परमवैभवाची पायाभरणी

स्रोत: विवेक मराठी    दिनांक13-Aug-2020
|
@डॉ. दिनेश थिटे
 
पाचशे वर्षे हिंदू समाजाने शक्य तितक्या प्रकारे लढा दिला व स्वप्न पाहिले की अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी पुन्हा भव्य मंदिर होईल. ही स्वप्नपूर्ती होत असल्याने ५ ऑगस्टच्या भूमिपूजनाचे महत्त्व आहे. देश स्वावलंबी होण्यासाठी त्याला आत्मविश्वासाची व त्याआधारे निश्चित केलेल्या स्वदेशी धोरणाची गरज आहे. ५ ऑगस्ट २०२० रोजीची श्रीरामाच्या भव्य मंदिराच्या शिलापूजनाची ऐतिहासिक घटना याची मुहूर्तमेढ ठरेल. 


seva_1  H x W:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिराचे भूमिपूजन झाले आणि हिंदू समाजाने पाचशे वर्षे केलेल्या प्रदीर्घ लढ्याचे सार्थक झाले. रामजन्मस्थानाच्या मुक्तीसाठी लढणाऱ्या कारसेवकांना संकल्पपूर्तीचे समाधान मिळाले, तर या लढ्याशी काहीही संबंध नसलेल्या सामान्य हिंदूंनाही समाधान वाटले.

राममंदिराच्या भूमिपूजन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून परमपूज्य सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उपस्थित होते. ते म्हणाले की, "या समारंभामुळे देशभर आनंदाची लाट आली आहे. सर्वात मोठा आनंद आहे की, भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी ज्या आत्मविश्वासाची आवश्यकता होती आणि ज्या आत्मभानाची गरज होती, त्याचे सगुण साकार अधिष्ठान तयार होण्याचा शुभारंभ आज होत आहे. परमवैभवसंपन्न आणि सर्वांचे कल्याण करणाऱ्या भारताची निर्मिती करण्याचा हा शुभारंभ आहे."

देशामध्ये लाखो मंदिरे आहेत. अक्षरधामसारखी भव्य आणि सुंदर मंदिरे आधुनिक काळात निर्माण झाली. अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी उभारण्यात येणाऱ्या मंदिराचेच असे काय महत्त्व आहे की, त्याच्या भूमिपूजनाचा आनंद संपूर्ण भारताने दिवाळीसारखा साजरा करावा? हे मंदिर व्हावे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या योजनेनुसार संघस्वयंसेवकांनी आणि समविचारी हिंदूंनी तीस वर्षांचा चिवट संघर्ष केला व बलिदान दिले, त्यामुळे या मंदिराच्या निर्मितीला महत्त्व आले. अयोध्येतील राममंदिरासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी १९९० साली रथयात्रा काढली. त्यानंतर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आणि नंतर देशातील प्रमुख पक्ष म्हणून भाजपाचा उदय झाला, यामुळेही या मंदिराच्या निर्मितीला महत्त्व आहे. भारतावर क्रूर आक्रमण करून राज्य करणारा आक्रमक बाबर याचा सेनापती मीर बाकी याने १५२८ साली श्रीरामजन्मभूमीवर असलेले मंदिर पाडून त्या जागी बाबरी मशीद बांधली. त्यानंतर १९९२ साली कारसेवकांनी बाबरीचा विवादित ढाचा पाडला आणि त्यानंतर २८ वर्षांनी मंदिराचे भूमिपूजन झाले, म्हणूनही त्याचे महत्त्व आहे. राममंदिराच्या भूमिपूजनाचे ऐतिहासिक, राजकीय व सांस्कृतिक महत्त्व शोधावे, तर अनेक आयाम आहेत. पण त्यामुळे भारताच्या परमवैभवाची पायाभरणी कशी होते, हा मुद्दा उरतोच.

