स्वदेशी आत्मनिर्भरता

विवेक मराठी    04-Jul-2020
Total Views |
@राजेंद्र देवणीकर

'आत्मनिर्भर भारत' ही संकल्पना मा. पंतप्रधान मोदींजींनी आपल्या भाषणात व्यक्त केली. भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारताला स्वालंबनाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर ग्रामीण विकास व पर्यायाने ग्रामीण उद्योगावर भर दिला पाहिजे.


Modi govt Aatmnirbhar Bha

मा. पंतप्रधान मोदीसाहेबांनी भाषणात सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत लोकल म्हणजेच स्वदेशी व आत्मनिर्भरता म्हणजे स्वावलंबन याविषयी मार्गदर्शन केले, ते अत्यंत योग्य, भारतीय समाजव्यवस्था व अर्थव्यवस्था सुस्थितीत आणण्यासाठी उचललेले योग्य पाऊल आहे, असे मी समजतो.

या संदर्भात खालील मुद्द्यांवर काम करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे भारताची कृषीआधारित उद्योगप्रधान अर्थव्यवस्था व समाजव्यवस्था सुदृढ, सक्षम व स्वावलंबी होईल. या संदर्भात गावपातळीवर किंवा प्रखंड, मंडल (अंदाजे पाच ते दहा गावे) या ठिकाणी हे काम सुरू करण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

स्वावलंबी खतनिर्मिती प्रकल्प

गावातील उपलब्ध रसायनविरहित संसाधनांच्या माध्यमातून, सामूहिक तत्त्वावर उत्कृष्ट प्रतीचे, जमिनीचा नैसर्गिक पोत वाढवण्यासाठी उपयोगी असलेले, गुरांच्या शेणापासून व गोमूत्रापासून आणि उपलब्ध काडीकचरा व सुपीक माती यांचा वापर करून खत तयार करणे. गोमूत्र व ताकाच्या माध्यमातून विविध प्रकारचे कीटकनियंत्रक (पेस्टिसाइड) व बुरशीनियंत्रक (फंगीसाइड) तयार करणे.

धान्य प्रक्रिया उद्योग

आपण आपल्याकडे प्रामुख्याने तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, भाजीपाला, फळे, फुले व मसाला यांचे उत्पादन घेत आलो आहोत. पण ऊस व सोयाबीन यांच्या वाढत्या औद्योगिक प्रभावामुळे या मुख्य धान्यांच्या बाबतीत आपण मागे राहिलो. आता त्यावर प्रक्रिया उद्योग उभारून हे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे.

तृणधान्य मिलेट्स

ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, कुटकी, कोडो, सामा ही तृणधान्ये मानवी शरीरासाठी अत्यंत पोषक, सर्व प्रकारची पोषक द्रव्ये उपलब्ध असलेली धान्ये आहेत. यांचे उत्पादन भरपूर येते व कमी पाण्यावर ही पिके येतात, या सर्व धान्यांना जगभरात मागणी असून त्यांचे विविध प्रक्रिया उद्योग करता येतात. यामुळे पशूंना मुबलक पौष्टिक चारा मिळतो. यावर आधारित उद्योग - बिस्किट, पापड, लाह्या, मुरमुरे, रवा, पोहे, पीठ इत्यादी बनवणे - करता येतात.

कडधान्ये, डाळी

तूर, चणे, मूग, उडीद, मसूर, चवळी, मटकी, कुळीथ या उत्कृष्ट दर्जाचे प्रोटीन असलेल्या आपल्याकडील डाळी. यांना प्रचंड मागणी व उपयुक्तता आहे. यांच्या काष्टापासून उत्कृष्ट खतनिर्मिती होते. वाढत्या रोगराईमुळे सालयुक्त डाळींना प्रचंड मागणी आहे. या डाळींपासून पीठ, चटण्या, पापड, पशुआहार इत्यादी प्रक्रिया उद्योग करता येतात.

