कोरोनाच्या कहरावर पोकळ आश्वासनांचा उतारा

स्रोत: विवेक मराठी    दिनांक16-Aug-2020
|
@प्रमोद कोनकर

कोरोनाने आता कहर केला आहे. याच काळातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या सलग पंधरा दिवसांमधल्या तीन घटना केवळ जिल्ह्यासाठीच नव्हे, तर कोकणासाठीसुद्धा धक्कादायक आहेत. कोरोनाविरोधातल्या लढाईत काम करणारे वैद्य प्रमोद भिडे आणि बालरोगतज्ज्ञ दिलीप मोरे यांचं कोरोनामुळे झालेलं निधन आणि दापोलीतल्या डॉ. मेहेंदळे यांनी ४२ वर्षांचं रुग्णालय बंद करण्याचा घेतलेला निर्णय या त्या तीन घटना आहेत.


corona_1  H x W

रत्नागिरीतले वैद्य प्रमोद ऊर्फ रघुवीर पांडुरंग भिडे यांचं २७ जुलै रोजी निधन झालं. आयुर्वेदातले रसशास्त्री म्हणून त्याची ख्याती होती. आयुष्यभर त्यांनी आयुर्वेद जपला, जोपासला आणि शक्य तितका त्याचा प्रसार केला. त्यातून त्यांचे असंख्य विद्यार्थी तयार झाले. तेही आयुर्वेदाच्या प्रसारासाठी आणि आयुर्वेद शाखेतच प्रॅक्टिस करण्यासाठी प्रवृत्त झाले आहेत. एड्स आणि मूत्रपिंडाच्या रोगांवर संशोधन आणि इलाज करणारे रससिद्ध आणि कॅन्सरसारख्या दुर्धर आजार झालेल्यांचं जीवन शक्य तितकं सुसह्य करण्यासाठी धडपडणारे वैद्य भिडे यांचं कोरोनाविषयीचं आयुर्वेदशास्त्रानुसार संशोधन सुरू होतं. दुर्दैवाची बाब अशी की आयुष्यभर आयुर्वेद जगलेल्या या वैद्याला आयुष्याचे अखेरचे काही दिवस आधुनिक वैद्यकीय रुग्णालयात आयुर्वेदविहीन अवस्थेत काढावे लागले. आधुनिक वैद्यकाच्या नियमांमुळे त्यांना अखेरच्या आजारात आयुर्वेदाची औषधं देता आली नाहीत.

डॉ. दिलीप मोरे यांनी कोरोनाबाधित ४४ बालकांना कोरोनाच्या दाढेतून बाहेर काढून नवजीवन प्राप्त करून दिलं होतं. डॉक्टर रुग्णांची पिळवणूक करतात, असं सर्वसाधारण चित्र असतं. पण त्याला पूर्णपणे छेद देणारी आणि प्रसंगी रुग्णाला औषध घेण्यासाठी पैसे नसतील तर स्वतःकडून पैसे देऊन रुग्णांसाठी सेवा बजावणारे डॉक्टर अशी मोरे यांची प्रतिमा होती. वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत जिल्हा रुग्णालयात त्यांनी बालरोगतज्ज्ञ म्हणून सेवा केली. निवृत्तीनंतर काही काळ त्यांनी खासगी दवाखाना सुरू केला होता. मात्र ते त्या ठिकाणी रमले नाहीत. थोड्याच काळात ते पुन्हा जिल्हा रुग्णालयात मानद बालरोगतज्ज्ञ म्हणून रुजू झाले. त्यानंतर सुमारे सहा वर्षं ते कार्यरत होते. गेल्या मार्च महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. पुढच्याच महिन्यात सहा महिन्यांच्या एका बालकाला कोरोनाची बाधा झाली. त्याची आई कोरोनामुक्त होती. पण तिच्या बालकाला कोरोना झाल्यामुळे त्याच्यावर उपचार करणं अत्यंत आव्हानाचं होतं. डॉ. मोरे यांनी ते आव्हान लीलया पेललं. मातेच्या दुधावरच त्या बालकाला बरं करण्यात त्यांनी यश मिळवलं. राज्यातलं हे पहिलं उदाहरण होतं. त्यानंतर तीन महिन्यांत सुमारे ४४ बालकांना त्यांनी कोरोनामु्क्त केलं. याच महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी जिल्हा रुग्णालयातील मानद सेवा थांबविण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याच दरम्यान त्यांना स्वतःला कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. सुरुवातीला ते उपचारांना प्रतिसाद देत होते. मात्र अखेरच्या दिवसभरात त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यांचं निधन झालं.

