समाजमाध्यम एक प्रभावी अस्त्र?

विवेक मराठी    16-Aug-2020
Total Views |
@शंतनू पांढरकर
आधुनिक काळात सोशल मीडिया हे अतिशय प्रभावशाली अस्त्र ठरले आहे. परंतु ही माध्यमे हाताळणाऱ्या मंडळींची वैचारिक दृष्टीदेखील तितकीच महत्त्वाची आहे. समाजमाध्यमांद्वारे व्यक्त होणाऱ्या विचारांचे पडसाद समाजमनावर उमटताना दिसतात. अशा वेळी बहुतेकदा समाजमाध्यमे केवळ मुखवट्याचे काम करीत असतात, ती केवळ निमित्तमात्र असतात. अलीकडे समाजमाध्यमे ही 'राष्ट्रीय विरुद्ध अराष्ट्रीय' या वादाचे नवीन कुरुक्षेत्र बनू पाहत आहे. म्हणूनच समाजमाध्यम नावाचे हे अस्त्र आपली सदसद्विवेकबुद्धी आणि सज्जनशक्ती जागृत ठेवूनच हाताळायला हवे...


media_1  H x W:

काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार मायकल ल्युनिग यांचे एक व्यंगचित्र थोड्या वादाच्या भोवर्‍यात अडकले होते. त्यांनी समाजमाध्यमात (सोशल मीडियात) गुंतलेली, 'बिझी' असलेली पण हातातल्या बाबागाडीतून पडलेल्या आपल्या बाळाकडे लक्ष नसलेली माता आणि बाबागाडीतून पडलेले बाळ त्यात चितारले होते. यातील अतिशयोक्ती जरी बाजूला ठेवली, तरी एक गोष्ट नाकारण्यासारखी नक्कीच नाही आणि ती म्हणजे मोबाइल आणि त्यातील ही समाजमाध्यमे व्यक्तीच्या आयुष्याचा फार मोठा भाग बनली आहेत. यात खर्च होणाऱ्या दिवसाच्या तासांचा हिशोब प्रत्येकाने मनाशी मांडला, तरी हे सहजच पटेल आणि समक्ष दिसेलही.

फेसबुक, ट्विटर यासारखी समाजमाध्यमे गेल्या काही वर्षांत प्रत्येकाजवळ उपलब्ध झालेली सहज, सोपी, उत्तम अशी साधने आहेत. आपला विचार कधीही आणि कुठेही स्वतंत्रपणे प्रामाणिकपणे मोठ्या आवाजात मांडता आला नाही, ते मांडण्याचे व्यासपीठ या समाजमाध्यमांनी अगदी सामान्य सामान्य व्यक्तींना उपलब्ध करून दिले आहे. कधीही चर्चा न झालेले मुद्दे, यापूर्वी कधीही चर्चेमध्ये नसलेल्या बाबी, जाणीवपूर्वक लपवलेली तथ्ये यावर खुल्या चर्चा करणे शक्य झालेय ते या समाजमाध्यमांमुळेच. विविध मार्गदर्शनासाठी, मदतीसाठी, ज्वलंत विषयांच्या चर्चा करण्यासाठी, नवनवीन बातम्या मिळवण्यासाठी, त्यावर मते मांडण्यासाठी, वाद-विवाद, सुसंवाद साधण्यासाठी आणि अगदी वेबिनार, चर्चासत्रे, व्याख्यानमाला ऐकण्यासाठीसुद्धा या समाजमाध्यमांचा प्रामुख्याने उपयोग होतो आहे. समाजमाध्यमांच्या या उपयोगांची यादी केली, तर निर्माण होणारा जो आवाज आहे तो फार मोठा आहे. समाजमाध्यमांच्या या सामर्थ्याला कोणी नाकारू शकत नाही, कोणी त्याला अस्पृश्य म्हणून झिडकारू शकत नाही. माहितीचा किंवा ज्ञानाचा खजिना नाही, तर या समाजमाध्यमांनी आज आपल्या आयुष्यात त्याहून बरीच मोठी मजल मारलेली आहे. Reach of Social Media - समाजमाध्यमांची पोहोच हाच विषय चर्चायचा असेल, तर कोणत्याही निर्बंधाशिवाय संपूर्ण जग प्रत्येकाच्या तळहाती आलेले आहे असे म्हटले, तरी चुकीचे होणार नाही. असे हे शस्त्र महत्त्वाचे असले, तरी या शस्त्रावरील मूठ आणि त्या मुठीला दिशादर्शन करणारा मेंदू महत्त्वाचा ठरतो. या साधनाचा वापर करून कोण काय लिहील? कोण कसे व्यक्त होईल? हे सांगणे अवघड आहे, निर्माण होणारे हे साहित्य प्रचंड आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे अवघड आहे.

