कोविड-१९मधील काही महत्त्वाच्या लॅब चाचण्या

विवेक मराठी    30-Jul-2020
Total Views |
@डॉ. मिलिंद पदकी

कोविड-१९मध्ये न्यूमोनिया, श्वसनाचा तीव्र रोग आणि रक्तवाहिन्यांत रक्ताच्या गुठळ्या होणे या प्रॉब्लेम्सचे प्रयोगशाळेत निदान करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चाचण्या आपण बघणार आहोत. त्यासाठी अनेक चाचण्या आणि रुग्णाची तत्कालीन स्थिती याचे पूर्ण चित्र लक्षात घेऊनच उपचाराबाबत निर्णय घेतले जातात.

Some important lab tests

कोविड-१९मध्ये न्यूमोनिया, श्वसनाचा तीव्र रोग आणि रक्तवाहिन्यांत रक्ताच्या गुठळ्या होणे या प्रॉब्लेम्सचे प्रयोगशाळेत निदान करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चाचण्या खाली दिल्या आहेत. यात कोणतीही एकच चाचणी वापरून अनुमान काढले जात नाही, तर अनेक चाचण्या आणि रुग्णाची तत्कालीन स्थिती याचे पूर्ण चित्र लक्षात घेऊनच उपचाराबाबत निर्णय घेतले जातात, हे लक्षात घेणे. त्यामुळे कोणत्याही एका आकड्याकडे बघून घाबरण्याचे कारण नाही.

१. कम्प्लीट ब्लड काउंट (CBC) - तुमच्या रक्ताच्या पेशींच्या संख्येमध्ये काही फरक झाला आहे का, हे बघण्यासाठी ही चाचणी केली जाते. यात वयोमान, लिंग आणि रोग यांनी फरक पडतो. रिपोर्टमध्ये प्रत्येक प्रकारच्या पेशींची नॉर्मल रेंज लिहिलेली असते.
तीन प्रकारच्या रक्तपेशी -


Some important lab tests
 
१. लाल रक्तपेशी - या शरीरभर प्राणवायू नेणे आणि कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर नेणे ही दोन कामे करतात.
याचे दोन गुणधर्म तपासले जातात -
अ. हिमोग्लोबिन
ब. हिमॅटोक्रिट - रक्तातले लाल पेशींचे प्रमाण देणारी चाचणी.
हे दोन्ही कमी असल्यास ऍनिमिया असू शकतो, जो लोहाच्या कमतरतेमुळे होतो. कोविड-१९मध्ये लाल रक्तपेशीला किंवा त्यांच्यातील हिमोग्लोबिनला व्हायरस बांधतो आणि त्यामुळे रक्त प्राणवायू वाहून नेऊ शकत नाही, अशी पोस्ट व्हॉट्स ऍपवर फिरत होती. पण याला जिवंत शरीरातील पुरावा अजून नाही. केवळ एका परीक्षानळीतील चाचणीवर हे मांडले गेले आहे.
२. पांढऱ्या रक्तपेशी - या शरीराला जंतूंच्या संसर्गाविरुद्ध लढा देण्यासाठी मदत करतात. या अनेक प्रकारच्या असतात आणि त्यांची उपस्थिती आणि संख्या हे दोन्ही पाहिल्या जातात. या आकड्यातील चढ-उतारावरून संसर्ग, सूज (इन्फ्लमेशन) किंवा कॅन्सर शोधण्यास मदत होते.
कोविड-१९मध्ये CD3+ T लिंफोसाइट्स नावाच्या पांढऱ्या रक्तपेशी कमी होतात आणि हे IL-6 आणि IL-8 या दोन सायटोकाइन्सचे प्रमाण नको तितके वाढण्याशी निगडित असते, जे पुढे सायटोकाइन वादळाकडे जाऊ शकते.
३. प्लेटलेट्स - हे खरे तर मेगाकॅरियोसाइट नावाच्या पेशींचे 'तुकडे' असतात, जे रक्त गोठविण्याचे काम करून रक्तस्राव थांबवितात. पण अशा रक्ताच्या गुठळ्या रक्तवाहिन्यांत झाल्या, तर संबंधित इंद्रियाची हानी होऊन मोठा धोका उत्पन्न होतो (उदा. फुप्फुसे, हृदय, किडनी, मेंदू.) कोविडमध्ये हा धोका मोठा असून सुमारे ४० टक्के मृत्यूंमध्ये अशा गुठळ्या आढळत आहेत, ज्यात फुप्फुसात अशा गुठळ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

