जावे कौशल्याचे गावी

29 Jul 2020 12:16:18
 @अमोल पुसदकर

उद्योगातील बदलाची माहिती ठेवणे, उद्योगांची गरज ओळखणे व त्यानुसार नवनवीन कौशल्य आत्मसात करणे हाच रोजगार गॅरंटीचा मंत्र आहे. कोरोना संकटकाळ असला तरी उद्योग जगतात अनेक संधी निर्माण करणारा आहे. नेमक्या या संधी कुठे आणि कशा आहेत, हे ओळखून उद्योग क्षेत्रात अमुलाग्र बदल होऊ शकतात.



seva_1  H x W:

रोजगाराच्या संभाव्य संधी

कोरोनामुळे अमेरिका चीनवर चांगलाच नाराज झालेला आहे. त्यामुळेच त्यांनी चीनमध्ये काम करणाऱ्या एक हजार अमेरिकन कंपन्यांशी संपर्क साधला आहे व त्यांना त्यांचा उद्योग चीनबाहेर नेण्याची विनंती केलेली आहे. यासाठी अमेरिका त्यांना मोठ्या प्रमाणावर सवलती आणि विविध प्रकारची सूटसुद्धा देणार आहे. अमेरिकेसमोर व्हिएतनाम आणि भारत हे दोन उत्तम पर्याय म्हणून उपलब्ध आहेत. मागील दोन वर्षांत अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये जे व्यापार शीतयुद्ध सुरू होते, त्यामध्ये भारताने अमेरिकेला चांगली साथ दिलेली आहे. त्यामुळे भारत हा उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील एक विश्वासू साथीदार म्हणून अमेरिका भारताकडे बघत आहे. अमेरिकेची अपेक्षा आहे की चीनने त्यांच्या देशात ज्या प्रकारच्या पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत, त्याच प्रकारच्या पायाभूत सुविधा भारत आणि व्हिएतनाम यांनी विकसित कराव्या, म्हणजे ह्यातील बरेच उद्योग भारतात स्थानांतरित करता येतील.

वैद्यकीय उपकरणे आणि त्यांचे वितरक, अन्नप्रक्रिया, कापड, चामड्याच्या वस्तू, वाहनांचे सुटे भाग अशा जवळपास ५५० उत्पादनांच्या कंपन्या भारतात याव्या म्हणून भारत सरकार प्रयत्नशील आहे. वैद्यकीय उपकरणे बनविणाऱ्या अबोट लॅबोरेटरीज आणि मेडट्रॉनिक यासारख्या मोठ्या कंपन्यासुद्धा भारतात याव्या यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु यासाठी सरकारला काही बदल करण्याची आवश्यकता आहे. भूमी अधिग्रहण, कर, कामगारविषयक अशा क्षेत्रांतील कायदे उद्योगानुकूल बनविण्याची आवश्यकता आहे. सरकारने या संदर्भात प्रयत्न करावे, अशी या विदेशी कंपन्यांची इच्छा आहे. भारतात स्थानांतरित होण्यात या विदेशी कंपन्यांना भारतातील स्वस्त जमीन आणि स्वस्त मनुष्यबळ हा एक मोठा लाभ मिळणार आहे. यासाठी सरकारला पायाभूत सुविधा निर्मितीसाठी खूप मोठा खर्च करावा लागणार आहे. कोविड-१९मुळे अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. अनेकांची नोकरी गेलेली आहे, अनेकांचे रोजगार गेलेले आहेत, या पार्श्वभूमीवर उद्योगांमध्ये एक नवचैतन्य आणण्याच्या दृष्टीकोनातून नवीन रोजगारांची निर्मिती करण्याच्या दृष्टीकोनातून आणि नवीन नोकऱ्यां निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून या संधीचे सोने करणे अत्यंत आवश्यक आहे.

