हळुवारपणा व कठोरता यांचा संगम असलेला तत्वज्ञ - प्लेटो

विवेक मराठी    08-Jul-2020   
Total Views |
एकूणच तत्कालीन समाजामध्ये असलेल्या प्रश्नांना अनुसरून प्लेटोने आपली मते मांडली होती. मात्र ही सारी मते कल्पनारम्य राहिली आणि असे आदर्श राज्य हे प्लेटॉनिक लव्ह प्रमाणेच अदृश्य स्वरूपातच शिल्लक राहिले. प्लेटोचा तत्वज्ञ बनण्याचा प्रवास आणि त्याचे शिक्षणविषयक विचार, साम्यवादी विचार व आदर्श राज्य याविषयीची माहिती याचा थोडक्यात आढावा या लेखात घेणार आहोत.


plato and socrates philos

'जग दार्शनिकांचे' ही लेखमाला सुरू करताना असे ठरवले होते की, जे विदेशी तत्त्वज्ञ फारसे माहितीतले नाहीत, त्यांच्यावर लिहायचे. अनेक वाचकांनी फोनवर विचारले की "प्लेटो, ऍरिस्टॉटल कधी लिहिणार?" त्यावर "ते तर सर्वांना माहीत असतातच, म्हणून लिहिले नाहीत" असे उत्तर मी देत असे.

मात्र एका महिला वाचकाने मला सांगितले की, सॉक्रेटिस, प्लेटो यांच्या कथा वगैरे माहीत असतात, पण त्यांचे तत्त्वज्ञान, जीवनचरित्र यांचा सामान्यपणे परिचय नसतो. हे मत मला पटले, म्हणून इथून पुढे तीन लेख अनुक्रमे प्लेटो, सॉक्रेटिस व ऍरिस्टॉटल यांच्यावर असतील. खरे म्हणजे काळानुसार सॉक्रेटिस आधी हवा. मात्र आपण येथे क्रम बदलत आहोत, कारण प्लेटोचे तत्त्वज्ञान समजून घेतल्यावर सॉक्रेटिस अधिक चांगला कळतो.

अथेन्सच्या उच्च राजघराण्यातील अठ्ठावीस वर्षांचा एक तरुण.. आता हळूहळू उच्चपदस्थ अधिकारी होणार असे सगळ्यांना वाटत होते. एका घटनेने तो पूर्ण बदलला आणि जगाला एका मुरब्बी राजकारण्याऐवजी हळुवार आणि कठोरता यांचा संगम असलेला एक तत्त्वज्ञ मिळाला. ज्याच्या नावाशिवाय तत्त्वज्ञांची यादी पूर्णच होऊ शकत नाही, असा प्लेटो आपल्या गुरूंच्या अद्भुत इच्छाशक्तीने विलक्षण अस्वस्थ झाला. त्याच्याच निष्ठेची दीक्षा घेऊन त्याने पुढील संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. तो गुरू म्हणजे सॉक्रेटिस व शिष्य म्हणजे प्लेटो होय.

वयाच्या ७०व्या वर्षी सॉक्रेटिसवर खटला सुरू होता. त्याने आपले म्हणणे मागे घ्यावे, न घेतल्यास मृत्यू पत्करावा. मित्र म्हणत होते, "जीव वाचव. तुझे तत्त्व सत्य आहे हे आम्ही जाणतोच." पण ज्ञान आणि नीती अविभाज्य घटक आहेत, हा सिद्धान्त खरा ठरवण्यासाठी या तत्त्वज्ञाने विषाचा पेला स्वहस्ते ओठांना लावला. या मृत्यूनंतर प्लेटो अथेन्स सोडून निघाला. सतत अकरा वर्षे तो वेगवेगळ्या देशांत फिरला आणि त्यानंतर सिरॉकसच्या तरुण राजाचा सल्लागार म्हणून काम करू लागला. तेथे तो फारसा टिकू शकला नाही, मात्र 'फिलॉसॉफर किंग' अर्थात 'तत्त्वज्ञ राजा' ही अभिनव संकल्पना त्याला तेथेच सुचली.