पराभूतांच्या अपमानासाठी राममंदिर पाडले

आक्रमक बाबराचा सेनापती मीर बाकीने १५२८ साली राममंदिर पाडून बाबरी मशीद बांधली. खरे तर त्याला मशीद बांधण्यासाठी अन्यत्र कोठेही जागा मिळाली असती. पण त्याने त्याच ठिकाणी मंदिर पाडून मशीद बांधली, कारण त्याला स्थानिक जनतेला संदेश द्यायचा होता की, तुम्ही ज्या प्रभू रामचंद्राला सर्वस्व मानता, त्याच्या जन्मस्थानी त्याचे मंदिर असणार नाही. तुमच्या श्रद्धा आणि भावना पायदळी तुडवतो, कारण आम्ही राज्यकर्ते आहोत आणि तुम्ही गुलाम आहात.

हिंदू समाजासाठी राम सर्वत्र आहे. महाराष्ट्रात लोक भेटल्यावर आणि जातानाही "राम राम" करतात. राजस्थानमध्ये "राम रामसा" म्हणतात. अगदी हिंदू परंपरांचे महत्त्व नाकारणाऱ्या बहुजन समाज पक्षाच्या संस्थापकांचे नावही काशीराम होते. राम सर्वत्र आहे. सर्वांमध्ये आहे. त्याच्या जन्मस्थानी असलेले मंदिर पाडून आक्रमकांनी स्थानिकांना संदेश दिला. त्यामुळेच गेली पाचशे वर्षे हिंदू समाजाने शक्य तितक्या प्रकारे लढा दिला व स्वप्न पाहिले की अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी पुन्हा भव्य मंदिर होईल. ही स्वप्नपूर्ती होत असल्याने ५ ऑगस्टच्या भूमिपूजनाचे महत्त्व आहे.

पण ही स्वप्नपूर्ती देशाला परमवैभवाकडे कशी नेईल? या प्रश्नाचे उत्तर जाणण्यासाठी भारताचे इतिहासकाळापासून असलेले परमवैभव लयाला कसे गेले, हे पाहिले पाहिजे. भारत हा गरीब व मागासलेला देश होता व तो इंग्रजांच्या आगमनानंतर आधुनिकतेच्या मार्गावर आला, असा इतिहास आपण सर्व शिकलो. पण ही मतलबी मांडणी आहे. वस्तुस्थिती वेगळी आहे. भारत हा मुळात सध्याप्रमाणे गरीब देश नव्हता.

भारत श्रीमंत असल्याने व्यापारासाठी युरोपीय आले

इंग्लंडमध्ये ३१ डिसेंबर १६०० रोजी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. ईस्ट इंडीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात निर्माण होणारे मसाले, उत्तम कापड आणि युरोपीय श्रीमंतांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या महागड्या वस्तू यांच्या व्यापारातून स्पेन आणि पोर्तुगाल यांनी भरपूर संपत्ती कमावली होती. त्या व्यापारात आपल्यालाही वाटा मिळावा यासाठी लंडनच्या व्यापाऱ्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. त्यासाठी त्यांनी त्या वेळी ७०,००० पौंड इतके भांडवल उभे केले होते. पुढे भारतात आल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने मुघल सम्राट जहांगीर याच्याशी १६१३ साली करार करून व्यापारासाठी सवलती मिळवल्या व सुरत येथे वखारीची स्थापना केली. भारतातून सुती कापड, रेशमी वस्त्रे, मसाले, नीळ, किमती वस्तू यांची खरेदी करून युरोपात निर्यात करत या कंपनीने व्यापारात जम बसवला. कंपनीकडे सैन्यही होते, त्याच्या जोरावर कंपनीने मुघलांच्या ताब्यातील समृद्ध असे बंगाल राज्य १७५७ साली बळकावले आणि कंपनीच्या राजवटीचा पाया भक्कम झाला. पुढे ईस्ट इंडिया कंपनीने स्थानिक सैनिकांचा वापर करत आणि ठिकठिकाणी लढाया करत भारतात आपले राज्य प्रस्थापित केले. १८५७ साली भारतीयांनी क्रांती करून ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्याला आव्हान दिले. त्यानंतर ब्रिटिश सरकारने परिणामकारक हस्तक्षेप केला आणि कंपनीचे राज्य १८५८ साली संपुष्टात येऊन ब्रिटिश सरकारची थेट राजवट सुरू झाली.