वैद्य भिडे आणि डॉ. मोरे या दोघांच्या निधनामुळे दोन वेगवेगळ्या शाखांमधल्या वैद्यकीय शाखांचं आणि त्यावर अवलंबून असलेल्या रुग्णांचं फार मोठं नुकसान झालं आहे. दोघेही कोरोनाच्या आजाराने रत्नागिरीच्या जिल्हा कोविड रुग्णालयातच निधन पावले, हा एक दुर्दैवी योगायोग. या दोघांचाही दुर्दैवी अंत करणाऱ्या आजारामुळे आरोग्य यंत्रणा आणि ती चालविणारी शासन यंत्रणा याविषयीचे अनेक प्रश्न निर्माण होतात. हे प्रश्न किती खोलवर गेले आहेत, जिल्ह्यातली कोरोनाविरुद्ध लढणारी यंत्रणा किती तोकडी आहे, याची प्रचिती ४२ वर्षांचं रुग्णालय बंद करण्याच्या दापोलीतले प्रतिथयश डॉ. वसंत मेहेंदळे आणि त्यांच्या पत्नी डॉ. वर्षा यांच्या निर्णयामुळेही येते. यंत्रणेतल्या उणिवा दूर करण्यासाठी, तसंच इतर उपायांबाबत त्यांनी सातत्याने यंत्रणेशी पाठपुरावा केला. त्याला यश आलं नाही. साधं उत्तरही आलं नाही. कोरोनाच्या युद्धात सुरुवातीपासून डॉक्टर म्हणजे योद्धे आहेत, असं समजून त्यांनी स्वतः तसंच त्यांच्या इतर समव्यावसायिकांना रुग्णसेवा सुरू ठेवायला प्रवृत्त केलं. पण अखेर पस्तीस वर्षं चाललेलं रुग्णालय कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय त्यांना घ्यावा लागला.

मुंबई आणि चाकरमानी यांचं अतूट नातं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून चाकरमान्यांचं मुंबईतून कोकणात येणं हा मोठाच विषय झाला. त्यासाठी अनेक धरसोडीचे निर्णय जाहीर झाले. ते नकळत मागे घेतले गेले. एसटीच्या मोफत गाड्यांची घोषणा झाली, प्रत्यक्षात चौपट भाडं आकारून काही काळासाठी ती सेवा सुरू झाली. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाबंदी जारी करण्यात आली. पण चाकरमान्यांना कोकणात आणण्याचा निर्धार लोकप्रतिनिधींनी मोठ्या अहमहमिकेने केला. तो प्रत्यक्षात आणण्यासाठी कंबरा कसल्या. मे महिन्याचा हंगाम संपल्यानंतर कोकणवासीयांचा लाडका गणेशोत्सव लवकरच येत आहे. त्यासाठीही चाकरमान्यांना अनेक आश्वासनं झेलावी आणि काही काळाने विसरून जावी लागली. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासन कसं प्रयत्नशील आहे, चाकरमान्यांसह कोकणवासीयांची सरकारला किती काळजी आहे, हे शक्य तितक्या प्रसारमाध्यमांचा वापर करून घेऊन सांगितलं गेलं. ते कोरोनाच्या कानी मात्र गेलंच नाही. मे महिन्याच्या सुरुवातीला दोन आकडी असलेला कोरोनाबाधितांची संख्या आता चार आकडी झाली आहे.


corona_1  H x W

कोरोनाचा कहर व्हायला शासनाचीच धरसोडीची अनेक धोरणं कारणीभूत आहेत. रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात प्रदीर्घ काळ वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहिलेले डॉ. दिलीप मोरे यांच्या आठवणी जपण्यासाठी जिल्हा रुग्णालयातल्या एका कक्षाला त्यांचं नाव देण्याची घोषणा करण्यात आली. पण केवळ नाव देऊन प्रश्न सुटणार नाही. प्रश्न सोडविण्यासाठी खूप काही करावं लागणार आहे. कोरोनाच्या जगद्व्यापी आजारावर अजून औषध सापडलेलं नाही. त्यामुळे कोरोना झालेल्या रुग्णाला रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवणं यापलीकडे तूर्त तरी कोणतेच उपाय नाहीत. तुटपुंजी साधनं, अपुरे कर्मचारी, राजकीय दबाव सहन करत आरोग्य यंत्रणा काम करत आहे. पण त्या यंत्रणेला पुरेशी साधनं दिली जात नसतील, तर त्यांचे प्रयत्न तोकडे पडणार, यात शंकाच नाही. ती यंत्रणा चालविणारे शासन या साऱ्यात कमी पडत आहे, हे स्पष्ट दिसतं. त्यामुळे आरोग्य यंत्रणेविषयी नव्हे, तर आरोग्य यंत्रणा चालविणाऱ्यांविषयी प्रश्नचिन्ह आहे. रत्नागिरीतील एका ज्येष्ठ नागरिकाने स्पष्टपणे सांगितलं की, रत्नागिरीत आजारी पडणंही आता कठीण झालं आहे. इतर आजारांचं जाऊ द्या, पण साध्या सर्दी-पडशाच्या आजारासाठी कोणताही डॉक्टर आपली सेवा देत नाही.

