येईल?

या घटनेतील एक पूर्वघटना म्हणजे सोमनाथाची स्थापना होय. ज्याप्रमाणे आज ही सर्व राळ उठवली जाते आहे की पंतप्रधानांनी कशाला जावं वगैरे, त्या वेळी तर हा मुद्दा तत्कालीन पंतप्रधानांनीच उभा केला होता! राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे त्या ठिकाणच्या प्रतिष्ठापनेकरिता यजमान म्हणून जाणार होते आणि नेहरूंनी त्यावर आक्षेप घेतला होता. त्यांच्या विरोधाला न जुमानता राजेंद्रबाबू तिथे गेले होते. त्यामुळे सोमनाथाच्या विध्वंसानंतरची पुनर्निर्मिती ही फार महत्त्वाची घटना होती आणि आताची घटना त्याहूनही अधिक महत्त्वाची आहे. कारण, जो संघर्ष रामजन्मभूमीसाठी करावा लागला, तितका संघर्ष सोमनाथाकरिता करावा लागला नाही.

रामजन्मभूमी आंदोलनाचं त्या काळी नेतृत्व करणारे अशोक सिंघल यांच्याबद्दल काय सांगाल? आज हा क्षण पाहण्यास अशोकजी असते तर..

अशोकजींनी हे आपलं जीवितकार्य मानलं. त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण अन क्षण रामजन्मभूमीच्या कार्याचं चिंतन करण्यामध्ये, त्याला आनुषंगिक असलेल्या अन्य विषयांच्या चिंतनात व्यतीत होत होता. त्यामुळे त्यांना याची किती धग होती, हे आम्ही जवळून अनुभवलं आहे. आज ते असते तर त्यांना जो आनंद झाला असता, तो शब्दांत वर्णन करणं कुणालाही शक्य नाही. या थोर पुरुषाने रामजन्मभूमीकरिता आपलं सर्वस्व अर्पण केलं. अशोक सिंघल हेही या कार्याकडे केवळ भगवंताचं काम म्हणून पाहत नव्हते, तर यातून एक मोठं राष्ट्रकार्य साधलं जाणार आहे, हीदेखील त्यांची धारणा होती. जी योग्यच होती.


shree ram_1  H
 
रामजन्मभूमी आंदोलनातील अशा कोणत्या घटना, प्रसंग, आठवणी आहेत ज्यांचं तुम्हाला या निमित्ताने आज स्मरण करावंसं वाटतं?

दोन प्रसंग मला आठवतात. उडुपी येथील धर्मसंसदेला मी उपस्थित होतो आणि तिथे या संस्थेचे तत्कालीन प्रमुख परमहंस रामचंद्रजी महाराज यांचं भाषण होत होतं. त्या वेळेस ते खूपच भावुक झाले होते. त्या काळात राममंदिर निर्माणाची बाब तर दूरच, तत्कालीन राममंदिराला लागलेलं टाळंसुद्धा काढायचं होतं. त्यांनी व्यासपीठावर हे जाहीर केलं की, येणाऱ्या होळीपर्यंत जर हे टाळं उघडण्यात आलं नाही, तर मी आत्मदहन करेन! ते इतके उग्र प्रकृतीचे होते की आम्हीही सर्व जण स्तब्ध झालो. तसंच शासनसुद्धा स्तब्ध झालं आणि शासनाने ते टाळं काढलं.

दुसरा प्रसंग असा - जेव्हा कारसेवकांवर गोळीबार झाला, तेव्हा कोठारी बंधूंना रस्त्यावर ओढून ओढून मारण्यात आलं. इतकं झाल्यावरही जेव्हा त्यांच्या आईवडिलांना आम्ही भेटलो, तेव्हा त्यांनी दुःख तर व्यक्त केलं, मात्र ‘भगवान राम की सेवा करते हुए हमारे राम गये, इसका हमें गर्व है’ असं त्यांनी त्या वेळी, त्या प्रसंगातदेखील सांगितलं! ज्या दिवशी रामजन्मभूमीबाबत न्यायालयाचा निकाल आला, त्या दिवशी मी योगायोगाने कोलकात्यात होतो. आज कोठारी बंधूंचे आईवडील हयात नाहीत. कोठारी बंधूंच्या बहिणीला भेटण्यासाठी जेव्हा आपले लोक गेले, तेव्हा तिला आनंद व दुःखादी भावनांचं संमिश्रण उफाळून आलं आणि त्या भावनावेगातही तिने रामजन्मभूमीचं स्वप्न साकार झाल्याचा आणि त्यासाठी आपल्या बंधूंचं बलिदान व्यर्थ न गेल्याचा आनंद व्यक्त केला! लोक किती पराकोटीचा त्याग करू शकतात, हे अनुभवणं ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती. 

आता एक शेवटचा प्रश्न.. रामजन्मभूमीचा प्रश्न तर मार्गी लागला, स्वप्नपूर्तीच्या दिशेने आता भक्कम पावलं पडण्यास सुरुवातही झाली. यानंतर आता काशी आणि मथुरेबद्दल येत्या काळात आपली काय भूमिका राहील?

आज मी रामजन्मभूमी न्यासाचा कोषाध्यक्ष आहे. त्यामुळे मी या कामातच गर्क आहे. तथापि, आपण उल्लेखलेल्या गोष्टीकडे आपला समाज व आम्हीदेखील कानाडोळा करणार नाही, विसरणार नाही, इतकंच मी आज सांगेन! 

मुलाखतकार - निमेश वहाळकर