तेलबिया

शेंगदाणा, करडई, जवस, तीळ, मोहरी, खोबरे या बाबतीत भारतात हजारो वर्षांपासून स्वावलंबन होते. त्यामुळे मानवाला आरोग्य व पशूला सकस आहार मिळत असे. औद्योगिक क्रांतीमुळे ही व्यवस्था मोडली गेली. पूर्वी गावागावात तेल घाणे असत. पण आज आपण लाखो लीटर तेल विदेशातून आयात करतो. ही व्यवस्था पुन्हा उभी होण्यासाठी गावोगावी छोटे-छोटे तेल प्रक्रिया उद्योग सुरू करावे लागतील. त्यामुळे शुद्ध तेल व उच्च प्रतीची खल्ली पशुआहार म्हणून मिळेल. यावरील प्रक्रिया उद्योग म्हणजे लाकडी घाण्याचे विविध प्रकारचे शुद्ध तेल उपलब्ध करणे, पशुआहार, केशतेल, मालिश तेल, वेगवेगळी औषधी तेले इत्यादी बनवणे.

Modi govt Aatmnirbhar Bha


भाजीपाला

पालक, मिरची, टमाटे, दोडके, गाजर, मुळा, बीट, रताळे, बटाटे, कांदे, लसूण, वांगे, चवळी, मटकी, भेंडी, कारले, तोंडले, काकडी, वाळुक, कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना, अंबाडा, चमकुरा, कोबी, भोपळा, शेवगा, हादगा, तांदुळजा, चंदनबटवा इत्यादी शेकडो प्रकारची उत्कृष्ट पोषकद्रव्ये असलेला भाजीपाला आपल्याकडे उपलब्ध असतो. एवढी विविधता जगात कुठेही मिळणार नाही. याची सुयोग्य वितरण व्यवस्था व टिकाऊ प्रक्रिया करून विक्री व्यवस्था उभी झाल्यास याचे जगभरात खूप मोठे मार्केट आहे. उदाहरणार्थ, ताजी भाजी विक्रीव्यवस्था, वाळलेल्या भाज्या, चिप्स, पापड, भाजी पावडर, औषधी रस, अर्क, इत्यादी प्रक्रिया उद्योग यामध्ये करता येतील.

फळे

पूर्वी आपल्याकडे गावागावात, शेतात, जंगलात मुबलक प्रमाणात आंबा, जांब, जांभूळ, लिंबू, द्राक्ष, फणस, अननस, नारळ, बोर, पपई, बेल, कवठ, चिंच, सीताफळ, चिकू, संत्रा, मोसंबी, डाळिंब, आवळा, कोहळा, करवंद, भोकर, सफरचंद, काजू, बदाम, खजूर, बिबा, चार इ. फळझाडे होती. ती आता कमी होत आहेत. विविध ऋतूमध्ये येणारी ही फळे म्हणजे सजीवांसाठी मेजवानीच. तिचे संगोपन व संवर्धन होणे सजीवांसाठी अत्यंत उपयोगी आहे. आपल्याला या सर्वांचे नैसर्गिक पद्धतीने प्रक्रिया उद्योग करता येतील. उदाहरणार्थ, ताजे फळ विक्री करणे, वाळवून पावडर करणे, सुकामेवा, सरबत, औषधी रस, लोणचे करणे, बर्फी इत्यादी विविध पदार्थ करणे.

