लोकमान्यांची ग्रंथसंपदा

विवेक मराठी    30-Jul-2020
Total Views |
लोकमान्य टिळक हे विद्वतेचे भांडार होते. त्यांचे लेखन वाचले, तर टिळक या तीन अक्षरांवर विद्येचा कसा प्रभाव होता हेच आपल्याला दिसून येते. टिळकांनी अवघे चार ग्रंथ लिहिले, परंतु हे चारही ग्रंथ विद्वत्तापूर्ण. लोकमान्यांची ही ग्रंथसंपदा पाहून आपल्याला नतमस्तक व्हायला होते. लोकमान्यांच्या पुण्यतिथी स्मरणार्थ त्यांनी लिहिलेल्या ग्रंथसंपदेचा आढावा घेऊया.


tilak_1  H x W:

लोकमान्यांनी तसे पाहिले तर ग्रंथ लिहिले अवघे चार - ओरायन, आर्टिक होम इन द वेदाज, वेदिक क्रोनॉलॉजी आणि गीतारहस्य. चारही ग्रंथ विद्वत्तापूर्ण. ज्यांना आव्हान देऊन त्यावर चर्चा घडवायची म्हटले, तर तसे करणाऱ्यास त्याहीपेक्षा अधिक ज्ञान आपल्याकडे आहे हे सिद्ध करावे लागेल किंवा आपण ठार वेडे आहोत हे जगाला सांगावे लागेल. असे वेडे त्या काळात होते, असे म्हटले तर आताच्या काळात त्यांचे प्रमाण कमी आहे असे म्हटल्यासारखे होईल. तेव्हा आपण त्या वेड्यांची चर्चा करण्यापेक्षा या ग्रंथांची माहिती थोडक्यात घ्यावी, हे उत्तम.


'ओरायन' हा ग्रंथ टिळकांनी लिहून पूर्ण केला तो ऑक्टोबर १९९३मध्ये. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत टिळकांनी शेवटी म्हटले आहे ते अगदी खरे आहे. ते म्हणतात, ‘सोन्याचा लखलखीतपणा किंवा त्याचा गडदपणा यांची खरी कसोटी ही आगीच्या भट्टीतच होऊ शकते.’ त्याच वेळी ते असेही म्हणतात की, 'माझ्या इतर कार्यक्रमांमुळे भविष्यात मला या विषयाकडे अधिक लक्ष देता येईल असे वाटत नाही. जर या पुस्तकावर अधिक तपशीलवार आणि कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय चर्चा झाली, तर मी स्वत:ला भाग्यवान मानेन.’ तेव्हाच काय, अशी चर्चा केव्हाही होत नाही, याची आपल्याला माहिती आहे. संबंधित लेखकाने अमुक एक गोष्ट कोणत्या परिस्थितीत लिहिली असेल, याचा विचारच आपण करत नाही. त्या वेळी त्याची मन:स्थिती काय असेल याची चिकित्सा तर दूरच. प्रत्येक विषयात आपण किती शहाणे आहोत आणि आपल्यापेक्षा या पुस्तक लेखकाला कसे फारसे कळत नाही, हे दाखवण्याकडे ग्रंथ परीक्षकांचा सर्वसाधारण कल असतो किंवा यासम हा, असेच त्यांना सांगायचे असते.