त्यानंतर त्याने आपल्या पाठशाळेची पायाभरणी केली. पश्चिमेकडे सर्वप्रथम उच्च शिक्षण देणारे विद्यापीठ प्लेटोने स्थापन केले. हा काळ इसवीसनापूर्वीचे पाचवे शतक. स्पार्टा आणि अथेन्स या नगरराज्यांमध्ये लोकशाही की महाजनपद सत्ता या विषयावर संघर्ष झाला होता. आजच्या व्याख्येनुसार अथेन्समध्ये लोकशाही होती. या लोकशाही राज्यातच सॉक्रेटिसची हत्या करण्यात आली होती!

यामुळेच प्लेटोच्या मते लोकशाही मार्गाने समाजाचे कधीही कल्याण होणार नाही. कारण तेथे राज्यकर्ते हे ज्ञानसंपन्न व नीतिसंपन्न असण्याची अट नसते. म्हणूनच आपल्या कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमध्ये ज्ञानसाधना केलेला व नीतीने वागणारा राजा, त्याच प्रकारचे साहाय्यक स्त्री-पुरुष यांची सत्ता असावी. हे सर्व त्याने 'रिपब्लिक' या सुप्रसिद्ध ग्रंथात मांडले आहे. याआधारे आपण प्लेटोची शिक्षणविषयक संकल्पना, साम्यवादाविषयीची संकल्पना व आदर्श राज्याची कल्पना यांची माहिती घेऊ.

या संकल्पना अत्यंत पुस्तकी व रम्य आहेत हे खरे आहे. परंतु यातूनच खूप नवनवीन प्रयोग, कायदे, पद्धती व नीती यासाठी अनेकांना प्रेरणा मिळाली हेही खरे. प्लेटॉनिक लव्ह ही अत्यंत हृद्य संकल्पना, राजकीय तत्त्वज्ञान मांडणारा प्लेटो एक सर्वगामी पंडित होता, हे ध्यानात ठेवूनच त्याचे तत्त्वज्ञान वाचावे लागते.


plato and socrates philos

प्लेटोचे शिक्षणाविषयीचे विचार

प्लेटोच्या विचारांमध्ये व्यक्ती म्हणून व्यक्तीला गौण स्थान आहे. व्यक्तिस्वातंत्र्य, व्यक्तीला काही इच्छा-आकांक्षा असू शकतात याविषयी तो मूक राहिला आहे, कारण राज्यामधील एकता, राज्याचे हित तेच व्यक्तीचे हित, त्यातही जी व्यक्ती ज्ञान संपादन करू शकते, विशिष्ट कौशल्य आत्मसात करू शकते अशा व्यक्तीने ते केवळ समाजासाठीच उपयोगात आणले पाहिजे याविषयी असलेला त्याचा आग्रह, यामुळे त्याचे शिक्षणविषयक विचार अत्यंत वेगळे व व सामाजिक दृष्टीने उपयुक्त ठरतील असेच होते.

शिक्षण हे साधनस्वरूप आहे. समाजामध्ये असलेल्या विविध कामांसाठी व्यक्तींनी विविध कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत व त्यासाठीची पात्रता निर्माण व्हावी म्हणूनच शिक्षण असावे, असे प्लेटोचे मत होते. केवळ जन्माने व्यक्तीचे समाजातील स्थान आणि कर्म निश्चित होत नाही, असे प्लेटो मानत असे. त्यामुळे शिक्षण देणे ही प्रक्रिया तो अत्यंत अनिवार्य मानतो.