फुले

कमळ, मोगरा, पारिजातक, केवडा, जाई, जुई, शेवंती, झेंडू, काकडा, चाफा, चंपा, कण्हेर, कर्दळी, पलाश, गुलाब, कुमुदिनी, बकुळ, निशिगंध, सदाबहार, कृष्णकमळ, ब्रह्मकमळ, अबोली, मधुमालती, जास्वंद, गोकर्ण, नर्गिस, नागकेशर इ. फुलांची संपत्ती निसर्गाने आपल्या देशाला भरपूर दिली आहे. ही फुले दिसायला खूप सुंदर आसतात, औषधी रसांनी युक्त असतात आणि मनमोहक सुगंधाने आपल्याला नेहमी उत्साहित करतात. ही फुले वर्षभर वेगवेगळ्या ऋतूत येतात. यामुळेच की काय, भारत देश वर्षभर उत्सवांनी आणि समारंभांनी परिपूर्ण आहे. विविध पंथांमध्ये, संप्रदायांमध्ये उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे व यामध्ये त्या ऋतूमध्ये येणारे ही फुले अनिवार्य आहेत. म्हणून त्या त्या वेळेस त्यांची मागणी मोठ्या प्रमाणात आसते. देशी फुलांमध्ये मकरंद मोठ्या प्रमाणात असतो, मधमाश्या मोठ्या प्रमाणात परागीभवन करतात. त्यामुळे फळांची संख्या वाढते, शेतीचे उत्पादन वाढते. ही नैसर्गिक रचना आहे. सध्या आपल्यावर जी विदेशी फुले लादली जात आहेत, ती गंधहीन व रसहीन आहेत. त्यांचा आपल्या आरोग्याशी आणि उत्साहाशी काही संबंध नाही. ही परिस्थिती आपल्याला बदलावी लागेल. देशी सुगंधी फुले विकणे, रंग बनवणे, अत्तर तयार करणे, गुलकंद करणे, स्नानचूर्ण करणे, मध व मेण संकलन करणे हे उद्योग होऊ शकतात.

मसाले

मिरची, हळद, धणे, जिरे, आले, हिंग, दालचिनी, जायफळ, तमालपत्र, कढीपत्ता, सुपारी, मेथीदाणे, लवंग, वेलदोडा, बडीशेप, केशर इत्यादी पदार्थांचा आपल्याकडे दैनंदिन जेवणात व विशिष्ट आजारात वापर करण्यात येतो. सबंध जगात औषधी वापरासाठी यांना प्रचंड मागणी आहे. ज्या ठिकाणी शेकडो वर्षापासून यांचे उत्पादन होत आले आहे, त्या ठिकाणी यांचे संवर्धन करून प्रक्रिया उद्योग सुरू करावे लागतील. मिरची, हळद व मसाला पावडर बनवणे, विविध औषधी चूर्ण बनवणे या छोट्या प्रक्रिया उद्योगामुळे शुद्धता ठेवता येईल व रोजगार वाढेल.

औषधी वनस्पतीची लागवड व संगोपन

भारतात विविध प्रकारचे हवामान व पर्यावरणीय व्यवस्था असल्यामुळे जीवविविधता प्रचंड आहे. हजारो औषधी वनस्पती इथे विविध ठिकाणी आपोआप उत्पादित होतात. यामुळेच इथे ऋषिमुनींद्वारे आयुर्वेदाची रचना झाली. उदाहरणार्थ, तुळस, गुळवेल, कोरफड, अनंतमूळ, पुनर्नवा, गोखरू, आघाडा, केना, दूर्वा, अश्वगंधा, दर्भ, जटामानसी, शतावरी, चंदन, पाषाणभेद, सर्पगंधा, सप्तरंगी, गुंज, ज्येष्ठमध, मोह, कुर्डू, वाळा, नागरमोथा, रिठा, शिकेकाई, बेहडा, हिरडा, अर्जुन, बिब्बा, करंज, बाभूळ, वड, पिंपळ, उंबर, पळस, शमी, आपटा, कडुलिंब या सर्वापासून विविध औषधी बनवता येतील. याची उपयुक्तता सिद्ध केल्यास यांना प्रचंड मागणी येईल. हे मोठ्या प्रमाणात आता सुरू झाले आहे. यापासून काढे, अर्क, घनवटी, आसव, दंतमंजन, मलम, स्प्रे, सिद्ध तेल, साबण, शाम्पू, फेसपॅक, धूपबत्ती, अत्तर, उटणे, हवन सामग्री इत्यादी उद्योग करता येतील.