सांगायचा मुद्दा हा की, टिळकांची वृत्ती ही संशोधकाचीच होती. १८८९मध्ये नेहमीप्रमाणे श्रीमद्भगवदगीता वाचताना ते ‘मासानां मार्गशीर्षोऽहं’पाशी थांबले. या श्रीकृष्णवचनातून आपल्याला काहीतरी महत्त्वाचे अनुमान काढता येईल, असे वाटून त्यातून ते आपल्याच जुन्या भाषणाच्या विश्वात गेले. डेक्कन कॉलेजमध्ये तेव्हा प्रज्ञावंतांचे एक व्यासपीठ होते. त्यात त्यांनी डेक्कन कॉलेजचे प्राचार्य एफ.जी. सेल्बी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ‘वेदांचे प्राचीनत्व’ या विषयावर एक निबंध सादर केला होता. लंडनमध्ये १८९२मध्ये भरणाऱ्या पौर्वात्य परिषदेसाठी याच विषयावर एक प्रबंध लिहून पाठवावा, असे टिळकांना सांगण्यात आले. त्या वेळी विंचूरकर वाड्यात एक महिनाभर स्वत:ला कोंडून घेऊन टिळकांनी हा प्रबंध तयार केला. त्या सर्व काळात टिळकांचे स्वत:च्या जेवणाकडेही फारसे लक्ष नव्हते. हा प्रबंध त्यांनी लंडनला पाठवला आणि तो 'ओरायन' या नावाने ऑक्टोबर १८९३मध्ये प्रकाशित झाला. वेदांच्या मूल स्वरूपाचा हा होता शोध. त्यासाठी भाषाशास्त्रीय शोधांचा वापर न करता त्यांनी खगोलशास्त्रीय पद्धतींचा वापर केला. वेद हे सर्वात प्राचीन ग्रंथ नव्हेत, या पाश्चात्त्यांच्या विचारांना धक्का देणारे त्यांचे हे लेखन आहे. टिळकांनी या सर्व मांडणीमध्ये काय म्हटलेले आहे, ते सांगताना प्रा. न.र. फाटक आपल्या ‘लोकमान्य’ या ग्रंथात सांगतात, ‘ओरायन या पाश्चात्त्य नावाचा नक्षत्रपुंज आणि मृगशीर्ष हे एकच असून ते शिरच्छेद सुचविचात. ग्रीक पुराणात ओरायनविषयी जशी तुटलेल्या डोक्याची कथा आहे, तशीच प्रजापतीचे डोके रुद्राने उडविल्याची कथा वैदिक ग्रंथातून आहे. प्रजापतीचा निर्देश या कथेप्रमाणे ॠग्वेदात आहे. पण तिथे मृगाचा संबंध नाही. रुद्राचा शत्रू मृगाचे रूप घेऊन आला असल्याने त्याचे डोके इंद्राने उडविले. या अनुसंधानातला मृगशीर्ष हा शब्द रुद्रप्रजापतीच्या कथेकडे घेता येईल. मृगशीर्षाचे वर्णन संस्कृत ग्रंथातून ‘इन्वाका नावाचा लहान नक्षत्रांचा समुदाय’ असे करतात. तो समुदाय मृगशीर्षाच्या डोक्यावर असतो हे वर्णन अमरकोशात आहे. परंतु त्याला महत्त्व देण्याचे कारण नाही. एकदा केव्हातरी काळवीटाचे डोके - आरपार बाण गेलेले - आकाशात दिसते अशी समजूत प्रचलित असावी, म्हणून मृगशीर्ष हे नाव त्या नक्षत्रपुंजाला पडले असावे. ....टिळकांनी या शोधासाठी वेगवेगळ्या मापदंडांना वापरलेले आहे. एका ठिकाणी त्यांनी फाल्गुनी पौर्णिमेचा वर्षारंभ हे पितृपक्षाचे कोडे सोडविण्यास उपयोगी पडतो, असे म्हटले आहे. पारशी समाजातही पितृपक्ष याच वेळी पाळतात, असे म्हटलेले आहे. एकेकाळी वैदिक आणि पारशी लोक एकत्र राहत होते, याची ही साक्ष असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. ओरायन हा शब्दही ग्रीक असला, तरी ग्रीक आणि आर्य एकत्र राहत होते तेव्हा तो ‘आग्रायण’ या शब्दापासून जन्मास आला असला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे. या सर्व लेखनामध्ये त्यांचे भाषाशास्त्रीय प्रभुत्व तर दिसून येतेच, तसाच त्यांचा खगोलशास्त्रीय दृष्टीकोनही त्यातून दिसून येतो. ते मासानां मार्गशीर्षोऽहं या एकाच वचनावरून ख्रिस्तपूर्व चार हजार वर्षांपर्यंत मागे गेले. तसे करताना वीस-बावीस हजार वर्षे मागे जाता येणे शक्य असतानाही ते तसे मागे गेले नाहीत आणि प्राचीनत्वाच्या वृथ अभिमानाला ते बळी पडले नाहीत' असेही फाटक यांनी म्हटले आहे. टिळकांच्या या प्रबंधलेखनास आणि त्यातल्या निष्कर्षास ब्लूमफील्ड, बार्थ, बुल्हर प्रभृतींनी आपला पाठिंबा दिला होता, यावरून त्यांचे हे संशोधन किती वरच्या पातळीवर केले गेले होते हे स्पष्ट होते.