नवीन उद्योगातून रोजगाराचे सर्जन

कोणत्याही नवीन कंपन्या ज्या वेळेला भारतामध्ये येतील, त्या वेळेला त्यांना सर्वप्रथम आवश्यकता असेल ती जमिनीची. जमिनीचा ताबा घेणे, सपाटीकरण (लेव्हलिंग) करणे, ले आउट टाकणे, वेगवेगळ्या पद्धतीची यंत्रसामग्री कुठे कुठे लावायची त्याची योजना बनविणे, मशीन इन्स्टॉलेशन, संपूर्ण प्लांटमध्ये प्लंबिंगची कामे - म्हणजे केवळ पाण्याची पाइपलाइन नाही, तर हवा, ऑइल, गरम पाणी, गॅस, जिथे जिथे जे जे आवश्यक असेल, ती वस्तू त्या ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी वेगळ्या पद्धतीच्या पाइपलाइन्स टाकण्याची आवश्यकता असते. कंपनी सुरू होताना सुरुवातीला जर कोणती कामे करावी लागत असतील तर ती म्हणजे सिव्हिलची - म्हणजे बांधकामाशी संबंधित कामे आयटीआय सिव्हिल मुले करू शकतात. प्लंबिंगची कामे आयटीआय प्लंबर झालेली मुले करू शकतात. कंपनी म्हटली म्हणजे स्वच्छता, सुरक्षा, बागकाम, प्रयोगशाळा, इमारतींची देखभाल हे ओघानेच आले. ह्या सर्व विषयांत आयटीआय झालेली व तसे कौशल्य असलेली मुले घेतली जातात. ड्राफ्ट्समन, सुतार, इलेक्ट्रिशिअन, कॉम्प्युटर ऑपरेटर, सर्व आयटीआय ट्रेडची मुले यांना काही कंपन्या जरी आल्या, तरीसुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे नवीन कंपन्या येणे म्हणजे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणे आलेच. त्यासाठी आपली तयारी असणे आवश्यक आहे.

भारत-चीन तणावातून संधी

सध्या तणावाची परिस्थिती असल्यामुळे ग्राहक 'मेड इन चायना'कडे पाठ फिरवत आहे. त्यामुळे प्रत्येक वस्तू कुठल्या देशाचे उत्पादन आहे, हे ग्राहक बघतो आहे. त्यामुळे कंपन्यांनी - उदाहरणार्थ टिकटॉकनेसुद्धा आमचा चीनशी काही संबंध नाही अशी भूमिका घेतली. त्याचप्रमाणे अनेक विदेशी कंपन्यासुद्धा आमचा चीनशी काही संबंध नाही असे म्हणत भारतामध्ये त्यांचे उद्योग सुरु करू शकतात. याला कारण म्हणजे चीनमधून भारतामध्ये आयात होणाऱ्या मालामध्ये ५५% वस्तू चीनमध्ये बनलेल्या असतात, पण चीनमध्ये विविध देशांतील कंपन्यांनी त्या बनविलेल्या असतात आणि त्या चीनमधून भारतामध्ये किंवा अन्य देशांमध्ये निर्यात केलेल्या असतात. त्यामुळे जर ग्राहकांनी 'मेड इन चायना' मालाकडे पाठ फिरविली, तर विनाकारण आपल्या व्यवसायावर परिणाम नको म्हणून अनेक कंपन्या मेड इन इंडिया असे दाखविण्यासाठी भारतामध्ये त्या सुट्या भागांची जुळणी किंवा उत्पादन किंवा विक्री अशा वेगवेगळ्या पद्धतींनी आपले कार्य सुरू करू शकतात.

आपण चीनकडून प्लास्टिकच्या मूर्ती, खेळणी, देवीदेवतांच्या मूर्ती, फुले, पायपुसणे, विद्युत रोशणाईचे दिवे आदी वस्तू घेतो. भारत-चीनमधील तणावामुळे व भारत सरकारच्या भूमिकेमुळे यातील अनेक वस्तू भारतात तयार करण्यावर भारतीय उद्योजकांचा भर राहणार आहे. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊ शकते. कारण इंजेक्शन मोल्डिंगसारख्या मशीनद्वारे प्लास्टिकच्या सर्व वस्तू बनविणे सहज शक्य आहे. चिनी विद्युत रोशणाईच्या दिव्यांना पर्याय म्हणून भारतातील कुशल वा अर्धकुशल स्त्री-पुरुष कामगारांकडून या वस्तूंची निर्मिती व जुळणी कामे करून घेता येणे शक्य आहे. त्यामुळे ह्या सीमावादातूनसुद्धा रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.


seva_1  H x W:

विविध उद्योग क्षेत्रांतील संधी

ऑटोमोबाइल क्षेत्रामध्ये किया मोटर्स, जनरल मोटर्स, टेस्ला मोटर्स यांचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प नजीकच्या काळात सुरू होतील किंवा पूर्ण होतील. इलेक्ट्रिक मोटार व इलेक्ट्रिक बस बनविण्याचेही प्रकल्प भारतात सुरू होतील. त्यामुळे इलेक्ट्रिक विषयाशी संबंधित विद्यार्थ्यांना व ऑटोमोबाइल अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ह्यात संधी मिळू शकेल.

