उचल धनुष्य, पार्था!

14 Aug 2020 15:03:38
पार्थ पवार यांनी काय मत मांडावे, याबाबत राजकीय कार्यकर्ता म्हणून त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असायलाच हवे. संविधानाने त्यांना तो हक्क दिला आहे. पण त्यांचे मत पक्षधोरणाविरुद्ध आणि पक्षहिताविरुद्ध असेल, तर त्यांनी पक्षाच्या भूमिकेविरुद्ध जाण्याचे पाऊल का उचलले, याचाही विचार केला पाहिजे. पक्षातील नवीन कार्यकर्त्यांनी आपली मते मांडूच नयेत असे शरद पवार यांचे धोरण आहे का? सध्या महाराष्ट्रात जे राजकारण चालू आहे, त्याला आणि प्रशासन आणि सरकार यांच्याबाबत सर्वसामान्य माणसाच्या मनातील भावनेला जर पार्थ पवार यांनी वाट करून दिली असेल, तर त्यांचे काय चुकले?


pawar_1  H x W:

महाभारतातील भीष्म पितामह पार्थाच्या बाणाने घायाळ झाले आणि धरतीवर पडले. इच्छामरणाचे वरदान लाभलेल्या पितामह भीष्मांना मुक्ती मिळाली ती पार्थामुळेच. आज महाभारत आठवण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणात भीष्म पितामह म्हणून ज्यांचे महिमामंडण केले जाते, ते शरद पवार आपल्या नातवाच्या - पार्थ पवारांच्या वाग्बाणांनी घायाळ झाले आहेत आणि त्यांचा तोल सुटून आजवर त्यांनी जाहीरपणे व्यक्त होण्याची त्यांची चौकट त्यांनीच मोडली आहे. शरद पवार यांना 'जाणता राजा' असे संबोधन लावण्यात काही मंडळींना आनंद वाटतो आणि शरद पवार यांनाही ते आवडते. शरद पवारांचे जाणतेपण माध्यमातून व्यक्त होताना दिसून येते. समोरच्या व्यक्तीवर टीकाटिप्पणी करताना ते नेमकेपणाने आणि सौम्य शब्दात व्यक्त होतात. मात्र पार्थ पवार यांच्याविषयी बोलताना त्यांचा तोल ढळला आणि ते म्हणाले, "पार्थ पवार राजकारणात अपरिपक्व असून त्यांच्या बोलण्याला मी कवडीइतकी किंमत देत नाही." शरद पवार यांच्यावर अशी वेळ का आली? याचा विचार करताना महाराष्ट्र राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरची परिस्थिती समजून घेतली पाहिजे.

पाच ऑगस्ट रोजी अयोध्येत श्रीराममंदिराचे भूमिपूजन झाले. साऱ्या हिंदू समाजासाठी तो आनंदाचा क्षण होता. या दिवशी पार्थ पवार यांनी "जय श्रीराम" म्हणत हिंदू समाजाला शुभेच्छा दिल्या होत्या. ज्या भूमिपूजनास पार्थ पवार यांनी शुभेच्छा दिल्या, त्या भूमिपूजनामुळे कोरोना जाईल का? असा प्रश्न शरद पवारांनी विचारला होता. सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूचा तपास सीबीआयमार्फत व्हावा, अशी पार्थ पवार यांनी नुकतीच मागणी केली होती, त्या पार्श्वभूमीवर बोलताना शरद पवार यांनी जाहीरपणे मुंबई पोलीस योग्य प्रकारे काम करत असल्याचे सांगून पार्थ पवार यांना राजकीय दृष्टीने अपरिपक्व ठरवत त्यांना आपण कवडीइतकी किंमत देत नाही असे म्हटले होते. खरे तर सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूचा सीबीआयकडून तपास करण्यात यावा, अशी पार्थ पवार यांच्याआधी भाजपाकडून मागणी केली गेली होती. मग शरद पवारांनी पार्थ पवार यांच्या अपरिपक्वतेबाबत बोलण्याची, त्यांना कवडीमोल ठरवून अपमानित करण्याची वेळ का आली?

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत आपल्या नातवाला उमेदवारी देऊन पुढची पिढी राजकारणात सक्रिय करणाऱ्या शरद पवारांना आताच पार्थ पवार यांच्या राजकीय अपरिपक्वतेची जाणीव कशी झाली आणि शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांना धावपळ का करावी लागली? असे प्रश्न आपोआपच उपस्थित होतात. सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य मान्य असल्याचे म्हटले असले, तरी एवढ्यापुरता हा विषय संपणार नाही. ज्याअर्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते धावपळ करत आहेत, त्याअर्थी नक्कीच कोठेतरी ठिणगी पडली आहे आणि या ठिणगीचा वणवा होऊ नये म्हणून ही धावपळ सुरू आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे जो निर्णय घेतील तोच निर्णय अंतिम असतो. त्यांच्या निर्णयावर वेगळे मतही व्यक्त करण्याची कुणाची हिंमत होत नाही. भडक डोक्याचे, स्पष्टवक्ते म्हणून प्रसिद्ध असणारे अजितदादा पवारही याला अपवाद नाहीत. अजितदादांनी याआधी शरद पवारांच्या एकाधिकारशाहीविरुद्ध बंड करून पाहिले, पण शरद पवारांनी मोठ्या खुबीने त्यांच्या बंडाचे ताबूत मोडीत काढल्याचा इतिहास आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी शरद पवार यांच्या भूमिकेला डावलून आपले स्वतंत्र मत व्यक्त केले आहे आणि ते मतच पार्थ पवार यांची राजकीय लायकी शरद पवारांनी अधोरेखित करण्यास कारणीभूत ठरले आहे. या निमित्ताने शरद पवार यांचे ढळलेले संतुलन आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेली एकाधिकारशाही समाजासमोर आली आहे.

पार्थ पवार यांनी काय मत मांडावे, याबाबत राजकीय कार्यकर्ता म्हणून त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असायलाच हवे. संविधानाने त्यांना तो हक्क दिला आहे. पण त्यांचे मत पक्षधोरणाविरुद्ध आणि पक्षहिताविरुद्ध असेल, तर त्यांनी पक्षाच्या भूमिकेविरुद्ध जाण्याचे पाऊल का उचलले, याचाही विचार केला पाहिजे. पक्षातील नवीन कार्यकर्त्यांनी आपली मते मांडूच नयेत असे शरद पवार यांचे धोरण आहे का? सध्या महाराष्ट्रात जे राजकारण चालू आहे, त्याला आणि प्रशासन आणि सरकार यांच्याबाबत सर्वसामान्य माणसाच्या मनातील भावनेला जर पार्थ पवार यांनी वाट करून दिली असेल, तर त्यांचे काय चुकले? केवळ एकाधिकारशाही जपत पक्ष वाढवता येणे आता अशक्यकोटीतील गोष्ट आहे, हे शरद पवारांनी लक्षात घ्यायला हवे. पक्षात तशा प्रकारचे बदल घडवून आणले नाहीत, तर पुढील काळात पक्षातील असंख्य पार्थ धनुष्यबाण उचलण्यास पुढे येतील.
Powered By Sangraha 9.0