टिळकांनी आपले दुसरे जे पुस्तक लिहिले, ते ओरायनचा उत्तरार्ध म्हणूनच लिहिले, ते म्हणजे ‘आर्टिक होम इन द वेदाज’. हे १९०३मध्ये लिहिले गेले. त्याच्या प्रस्तावनेतच म्हटलेले आहे की, हे पुस्तक ओरायनचा ‘सीक्वेल’ - म्हणजेच पुढचा भाग आहे. १८९३मध्ये पहिला भाग, तर ‘आर्टिक होम’ १९०३मध्ये. म्हणजेच सलग दहा वर्षे टिळक या भागाचा विचार करत असले पाहिजेत. वि.रा. सहस्रबुद्धे यांनी ‘आर्टिक होम’चा अनुवाद केला असून तो ‘वैदिक आर्यांचे मूलस्थान’ या नावाने प्रसिद्ध आहे. या मराठी अनुवादाच्या प्रस्तावनेत टिळक विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. चिं.ग. काशीकर यांनी अगदी थोडक्यात मूळ पुस्तकाची रूपरेषा सांगितली आहे. ते म्हणतात, ‘उत्तर ध्रुव सिद्धान्तावरील आपला ग्रंथ टिळकांनी सन १९०३मध्ये प्रकाशित केला. ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाराच्या निमित्ताने जे इंग्रज अधिकारी भारतात आले, त्यांनी संस्कृत भाषेचा आणि वाङ्मयाचा अभ्यास केला. संस्कृत भाषेचा युरोपातील अनेक भाषांशी निकटचा संबंध आहे, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. संस्कृत आणि अवेस्ता या आशिया खंडातील भाषा आणि युरोप खंडातील ग्रीक, लॅटिन, केस्टिक, ट्यूटॉनिस, स्लाव्होनिक, लिथुआनियन इत्यादी भाषा बोलणाऱ्यांचे मूळचे पूर्वज अतिप्राचीन काळी परस्परांच्या सान्निध्यात कोठे तरी राहिलेले असावेत, असा सिद्धान्त त्यांनी प्रस्थापित केला. त्यांचे मूलस्थान कोठे असावे यासंबंधीचे आडाखे सप्रमाण मांडले. डॉ. वॉरेन यांनी ‘पॅराडाइज फाउंड’ या ग्रंथात भूगर्भशास्त्राच्या आधारे असे दाखवून दिले की, फार प्राचीन काळी उत्तर ध्रुवाचा प्रदेश मनुष्यवस्तीला योग्य होता आणि तेथे मानवाची वस्ती होती. पुढे हिमयुग आल्यामुळे तेथील मनुष्यवस्ती नष्ट झाली.’
 
काशीकरांनी आपल्या प्रस्तावनेत अतिशय सुंदर माहिती दिली आहे. टिळकांच्या हयातीत केशव लक्ष्मण ओगले यांनी ‘आर्टिक होम’ या ग्रंथाचा मराठी अनुवाद केला होता. पण लोकमान्यांनी त्यास परवानगी दिली नाही. त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, म्हणून केवळ त्यांनी छापलेली काही पुस्तके विकण्यास परवानगी दिली. याचा अर्थ ओगले यांनी काही प्रती छापूनही घेतलेल्या होत्या, पण त्यांना आर्थिक झीज सोसावी लागेल याची चिंता टिळकांना असल्याने त्यांनी तेवढ्या प्रतींची विक्री करण्यास परवानगी दिली. ओगले यांचे ते पुस्तक वा भाषांतर कोठेही उपलब्ध नाही.


टिळकांच्या या उपपत्तीचा अर्थ ब्रिटिशांनी ‘तुम्ही आर्य, तुम्ही इथले नाही, तेव्हा तुमचा या भूमीवर अधिकार नाही, अशा तऱ्हेने विकृत विचार पसरवायला प्रारंभ केला. त्यास टिळकांनी लखनौ काँग्रेसमध्येच जोरदार उत्तर दिले. ते म्हणाले, ‘आम्ही नाही ना या भूमीचे मालक, पण मग तुम्ही तरी कोठे आहात या भूमीचे मालक? तुम्ही तर ठार परकेच. मग ही भूमी ज्यांची आहे त्या दलित, पददलित, आदिद्रविड, भिल्ल, गोंड यांना द्या. त्यांच्या हाती सत्ता द्या आणि तुम्ही चालते व्हा.’ याच वेळी त्यांनी 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते मी मिळवणारच’ अशी घोषणा दिली तेव्हा टाळ्यांचा जो कडकडाट झाला तो आकाशाशीच स्पर्धा करणारा होता.

tilak_1  H x W:
 
'मंडालेच्या तुरुंगात टिळक गेले नसते, तर भारतीय समाज एका व्यासंगी ग्रंथसंपदेला मुकला असता' असे कर्मयोगी लोकमान्य या आपल्या ग्रंथात डॉ. सदानंद मोरे यांनी म्हटले आहे. ते म्हणतात, ‘गीतारहस्याचे हे बीज टिळकांच्या मनोभूमीत रुजून बरेच दिवस झाले होते; परंतु मशागत करून त्याचे रोप वाढवणे टिळकांना आपल्या सार्वजनिक कामाच्या धबडग्यात शक्य झाले नव्हते. त्यासाठी हवी असणारी फुरसत टिळकांना तुरुंगवासामुळे प्राप्त झाली. तेव्हा एका अर्थाने ही शिक्षा त्यांच्यासाठी इष्टापत्ती किंवा इंग्लिशमध्ये ज्याला Blessing in disguise म्हणतात तशी ठरली.’
 
टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्य लिहायला घेतले ते २ नोव्हेंबर १९१० रोजी. पहिली आठ प्रकरणे त्यांनी एक महिना सहा दिवसांमध्ये पूर्ण केली. हे काम ४१३ पानांचे होते. त्यांनी ३० मार्च १९११ रोजी संपूर्ण लेखन संपवले आणि त्यानंतर त्यांनी सविस्तर प्रस्तावना लिहायला घेतली. पुस्तकाची अनुक्रमणिका, समर्पण हेही त्यांनी त्याबरोबरच पूर्ण केले. कोणत्या मजकुरापुढे कोणता मजकूर घ्यायचा, याबद्दलचा तपशीलही त्यांनी स्वतंत्ररित्या लिहून ठेवला. हा ग्रंथराज एकूण ८५६ पानांचा आहे. डेमी अष्टपदी ३२ अधिक ८५६ - म्हणजे त्याच्या जाहिरातीत म्हटल्याप्रमाणे बारा कमी नऊशे पानांचा तो ग्रंथराज टिळक मंडालेहून परतल्यावर चित्रशाळा प्रेसमध्ये छपाईसाठी देण्यात आला तेव्हा टिळकांची लगबग पाहण्यासारखी असावी. ते चित्रशाळा उघडण्यापूर्वीच तिथे जाऊन थांबायचे, असे वर्णन केले गेले आहे.


टिळकांचे चिरंजीव रामभाऊ यांनी म्हटले आहे की, कितीएक गोष्टींचा उल्लेख वडील संभाषणाचे वेळी करीत व गीतारहस्यातही नीती व धर्म यावर त्यांनी जी चर्चा ‘अधिभौतिक सुखवाद’ या चौथ्या प्रकरणात केली आहे, ती वाचून दाखवीत. त्यात ‘सर्वभूतहितेरता:’ यावरून ‘पुष्कळांचे पुष्कळ सुख’ येवढेच पाहणारास जर साधू (नीतिमान) म्हणावयाचे, तर मग वेश्येसही साध्वी म्हणावे लागेल, अशी पराकोटीची कोटी करून हासवीत. तसेच स्वार्थ श्रेष्ठ की परार्थ श्रेष्ठ यासाठी पुढील श्लोक -


एके सत्पुरुषा: परार्थघटका: स्वार्थान् परित्यज्य ये
सामान्यास्तु परार्थमुद्यामभृत: स्वार्थाऽविरोधेन ये ।
तेऽमी मानवराक्षसा: परहितं स्वार्थाय निघ्नन्ति ये
ये तु घ्रान्ति निरर्थकं परहितं ते के न जानीमहे ।। भ्रर्तृहरी
हे टिळक स्वत: म्हणून दाखवीत. त्याचेच नवनीतातील भाषांतरही लगेच सांगत,
हे तों सत्पुरुष स्व-कार्य त्यजिती अन्यार्थही साधिती
हे तो मध्यम जे निजार्थ करुनी अन्यार्थ संपादिती।
हे तो राक्षस जे स्व-कार्यविषयी अन्यार्थ विध्वंसिती
जे कां व्यर्थ परार्थहानि करिती ते कोण की दुर्मती।।


हा श्लोक आजच्या एकूणच अवस्थेला शोभेलसा असा आहे. नवनीतात जे सांगितले आहे, त्याचे वर्णन करायला हवेच असे नाही. नीती आणि अनीती या शब्दांमधला हा अर्थातच फरक आहे.

 
गीतारहस्याची किंमत त्या काळात तीन रुपये होती आणि पहिली आवृत्ती सहा हजारांची होती. ती एक महिना आणि बारा दिवसांनी संपली. ती पुन्हा छापली गेली. ७ सप्टेंबर १९१५ रोजी ती परत छापली गेल्याची जाहिरात केसरीमध्ये प्रसिद्ध झाली होती. विशेष हे की गीतारहस्य प्रसिद्ध झाले, तेव्हा ते घेण्यासाठी गायकवाड वाड्याबाहेर रांग लागली होती आणि हा विद्वत्तेचा ग्रंथ आपल्याकडे आहे हे सांगण्यासाठी अनेक पुणेकर तेव्हा बखोटीला गीतारहस्य ठेवून हिंडत आणि ‘माझ्याकडे आहे, तुमच्याकडे आहे का?’ असे विचारताना दिसायचे.