खोट्या खात्यावरून (वरून) होणारी हेटाळणी, ट्रोलिंग, राबवला जाणारा अजेंडा, त्याला घाबरून प्रामाणिकपणे मुद्दा मांडण्यात, सत्य समोर आणण्यात करण्यात येणारी कुचराई असेही प्रश्न आहेत. दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळीच एका फार नामांकित पत्रकाराने आपले माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणब मुखर्जी यांच्या मृत्यूची बातमी समाजमाध्यमांवर दिली. ती चुकीची होती. प्रणबजींच्या पुत्राने या बातमीचे खंडन केल्यावर सत्य जनतेसमोर आले, पण तोपर्यंत व्हायचे ते नुकसान होऊन गेले होते, बरेच पाणी वाहून गेले होते.

कुठेतरी काहीतरी चर्चा भरकटवून मूळ प्रश्नांना बगल देण्याची अप्रामाणिकता, व्यक्त होण्याची अतिघाई, येथे टिकण्याची जीवघेणी स्पर्धा ही एक वेगळी काळी बाजू या माध्यमालाही आहेच.

तरीही अतिशय प्रभावशाली असे हे माध्यम साधन आहे आणि आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रत्येक जण या साधनाचा उपयोग करून घेतो, हेही सत्य आहे. दोन दिवसापूर्वी बंगळुरूसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरामध्ये एका फेसबुक पोस्टवरून उद्भवलेला हिंसाचार याचे ताजे उदाहरण आहे. घटनेचे, हिंसेचे मूळ कारण, काय घडले कसे घडले, कशा प्रकारे घडवले गेले ही सर्व तथ्ये तपासानंतर समोर येतीलच, पण या प्रकरणात पहिला आरोप झाला तो एका तरुणाने लिहिलेल्या फेसबुकच्या पोस्टवर. आपल्या निष्ठा इतक्या तकलादू झाल्या आहेत का, की काही शब्दांनी आपण उद्दीपित होऊन स्वतःचा समाज, समोरच्याचे घर जाळायला निघतो, पोलीस स्टेशन पेटवायला निघतो, तेही केवळ ३० मिनिटांत.. यावर विचार करायची आवश्यकता आहे आणि हे केवळ एका फेसबुक पोस्टवरून झालेय का? याचाही शोध घेणे गरजेचे आहे. धर्म हे समाजाला जोडण्याचे माध्यम आहे, पण ही समाजमाध्यमे धार्मिक आधारावर समाजाला फोडण्याचे काम करतात, असाही आरोप करण्यात आला. ही आग समाजमाध्यमांमुळे पेटली असेही म्हणण्यात आले. अर्थात तथ्यांकडे वस्तुनिष्ठपणे पाहिले, तर त्या पोस्टने फार तर 'एक ट्रिगर पॉइंट'चे काम केले, असे भासेल. भासेल यासाठी की कदाचित घोडा आधीच तयार होता, नाल मिळाली आणि पळवला गेला, धुमसणाऱ्या संतापाला वाट मिळाली. राग संताप कसला, हे श्रीरामचंद्राला ठाऊक; पण बंगळुरू याआधीही २००७च्या जानेवारीमध्ये अशा प्रकारे जळले होते, तेव्हा कारण होते इराकमध्ये सद्दाम हुसेन यांना देण्यात आलेली फाशी. आसाममधल्या आणि ब्रह्मदेशातल्या हिंसाचाराचा विरोध करण्यासाठी एकत्र आलेल्या जमावाने ११ ऑगस्ट २०१२च्या भर दुपारी मुंबईत काय काय केले, किती हिंसाचार केला याची आठवण सर्वांना आजही आहे.

