नाशिकचे उद्योगविश्व निश्चितच भरारी घेईल!

विवेक मराठी    07-Jul-2020
Total Views |

@संजय देवधर
जागतिक मंदीच्या तडाख्यातून सावरणाऱ्या नाशिकच्या उद्योग क्षेत्राला कोरोना संकटाचा फटका बसला. या अनपेक्षित, अकल्पित समस्येने लहान-मोठ्या उद्योगधंद्यांना घेरले. नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (निमा) ३५००पेक्षा जास्त सदस्य आहेत. या वेळी उद्योजकांना धीर देऊन वेळोवेळी होणाऱ्या शासकीय नियमांची माहिती देण्याचे व अडचणींमधून वाट काढण्याचे काम निमाने केले. त्यामुळे आज येथील अनेक लहान-मोठे उद्योग पुन्हा सुरू झाले आहेत. निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव यांच्याशी संवाद साधला असता कामगारांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेत नव्याने कामाला लागलेल्या या उद्योग क्षेत्राविषयी माहिती दिली.

Nashik's industrial_1&nbs


राज्यातील औद्योगिक सुवर्ण त्रिकोणात नाशिक हा महत्त्वाचा कोन आहे. मुंबई-पुण्यानंतर नाशिक हे तिसरे औद्योगिक केंद्र ठरते. कोरोना महामारीची झळ बसली, तरीही स्वावलंबी होऊन मोठी झेप घेण्याची क्षमता नाशिकमध्ये आहे. नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) संघटनेने शहरासह जिल्ह्यात विस्तारलेल्या उद्योग क्षेत्राला बळ देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या परिवर्तनकाळात अनेक संधी सामोऱ्या आल्या आहेत. तरुण उद्योजकांनी त्याचा लाभ घेण्याची हीच वेळ आहे. आगामी काळात नाशिकचे उद्योगविश्व निश्चितच भरारी घेईल असा विश्वास निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव व्यक्त केला.

जागतिक मंदीच्या तडाख्यातून सावरणाऱ्या नाशिकच्या उद्योग क्षेत्राला कोरोना संकटाचा फटका बसला. या अनपेक्षित, अकल्पित समस्येने लहान-मोठ्या उद्योगधंद्यांना घेरले. नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (निमा) ३५००पेक्षा जास्त सदस्य आहेत. या वेळी उद्योजकांना धीर देऊन वेळोवेळी होणाऱ्या शासकीय नियमांची माहिती देण्याचे व अडचणींमधून वाट काढण्याचे काम निमाने केले. प्रदीप पेशकार, तुषार चव्हाण या पदाधिकाऱ्यांसमवेत टप्याटप्याने लहान-मोठ्या कंपन्या सुरू करण्यात पुढाकार घेतला. परिणामी लवकरच ४२५ कंपन्या सुरूही झाल्या. आता जूनअखेर २० ते २५ टक्के क्षमतेने जिल्ह्यातील १२,३०० कंपन्या सुरू आहेत. हा राज्यातला विक्रमच म्हणावा लागेल. हे करीत असताना केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पावले टाकण्यात आली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, सहआयुक्त आरती सिंग, डीआयसीचे सतीश भामरे, एमआयडीसीचे नितीन गवळी यांच्या सहकार्याने अनेक वेबिनार बैठका झाल्या. त्यातून उद्योगविश्वाचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत झाली. परिणामी आज नाशिकमध्ये तीन शिफ्ट्समध्ये काम सुरू आहे, असे शशिकांत जाधव यांनी स्पष्ट केले.Nashik's industrial_1&nbs
नाशिक
मध्ये चीनवर मात


सध्या चीनविरोधात वातावरण निर्माण झाले आहे. अशातच बॉश या बड्या कंपनीने चीनमधील प्रकल्पात तयार होणारे उत्पादन नाशिकमध्ये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. चीनवर मात करण्यासाठी करण्यात येणाऱ्या या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. चीनमधून आयात करण्यात येणाऱ्या कच्च्या मालाऐवजी स्थानिक पातळीवर पर्याय शोधण्यालाही वेग आला आहे. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेल्याच्या बातम्या येत असताना बॉश कंपनीने प्रशिक्षणार्थी कामगारांना नोकरीत घेतले असून कायम कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपयांची पगारवाढ दिली आहे. ग्लॅक्सो या औषधनिर्माण करणाऱ्या कंपनीनेही भरघोस पगारवाढ जाहीर केली. एकूणच लॉकडाउन काळात कामगारांमध्ये कौशल्ये आत्मसात करून आव्हानांवर मात करू शकतो हा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत बदल स्वीकारले. नाशिकच्या सुमारे दोन हजार लहान-मोठ्या उद्योगांत सव्वा लाखांपेक्षा जास्त कामगारांंना रोजगार मिळतो. उद्योग-व्यवसायांबरोबरच कामगारांच्या कार्यशैलीतही आमूलाग्र बदल झाले. या वेळी कामगार संघटनांंनी सहकार्याचे धोरण अनुसरून उद्योग वाढीला मदतच केली. त्यांचेही आभार मानले पाहिजेत, असेही शशिकांत जाधव यांनी नमूद केले.