Modi govt Aatmnirbhar Bha


गोसंगोपन व पशुपालन

हजारो वर्षांपासून गोसंवर्धन व पशुपालनातून भारत निरोगी, सशक्त, समृद्ध व सुसंस्कृत बनत आला आहे. गोवंशाचे शेण व गोमूत्र यापासून शेतीसाठी पोषक खत उपलब्ध होते. दूध, दही, ताक, लोणी आणि तूप यापासून मानवी शरीराचे पोषण होते. गोपालन व पशुपालनाशिवाय शेती व शेतीआधारित प्रक्रिया उद्योग होऊच शकत नाहीत. बैलांच्या शारीरिक श्रमाने जमीन सुपीक बनते व वस्तूंची ने-आण करण्यासाठी यापेक्षा सुलभ आणि उत्तम साधन दुसरे नाही. ही स्वावलंबी व्यवस्था आहे. खत, पेट्रोल, डिझेल, ट्रॅक्टर आयात करणे म्हणजे परावलंबन आहे.

कीटकनियंत्रणामध्ये पशू व पक्षी यांचे खूप मोठे योगदान आहे. बैलशक्तीच्या वापरामुळे, संपत जाणाऱ्या ऊर्जा संसाधनांची बचत होते. खतनिर्मिती प्रकल्प, दुग्धव्यवसाय, पंचगव्य औषधी उत्पादने व जीवनोपयोगी उत्पादने बनवणे, चर्मोद्योगासाठी मृत पशूच्या चामड्याची उपलब्धता, गोबर गॅसद्वारे ऊर्जा स्वावलंबन इ. व तसेच यापुढे मोठ्या प्रमाणात गावात ऊर्जानिर्मिती प्रकल्प सुरू करावे लागतील.

चर्मोद्योग

आपल्याकडे विविध चर्मवस्तू वापरण्याची प्रथा होती. आपल्याकडे फक्त मृत पशूंच्या चामडीचा वापर केला जायचा. उदाहरणार्थ - जोडे, चपला, आसन, गोण्या, दोर, बॅग, पट्टा, संगीत वाद्य इत्यादी वस्तू बनत. त्यासाठी पशुहत्या केली जात नसे. पण औद्योगिक क्रांतीने मोठमोठे कारखाने निर्माण झाले. गावातील चर्मोद्योग नष्ट झाले. मोठ्या प्रमाणात पशुहत्या झाली. आज फक्त १०% पशुधन शिल्लक आहे. यासाठी पशुधन वाढवणे व पशूंची हत्या न करता मृत पशूंच्याच चामड्यापासून वस्तू बनवणारे लघु चर्मोद्योग निर्माण झाले पाहिजेत. ही समाजाची गरज आहे.

माती उद्योग

भारतात वेगवेगळे पर्यावरण असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची माती उपलब्ध आहे. अन्नधान्य उत्पादनाबरोबरच घरबांधणीसाठी व विविध प्रकारची उपयोगी भांडी - उदाहरणार्थ अन्न शिजवण्यासाठी व पाण्यासाठी - बनवण्यासाठी मातीचा उपयोग होतो. हजारो वर्षांपासून आपण मातीच्या भांड्यांचा उपयोग करत आलो आहोत. मातीच्या घरात राहिल्यामुळे पर्यावरण सुसंगत आरोग्य मिळते, मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्यास सर्व पोषक द्रव्ये मिळतात, मातीच्या भांड्यात पाणी ठेवल्यास पाणी शुद्ध व साधारण प्रमाणात उपलब्ध होते. हे आरोग्यासाठी श्रेष्ठ आहे. एसी, फ्रीज, कुकर, RO यांच्या वापरामुळे शरीराची प्रतिकारशक्ती संपत चालली आहे व रोग वाढत आहेत. या उद्योगात खूप करण्यासारखे आहे. उदाहरणार्थ, घर बांधण्यासाठी माती तयार करणे, पाण्याची विविध भांडी, अन्न शिजवण्यासाठी भांडी, मातीचा कुकर, मातीचा फ्रीज, मातीचा तवा, रांजण साठवणीसाठी, मातीच्या पर्यावरणस्नेही मूर्ती अशा व इतर अनेक जीवनोपयोगी वस्तू मातीपासून बनवता येतात.

