प.पू. सरसंघचालकजींच्या दृष्टीतून काकाजी खंडेलवाल

स्रोत: विवेक मराठी    दिनांक01-Aug-2020
|
काकाजींची संघावर अतूट श्रद्धा होती. जिला संघभक्ती म्हणता येईल, अशी त्यांची भक्ती होती. ती भक्ती सगळ्यांनीच पाहिली. अशा ज्येष्ठ-श्रेष्ठ कार्यकर्त्यांच्या प्रेरणेनेच नितनवीन कार्यकर्ते तयार होतात. त्यांना स्वतंत्र प्रशिक्षण देण्याची गरज पडत नाही. संघाचे काम कसे करायचे हे ते अशा प्रकारच्या ज्येष्ठ-श्रेष्ठ कार्यकर्त्यांकडे पाहून शिकतात. काकाजी भक्तिभावाने काम करायचे. ज्ञान, कृती आणि भक्ती या तिघांचा संयोग व्हायला हवा, असे म्हणतात तसाच काकाजींमध्ये होता. कौशल्य आणि व्यावहारिकता बाळगूनसुद्धा प्रेम-जिव्हाळा-भक्ती असा त्यांचा व्यवहार असायचा.

RSS_1  H x W: 0
 
'दिवसेनैव तत् कुर्याद येन रात्रौ सुखं वसेत
यावज्जीवं च तत्कुर्याद येन प्रेत्य सुखं वसेत।।'

विदुरनीतीतील हा श्लोक म्हणतो की 'दिवसभर अशी कामे करावी ज्यांमुळे रात्री शांत झोप लागेल, त्याचप्रमाणे आयुष्यभर अशी कामे करा, ज्यामुळे मृत्यूनंतर आनंद होईल, मोक्ष प्राप्त होईल.'

ज्ञान-कर्म-भक्तिव्रताचे आचरण करणारे ---------------- खंडेलवाल, जे समाजात 'काकाजी' म्हणून ओळखले जायचे, यांनी आपले संपूर्ण आयुष्य अशा प्रकारे व्यतीत केले.

अकोला (महाराष्ट्र) येथे जनसंघाचे काम करणाऱ्या काकाजींचे संघकार्यालयात येणे-जाणे होते. आदरणीय मोहनजी जेव्हा अकोल्याच्या महाविद्यालयात शिकत असत, तेव्हा तेसुद्धा संघाच्या कार्यालयात येत असत आणि तिथेच काकाजींबरोबर झालेला त्यांचा पहिला परिचय पुढे जाऊन इतका प्रगाढ झाला की नंतर काकाजी अकोल्याचे संघचालक झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर माननीय मोहनजीसुद्धा प्रचारक झाले आणि त्यांना संघाने अकोल्याला पाठवले.

संघचालक म्हणजे काय? संघचालक म्हणजे स्वयंसेवकांचा पालक. संघचालक झाल्यानंतर काकाजींनी या शब्दाचे अक्षरश: पालन केले. नगर कार्यकारिणीच्या कार्यकर्त्यांच्या घरी काय परिस्थिती आहे? कार्यकर्त्यांचे वर्तन कसे आहे? सध्याची परिस्थिती कशी आहे? या सर्व गोष्टींची त्यांना पूर्ण कल्पना असायची. ते स्वतः सर्वांशी भेटून माहिती घेत. अकोल्यातून जे जे कार्यकर्ता प्रचारक बाहेर पडले, त्या सर्वांच्या घरी वर्षातून दोनदा जाऊन ते चौकशी करत असत. दिवाळीत त्यांच्या कुटुंबीयांना आपल्या घरी फराळासाठी घेऊन यायचे. अर्धांगवायूने ग्रस्त झाल्यावरसुद्धा ऑटो रिक्षातून जात असत. 'ज्येष्ठ पालनकर्त्या'च्या संघचालकाची भूमिका त्यांनी अक्षरशः आयुष्यभर पार पाडली. निरनिराळ्या शाखा व कार्यकर्त्यांकडे नियमितपणे जाऊन त्यांची चिंता करण्याचे काम त्यांनी सतत केले. ते नेहमीच संघ जगले, असे म्हणता येईल. काकाजी म्हणजे आपले खरे पालक, असेच सर्व स्वयंसेवकांना वाटत असे.