seva_1  H x W: ने भारतात कसे साम्राज्य उभारले, याची उजळणी करण्याचे कारण म्हणजे या सर्वांमध्ये एक मुद्दा ध्यानात घ्यायला हवा की भारत हा जगातील एक समृद्ध देश असल्याने येथील उंची मालाच्या व्यापारासाठी ब्रिटिश कंपनी येथे आली. कंपनी काही राज्य करण्यासाठी आली नाही. राज्य ताब्यात घेतल्याने व्यापार करणे आणखी प्रभावी होत असल्याने त्यांनी राज्य प्रस्थापित केले. पण त्यांचा हेतू या जागतिक पातळीवरील संपन्न देशाला व्यापारातून लुटण्याचाच होता. ईस्ट इंडिया कंपनीने भारतात येण्याच्या खूप आधी - १४९२ साली स्पॅनिश दर्यावर्दी ख्रिस्तोफर कोलंबसने भारताला जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी पश्चिमेच्या दिशेने प्रवास केला व त्याला अमेरिकेचा शोध लागला. पण त्याचाही हेतू भारतात जाऊन तेथील रेशीम आणि मसाल्यांची अपार मूल्याची संपत्ती स्पेनला आणण्याचाच होता.

ब्रिटिशांनी भारतात येऊन आपले राज्य प्रस्थापित करेपर्यंत भारत हा जगातील एक श्रीमंत देश होता व ब्रिटिशांनी लुटल्यामुळे भारत गरीब झाला, या बाबतीत विविध मान्यवरांनी मांडणी केली आहे. इंडियन नॅशनल काँग्रेसचे सहसंस्थापक दादाभाई नौरोजी यांनी १९०१ साली लिहिलेल्या ‘पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया’ या ग्रंथात ब्रिटिश राजवट हिंदुस्थानचे कसे आर्थिक शोषण करत आहे, हे स्पष्ट केले होते. या शोषणामुळे भारतात दारिद्र्य कसे निर्माण झाले, हेसुद्धा त्यांनी स्पष्ट केले होते. महान इतिहासकार धरमपाल यांनी ‘इंडियन सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन एटीन्थ सेंचुरी’ या त्यांच्या ग्रंथात अठराव्या शतकात - म्हणजे ब्रिटिशांनी भारतातील व्यवस्था उद्ध्वस्त करेपर्यंत या देशातील उद्योगधंदे व शेती किती प्रगत होती, हे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या दप्तराच्याच आधारे धरमपाल यांनी ही मांडणी केली आहे.
 
 

अलीकडच्या काळात माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी ‘ॲन एरा ऑफ डार्कनेस – द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया’ या त्यांच्या ग्रंथात ब्रिटिशांनी भारताची कशी लूट केली हे स्पष्ट केले आहे. थरूर म्हणतात की, ब्रिटिश लोक जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक देश असलेल्या भारतात आले. दोनशे वर्षांपूर्वी जागतिक जीडीपीमध्ये भारताचा वाटा २३ टक्के होता व देशात गरिबी औषधालाही नव्हती. कापड, पोलाद आणि जहाज बांधणीच्या व्यवसायात भारत जगातील प्रमुख देश होता. पण ब्रिटिशांनी लुटल्यामुळे भारत हा जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक देश झाला.

ब्रिटिशांनी भारताची नक्की किती लूट केली, याचे संशोधन अर्थतज्ज्ञ उत्सा पटनाईक यांनी केले आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटी प्रेसने त्यांचे निबंध प्रसिद्ध केले आहेत. मिंट या आर्थिक प्रकाशनाला नोव्हेंबर २०१८मध्ये दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, १७६५ ते १९३८ या कालावधीत ब्रिटनने भारतातून ४५,००० अब्ज (४५ ट्रिलियन) डॉलर्स संपत्तीची लूट केली. अपार कर लादणे व अन्य उपायांनी ब्रिटिशांनी भारताची संपत्ती लुटल्यामुळे भारताचे जपानप्रमाणे आधुनिकीकरण झाले नाही व देश दरिद्री झाला. भारतीय अर्थव्यवस्थेने सुमारे ३ ट्रिलियन डॉलर्सचा जीडीपी गाठल्यानंतर भारत ही जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली आहे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सची करून देश तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, हे ध्यानात घेतले तर ४५ ट्रिलियन डॉलर्सची लूट किती मोठी होती, हे ध्यानात येईल.