नाशिकमध्ये सातपूर व अंबड परिसरात दोन हजारपेक्षा जास्त कामगार असणाऱ्या दहा मोठ्या, तर हजारपेक्षा जास्त कामगार असणाऱ्या सुमारे तीस कंपन्या आहेत. मोठया कंपन्यांंपैकी महिंद्रा, जिंदाल पॉलिफिल्म, हिंदुस्थान ग्लास फॅक्टरी, इप्कास, सीएट टायर्स आधी सुरू झाल्या. पाठोपाठ मायको, एक्सलो, किमप्लास्क, सीमेन्स, एबीबी, ल्युसी या, तसेच त्यानंतर रिलायबल इंडस्ट्रीज, जेबीएम, डिअर, महिंद्र सीआय याही कंपन्या सुरू करण्यात आल्या. या मोठ्या उद्योगांवर अनेक छोटे उद्योग, किरकोळ विक्रेते (vendors) अवलंबून असतात. यामुळे एकूणच उद्योगचक्राला गती मिळाली. महत्त्वाचे म्हणजे या सर्व कंपन्यांंमध्ये कामगारांच्या आरोग्याची काटेकोरपणे दक्षता घेतली जाते. वेळोवेळी सॅनिटायझेशन, साबणाचा व मास्कचा वापर, शारीरिक तापमान तपासणी यांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे सुदैवाने आजतागायत एकही कामगार कोरोनाबाधित नाही, याकडेही जाधव यांनी लक्ष वेधले आहे. कंपनीत जागेवरच कामगारांना चहा, नाश्ता, जेवण पुरवल्याने वेळेची बचत होऊन कामाचा वेग वाढला. उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. पगारात घट न करता कामाची वेळ आठऐवजी सहा तास केल्याने कामगार व व्यवस्थापन समाधानी आहे. या कालावधीत १० ते १२ टक्के परप्रांतीय कामगार त्यांच्या राज्यात परत गेले. मात्र त्याचा परिणाम झाला नाही किंवा उद्योग-व्यवसायांंना अडचण आली नाही, असेही निरीक्षण शशिकांत जाधव यांनी नोंदवले.


Nashik's industrial_1&nbs 
नाशिकची उद्योगनगरी प्रामुख्याने ऑटोमोबाइल हब आहे. शासनाने बीएस-फोरऐवजी बीएस-सिक्स या प्रकारच्या वाहनांचे उत्पादन करण्याचे निर्देश दिले आहेत. अचानक हा बदल शक्य होईल असे वाटत नाही. शासनाने बाहेरच्या उद्योगांसाठी रेड कार्पेट पसरण्याऐवजी नाशिकमधील उद्योगांनाच सबसिडी, सवलती देण्याचे धोरण स्वीकारले, तर नाशिकला व पर्यायाने राज्यालाच फायदा होईल, याकडे लक्ष वेधत जाधव पुढे म्हणाले, "स्पर्धेच्या युगात पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तरी झोनच्या चक्रात इंडस्ट्रीला अडकवू नये. कोरोनाच्या संकटाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघितले पाहिजे. कोरोनाच्या काळात उद्योग-व्यवसायात पारदर्शकता अधिकच वाढली आहे. इनोव्हेशन वाढते आहे. त्यामुळे नाशिकला स्वतंत्र इंजीनिअरिंग क्लस्टर केले, तर युवकांना प्रोत्साहन मिळेल. मोठया प्रमाणावर तरुण आकर्षित होतील. कमीतकमी गुंतवणुकीत जास्त प्रमाणात छोटे उद्योग वाढतील. रोजगार उपलब्ध होतील. आयातीचे प्रमाण कमी होऊन निर्यातीत भर पडेल. केंद्र सरकारने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना सक्षम करण्यासाठी वीस हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. त्याचा फायदा थेट कसा पोहोचला याचा डाटा बँकांनी जाहीर केला तर चित्र अधिक सुस्पष्ट होईल" असे आवाहनही जाधव यांनी केले.

आगामी काळात कोरोनाची समस्या कमी होण्याची आशा आहे. बदललेल्या परिस्थितीत फूड इंडस्ट्रीला खूप संधी आहेत. इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स या व्यवसायांना खूप चांगले दिवस येतील. बदललेल्या जीवनशैलीनुसार लागणारी अनेक उपयुक्त उत्पादने बाजारात आणता येतील. यापुढे सौर व विद्युत वाहनेच रस्त्यांवर धावतील. त्यामध्ये अनेक संधी आहेत. मोठी शोरूम्स, मॉल्सपेक्षा वेअरहाऊस मोठया प्रमाणावर लागतील कारण कोरोनाने शहरवासीयांची सगळी जीवनशैलीच बदलून टाकली आहे. अनावश्यक गरजांवर नियंत्रण आले असून उधळपट्टी थांबली आहे. युवकांना शेअर बाजारामध्येदेखील उद्योजक बनता येईल. त्यासाठी अभ्यास करून त्यांनी व्यापार समजून घ्यायला हवा. उत्तम शेअर सल्लागारांना, तसेच विविध तज्ज्ञांनाही मागणी वाढणार आहे. याच वेळी ऑनलाइन शिक्षणाचे फायदे-तोटे समोर येत आहेत. नर्सरी ते पदव्युत्तर शिक्षणाची दिशा बदलते आहे. सध्याच्या संक्रमणावस्थेत राज्यातील मंत्र्यांनी वेगवेगळ्या एनजीओंच्या सहकार्याने आगामी प्रकल्पांची, योजनांची आखणी केली पाहिजे. नंतरच्या काळात राज्याला त्याचा फायदा होईल. निमाच्या सर्व सदस्यांनी कायमच सहकार्य केले आहे. या एकजुटीमुळेच कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्याचे बळ मिळाले. यापुढेही अशीच साथ मिळेल, अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली.
संजय देवधर
९४२२२७२७५५