काकाजींची संघावर अतूट श्रद्धा होती. जिला संघभक्ती म्हणता येईल, अशी त्यांची भक्ती होती. ती भक्ती सगळ्यांनीच पाहिली. अशा ज्येष्ठ-श्रेष्ठ कार्यकर्त्यांच्या प्रेरणेनेच नितनवीन कार्यकर्ते तयार होतात. त्यांना स्वतंत्र प्रशिक्षण देण्याची गरज पडत नाही. संघाचे काम कसे करायचे हे ते अशा प्रकारच्या ज्येष्ठ-श्रेष्ठ कार्यकर्त्यांकडे पाहून शिकतात. काकाजी भक्तिभावाने काम करायचे. ज्ञान, कृती आणि भक्ती या तिघांचा संयोग व्हायला हवा, असे म्हणतात तसाच काकाजींमध्ये होता. कौशल्य आणि व्यावहारिकता बाळगूनसुद्धा प्रेम-जिव्हाळा-भक्ती असा त्यांचा व्यवहार असायचा.

त्या वेळी काकाजी हे अकोल्यात संघकार्याचे एक प्रमुख केंद्र होते. त्यांनी स्वदेशीचे नेहमीच पालन केले. आपला व्यवसायसुद्धा प्रामाणिकपणे केला. व्यवसायात त्यांच्यासह काम करणाऱ्या सर्व कर्मचार्‍यांशी त्यांचे कौटुंबिक संबंध होते. यामुळेच त्यांचा व्यवसायसुद्धा कुटुंबाप्रमाणे यशस्वीपणे चालला आहे. म्हणूनच आणीबाणीच्या काळात १९ महिने (सन १९७५ ते १९७७) तुरुंगात काढूनसुद्धा त्यांच्या व्यापाराला कोणतेही नुकसान झाले नाही.

काकाजींनी एकदा ज्याला आपले मानले, आणि संघाचा स्वयंसेवक तर नेहमीच त्यांचा आपला असायचा, तर त्याची किती काळजी करावी? माननीय मोहनजी जेव्हा प्रचारक होऊन अकोल्यात आले, तेव्हा काकाजी त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेले. तेव्हा ते जयहिंद चौकातील त्यांच्या जुन्या घरात राहत होते. त्यांचे चिरंजीव गोपालजी हे त्या वेळी दहावीत किंवा अकरावीत होते. काकाजी माननीय मोहनजींना घरी जेवणाच्या वेळी घेऊन गेले. त्यांना आणि गोपालजींना जवळच बसवले आणि त्यांच्यासमोर काकीजींना सांगितले, "हे आता प्रचारक आहेत, जेवायला आपल्याकडे येतील." त्या वेळचे संघाचे कार्यवाह श्री. मुगुटराव राजूरकर यांनी काकाजींशी बोलून ही व्यवस्था केली होती. माननीय मोहनजींची काकाजींकडे एक महिन्याची व्यवस्था केली होती, पण काकाजींनी घरात हे नाही सांगितले, की हे एक महिना येथे जेवायला येतील. ही संघाची शिस्त आहे. काकाजींनी त्यांची घरात ओळख करून दिली आणि त्यानंतर गोपालजी आणि माननीय मोहनजी दररोज स्वयंपाकघरात बसून गरमगरम जेवण करत असत. त्या वेळी वागण्यात कृत्रिमता नव्हती, तर आपलेपणा होता. आपण काही विशेष करीत आहोत अशी भावना नव्हती. अगदी घरच्यासारखे वर्तन असले, तरी प्रचारकाच्या सन्मानाची काळजीसुद्धा घेतली जायची. सन्मान इत्यादीची अपेक्षा भलेही मोहनजींनी केली नसेल, परंतु काकाजींनी त्यांचा सन्मानच केला होता.

देशात २६ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू झाली आणि ३ जुलै रोजी संघावर बंदी घालण्यात आली. पण संघाच्या कार्यकर्त्यांचे अटकसत्र २८ जूनपासूनच सुरू झाले होते. अकोल्यात काकाजी, जवाहरलालजी लुंकड, मांगीलालजी इत्यादी कार्यकर्त्यांना तुरुंगात धाडण्यात आले. या सर्वांना याची कल्पना होतीच आणि त्यांनी आपापल्या घरी तसे कळवलेही होते. तरीही अटकेनंतर काही कुटुंबांमध्ये घबराट पसरली होती. पण काकाजींच्या घरी काकाजींच्या पत्नी अत्यंत शांत होत्या. त्यांना काळजी नव्हती असे नाही, परंतु त्यांनी ती लोकांसमोर दाखवली नाही. कुटुंबप्रमुख नसताना त्याची जबाबदारी सहप्रमुखावर येते, तशीच काहीशी काकीजींवर आली. त्यांनी ती व्यवस्थित पार पाडली. त्या कुणाच्याही समोर हताश दिसल्या नाहीत. याउलट, त्यांना भेटणाऱ्या व्यक्तींना त्यांच्याकडून शक्तीच मिळत असे. सगळीकडे निराशेचे वातावरण असतानाही काही घरांमध्ये जाऊन हिंमत वाढते, अशा घरांमध्ये एक घर काकाजींचे होते. तिथे जाऊन आल्यानंतर कार्यकर्त्यांना इतर घरी जाण्याची मानसिक शक्ती प्राप्त होत असे.