खरे संकट आत्मविश्वासाच्या अभावाचे

भारतावर मुसलमान आक्रमकांनी राज्य केले. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली व नंतर पुढे मराठ्यांनी स्वराज्याच्या सीमा देशाच्या सीमेपर्यंत रुंदावत नेल्या. पण पुढे ब्रिटिशांचे राज्य आले. परकीय आक्रमणामुळे देशाची राजकीय सत्ता विदेशी व्यक्तींच्या हाती गेली व त्यांनी देशाचे नुकसान केले. ब्रिटिश राजवटीचे वेगळे वैशिष्ट्य होते. त्यांनी राजकीय सत्ता भोगलीच, पण त्यांचा खरा हेतू आर्थिक शोषणाचा होता. त्यांनी भारतातील प्रस्थापित उद्योग व्यवसाय उद्ध्वस्त केले आणि आपल्या मालासाठी बाजारपेठ निर्माण केली. त्यांच्या आर्थिक धोरणामुळे देशातील शेतकरी संकटात सापडला. या सर्वावर कडी म्हणजे ब्रिटिशांनी देशाच्या शिक्षणव्यवस्थेत हस्तक्षेप करून असा न्यूनगंड निर्माण केला की, ब्रिटिशांचे राज्य हे भारताच्या हिताचे आहे, त्यांच्यामुळे देशाला आधुनिकतेची वाट सापडली व भारतीयांची कसलीही लायकीच नाही. परिणामी या देशाला परमवैभवाची परंपरा असूनही आणि ते गाठण्याची पूर्ण क्षमता असूनही गेली अनेक वर्षे भारत दारिद्र्यात राहिला.

देशाला १९४७ साली ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यावर तरी भारतीय मानसिकतेचा आणि स्वदेशी मूल्यांचा सन्मान होईल, अशी लोकांची अपेक्षा होती. लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने कोट्यवधी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी झाले, त्यांच्यावर दोघांच्या स्वदेशीच्या आग्रहाचा प्रभाव होता. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या काँग्रेसने महात्मा गांधी यांचे नाव केवळ जनतेच्या पाठिंब्यासाठी वापरले व त्यांच्या स्वदेशीच्या विचारांकडे सोईस्कर दुर्लक्ष केले. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर पाश्चात्त्य विचारांचा पगडा होता. पाश्चात्त्यीकरण म्हणजे आधुनिकीकरण या पद्धतीने त्यांनी धोरणे आखली. पुढेही तसेच चालू राहीले. या सर्व वातावरणात भारतीय जनमानस आपली अस्मिता आणि स्वाभिमान शोधत असताना १९८०च्या दशकात अयोध्या येथे रामजन्मस्थानी मंदिर उभारण्याचे आंदोलन सुरू झाले. सर्वांसाठी श्रद्धास्थान असलेल्या रामाच्या जन्मस्थानी त्याचे मंदिर असावे, ही हिंदू समाजाची अत्यंत साधी अपेक्षाही आपल्याच देशात पूर्ण होऊ शकत नाही, या जाणिवेने समाज अस्वस्थ झाला. पाचशे वर्षांपूर्वी आक्रमकांनी हिंदू समाजाला हिणवण्यासाठी मंदिर पाडून उभारलेले अपमानाचे चिन्ह दूर झाले पाहिजे, या भावनेने समाजाने हे आंदोलन उचलून धरले. पुढे काय घडले याचा इतिहास ताजा आहे.

पाचशे वर्षे अपमान सहन करावा लागल्यामुळे विशेषतः स्वातंत्र्यानंतर भारतीय सरकार असूनही आपल्या भावनांची कदर होत नाही या जाणिवेमुळे समाज अस्वस्थ होता. यामुळेच समाजाला मंदिराच्या भूमिपूजनाच्या वेळी जल्लोश करावासा वाटला. हा लढा एखाद्या विशिष्ट समुदायाच्या विरोधात नव्हता. डाव्या मंडळींनी या संघर्षाला हिंदू–मुस्लीम असे रूप देऊन भडका उडवला. मशिदीलाच विरोध करायचा तर देशात असंख्य मशिदी आहेत. बाबरीच का? हा सूडाचा प्रवास नव्हता, तर आत्मगौरवाचा होता. आमच्याच देशात आमची इतकी साधी आकांक्षाही पूर्ण होणार नाही का? मीर बाकीप्रमाणे आजही आम्हाला हिणवणार का? अशी अस्वस्थता होती. मंदिराच्या भूमिपूजनामुळे आत्मगौरवाचा शोध पूर्ण झाला आणि समाजाला नवा आत्मविश्वास गवसला.