पण मग प्रश्न उभा राहतो की हा दोष खरेच समाजमाध्यमांचा आहे का, की काही वेगळी काळजी घेणे आवश्यक झाले आहे? समाजमाध्यमातील नोंदी संवेदनशील असतात. पण हा एक वेगळा संघर्ष वेगळ्या पातळीवर सुरू आहे आणि त्याला आपण नाकारू शकत नाही, तो तसा नाकारणे चुकीचे ठरेल.
 

media_1  H x W: 
एकाच वेळी संपूर्ण समाजात अशा प्रकारे कोणत्याही क्षुल्लक कारणाचा बुरखा घेऊन, हिंसक पद्धतीने व्यक्त होण्याची शक्यता किती भयानक आहे. धर्माच्या आधारावर फाळणी अनुभवलेले राष्ट्र आहे आपले. या सर्व घटनांनंतरही काहींची निद्रा तुटत नसेल, तर अवघड आहे.

अगदी परवा उर्दू साहित्यातील एक कवी निवर्तले. लगोलग त्यांच्या 'किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है' या ओळी समाजमाध्यमांवर झळकू लागल्या. सामाजिक छळाचा अत्युच्च बिंदू अनुभवल्यानंतरही अवघ्या विशीतल्या तरुणाच्या मनात उमललेले 'पसायदान' विसरले जाते आणि आणि सर्वांकडून सर्व प्रकारचा जयजयकार होऊनही वानप्रस्थाकडे जाणाऱ्या अनुभवाच्या तोंडी आलेल्या 'सभी का ख़ून है शामिल यहाँ की मिट्टी में
किसी के बाप का हिन्दोस्तान थोड़ी है' या ओळी प्रसिद्ध होतात...

का? कशामुळे?

कारण एकच - हा एक विचारसंघर्ष सुरू आहे, Narrative बनवण्याची लढाई सुरू आहे, विमर्श स्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. समाजमाध्यमे तर मुखवटा आहेत, वरवरचे कारण आहे. समाजमाध्यम हे राष्ट्रीय विरुद्ध अराष्ट्रीय या वादाचे नवीन कुरुक्षेत्र बनतेय.

हा विमर्श किंवा आपला विचार प्रस्थापित करण्याचा संघर्ष वाईट आहे अशातला भाग नाही, पण त्यातून समाजाच्या हिताचे काम, राष्ट्रहिताचे काम होतेय की नाही हे पाहणे गरजेचे आहे आणि म्हणूनच समाजमाध्यमातून निर्माण झालेले सर्व संवेदनशील विषय सावधपणे वाचणे, त्यावर तितक्याच सावधपणे व्यक्त होणे, त्या विषयात मांडलेला मूळ विचार ओळखणे आणि त्या संदर्भातील सर्व तथ्ये मांडून त्यांचे एक प्रकारचे डॉक्युमेंटेशन करून ठेवणे फार फार गरजेचे आहे.

आपण पूर्वीपासून ऐकत आलो, आर्टिकल ३७० घालवणे फार अवघड, ३५-Aबद्दल निर्णय घेणे अशक्य.. भारतीय सोडा, अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांकडूनही हा विचार किती दिवस चालवला गेला. खरे काय होते? ३७० हटवणे किती सोपे होते, ऐकत आलो तसे अशक्य तर नव्हतेच नव्हते, हे आता सिद्ध झाले आहे. पण हे कसे शक्य झाले? हे अवघड आहे, अशक्य आहे हा विचार पुढे आणण्यात आला वर्षानुवर्षे. तो जाणीवपूर्वक बिंबवण्यात आला. सत्य फार वेगळे होते.

बंगळुरूसारख्या घटनांमधून समाजमाध्यमांबद्दलची संवेदनशीलता अधोरेखित होते. पण ती अधोरेखित होत असताना मूळ मुद्द्यांकडे, मूळ दोषांकडे, हिंसक प्रवृत्तीकडे आपण दुर्लक्ष नाही ना करत? समाजमाध्यमे चांगल्या विचारांसाठी, एक सुरुवात, एक संधी उपलब्ध करून देऊ शकतात, पण अराष्ट्रीय विचारासाठी, हिंसक विचारासाठी ते 'कोलीत' म्हणून तर काम नाही ना करत? यावर विचार झाला पाहिजे आणि जर या प्रश्नाचे उत्तर शतांशानेही 'होय' असेल, तर काळजीपूर्वक त्याला सामोरे गेले पाहिजे.