आज अनेक जण आपल्याला द्रव्ययोग साधला असे सांगताना आढळतात. टिळक त्याविषयी काय म्हणतात ते पाहा. ते म्हणतात, ‘सामान्यत: एकच कर्म करण्याचे अनेक ‘योग’ किंवा ‘उपाय’ असतात. परंतु त्यापैकी उत्तम साधनास ‘योग’ शब्द विशेषेकरून लावण्यात येत असतो. उदाहरणार्थ, द्रव्य संपादन करावयाचे असल्यास ते चोरीने, फसवून, भिक्षेने, सेवा करून, कर्ज काढून, मेहनत करून वगैरे अनेक साधनांनी संपादन करिता येण्यासारिखे असते; व यापैकी प्रत्येक साधनास ‘योग’ शब्द धात्वर्थाप्रमाणे जरी लाविता येण्यासारखा असला, तरी ‘आपले स्वातंत्र्य न गमाविता मेहनत करून पैसा मिळविणे’ या उपायासच मुख्यत्वेकरून ‘द्रव्यप्राप्तीयोग’ असे म्हणण्याचा प्रघात आहे. आताच्या स्थितीत सांगायचे झाल्यास प्रत्येकाने आपला हा योग कधी आला ते तपासून पाहिले, तर बरेच काही आढळून येईल. असो.


टिळकांनी 'वेदिक क्रोनॉलॉजी' किंवा वैदिक कालगणना हा वेदांग ज्योतिषावर लिहिलेला चौथा ग्रंथ हाही मंडालेच्या तुरुंगात लिहिला आणि तोही एका अर्थाने अपुराच राहिला. या ग्रंथाची तारीख आहे १५ मे १९१४.
 
लोकमान्यांची ही ग्रंथसंपदा पाहून आपल्याला नतमस्तक व्हायला होते. त्यांनी आपला गीतारहस्य हा ग्रंथ 'श्रीशाय जनतात्मने' म्हणून तो जनतेला अर्पण केला. जनता ही त्यांचे सर्वस्व होती. जनतेला आपला सर्वोत्तम ग्रंथ अर्पण करणारा त्यांच्याइतका विद्वान महापुरुष झाला नाही, एवढेच फार तर आपण म्हणू शकतो. त्यांनी जे इतर लेखन केले, ते अर्थातच 'समग्र टिळक' या एकूण आठ खंडांमधून प्रसिद्ध आहे. त्यांनी स्वराज्यासाठी केलेली वणवण, त्यांनी विरोधकांची उडवलेली शाब्दिक भंबेरी अशा अनेक गोष्टींना शब्दरूप करायचे म्हटले, तर ते या चौकटीत बसवता येणार नाही. त्यांचे लेखन वाचले, तर टिळक या तीन अक्षरांवर विद्योचा कसा प्रभाव होता हेच आपल्याला दिसून येते. जाता जाता आणखी एका गोष्टीचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. त्यांनी आपल्या प्रस्तावनेत अनेकांचे आभार मानले आहेत, पण त्यांनी म्हटले आहे की, लढाईमुळे कागदाची (विलायती नव्हे) उणीव पडणार होती. ती मुंबईतील स्वदेशी कागदाच्या गिरणीचे मालक मेसर्स डी. पदमजी आणि सन यांनी वेळेवर आमच्या मताप्रमाणे कागद पुरवल्यामुळे दूर झाली व गीतेचा हा ग्रंथ चांगल्या स्वदेशी कागदावर छापावयास मिळाला. तथापि ग्रंथ छापताना तो अजमासाबाहेर वाढल्यामुळे पुन्हा कागदाची उणीव पडली; व ती पुण्यातील रे पेपर मिलच्या मालकांनी भरून काढली नसती, तर आणखी काही महिने ग्रंथ प्रसिद्ध होण्याची वाचकांस वाट पहावी लागली असती. म्हणून या दोन्ही गिरण्यांच्या मालकांचे आम्हीच नव्हे, तर वाचकांनीही आभार मानिले पाहिजेत.' इतक्या बारीकसारीक गोष्टींसह चौफेर दृष्टी असणाऱ्या या महापंडित व्यक्तीचे हे पुण्यस्मरण.

 
अरविंद व्यं. गोखले
९८२२५५३०७६