अकोल्यात अर्बन सहकारी बँक आणि भारत विद्यालय हे दोन प्रकल्प संघस्वयंसेवक चालवत असत. यामुळे तिथे संघस्वयंसेवकांचे दोन गट झाले होते. पण काकाजींनी ना कोणत्या गटाला कधी पाठिंबा दिला, ना कोणाशी पक्षपात केला. ते सर्वांना स्वयंसेवक म्हणून भेटत असत आणि दोन्ही गट त्यांचा आदर करत असत.

काकाजींचे घर प्रत्येकाच्या स्वागतासाठी नेहमीच खुले असायचे. संघाचे कितीही लोक आले, तरी त्यांची पत्नी म्हणजेच काकीजी सर्वांचे खानपान इत्यादी योग्य त्या आदराने करत असत. काकीजी म्हणजे ममतेचे मूर्तिमंत स्वरूप. माननीय मोहनजी यांना तर त्या मोठ्या मुलाप्रमाणे मानत असत. गोपाल छोटा आणि मोहन मोठा असे त्यांचे वागणे असायचे. त्यांचे जेवण झाले की नाही याची त्या वैयक्तिक काळजी घ्यायची. आलेल्या प्रत्येकाला त्या जेवायचा प्रचंड आग्रह करत असत. पती-पत्नी दोघेही संघाच्याच रंगात रंगले होते. श्रीमंत-गरीब, चांगल्या-वाईटाची कल्पना त्यांच्या मनात कधीच येत नसे. सर्वांशी एकसमान वागणूक. घरात जातीपातीचा कुठलाही भेदभाव नाही. त्या काळात हे खूप अवघड होते. सध्याच्या काळात हे खूप सोपे वाटले, तरी त्या वेळी जातीपातीचा मोठा पगडा होता. अशा वेळी कोणत्याही जातीचा विचार न करता सर्व स्वयंसेवकांना स्वयंपाकघरात थेट प्रवेश असायचा. हे सगळे सहज व्हायचे. आम्ही काहीतरी विशेष करत आहोत, ही भावना कधीच दिसून नाही आली. संघकार्यकर्त्याची संघाबद्दलची निष्ठा यातून दिसून येते. या सगळ्या गोष्टींचे कोणतेही लेखी प्रशिक्षण संघ देत नाही. संघ हे त्याचे प्रत्यक्ष रूप आहे. मग काकाजींचे घर याला अपवाद कसे असू शकेल?

आधी काकाजी, मग गोपालजी आणि आता मधुरजी अशा तीन पिढ्यांशी माननीय मोहनजींचा संबंध आहे. आधी जसे होते तसेच आताही आहेत. हेच संघाचे वैशिष्ट्य आहे. संघाचा संबंध फक्त कार्यकर्त्याशी नसतो, तर तो संपूर्ण घराशी असतो. हे नाते मैत्रीचे, बंधुतेचे असते. संघाचे काम वाढत आहे म्हणजे काय होत आहे? म्हणजे असे जीवन जगणारी कुटुंबे मोठ्या संख्येने आणि अधिक व्यापक क्षेत्रात तयार होत आहेत. त्यांची व्यापकता जेवढी वाढेल तेवढेच संघाचे कार्यही वाढते.

शंकराचार्यांनी म्हटले आहे,
'मनुष्यत्वं मुमुक्षत्वं महापुरुष संश्रय।' - मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुषांचा सत्संग या तीन गोष्टी माणसाला देवाच्या कृपेने मिळतात. जन्म घेतल्यावर आपल्याला मनुष्यत्व मिळते, मुमुक्षत्व कसे आणि केव्हा मिळेल याबाबत सांगता येत नाही, मात्र महापुरुषांचा सत्संग संघाच्या माध्यमातून लाभतो. याचे कारण म्हणजे काकाजींसारखे लोक भेटतात. सगळेच महापुरुष प्रसिद्ध असतातच, असे नाही. परंतु संघामुळे सद्गुणसंपन्न लोक भेटतात. परोपकारी जीवन जगण्यासाठी आवश्यक निष्ठा, श्रद्धा मनात बाळगून महापुरुषांना जीवन जगण्याचा अनुभव घेण्याचा फायदा लाभ मिळतो. म्हणूनच संघात जो येतो तो भाग्यवान, असे म्हणायला काही हरकत नाही.

अनुवाद : देविदास देशपांडे