एल.एच. एव्हिएशनचा ड्रोन निर्मिती प्रकल्प, थ्रस्ट एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडचा अवाढव्य प्रकल्प हे तर महाराष्ट्रातच होणार आहेत. ह्यात शीट मेटल, मशीनिंग, सीएनसी मशीन ऑपरेटर, सीएनसी प्रोग्रॅमर, वेल्डर, रंगारी, केमिकल प्लांट ऑपरेटर ह्या सर्वाना काम मिळू शकेल. बांधकाम क्षेत्रातही स्मार्ट सिटी, पर्यटन, औषधनिर्मिती (फार्मा) क्षेत्र, संरक्षण, जीवतंत्रज्ञान (बायोटेक्नॉलॉजी) आदी क्षेत्रांतही मोठी गुंतवणूक अपेक्षित आहे.

प्रशिक्षणाची गरज

आजची शिक्षण व्यवस्था लक्षात घेता कॉलेजेसमध्ये नियमित तासिका होत नाहीत, तसेच शिक्षकांची कमतरता व अनुभवी शिक्षकांची तर वानवाच आहे. विद्यार्थ्यांची रुची आणि आयटीआय किंवा शिक्षण देणाऱ्या विविध संस्थांमध्ये असलेल्या सुविधांची कमतरता यामुळे विद्यार्थ्यांचा हवा तो स्तर आज बाहेर पडत नाही. अशा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो. असे विद्यार्थी ज्या वेळेला वेगवेगळ्या तांत्रिक पदांकरिता आवेदन करतात आणि मुलाखतीसाठी जातात, त्यांना प्रात्यक्षिक केल्याचा अनुभव अत्यंत कमी असल्यामुळे ते हिमतीने मुलाखत देऊ शकत नाही किंवा उत्तीर्ण होऊ शकत नाहीत. त्यांना म्हणावी तशी संधी मिळत नाही. ज्यांना कुठला न कुठला रोजगार उपलब्ध होतो, ते सर्व एक तर कुशल कामगार किंवा अकुशल कामगार या गटांमध्ये मोडतात. कुशल कामगार म्हणजे ज्यांनी आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे व अकुशल कामगार म्हणजे ज्यांनी दहावीनंतर तांत्रिक मान्यताप्राप्त संस्थेचा अशा पद्धतीचा कुठलाही अभ्यासक्रम केलेला नाही.

प्रशिक्षणातून ज्ञान, अनुभव, आत्मविश्वास, कामातील गती ह्या गोष्टी प्राप्त होतात. ह्यामुळेच कौशल्य प्राप्त होते. उद्योगांना कामातील कौशल्य जास्त महत्त्वाचे असते. ह्याच भरवशावर उमेदवारास भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

प्रशिक्षणाचे प्रकार

प्रत्यक्ष कामावरचे प्रशिक्षण (ऑन जॉब ट्रेनिंग) व कामाबाहेरचे (ऑफ जॉब) ट्रेनिंग हे प्रशिक्षणाचे दोन प्रकार आहेत. उद्योगामध्ये वा प्रत्यक्ष कामाच्या जागी प्रशिक्षणार्थी उमेदवारास काम करण्याचे प्रशिक्षण देणे याला ऑन जॉब ट्रेनिंग असे म्हणतात. यामध्येही प्रत्यक्ष कामात सहभागी करणे व कामाशी संबंधित काम देणे असे दोन प्रकार आहेत. उदाहरणार्थ, सीएनसी मशीन ऑपरेट करणे हे जर काम असेल, तर प्रत्यक्ष मशीन चालविण्यास लावणे व त्याकरिता प्रशिक्षण देणे हे झाले ऑन जॉब ट्रेनिंग. पण बरेचदा यामध्ये यंत्राचा एखादा भाग निकामी होणे, टूल तुटणे किंवा अपघात इत्यादी गोष्टींचे भय असते. त्यामुळे अश्या उमेदवारास मशीनची माहिती, कंट्रोल पॅनलची माहिती, टूल लोडिंग-अनलोडिंग अशी कामे शिकविली जातात. हे सर्व ऑन जॉब ट्रेनिंगमध्ये येते.