फेसबुक पोस्टमुळे, समाजमाध्यमांमुळे हिंसा उसळली हा निष्कर्ष उथळ आहे. एकदा नाव 'कानफाट्या' पडले की पडतेच. समाजमाध्यमांवर दोषारोप करताना या साधनामागच्या मेंदूमधील गणिते लक्षात घेणे गरजेचे आहे. नुसते हे गणित लक्षात घेऊन चालणार नाही, तर समाजमाध्यमांवर व्यक्त होताना, आपले मुद्दे मांडताना, सत्य मांडताना या अराष्ट्रीय मंडळींना अशा प्रकारची संधी कमीत कमी मिळेल याची काळजी घेणेही गरजेचे आहे. समाजमाध्यमांवर वावरताना एखादा कमकुवत क्षण येऊ शकतो, पण तो टाळायला हवा हे नक्की.

media_1  H x W: 

मागील आठवड्यात एका नामांकित व्यक्तीची मुलाखत ऐकण्याचा प्रसंग आला. अगदी हास्यास्पद म्हणता येतील अशा समोरच्या प्रश्नांनाही ती व्यक्ती उत्तर देताना, "तुम्ही खूप विद्वान आहात, प्रश्न खूप छान आहेत" अशा प्रकारे 'टोल'वीत होती. पण विद्वान हा शब्द तीन-चार वेळा सतत ऐकल्यावर समोर बसलेल्या सर्वांना आणि प्रश्नकर्त्यांनाही त्याचा योग्य अर्थ समजला. समाजमाध्यमांवर व्यक्त होताना आपला मुद्दा दृढपणे मांडत हे भान जपणे आवश्यक आहे. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या समाजमाध्यमांवर संवेदनशील विषयांवर व्यक्त होताना या प्रकारची काळजी घेणे महत्त्वाचेच आहे. एकीकडे समाजमाध्यमातील अभिव्यक्तिस्वातंत्र्य या विषयांवर व्याख्यानमाला आयोजित होतात, असहिष्णुतेच्या नावे टाहो फोडला जातो आणि दुसरीकडे समाजमाध्यमातील कोणत्यातरी पोस्टचा आधार घेत क्रूरपणे हिंसक आंदोलने केली जातात, माणसे मारली जातात, आणि याचे कारण काय दिले जाते? तर फेसबुकवरील एक पोस्ट! समाजमाध्यमात कोणीही कशा प्रकारेही व्यक्त झाले, तरी त्याची जोडणी अशा प्रकारे होते, पण त्याकडे पाहत आपण सत्य नाकारले तर त्यासारखा भोंगळपणा दुसरा नाही.

शेवटी समाजमाध्यम हे एक ब्रह्मास्त्र आहे. ते अर्जुनाकडे असते आणि अश्वत्थाम्याकडेही. कुरुक्षेत्रावरील समोरासमोरील लढाई संपल्यावर होणाऱ्या संघर्षात अर्जुनही ब्रह्मास्त्र चालवतो आणि अश्‍वत्थामाही. फरक फक्त इतकाच - गरज पडल्यास अर्जुनाला ते आवरता येते आणि अश्वत्थामा ते ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भाकडे वळवतो, येणाऱ्या पुढच्या पिढीकडे, भविष्याकडे वळवतो.

राष्ट्रीय विचारांशी जमिनीवर संघर्ष करण्याची कुवत आज अराष्ट्रीय म्हणता येतील अशा कुणाकडेच राहिलेली नाही आणि म्हणून मग स्वतःच्या विचारांना, दुष्कृत्याला समाजमाध्यमांच्या कोणत्यातरी गोष्टीची प्रतिक्रिया बनवून वा त्यांचा उपयोग करून समाजात हिंसा घडवण्याचे प्रकार वाढीस लागलेले दिसतात. हा बुरखा फाटायला हवा. कोलीत देण्याचे असे प्रकार संपायला हवेत. द्वापरयुगामध्ये परीक्षिताला वाचवणारा श्रीकृष्ण होता, पण कलियुगामध्ये अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राला बाद करणारा कृष्ण कोण असेल? ती शक्ती म्हणजे समाजातील, राष्ट्रातील सज्जनशक्तीच. 'या कुरुक्षेत्री, ही सज्जनशक्तीच कृष्ण आहे आणि हीच अर्जुनही' आहे, म्हणूनच समाजमाध्यम नावाचे हे ब्रह्मास्त्र सांभाळण्याची, हाताळण्याची मोठी जबाबदारी या सज्जनशक्तीवर आहे. राष्ट्रीय विचाराने समाजमाध्यमांवर व्यक्त होणाऱ्यांचे उद्दिष्ट चांगले आहे, त्यामुळे यश निर्भेळ असेल ही खात्री आहे. 
९४२३९४९२५४