seva_1  H x W:  

भारत हा स्वयंपूर्ण देश होण्यासाठी हा आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच आत्मविश्वासाने निश्चित केलेल्या स्वदेशी धोरणाची गरज आहे. सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात श्रीरामजन्मस्थानी मंदिर बांधण्याचा निकाल दिल्यानंतर सर्व समाजाने सामंजस्याने त्याचे स्वागत केले. मंदिराच्या भूमिपूजनाचेही सर्व स्तरांतून स्वागत झाले. मंदिरामुळे देशाच्या आत्मविश्वासाबरोबरच सामाजिक सलोख्याचेही पर्व सुरू झाले आहे. भारत हा दोनशे वर्षांपूर्वी जगातील एक श्रीमंत देश होता. आजही भारताकडे सर्व क्षमता आहेत. कमतरता होती ती आत्मविश्वासाची आणि आत्मभानाची. आधी मेकॉलेच्या शिक्षणव्यवस्थेने आणि ब्रिटिश राजवटीने पद्धतशीरपणे भारतीयांमध्ये न्यूनगंड निर्माण केला. पुढे स्वातंत्र्यनंतर काँग्रेसच्या पाश्चात्त्यधार्जिण्या धोरणांमुळे देशात पुरेसे आत्मभान निर्माण झालेच नाही.

२०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे पूर्ण बहुमताचे सरकार आल्यानंतर परिस्थितीत झपाट्याने बदल होऊ लागला. त्यापूर्वी श्रद्धेय अटलजीच्या सरकारच्या काळात १९९८ ते २००४ या सहा वर्षांत देशाच्या विकासासाठी प्रभावी पावले टाकली. पण अटलजींना संख्याबळाची मर्यादा होती व सरकार स्थिर ठेवण्यात बरीच शक्ती खर्च होत होती. समाजाच्या जिव्हाळ्याचे अनेक विषय अटलजींच्या सरकारच्या काळात संख्याबळाच्या अभावी बाजूला ठेवावे लागले होते.

आज देशाची अर्थव्यवस्था जगातील पाचव्या स्थानावर आहे. परकीय चलनाच्या साठ्याच्या बाबतीत भारत जगात आठव्या स्थानावर आहे. वीजवापराच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. पेट्रोलियम पदार्थाच्या वापराच्या बाबतीतही भारत तिसऱ्या स्थानावर आहे. मोबाइल फोनच्या संख्येच्या आणि इंटरनेटच्या वापराच्या संख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्कम नेतृत्वाखाली आत्मविश्वासाने भरलेला भारत आता नवी झेप घेईल. या देशाला पुन्हा परमवैभव गाठण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. भारताकडे जमीन, मनुष्यबळ, सूर्यप्रकाश, पाणी, खनीज संपत्ती, शेती, उद्योग व्यवसाय, विज्ञान तंत्रज्ञान, सामाजिक स्वास्थ्य अशा प्रगत देश होण्यासाठीच्या सर्व बाबी आहेत. पण देश स्वावलंबी होण्यासाठी त्याला आत्मविश्वासाची व त्या आधारे निश्चित केलेल्या स्वदेशी धोरणाची गरज आहे. त्यासाठी ५ ऑगस्ट २०२० रोजी ऐतिहासिक घटना घडली. परमपूज्य सरसंघचालक म्हणाले, त्याप्रमाणे आत्मविश्वासाचे आणि आत्मभानाचे सगुण साकार अधिष्ठान तयार होण्याचा शुभारंभ झाला. आता परमवैभवसंपन्न आणि सर्वांचे कल्याण करणारा भारत निर्माण होईल.

९८२२०२५६२१