सोने खरेदीपेक्षा गोल्ड बॉण्ड खरेदी करा

विवेक मराठी    09-Jul-2020
Total Views |


 Buy gold bonds rather th

भारतीयांचे सुवर्ण-प्रेम इतके आहे की दर वर्षी आपण ८०० ते ९०० टन सोने आयात करतो. यातील जवळपास २/३ सोने दागिन्यांसाठी वापरात येते, तर २००-३०० टन गुंतवणुकीसाठी. भारताची सोन्याची मागणी जगातील सोन्याच्या मागणीच्या २५% असते. मागील वर्षी, म्हणजेच २०१९-२० या आर्थिक वर्षात सोने आयातीवर आपण तब्बल २.३ लाख कोटी रुपये खर्च केले. पेट्रोल आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीवरील खर्चानंतर सोने आयातीवरील खर्चाचा क्रमांक लागतो.

असा सार्वत्रिक समज आहे आणि तो बऱ्याच अंशी खराही आहे की सोन्याची दरवाढ ही महागाईच्या दराहून अधिक असते, म्हणून गुंतवणूक म्हणून सोने-खरेदी करावी. सोने खरेदी करून त्याचे दागिने न करता ते घेऊन ठेवले, तर काही वर्षांनी ते सोने विकल्यास चांगले उत्पन्न मिळू शकेल. पण सोन्याचे दागिने न करता सोने बँकेच्या लॉकरमध्ये असे वर्षानुवर्षे ठेवणारे महाभाग विरळाच. शिवाय लॉकरचे दर वर्षी भाडे द्यावे लागल्याने सोन्याच्या किमतीतील वाढ तेवढी कमी होणार, हे नक्की.

त्यामुळे प्रत्यक्ष सोने खरेदी करून बँक लॉकरची शोभा वाढवण्यापेक्षा भारतीय रिझर्व्ह बँकेने उपलब्ध करून दिलेल्या गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक करणे खचितच उत्तम. भारतीय रिझर्व्ह बँक दर १-२ महिन्यांनी असे बॉण्ड्स विक्रीला आणते. नुकतेच ६ जुलै ते १० जुलै २०२० या कालावधीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने असे बॉण्ड्स विक्रीसाठी काढलेले आहेत, त्याविषयी जाणून घेऊ या व १० जुलैपूर्वी यात गुंतवणूक करू या. पण गोल्ड बॉण्ड म्हणजे काय, ते आधी समजून घेऊ या.

२०१४मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेला सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड्समार्फत किरकोळ गुंतवणूकदारांकडून पैसे उभारणीचे आदेश दिले. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार नोव्हेंबर २०१५मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने ही योजना आणली आणि त्यानंतर दर वर्षी ४--६ टप्प्यांमध्ये असे बॉण्ड्स ५ दिवसांच्या कालावधीसाठी विक्रीला उपलब्ध असतात. या वर्षी एप्रिल, मे आणि जूनमध्ये असे बॉण्ड्स विक्रीला आणल्यानंतर चौथ्या टप्प्यात ६ जुलै ते १० जुलै या कालावधीसाठी ही योजना गुंतवणूकदारांना उपलब्ध झाली आहे.

मुदत व दर काय?

या योजनेची मुदत ८ वर्षांची असून यात ४८५२ रुपये प्रतिग्रॅम या दराने सुवर्ण बॉण्ड खरेदी करता येतील. ऑनलाइन खरेदी केल्यास ५० रुपयांची सूट असल्याने प्रतिग्रॅम ४,८०२ रुपये या दराने हे बॉण्ड्स खरेदी करता येतील. मुदत ८ वर्षांची असली, तरी ५ वर्षांनंतर गुंतवलेली रक्कम काढता येऊ शकते. मुदत पूर्ण झाल्यावर मिळणारी रक्कम त्या वेळी असलेल्या सोन्याच्या बाजारभावाने मिळेल. म्हणजे कसे ते समजून घेऊ या.

समजा, आजचा सोन्याचा भाव ४,८५२ प्रतिग्रॅम आहे. ८ वर्षांनंतर तो भाव जर ८,००० झाला असेल, तर मुदत संपल्यावर सरकार आपल्याला १ ग्रॅम सोन्याच्या बॉण्डचे ८,००० रुपये देईल. शिवाय दर वर्षी या बॉण्डवर २.% दराने व्याजही मिळेल. व्याज करपात्र आहे, पण भांडवली लाभावर कर लागणार नाही. व्याजाची रक्कम दर सहामाहीला बँक खात्यात जमा होईल. TDS कापला जात नाही.

कोण आणि किती गुंतवणूक करू शकतो?