प्लेटो दोन टप्प्यांमध्ये शिक्षणाची व्यवस्था लावतो - एक म्हणजे विसाव्या वर्षापर्यंत, हा पहिला टप्पा. वयाच्या सहाव्या वर्षापासून अठराव्या वर्षीपर्यंत तर्कशास्त्र, गणित, राज्यशास्त्र या विषयांवर भर देऊन विद्यार्थ्यांना निरनिराळ्या कामांसाठी तयार करण्यात यावे. त्यानंतर १८ ते २० या दोन वर्षांमध्ये लष्करी शिक्षणाची शिफारस तो करतो. त्यानंतर विसाव्या वर्षी एक महत्त्वपूर्ण चाचणी होऊन त्यामध्ये पात्रता आणि स्वभाव यांविषयीचे काही निकष लावले जातील व त्यावर विद्यार्थ्यांना पात्रता आणि स्वभावानुसार कामे दिली जातील. यामध्ये उत्तम कामगिरी करणारे लोक सरकारी कारभारातील दुय्यम अधिकारी, तसेच संरक्षण व्यवस्थेतील अधिकारी कायदेविषयक अधिकारी असे होऊ शकतात.

पुढच्या टप्प्यामध्ये काही विशेष विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल, ज्यामध्ये हे विद्यार्थी अधिक महत्त्वपूर्ण कामांचे प्रशिक्षण घेऊ शकतील. हे प्रशिक्षण तिसाव्या वर्षीपर्यंत चालेल. यामधील विद्यार्थी राज्यकारभारासाठी तयार करण्यात येतील.

एकूणच फारसा व्यावहारिक विचार न करता केवळ पूर्वसुरींचा - म्हणजे सोफिस्ट लोकांचा विचार खोडून काढायचा, म्हणून शिक्षण पद्धतीमध्ये प्लेटोने साहित्य, काव्य, व्याकरण, यांना स्थान दिलेले नाही, कारण आधीच्या लोकांनी केवळ यावरच भर दिलेला होता. या शिक्षण पद्धतीला कसे राबवायचे, तसेच या शिक्षण पद्धतीतून निर्माण होणाऱ्या राजसत्तेचे ठीक आहे, परंतु तोपर्यंत ही शिक्षण पद्धती कोणी नियंत्रित करायची, याचे निर्णय कोणी घ्यायचे याविषयी प्लेटो बोलत नाही.

मात्र राबवण्याबद्दल कठीण असले, तरीही त्याचे शिक्षणविषयक विचार आजही सर्वोत्कृष्ट मानले जातात, यात शंका नाही. विशेषतः ज्ञान आणि नीती हे एकरूप आहेत, ज्ञानसंपन्न व्यक्तीच त्याग करून प्रजाजनांच्या हितसंबंधांची काळजी घेऊ शकते, म्हणूनच राज्यकर्ते हे तत्त्वज्ञ असले पाहिजेत, त्यांना योग्य शिक्षण मिळालेले असले पाहिजे, त्यातूनच सत्-असत् याचा विवेक करणे शक्य होऊ शकते व न्याय करता येऊ शकतो, राज्यशास्त्राचा पाया ज्ञानाचा असला पाहिजे हा त्याचा आग्रह होता. आपल्याकडे राजर्षी ही संज्ञा आहे. राज्यकारभारात असूनही त्यागपूर्वक वागणाऱ्या राजाला ती लावली जाते. असेच राज्यकर्ते आणि त्याच्याभोवतीचे लोक प्लेटोला अपेक्षित होते. त्यासाठी त्याने शिक्षण हाच त्याचा पाया मानला. राज्यकर्त्यांना ज्ञानाचा अधिकार आणि राज्य करणे हे इतर कामांसारखेच एक काम आहे, हे कर्तव्यभावनेने ओतप्रोत भरलेले मत होते.

