आपली जबाबदारी ओळखू या

03 Jul 2020 22:18:03

corona_1  H x W
जगण्याची अभूतपूर्व कोंडी केलेल्या कोविडशी झुंज एकीकडे आणि त्याच वेळी धूर्त, लबाड, स्वार्थांध अशा चीनशी करावा लागत असलेला संघर्ष दुसरीकडे, हे भारताचे वर्तमान आहे. या दोहोंपैकी कोविडचा प्रादुर्भाव हीदेखील चीननेच सर्व जगाला दिलेली देणगी आहे, याबाबत तीव्र नाराजी व संताप जगभरातून व्यक्त होत आहे. त्यात भर म्हणून, गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याची चिनी सैनिकांनी काढलेली कुरापत. चीनच्या सर्व प्रकारच्या पाताळयंत्री कारवायांना केंद्र सरकार आणि भारतीय सैन्य शौर्याने आणि बुद्धिकौशल्याने चोख प्रत्युत्तर देत आहे. यामुळे नामोहरम होत असलेल्या चीनचे धाबे दणाणले आहे.

त्यातच, सर्व प्रसारमाध्यमांना गाफील ठेवत भारताच्या पंतप्रधानांनी सेनाप्रमुखांसह केलेला लडाख दौरा, गलवान खोऱ्यातील चकमकीत जखमी झालेल्या सैनिकांची केलेली विचारपूस, त्यांच्याशी बोलून वाढवलेले मनोधैर्य... हा सगळा घटनाक्रम कपटी चीनला काळजीत पाडणारा आणि चिनी नागरिकांच्या मनातील त्यांच्या राज्यकर्त्यांविषयीच्या वाढत चाललेल्या असंतोषाला खतपाणी घालणारा ठरू शकतो.

अखिल विश्वावर सत्ता गाजवण्याची सुप्त तसेच प्रकट महत्त्वाकांक्षा बाळगणारा चीन, हळहळू जगाने वाळीत टाकलेला देश या प्रतिमानिर्मितीकडे वाटचाल करत आहे. चाळीस वर्षांपूर्वी अतिशय गरीब असलेला आणि अनेक निकषांवर भारताच्या मागे असलेला हा देश कष्टाने आज जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. असे असताना, आज चीनला आपल्याच कर्माने सर्वांकडून अपमानित व्हायला लागणे वा बेदखल व्हावे लागणे हे त्या देशासाठी नामुश्कीचे आहे.

अर्थात सामर्थ्यशील चीनचे फूत्कार काही काळ थांबल्यासारखे वाटले, तरी त्याने भारतासारख्या देशाला निश्चिंत, निर्धास्त राहता येणार नाही. सदैव जागरूक असलेले आणि या बलाढ्य शत्रूशी दोन हात करण्याची हिंमत दाखवणारे नेतृत्व आज भारताला लाभले आहे, हे या देशाचे सुदैव मानावे लागेल. चीनच्या कुटिल कारवायांना कृतिशील समर्थन देत असलेली अन्य शेजारी राष्ट्रे हीदेखील भारताची डोकेदुखीच आहे. या डोकेदुखीचा बंदोबस्तही समांतरपणे करावा लागणार आहे. थोडक्यात काय, तर भारताला सध्या अनेक तोंडे असलेल्या संकटाने घेरले आहे. शांत डोक्याने, अतिशय हुशारीने आणि सर्व बळ लावून त्याचा मुकाबला करणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे. केंद्रातले सरकार त्याच पद्धतीने वाटचाल करत आहे. म्हणूनच भारताच्या हिकमतीची दखल आणि प्रभाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पडत आहे. केंद्र सरकार आणि भारतीय लष्कर सर्व सामर्थ्यानिशी या संकटांशी लढत आहेत, ही सर्वाधिक जमेची बाजू नक्कीच. मात्र ती पुरेशी नाही. त्यांच्या या नेक प्रयत्नांना सर्वसामान्य नागरिकांची साथ लागणार आहे. ही साथ म्हणजे कौतुकाचे वा स्तुतीचे पोकळ देव्हारे अपेक्षित नाहीत, तर नागरिक म्हणून आपला कृतिशील सहभाग अपेक्षित आहे.