साखर व गूळ प्रक्रिया उद्योग

आपल्याकडे पूर्वी साधारण आठ प्रकारची साखर व गूळ होत असे. हे शरीरासाठी अत्यंत उपयोगी व विविध पदार्थांमध्ये त्याचा वापर होत असे. औद्योगिक क्रांतीनंतर कारखान्यात फक्त उसापासून मोठ्या प्रमाणात साखर बनू लागली. त्यामुळे गावागावातील गुऱ्हाळ व साखर उद्योग बंद पडले. मोठ्या प्रमाणात चहा, औषध आणि दारूसाठी, आधुनिक पदार्थांसाठी फक्त उसाची साखर वापरणे सुरू झाले. परिणामी यामुळे ३५% लोक रोगी आहेत. याला पर्याय म्हणून उसापासून गावातच प्रक्रिया उद्योग सुरू करून गूळ, गूळ पावडर, बुरा साखर, खडीसाखर गावातच तयार झाली पाहिजे. तरच आपल्याला नैसर्गिक व शुद्ध ऊर्जा मिळेल.

कापसापासून कपडे बनवणे

भारतामध्ये फार पूर्वीपासून सर्वत्र कापूस लागवड केली जाते. यातून आपली कपड्यांची गरज भागते. या पिकाला पूर्वीपासूनच जास्त मागणी होत आली आहे. पूर्वी आपल्याकडे विविध दर्जाचा कापूस उपलब्ध होता. जगात सगळीकडे या तलम, टिकाऊ व आरोग्यदायक कापडाचा व्यापार होत असे. या गुणवत्तेमुळे सर्वत्र भारतीय कापडाची मागणी होत असे. आता औद्योगिक क्रांतीमुळे कृत्रिम धागे - जे पर्यावरणपूरक नाहीत, पण आरोग्यदायक नसूनही स्वस्त असल्यामुळे त्यापासून बनवलेले कपडे सर्वत्र मोठ्या प्रमाणात विक्री होतात. मागणी कमी असल्यामुळे सुती कापसापासून तयार झालेल्या कापडाला योग्य भाव मिळत नाही व पर्यायाने कापसाला भाव मिळत नाही. यात आता बीटी बियाणे उपलब्ध झाल्यामुळे कापसाचे जुने बियाणे नष्ट होत आहे.

यासाठी आता कापसाची आपली जुनी सर्व वाण शोधून पुनर्जीवित व प्रतिष्ठित केली पाहिजेत. हे कापसाचे धागे हातमागासाठी पूरक होते. हातमागामुळे जास्त हातांना काम मिळते. म्हणून आता बंद पडलेला चरखा व हातमाग उद्योग पुन्हा प्रतिष्ठित केल्यास याद्वारे शेतकर्‍यांच्या कापसाला योग्य भाव आणि हजारो हातांना काम मिळेल. यामुळे सर्वांना आरोग्यही मिळेल, सुती कपडे उन्हाळ्यात थंड व हिवाळ्यात गरम असतात. शिवाय जिनिंग, प्रेसिंग, सूतकताई, विणणे, धुलाई, रंगाई, शिलाई असे कितीतरी उद्योग यावर स्थिरस्थावर होतात.