प्लेटोचे साम्यवादी विचार

आधुनिक साम्यवाद आणि प्लेटोचा साम्यवाद एकमेकांपासून खूपच भिन्न आहेत. युरिपीड्ससारख्या ग्रीक विचारवंतांनी प्लेटोच्या आधीदेखील साम्यवादाची कल्पना मांडली होती. मात्र प्लेटोचा साम्यवादी सिद्धान्त हा आदर्श राज्यनिर्मितीचे एक साधन आहे, असे तो म्हणतो. त्याने समाजामध्ये तीन वर्ग कल्पिले होते - एक राज्यकर्त्यांचा वर्ग, दुसरा संरक्षण आणि सैनिक दल आणि तिसरा उत्पादक वर्ग. यापैकी वरच्या दोन वर्गांसाठी प्लेटोने साम्यवाद सांगितलेला आहे. तिसरा उत्पादक किंवा सामान्य वर्ग आहे, त्यासाठी मात्र त्याने हा विचार केलेला नाही.

या साम्यवादाच्या सिद्धान्ताचे वैशिष्ट्य म्हणजे प्लेटोने या दोन वर्गांमध्ये स्त्रियांचादेखील समावेश केला आहे. राज्यकर्त्यांच्या हातांमध्ये राजकीय सत्ता दिल्यानंतर देशातले नियम, कायदे, संरक्षण असे सर्वच त्यांच्या हाती जाणार. जरी हे सर्व जण तत्त्वज्ञ असले, उच्चशिक्षित असले, तरीही जेव्हा निरंकुश अशी राज्यसत्ता त्यांच्या हातात जाईल, तेव्हा तेथेच आर्थिक सत्ता असेल तर त्यामुळे त्यांचे सद्गुण लयाला जाऊ शकतात, म्हणूनच या राज्यकर्त्यांची खाजगी मालमत्ता असू नये असे प्लेटो म्हणतो. या लोकांना निश्चित असा पगार दिला जावा. त्यांची राहण्याची सोय राज्याकडून करण्यात यावी. त्यांचे खाणेपिणे, राहणे एका ठिकाणी असावे. त्यांच्यावर होणारा खर्च त्यांच्या पगारातून केला जावा. संपत्तीचा अधिकार नसल्यामुळे ह्या लोकांच्या मूलभूत गरजा राज्याने भागवाव्यात, मात्र त्यांनी नि:स्वार्थी राहावे आणि त्यांनी कुटुंबसंस्था स्वीकारू नये. कारण जर कुटुंबसंस्था, परिवार, स्वजन असतील, तर त्यामुळे संपत्तिसंचय, खाजगीकरण यासाठी प्रयत्न होऊ शकतील. राज्यकर्त्या व्यक्तीची भावनिक गुंतवणूक कुटुंबात होऊन राहील आणि त्यामुळे त्याचे समाजासाठी असलेले कर्तव्य तो विसरू शकेल. म्हणूनच वरील दोन वर्गांना कुटुंबसंस्थेचा अधिकारही प्लेटो नाकारतो. राज्यकर्ते आणि संरक्षक या दोन्ही वर्गांमध्ये स्त्री-पुरुष दोघेही असतील. दोघांनाही समान शिक्षण असेल. योग्यतेनुसार कामे दिली जातील, कारण ज्ञान हा आत्म्याचा सद्गुण आहे व स्त्रियांनादेखील आत्मा असल्याने त्यांना ज्ञानसंपन्न होता येते व स्त्रीवर्गही समाजासाठी उपयुक्त ठरू शकतो, असे प्लेटोचे मत होते.

