राष्ट्र सेविका समितीच्या माध्यमातून मालाड रेड झोनमध्ये स्क्रीनिंग

09 Jul 2020 21:07:17

 
corona_1  H x W

(वि.सं.कें.) – राष्ट्र सेविका समिती, दुर्गा वाहिनी यांच्या माध्यमातून मालाड येथील रेड झोनमध्ये स्क्रीनिंग करण्यात आले. गेल्या शुक्रवारी सुरु झालेल्या या मोहिमेची गुरुवार, ९ जुलै रोजी सांगता झाली. मुंबई मनपाच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या स्क्रीनिंग मोहिमेत एकूण १४,११२ नागरिकांचे स्क्रीनिंग करण्यात आले व कोरोनाची लक्षणे असणारे १०९नागरिक यावेळी आढळून आले. निरामय सेवा संस्था आणि सेवांकुर या संस्थांचा यात मोलाचा सहभाग होता.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून मुंबईसह आसपासच्या अनेक क्षेत्रांमध्ये गेले काही दिवस थर्मल स्क्रीनिंग मोहीम राबविण्यात येत आहे. मुंबईत एक लाख नागरिकांचे स्क्रीनिंग पूर्ण झाले असून महिलांचा यात मोलाचा सहभाग होता. पूर्णपणे महिलांच्या चमूने केलेले स्क्रीनिंग हे मालाडच्या मोहिमेचे वैशिष्ट्य होते. एकूण २९ महिलांचा या मोहिमेत सहभाग होता. यात प्राध्यापिका, वैद्यकीय विद्यार्थिनी तसेच अन्य क्षेत्रातील शिक्षण घेणाऱ्या मुली होत्या.


या मोहिमेत सहभागी झालेल्या प्रा. मधुर पंडीत-भोंदे यांनी या स्क्रीनिंगच्या अनुभवाबाबत सांगितले की, या मोहिमेत सहभागी झाल्यानंतर प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन चाचण्या केल्यावर आपण आपल्या परीने मानवी संक्रमणाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आनंद होतो. ह्या कॅम्प मधील सर्वच सहभागी कार्यकर्त्यांची काळजी घेतली गेली. कारण या कार्यकर्त्या रोजच रेड झोनमध्ये जाऊन संभाव्य रुग्णांचा शोध घेत होत्या. दैनंदिन आरोग्य तपासणी
, काढा, हळदीचे दूध, प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे ह्याकडे आयोजकांचा कटाक्ष होता. ३०-३५ जण एका संकुलात राहत असताना शारिरीक अंतराचेही पालन केले गेले.

**

Powered By Sangraha 9.0