रक्ताच्या गुठळ्या - निर्मितीची समस्या

06 Jul 2020 12:13:05
@डॉ. मिलिंद पदकी

सध्याच्या सार्स-कोव्ह-२ या कोविडच्या विषाणूचे आर.एन.ए. हे २६,००० ते ३२,००० युनिट्स इतके लांब आहे आणि या लांबीमुळे रक्ताच्या गुठळ्यांचा प्रॉब्लेम निर्माण करण्यात हा विषाणू निष्णात दिसतो.

corona_1  H x W
कोविड-१९च्या मरणोत्तर तपासणीत सर्वसामान्य 'फ्लू'च्या रोग्यांच्या नऊ पटीने अधिक रक्ताच्या गुठळ्या सापडल्या आहेत. रोहिणी (शुद्ध रक्तवाहिनी) आणि नीला (अशुद्ध रक्तवाहिनी, जी हृदयाकडे अशुद्ध रक्त परत नेते) या दोन्हीत हे आढळते. मात्र नीलांमध्ये हे प्रमाण बरेच अधिक असते.


विषाणूचे आवरण-विरहित 'नग्न' आर.एन.ए. रक्तात उतरून त्यामुळे या गुठळ्या होतात, हे पूर्वी दाखविले गेलेले आहे. आर.एन.ए.मधल्या फॉस्फेट साखळीमुळे हा प्रॉब्लेम निर्माण होतो आणि आर.एन.ए.ची साखळी जितकी लांब, तितका तो अधिक तीव्र बनत जातो. सध्याच्या सार्स-कोव्ह-२ या कोविडच्या विषाणूचे आर.एन.ए. हे २६,००० ते ३२,००० युनिट्स इतके लांब आहे आणि या लांबीमुळे रक्ताच्या गुठळ्यांचा प्रॉब्लेम निर्माण करण्यात हा विषाणू निष्णात दिसतो.

या गुठळ्या या मोठ्या आणि सूक्ष्म अशा दोन्ही रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण होऊ शकतात. रोहिणींमध्ये त्या झाल्यास पुढच्या भागाचा रक्तपुरवठा कमी किंवा बंद होऊन तो भाग रोगट किंवा निकामी होऊ शकतो. रोग्यांमध्ये हाताची बोटे सुजलेली आणि निळी पडलेली दिसणे हे याचे लक्षण असू शकते.

corona_1  H x W
 कोविड-१९मध्ये रक्ताच्या गुठळीने बंद झालेली लहान रक्तवाहिनी (व्यास सुमारे १ मि.मी.)


फुप्फुसांमध्ये हे होते आणि त्याचा श्वसनाच्या रोगावरही (ARDS) अनिष्ट परिणाम होतो. फुप्फुसाच्या शेवटच्या टोकाच्या पेशींमध्ये तो विषाणू तर जातोच, तिथून तो त्याला लगडून असलेल्या केशवाहिन्यांच्या (कॅपिलरीजच्या) आतल्या एकपेशीय आवरणाच्या पेशीत उतरतो. त्या पेशींची संरचना बिघडून रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. सूक्ष्मदर्शकाखाली लहान रक्तवाहिन्यांमध्ये लहान लहान गुठळ्या दिसतात. फुप्फुसांच्या शेवटाला हे अधिक दिसते. श्वासवाहिन्यांची टोके, ज्यांना 'अलव्हिओलस' असे नाव आहे, त्यांची संरचना खराब झालेली दिसते.

कोविडचा रोगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावरचे प्रतिबंधक उपाय

१. रक्तचाचणीमध्ये रक्तातले फायब्रिनोजेन वाढते, तसेच डी-डायमर हे संयुग वाढते. यांच्याबरोबर इन्फ्लमेशन-दर्शक पॅरामीटर्स (उदा. CRP) वाढतात.
२. 'लो मॉलेक्युलर वेट हिपॅरिन इंजेक्शन' दिवसाला २८५० युनिट्स (पाश्चिमात्य देशात). रुग्णाचे १०० किलोपेक्षा अधिक वजन असल्यास हा डोस दुप्पट केला जातो.

कोविड-१९च्या व्हेंटिलेटरवर असलेल्या ज्या रुग्णांना गुठळ्याविरोधी औषधे दिले गेली, ते रुग्ण सरासरी २१ दिवस जगले आणि त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण २९ टक्के होते, याउलट अशी औषधे न दिलेले रुग्ण केवळ नऊ दिवस जगले आणि त्यांच्यातले मृत्यूचे प्रमाण ६३ टक्के इतके अधिक होते. यातून गुठळ्या-प्रतिबंधक औषधांचे महत्त्व अधोरेखित होते.

फुप्फुसामध्ये मोठी गुठळी बनून त्याने मोठी रक्तवाहिनी बंद झाली असल्यास ती गुठळी विरघळविणारे औषध बारीक नळीतर्फे त्या गुठळीपर्यंत नेऊन सोडले जाते. टिश्यू प्लाझ्मिनोजेन ऍक्टिव्हेटर (tPA) या नावाचे औषध त्याबाबत प्रायोगिक पातळीवर कोविड-१९मध्ये वापरले जात आहे. गुठळ्या विरघळविणारी 'एन्झाइम्स' जातीची इतरही अनेक औषधे उपलब्ध आहेत. याआधी ती हार्ट अटॅक आणि पक्षाघात यातील गुठळ्यांविरुद्ध वापरातही आहेत.

नीलांमधील गुठळ्या

याबाबत संपूर्ण चित्र अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र हिपॅरिनचा प्रतिबंधक उपाय न केल्यास हे मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहे. अशा गुठळ्यांनी मूत्रपिंडातील, हृदयातील आणि मेंदूतील रक्तवाहिन्याही बंद होऊ शकतात, ज्यामुळे या इंद्रियांचे काम बंद पडू शकते. रोगी बरा होऊन घरी गेल्यावरही, तसेच लक्षणे न दाखविणाऱ्या, पण विषाणू-संसर्गित लोकांमध्येही ही प्रक्रिया चालूच असण्याचा धोका संभवतो. यासाठी अमेरिकेत आणि चीनमध्ये आता आरोग्य-संस्थांमार्फत या लोकांशी दर आठवड्या-दोन आठवड्यांनी कॉम्युटरवर ('झूम' वापरून) संवाद कायम ठेवणे चालू आहे. अशांना गुठळ्या-विरोधी औषधेही सुमारे ४५ दिवस चालू ठेवली जात आहेत. रिव्हारोक्झाबान हे त्यातले मुख्य औषध दिसते. हे भारतात महाग असल्यामुळे अशा लोकांनी किमान रोज एक 'बेबी ऍस्पिरिन' (७५ मिलिग्रॅम)ची गोळी प्रतिबंधासाठी घ्यावी, असे काही भारतीय डॉक्टर्स सुचवीत आहेत.

वरील सर्व उपायांनी ही मोठी समस्या आटोक्यात आणली जाईल, अशी आशा करू या! शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0