कोरोनाच्या संदर्भात सातत्याने शासकीय अनास्थेची चर्चा होत आहे. कोकणापुरता विचार करायचा झाला, तरी वाढत जाणारे रुग्ण, चाकरमान्यांची घरवापसी, त्यासाठी अमलात आणलेले नियम, तसंच सातत्याने त्यामध्ये होत जाणारे बदल यामुळे सर्वसामान्य जनता कंटाळली आहे. कोणत्याच निर्णयाच्या बाबतीत सरकार ठाम नसतं. आधीच्या आठवड्यात घेतलेला निर्णय दुसऱ्या आठवड्यात कधी आणि कसा बदलतो हेही समजत नाही. हा गोंधळ असतानाच प्रशासकीय यंत्रणाही व्यवस्थित चालल्याचं दिसत नाही. जनहितासाठी जनतेला बंधनात ठेवलं गेलं, तर नक्कीच समजू शकतं. पण सतत निर्णय बदलूनसुद्धा कोरोनाची स्थिती आटोक्यात आलेली नाही. कोकणात अजून तरी कोरोनाचे सर्व रुग्ण शासकीय रुग्णालयांमध्येच उपचारांसाठी दाखल केले जातात. पण जिल्हा रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत डॉक्टरांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंतची ७० ते ७५ टक्के पदं रिक्त आहेत. त्यामुळे कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना सातत्याने काम करावं लागतं. त्यांना कुटुंबीयांची साधी भेट घेता येत नाही. संपर्कही साधता येत नाही. त्यामुळे अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. ते लक्षात घेता नियमित सर्व पदं भरून काही राखीव कोटाही तयार केला गेला पाहिजे. पण मुळातच रिक्त झालेली पदं भरण्याच्या हालचाली नाहीत. खासगी डॉक्टरांची मदत घेतली जाणार असल्याचं सांगितलं जातं. खासगी डॉक्टर्स आपली सेवा बजावतही आहेत. पण मुळातच हाताबाहेर गेलेली स्थिती हाताळण्याएवढी यंत्रणा सक्षम झालेली नाही. खासगी डॉक्टरांवर कारवाई करणं, त्यांची रुग्णालय ताब्यात घेणं, त्यांचे परवाने रद्द करणं याबाबतचे इशारे त्यांना दिले जात आहेत. मात्र विम्याचं संरक्षण तर सोडाच, अत्यावश्यक असलेल्या पीपीई किटसारखी साधनंही त्यांना पुरविलेली नाहीत. रत्नागिरीत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या १०० खाटांच्या रुग्णालयाचं उद्घाटन आणि कोविडसाठी त्याचं रूपांतर एकाच वेळी झालं. पण रिक्त पदं भरण्याबाबत गांभीर्य दिसत नाही. पदं भरण्याची, आरोग्य सेवा आणि सुविधा दुप्पट करण्याची, कोविड केअर सेंटरची संख्या वाढविण्याची आश्वासनं दिली जात आहेत. ती प्रत्यक्षात येत नाहीत.

कोरोनायोद्धे वैद्य आणि डॉक्टर कोरोनाचेच बळी ठरतात, जेव्हा चांगलं चाललेलं रुग्णालय बंद करण्याचा निर्णय एखादा डॉक्टर घेतो, तेव्हा त्याला तशीच ज्वलंत कारणं असली पाहिजेत. शासकीय अनास्था कोणत्या पातळीवर पोहोचली आहे, त्याचंच हे उदाहरण आहे. कोरोनासाठी दोन हात करायला सिद्ध असणारे डॉक्टर जिथे शासकीय यंत्रणेपुढे हात टेकतात, तिथे सर्वसामान्य लोकांसमोर डोक्याला हात लावण्यापलीकडे काहीही शिल्लक राहत नाही. रत्नागिरी जिल्ह्यातले नागरिक सध्या तेच करत आहेत. कोरोनामुळे केलेल्या कहरावर पोकळ आश्वासनांचा दिला जाणारा उतारा पाहत जगणं जगत आहेत. कोरोनासोबत लढायची तयारी त्यांनी केव्हापासून केली आहेच, पण शासकीय अनास्थाही त्यांच्या अंगवळणी पडली आहे. ती हताश करणारी आहे, एवढंच.


९४२२३८२६२१

[email protected]