कुटुंबसंस्था नसल्यावर राज्याला वरच्या वर्गापासून लोकसंख्येची आवश्यकता भासेल, तेव्हा वरच्या दोन वर्गांतील निवडक स्त्री-पुरुषांना विवाहाची परवानगी देण्यात येईल. मात्र त्यांनी मूल होईपर्यंत एकत्र राहावे व मूल झाल्यानंतर ते मूल राज्याच्या सांभाळघरात द्यावे. तेथे त्याचे शिक्षण व्हावे आणि मुलाचे आई-वडील विवाहाच्या बंधनातून मुक्त व्हावेत, असे तो म्हणतो. ही मुले कोणती कुणाची हेदेखील कळू देऊ नये आणि त्यामुळे प्रत्येक मूल आपले समजून सारे जण साऱ्यांवर प्रेम करतील आणि ऐक्य असलेला समाज निर्माण होईल, असे प्लेटोला वाटत होते. मात्र हा साम्यवाद प्लेटोने केवळ ज्ञानसंपन्न आणि ज्ञानामधून नीतीची जपणूक करणाऱ्या तत्त्वज्ञ लोकांसाठीच मांडला आहे. तिसऱ्या वर्गाला या साम्यवादामध्ये प्लेटोने स्थान दिलेले नाही.

आदर्श राज्य

आदर्श राज्यासाठी सुशिक्षित, ज्ञानी असे राज्यकर्ते निवडणे ही पहिली पायरी. राज्यकर्त्यांना आवश्यक असणारे योग्य शिक्षण, विविध चाळण्यांमधून आणि चाचण्यांमधून गेल्यावर राजा आणि राज्यकर्ते यांची निवड आदर्श राज्यासाठी केली जावी, असे प्लेटो मांडतो. राज्यशास्त्र, गणित, तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास असणाऱ्या लोकांनीच राज्यकारभार केला पाहिजे. राज्याचे कायदे, न्याय, संरक्षण सर्व या लोकांच्या हातात असेल. या अमर्याद सत्तेमध्ये तत्त्वज्ञ राज्यकर्त्यांनी स्वतः मात्र अत्यंत त्यागपूर्वक जीवन व्यतीत केले पाहिजे, ही प्लेटोच्या आदर्श राज्याची संकल्पना होती.

एक वेगळ्या प्रकारचा कर्मसिद्धान्त आदर्श राज्यासाठी मांडलेला आहे. त्यामध्ये प्लेटो म्हणतो की ज्याला ज्या कामासाठी नेमले आहे, त्यांनी आयुष्यभर तेच काम अधिकाधिक उत्तम पद्धतीने सातत्याने करत राहावे. इतर कुणालाही त्यामध्ये हस्तक्षेप करू देऊ नये व स्वतःही इतरांच्या कामामध्ये हस्तक्षेप करू नये. एखाद्या व्यक्तीला जे काम दिलेले आहे, ते काम त्याने आपली हीच क्षमता आहे असे समजून करत राहावे. त्याला त्यानंतर दुसरी काही इच्छा झाली, तरीही दुसरे काम करण्याची परवानगी राज्याकडून मिळणार नाही. त्यामुळे आयुष्यात सुरुवातीच्या शिक्षणाच्या टप्प्यावर दिले जाणारे काम हेच तुमचे कर्म असेल, असे प्लेटो म्हणतो. आपल्याकडेदेखील वर्णव्यवस्थेचा चिवटपणा थोडासा याच पद्धतीचा आहे. यातूनच क्षत्रिय राजा विश्वामित्रांना ब्रह्मर्षी व्हावेसे वाटले होते आणि त्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट उपसले होते, याची कथा आपणा सर्वांना माहीत आहेच.

आदर्श राज्यात स्त्री-पुरुषांना समान संधी होती. स्त्रियांना पुरुषांइतकेच बुद्धिमान आणि कार्यक्षम मानणे व स्त्रियांना राज्याच्या वाढीसाठी कार्य करण्यासाठी तयार करणे या आधुनिकतावादाची सुरुवात प्लेटोच्या 'रिपब्लिक'मध्ये आपल्याला पहिल्यांदा दिसून येते.

एकूणच तत्कालीन समाजामध्ये असलेल्या प्रश्नांना अनुसरून प्लेटोने आपली मते मांडली होती. मात्र ही सारी मते कल्पनारम्य राहिली आणि असे आदर्श राज्य 'प्लेटॉनिक लव्ह'प्रमाणेच अदृश्य स्वरूपातच शिल्लक राहिले.