लाकूड उद्योग

पूर्वी आपल्याकडे जंगल, वन, अरण्य मोठ्या प्रमाणात होते. शेतामध्ये व गावात मोठ्या प्रमाणात महावृक्ष आणि फळझाडे होती. या महावृक्षांवर पक्षी मोठ्या प्रमाणात राहत व हे पक्षी सर्व फळझाडांच्या बीजसंक्रमणाचे कार्य मोठ्या प्रमाणात करीत. वाढती लोकसंख्या व व्यावसायिक वृक्षतोड वाढल्यामुळे लाकूडफाटा संपत चालला आहे. हजारो वर्षांपासून आपण लाकडापासून उपयोगी वस्तू, वेगवेगळी अवजारे बनवत आलो आणि फाट्यापासून ऊर्जा मिळवत आलो आहे. विविध ऊर्जा संसाधनांच्या संशोधन व वापरामुळे ही नैसर्गिक व्यवस्था तुटली आहे. कालांतराने आधुनिक ऊर्जा संसाधने संपुष्टात आल्यावर आपल्याला पुन्हा ही व्यवस्था स्वीकारावी लागेल. पूर्वी आपले सर्व जण वृक्षसंगोपन व संवर्धन मोठ्या प्रमाणात करत होतो, तो जीवनाचा एक भाग होता. त्यापासून गावोगावी लाकूड उद्योग मोठ्या प्रमाणात चाले. घरबांधणीसाठी लाकूड उपलब्ध करणे, शेतीसाठी उपयोगी अवजारे निर्माण करणे, घरगुती वापरासाठी उपयोगी वस्तू बनवणे. यामध्ये श्रम, बुद्धी व कौशल्याचा वापर होत असे. गावोगावी हे शिक्षण परंपरागत आपोआप मिळत असे. संपत चाललेली ऊर्जा संसाधने, वाढते प्रदूषण, प्राणवायूचा अभाव हे लक्षात घेता देशी महावृक्ष, फळझाडे पुनरुज्जीवित करण्याची व लाकूड उद्योग प्रस्थापित करण्याची गरज आहे. त्यामुळे विस्मृतीत गेलेली कलाकौशल्ये पुन्हा निर्माण होतील. यासाठी देशी महावृक्षांच्या आणि फळझाडांच्या वाटिका निर्माण करणे, लाकूड आधारित कलाकौशल्याचा विकास करणे, यासाठी रिकाम्या जमिनी वृक्षलागवडीसाठी खुल्या करणे इत्यादी गोष्टी कराव्या लागतील.

विविध कुटिरोद्योग

पूर्वीचे गाव, नगर, वस्ती स्वावलंबी व स्वयंपूर्ण असे. ती गावाची आदर्श स्थिती होती. आपल्या विविध संतांनी महापुरुषांनी व सुधारकांनी हेच सांगितलेले आहे. गावात सर्व बाहेरून येत असेल, तर त्यास आदर्श गाव कसे म्हणावे? कुणी सांगितले??

जसे वैयक्तिक परस्परावलंबनामुळे कुटुंबव्यवस्था निर्माण होते व टिकते, तसेच शेती, पशुपालन व शेतीपूरक उद्योग यांच्या परस्परावलंबनामुळे ग्रामकुटुंबव्यवस्था निर्माण होते. ही ग्रामकुटुंबव्यवस्था टिकण्यासाठी पशुपालनाने समृद्ध शेती व शेतीआधारित सशक्त उद्योग असणे गरजेचे आहे. जमिनीचा पोत व पर्यावरण यावर आधारित कृषी उत्पादनावर प्रक्रिया करणारे उद्योग गाव परिसरात सुरू झाले पाहिजेत. नाहीतर कच्चा माल मातीच्या भावात शहरात विकावा लागेल व शहरातून चौपटीने पक्का माल - तोही अधिकांश स्वरूपात भेसळ असलेला - घ्यावा लागेल.

त्यामुळे आता तरी शहरावर अवलंबून न राहता चांगली बुद्धी, कौशल्य, ज्ञान, शक्ती व सामर्थ्य गावी लावून स्वावलंबन वाढवावे लागेल. यासाठी आपल्याला वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ग्रंथात दिलेल्या मंत्राचा स्वीकार करावा लागेल.
'हाती उद्योगाचे साधन, मुखी रामनामाचे चिंतन | हाच धर्म आहे महान, गावकरी लोकांचा