काही दिवसांपूर्वी भारत सरकारने ५९ चिनी ॲप्सवर घातलेली बंदी हा चीनची कोंडी करण्याचा एक मार्ग. या बंदीमुळे आर्थिकदृष्ट्या बलाढ्य असलेल्या आणि जवळजवळ सर्व जगाचा निर्यातदार असणा-या चीनच्या अर्थव्यवस्थेवर फारसा प्रतिकूल परिणाम होणार नाही हे वास्तव असले, तरी या निर्णयाचे स्वागत व्हायला हवे. डिजिटल विश्वात अशा प्रकारे दडपण आणणे आणि चीननिर्मित ॲप्सचे महत्त्व कमी करणे हे चीनसाठी मानहानिकारक ठरू शकते. मात्र तो चीनला नेस्तनाबूत करण्याचा एकमेव मार्ग नाही. म्हणूनच या ॲपबंदीचे पूर्णपणे समर्थन करतानाच, चीनच्या विरोधात चालू असलेल्या लढाईचा तो एक महत्त्वाचा पण तुलनेने छोटा मुद्दा आहे हे लक्षात घ्यावे. मात्र ही भारतातील या विषयातील तज्ज्ञांसाठी नवसंशोधनाची संधी असू शकते, याचा विचार व्हायला हवा. त्याचबरोबर गेल्या चाळीस वर्षांतील चीनची उद्योगभरारी भारतीयांनी अभ्यासायला हवी आणि आपल्या देशातील वातावरणाशी, उपलब्ध साधनांशी/स्रोतांशी सुसंगत असे आपले औद्योगिक मॉडेल विकसित करायला हवे.

'आत्मनिर्भर भारताचे' जे स्वप्न पंतप्रधानांनी आपल्यासमोर ठेवले आहे, त्या स्वप्नाच्या पूर्ततेच्या दिशेने पहिले पाऊल म्हणजे स्वतःची ओळख असलेले उद्योगजगत उभे करणे हे असायला हवे. हे स्वप्न साकारण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. ती एक प्रकारची खडतर तपश्चर्याच आहे. त्यासाठी आपापल्या क्षेत्रात झोकून देऊन काम करावे लागेल. कालसुसंगत नसतील अशा जुन्या विचारांची झापडे दूर करून, नवविचारांचे स्वागत करावे लागेल. उद्योजकतेची, उद्यमशीलतेची वृत्ती अंगी रुजवावी लागेल. हे या समाजाचे स्वभाववैशिष्ट्य बनले, तर त्यातून एक बळ, शक्ती निर्माण होईल. मग सरकार कोणत्याही पक्षाचे का असेना, त्यावर या उद्यमशील समाजाचा एक नैतिक प्रभाव निर्माण होईल. त्यातूनच उद्योगासाठी आवश्यक अशा सोयीसुविधांची, सरकारी धोरणांची मागणी लावून धरता येईल.

तेव्हा ॲपबंदीचे स्वागत व समर्थन करताना आपली जबाबदारी ओळखून त्या दिशेने चार पावले टाकू या, तर त्या ॲपबंदीला प्रतीकात्मकतेपेक्षा अधिक व्यापक अर्थ लाभेल.

सरकार आणि सैन्य देशाचे रक्षण करत असताना, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावत असताना आपण आपल्या कर्तव्याचे भान ठेवू या. Vocal for local होण्यासाठी उद्यमशीलता समाजात रुजवू या. भारताला आर्थिकदृष्ट्या कणखर बनवणे ही आपल्यातील प्रत्येकाची जबाबदारी आहे. ती फक्त ग्राहक म्हणून नाही, तर उत्पादक, निर्माता म्हणूनही आहे.
Powered By Sangraha 9.0