या योजनेत भारतीय नागरिक, हिंदू अविभक्त कुटुंब (HUF), ट्रस्ट्स, विद्यापीठे, सेवाभावी संस्था गुंतवणूक करू शकतात. मात्र अनिवासी भारतीयांना यात गुंतवणूक करता येत नाही. एक व्यक्ती, किमान १ ग्रॅम आणि कमाल ४ किलोचे सुवर्ण बॉण्ड घेऊ शकतात. ट्रस्ट मात्र २० किलोपर्यंत गुंतवणूक करू शकतात. ही वार्षिक मर्यादा आहे, म्हणजे प्रत्येक टप्प्यात थोडे थोडे सोने बॉण्ड्सच्या रूपात जमा केले, तरी एका नागरिकांची गुंतवणूक एकूण ४ किलोपेक्षा जास्त होता काम नये. PAN कार्ड असणे आवश्यक आहे.

बॉण्ड्स कुठून खरेदी करता येतात?

भारतीय रिझर्व्ह बँकेने राष्ट्रीयकृत बँका, शेड्युल्ड बँका, पोस्ट ऑफिसेस, SHCIL, NSE, BSE एवढ्याच संस्थांना सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड योजनेच्या अंमलबजावणीची आणि विक्री प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी दिली आहे.

मुदतपूर्व रक्कम हवी असल्यास काय करावे?

८ वर्षे मुदतीची योजना असली, तरी ५ वर्षांनी मुदतपूर्व बॉण्ड्स अभ्यर्पित (Surrender) करून रक्कम मिळू शकते. मात्र त्याआधी रक्कम हवी असल्यास बॉण्ड तारण ठेवून कर्ज मिळू शकते किंवा बॉण्ड्स दुसऱ्याच्या नावे वर्ग करून त्याच्याकडून रक्कम घेता येऊ शकते किंवा प्रचलित एक्स्चेंजवरसुद्धा हे बॉण्ड्स विकता येतात.

सुरक्षेची हमी आहे का?

ही सरकारी योजना असल्याने गुंतवलेली रक्कम व त्यावरील व्याज मिळण्याची १००% हमी आहे. मात्र आपल्याजवळील संपूर्ण रक्कम यात गुंतवू नये. बचतीच्या १० ते २० टक्के रक्कम यात गुंतवली तर चालेल, कारण ही ८ वर्षे मुदतीची योजना आहे आणि योजनेतून मुदतपूर्व पैसे काढून घेणे शक्य असले, तरी त्याने नुकसान होण्याची शक्यता असते.

बॉण्ड्स घेण्याऐवजी सोनेच का घेऊ नये?

सोने सांभाळण्याची जोखीम फार आहे, तसेच सोने सांभाळण्याचा खर्चही अधिक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या सोन्याचे दागिने करण्याचा मोह होण्याची शक्यता असते आणि मग घडणावळीवर खर्च आणि दागिना विकायला काढल्यावर येणारी कमी किंमत याने नुकसानच होण्याची शक्यता अधिक असते, त्यापेक्षा गोल्ड बॉण्ड्समध्ये असलेले सोने हे आभासी सोने असल्याने त्या गुंतवणुकीला वरील धोके नाहीत. महत्त्वाचे म्हणजे सोने खरेदीवर ३% सेवाकर लागू आहे जो गोल्ड बॉण्ड्सवर लागू नाही.

मुद्दल परत मिळेल का? ते कमी मिळण्याची शक्यता आहे?

समजा, आपण आज ज्या भावाने सोने घेतले, तो भाव ८ वर्षांनंतर आजच्या भावाहूनही कमी असेल, तर मुद्दलाचा पूर्ण परतावा मिळणार नाही हे खरे. पण ही शक्यता अत्यंत धूसर आहे. असे दिसून आले आहे की सोन्याचे भाव दर ६ वर्षांनी दुप्पट होतात. त्यामुळे मुद्दल मिळेल का? हा प्रश्न अप्रस्तुत होतो.

यात सरकारचा फायदा काय?

काळा पैसा सोन्याच्या बिस्किटांमध्ये, म्हणजेच प्रत्यक्ष सोन्यामध्ये साठवण्याचा धोका वाढतो. बॉण्ड्समध्ये गुंतवणूक करताना PAN आणि KYC केले असल्याने ही शक्यता संपते. शिवाय हा जमा झालेला पैसा सरकारी तिजोरीत जात असल्याने सरकारला त्याचा वापर करता येतो. आयात केलेल्या सोन्यासाठी परकीय चलनात रक्कम द्यावी लागते आणि त्यामुळे सरकारी तिजोरीवर भार पडतो. गोल्ड बॉण्ड्स हे आभासी सोने असल्याने सरकारचे परकीय चलन वाचते.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाइटवर याविषयी अधिक माहिती उपलब्ध आहे.

१० जुलै २०२०ला ही योजना बंद होत आहे, हे लक्षात ठेवून गोल्ड बॉण्ड्समध्ये गुंतवणूक करायची असल्यास त्वरित कार्यवाही करावी.

(लेखक इर्डा (IRDA) अर्थात भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण या भारतातील विमा क्षेत्रावर कायद्याचे नियंत्रण ठेवणाऱ्या नियामक मंडळाचे माजी सदस्य आहेत.)