डी-डायमर - डी-डायमर हे संयुग हे रक्ताच्या गुठळ्यांपासून बनते. डी-डायमरचे प्रमाण निरोगी लोकांत ० ते ०.५ µg/mL आढळते, याउलट कोविड-१९मध्ये, ऍडमिशनच्या वेळेला ते ०.८ µg/mL (रेंज ०.४ ते १.८ µg/mL) इतके वाढल्याचे रिपोर्ट्स आहेत. असे ते वाढलेले दिसल्यास आणि इतर काही कारणांनी रक्तस्रावाची भीती नसल्यास, डॉक्टर्स ताबडतोब गुठळ्या-विरोधी औषधे सुरू करीत आहेत.
 

Some important lab tests

पुढे ज्यांच्यात रोग वाढत जातो, त्यात डी-डायमर कसा वाढतो, हे आकृतीत दाखविले आहे. (आडव्या क्ष अक्षावर दिवस दिसत आहेत.)

फायब्रिनोजेन - हा रक्ताच्या गुठळ्या घडवून आणणारा एक घटक आहे. त्याचे प्रमाण जर कोविड-१९मध्ये वाढलेले दिसले, तर रुग्णाच्या रक्तवाहिन्यांत रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका आहे असा निष्कर्ष काढला जातो.

यांच्याबरोबर, इन्फ्लमेशन-दर्शक पॅरामीटर्स (उदा. CRP) वाढतात.

'सी रीऍक्टिव्ह प्रोटीन' ('CRP' - सीआरपी) चाचणी - इन्फ्लेमेशन असल्यास हे प्रथिन आपल्या यकृतातर्फे स्रवले जाते आणि त्यामुळे ते इन्फ्लेमेशनची निशाणी मानले जाते. याची 4 mg/Lपेक्षा अधिक पातळी कोविड-१९ची शक्यता दर्शविते.
प्रसिद्ध क्लीव्हलँड क्लिनिकनुसार, CRPच्या पातळीनुसार तुमच्या हृदयविकाराच्या जोखमीचे निदान पुढीलप्रमाणे केले जाते -
१ mg/Lपेक्षा कमी = कमी जोखीम
1 ते 2.9 mg/L = मध्यम जोखीम
3 mg/L पेक्षा अधिक = जास्त जोखीम
10 mg/Lपेक्षा अधिक = विशेष जास्त जोखीम जी पुढील शक्यता दर्शविते -
• हाडांमधले इन्फेक्शन
• ऑटोइम्यून आर्थ्रायटिसचा अटॅक
• क्षय (टीबी)
• कॅन्सर (विशेषतः लिंफोमा जातीचा.)
• न्यूमोनिया

रक्तातील ऑक्सिजनचे ऍनालिसिस - कोविड-१९मध्ये रुग्ण तीव्र श्वसनरोगाकडे जात असल्यास त्याच्या रोहिणीमधील रक्तातील ऑक्सिजनचे ऍनालिसिस करून त्यातील ऑक्सिजनचे पार्शल प्रेशर (PAO2) ठरविले जाते. तसेच त्याला दिले जात असलेल्या ऑक्सिजन-मिश्रित हवेमधले ऑक्सिजनचे प्रमाणही (FiO2) माहीत असते. यांच्या अभ्यासाने, अशा हवेतले ऑक्सिजनचे प्रमाण किती वाढविल्यास रक्तातले ऑक्सिजनचे प्रमाण कितीने वाढत आहे, हे समजू शकते.
या दोन आकड्यांचा रेशो पुढीलप्रमाणे वापरला जातो -
२०० ते ३०० = सौम्य श्वसनरोग
१०० ते २०० = मध्यम तीव्रतेचा श्वसनरोग.
१००च्या खाली = तीव्र श्वसनरोग.

वरच्या मजकुरातून, रुग्णाची कोणती चाचणी कशासाठी केली जात आहे याची थोडीफार कल्पना यावी. अर्थात डॉक्टरबरोबर चर्चा करूनच खरी परिस्थिती समजू शकेल.