ऑन जॉब ट्रेनिंगसाठी 'नीम' (नॅशनल एम्प्लॉएबिलिटी एन्हान्समेंट मिशन) हा चांगला पर्याय आहे. यामध्ये दहावी उत्तीर्ण कोणीही उमेदवार ३ ते ३६ महिन्यांसाठी उद्योगामध्ये काम करण्यास पात्र ठरू शकतो. सरकारद्वारा पुढाकार घेऊन चालणारा हा प्रकल्प असल्याने, उद्योगाला ह्यामध्ये प्रतिव्यक्ती सबसिडी मिळते. त्यामुळे उद्योगाला स्वस्त मनुष्यबळ प्राप्त होते व मुलांना ऑन जॉब ट्रेर्निंगद्वारे कौशल्य प्राप्त करता येते.

ऑफ जॉब ट्रेनिंग

ऑफ जॉब ट्रेनिंग हा प्रशिक्षणाचा दुसरा प्रकार आहे. यामध्ये कंपनी विद्यार्थ्याला कंपनीच्या आत बनलेल्या त्यांच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण देते. प्रत्यक्ष मशीनवर प्रशिक्षण दिले जात नसून प्रतिकृतीवर दिले जाते. स्वयंसेवी संस्था किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र हेसुद्धा अशा पद्धतीचे प्रशिक्षण देतात. इंजीनमधील दोष शोधणे व दुरुस्त करणे शिकवायचे असेल, तर अशा संस्थांमध्ये साधे बाजारातील जुने इंजीन ठेवलेले असते व ते इंजीन कसे उघडतात, बंद करतात, त्याच्या वेगवेगळ्या भागांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. हे दोन्ही प्रकार प्रभावी आहेत. कारण विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी कंपनीतील प्रशिक्षकाला इतका वेळ उपलब्ध असेलच असे सांगता येत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या कौशल्य प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांचे ऑफ जॉब ट्रेनिंग होऊ शकते व यातून त्यांना पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक ज्ञान निश्चितच येऊ शकते. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो व उत्तीर्ण होण्यास त्यांना मदत होते.

आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध विभागांमध्ये काम करण्याची संधी दिली जाते. प्रशिक्षणाचा हा कालावधी दोन किंवा तीन वर्षे असू शकतो. त्या विभागांमध्ये काम करता करता ज्येष्ठ किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली अशा उमेदवारांचे प्रशिक्षण होते. कंपनीच्या बाहेर वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रशिक्षण संस्था विद्यार्थ्यांना काही प्रमाणपत्र अभ्रासक्रम उपलब्ध करून देतात, ज्यामध्ये त्यांना काम शिकविले जाते. ते काम शिकल्यानंतर त्यांना काही प्रमाणात प्रात्यक्षिक आणि काही प्रमाणात लेखी प्रशिक्षण दिले जाते. असे उमेदवार ते प्रमाणपत्र घेऊन कंपन्यांशी संपर्क साधतात व कंपन्यांच्या आवश्यकतेप्रमाणे त्यांना काम मिळते.

उद्योगातील बदलानुसार कौशल्यनिर्मिती

आता त्यामध्ये येऊ घातलेल्या कंपन्या जर आपण लक्षात घेतल्या, तर आपल्याला अनेक प्रकारच्या कौशल्यांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ, भारतामध्ये मोबाइल, इलेक्ट्रॉनिक वस्तू चीनमधून मोठ्या प्रमाणावर आयात केल्या जातात. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाइल बनविणाऱ्या कंपन्या भारतामध्ये आल्या, तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक्स सुटे भाग जुळणी आणि मोबाइल दुरुस्ती कारागीरांची आवश्यकता लागेल. यांची पूर्तता करण्यासाठी त्याचे दोन मार्ग असू शकतील. कोणत्या कंपन्या येणार आहेत याची माहिती सरकारी विभागांना असते. त्यांनी स्थानिक, जिल्ह्यातील किंवा विभागातील आयटीआय संस्थांशी संपर्क साधून तशा प्रकारचे अभ्यासक्रम सुरू करायला हवेत. येणाऱ्या उद्योगालाच विचारून तसे अभ्यासक्रम तयार करता येणे शक्य आहे किंवा तेही शक्य नसेल, तर किमान काही प्रमाणपत्र अभ्यासक्रम तरी राबविता येतील. विद्यार्थ्यांसाठी ३ किंवा ६ महिने अशा पद्धतीचा एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आणि त्या विद्यार्थ्यांनी तशा वस्तू बनविणाऱ्या कंपन्यांमध्ये जाऊन प्रशिक्षण घेतले, तर आपल्या देशात जेव्हा अशा मोठमोठ्या कंपन्या येतील, तेव्हा कुशल कारागीरांची पूर्तता करण्याकरता हे विद्यार्थी तयार राहतील.

