१९७५च्या आणीबाणीतील योद्ध्यांचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार

विवेक मराठी    06-Jul-2020
Total Views |
"लोकशाहीवर आघात झाल्यास राष्ट्रीय विचारांच्या संघटना जोरदार विरोध करतील" - देवेंद्र फडणवीस

१९७५च्या आणीबाणीतील योद्ध्यांचा सत्कार



cm_1  H x W: 0

"जर १९७५च्या आणीबाणीप्रमाणे लोकशाहीवर पुन्हा हल्ला झाला, तर राष्ट्रीय विचारांच्या संघटना आणि देशातील युवा त्याचा जोरदार विरोध करतील" असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिपादन केले. १९७५मधील इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीतील 'मिसाबंदीं'चा नुकताच त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तेव्हा ते बोलत होते. आणीबाणीच्या ४५व्या स्मृतिदिनी फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी हा कार्यक्रम नुकताच पार पडला. कोरोनाच्या टाळेबंदीमुळे या वेळी संघपरिवारातील मोजके मिसाबंदी कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यभरातील हजारो कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते.

फडणवीस पुढे म्हणाले की "१९७५मध्ये इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीला प्रखर विरोध करणारे कार्यकर्ते भविष्यात 'लोकशाहीचे योद्धे' म्हणून ओळखले जातील. या आणीबाणीविरुद्धच्या योद्ध्यांसाठी आपल्या सरकारच्या काळात काही थोडे काम करता आले, हे माझे भाग्य समजतो" असेही ते म्हणाले. आपण चार-पाच वर्षांचे असताना ती आणीबाणी लावली गेली, तेव्हा एका रात्री आपल्या वडिलांना पोलिसांनी उचलून नेले अशी आठवण त्यांनी सांगितली. आपण जेव्हा आईला विचारले की माझ्या बाबांनी काय गुन्हा केला आहे, तेव्हा आई म्हणाली, "त्यांनी इंदिरा गांधींना विरोध केला आहे." लोकशाहीवर पहिला आघात इंदिरा गांधींनी आणीबाणीद्वारे केला, कारण केवळ त्यांच्या भ्रष्टाचारामुळे त्या पुन्हा निवडून येऊ शकत नव्हत्या, असे फडणवीस यांनी सांगितले.

इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी हा इतिहासातील एक काळा कालखंड म्हणून नोंदला जाईल, असे फडणवीस म्हणाले. ते पुढे म्हणाले, "या आणीबाणीला विरोध करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची कुटुंबे व आयुष्ये उद्ध्वस्त झाली, तरी संघपरिवाराने निधड्या छातीने लोकशाहीवरील या संकटाचा सामना केला. देशातील तुरुंग भरून वाहू लागले, जागा कमी पडली, पण कार्यकर्त्यांचे मनोबल मात्र तुटले नाही" असे गौरवोद्गारही काढले.

या कार्यक्रमात बोलताना मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा म्हणाले की महाराष्ट्रात आज पुन्हा आणीबाणीसारखी स्थिती आपण पाहतो आहोत. आणीबाणी लादणारे आणि त्याला समर्थन देणारेच तीन पक्ष आज राज्यात सत्तेत आहेत, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की तेव्हा इंदिरा गांधींच्या विरोधात बोलले तर पोलीस तुरुंगात टाकायचे, आता सरकार कोरोनाच्या लढ्यात अपयशी ठरले असे बोलले तर पोलीस कारवाई होते.

या कार्यक्रमात मिसाबंदींचे प्रतिनिधी म्हणून चिमणभाई मेहता आणि कीर्तिदा मेहता, सर्वश्री रमेशभाई मेहता, लद्धाराम नागवाणी, संजीव परब, मिलिंद करमरकर आणि पुरुषोत्तम शेणॉय यांचा प्रातिनिधिक सत्कार फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी या कार्यकर्त्यांनी आपले आणीबाणीतील अनुभवकथन केले. काही कार्यकर्ते तर तत्कालीन संघप्रचारकांचे हाल सांगताना भावनाविवश झाले. ज्येष्ठ संघकार्यकर्ते विमल केडिया यांनी या सर्व कार्यकर्त्यांचा परिचय करून दिला. त्यांनी त्या काळातील देशातील परिस्थिती सांगणाऱ्या काही आठवणीही सांगितल्या. भाजपा मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

- राजेश प्रभू साळगावकर