आपण बघतो आहोत की मोठ्या प्रमाणावर ऑटोमोबाईल कंपन्या भारतामध्ये येऊ शकतात. भारतामध्ये वाहनांच्या सुट्या भागांची किंवा वाहनांची निर्मिती करण्याचे कारखाने टाकू शकतील. हया कंपन्यांचा भर जुळणी (ऑटोमोबाइल असेम्ब्ली) करण्यावर असतो. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणांवरून वेगवेगळे भाग एकत्रित आणणे आणि त्याला अंतिम रूप देणे अशा पद्धतीची ही प्रकिया असते. अशा कारखान्यात जुळणी कारागीरांची (असेम्ब्लरची) आवश्यकता जास्त असते. असेम्ब्लर म्हणजे जो वेगवेगळे सुटे भाग जोडतो, तो. यासाठी आयटीआय फिटरशिक्षित विद्यार्थी चालतो. आयटीआयमध्ये आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी फिटर ही शाखा घेत असतात. त्यांना नट रनर वापरणे, काम करण्याची योग्य पद्धत, ड्रॉइंग वाचणे, योग्य त्या गतीत काम करणे शिकविले जाते. हे जर तो विद्यार्थी शिकला आणि त्यात पारंगत झाला, तर मग तो टीव्हीचे सुटे भाग जोडणारा असेल किंवा ऑटोमोबाइलचे भाग जोडणारा असेल किंवा एखादे वातानुकूलन यंत्र (एसी) जोडणारा असेल, तो कुठल्याही गोष्टीची जुळणी करू शकतो. अशा पद्धतीचे विद्यार्थी ऑटोमोबाइल किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या असेंम्ब्ली प्रोजेक्टमध्ये सर्वत्र कामात येऊ शकतात. उदाहरणार्थ, एखाद्या ट्रॅक्टर कंपनीमध्ये ट्रॅक्टरची जुळणी करताना - म्हणजे असेम्ब्ली करताना असेम्ब्ली कशी करायची याचेसुद्धा प्रशिक्षण दिले जाऊ शकते. ट्रॅक्टरमध्ये येणारे प्रॉब्लेम कसे सोडवायचे याचे प्रशिक्षण दिले जाऊ शकते. ट्रॅक्टरच्या विक्रेत्यांकडे अशा मुलांना काम मिळू शकते. उद्योगातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन्ही प्रकारचे रोजगार निर्माण होतात. कौशल्य व्यर्थ जात नाही, त्याचा उपयोग होतोच.
दुसरे उदाहरण एसी असेम्ब्ली व दुरुस्तीचे आहे. कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम केलेल्या विद्यार्थ्यांना कंपनीत कायम काम मिळू शकते किंवा वेगवेगळ्या वितरक किंवा सेवा केंद्रामध्ये (फ्रँचायझीमध्ये) काम मिळू शकते. ग्राहक त्यांच्या समस्या कॉल सेंटरला सांगतात. कॉल सेंटर सेवा केंद्राला कळवितात. सेवा केंद्र प्रशिक्षित व्यक्तीला हे काम सोपवितात. म्हणजे कौशल्यामुळे स्वतःच्या गावी अशा प्रकारे रोजगार निर्माण होतो.

उद्योगातील बदलाची माहिती ठेवणे, उद्योगांची गरज ओळखणे व त्यानुसार नवनवीन कौशल्य आत्मसात करणे हाच रोजगार गॅरंटीचा मंत्र आहे. यामुळे 'कौशल्याचे घरी ऋद्धिसिद्धी पाणी भरी' असे म्हणावेसे वाटते .


९५५२५३५८१३

(लेखक उद्योग क्षेत्रात कार्यरत असून ऑटोमोबाइल व एरोस्पेस कंपनीतील अनुभवी आहेत.)
Powered By Sangraha 9.0