आमचे अंगठेबहाद्दर मित्र!

स्रोत: विवेक मराठी    दिनांक17-Aug-2020
|
@आबासाहेब पटवारी

कोरोनाने लादलेल्या लॉकडाउनने माणसाला स्वतःच्याच घरात स्थानबद्ध केले आहे. आपणच फुलवलेली बाग आणि तिथे येणारे पक्षी यांचाच या काळात मोठा विरंगुळा आहे. या पक्ष्यांशी जुळणाऱ्या स्नेहातून जगाची ओळख होते. विवेक परिवारातले ज्येष्ठ सदस्य आबासाहेब पटवारी यांनी त्यांच्या नव्या मित्राची करून दिलेली ही ओळख.

Best Trees to Plant_1&nbs

सध्याच्या लॉकडाउन वगैरेच्या काळात घरातच सुरक्षिततेची काळजी घेत बसण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. एरव्ही निसर्गाकडे दुर्लक्ष करणार्‍या आपल्याला आजूबाजूच्या निसर्गाकडे, पशुपक्ष्यांकडे, विशेषत: आजूबाजूच्या झाडांवर बागडणार्‍या पक्ष्यांचे बागडणे लक्षपूर्वक पाहिले, तर काही मजेशीर गोष्टी लक्षात येतात. सकाळ-संध्याकाळ पाऊस नसल्यास गच्चीवर फिरताना फक्त आमच्या कुटुंबीयांचाच वावर असणार्‍या आम्हाला दोन-तीन ‘अंगठेबहाद्दर’ मित्र भेटले. खरे तर त्यांना ‘अंगठेबहाद्दर’ म्हणणे म्हणणे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे. ते चतुर आणि विलक्षण उद्योगी आहेत. गच्चीवर असलेल्या पाती चहाची पाने करंडून कोण टाकतो? त्या पानांच्या चिरफळ्या करून त्या तोडून कोण नेतो? याचे मला आश्चर्य वाटत होते. एक दिवस निर्धार करून त्या ‘चोरांचा’ मागोवा घ्यायचा ठरवले आणि काय नवल! दोन इटुकले जीव - ज्यांचा आकार केवळ आपल्या अंगठ्याएवढा आहे, ज्यांची अणकुचीदार चोच, टोकदार शेपटी, इवलेसे मंद निळसर रुपेरी रंग असलेले सर्व विलक्षण आहे. चपळाईने चटकन उडायला मदत करणारे सानुले पंख! यांच्या मदतीने आपले छोटेसे - चेंडूच्या आकाराचे घरटे बांधायची बहादुरी करणारे आणि नाजूक ‘च्युकच्यूक’ आवाज करीत मधून मधून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारे हे गच्चीवरील फक्त आमच्या अस्तित्वाला आव्हान देणारे चिमुकले, पण आम्हाला पत्ता लागू न देता घुसखोरी करून आपले कौशल्यपूर्ण घरकूल निर्माण करणारे आणि सजवणारे चिमुकले जीव आमचे गच्चीवरील अनाहूत मित्र बनले.

त्यांनी पाती चहाची पाने वापरून असे सुंदर घरटे बनवले की त्यांच्याशिवाय इतर पक्ष्यांना - अगदी चिऊताईलाही प्रवेश त्यात करता येणार नाही. जाई-जुईच्या दाट फांद्यांचा आश्रय घेऊन प्रवेशद्वारासमोर अशी तटबंदी उभी केली होती की, कावळेदादांनाही प्रवेश अशक्य. कावळेदादा एरव्ही समंजसपणे वागत असले, तरी वेळ आली की आपला क्रूर, कपटी स्वभाव सोडत नाहीत. काही दिवसांपूर्वी मैनाताई आपल्या नवजात बाळांना चोचीने चारा भरवत असताना पिल्ले घरट्याच्या दाराशी येताच कावळेबुवांनी झेप घेऊन त्या पिल्लांनाच आपले भक्ष्य केले होते. मैना आणि जोडीदाराने अक्रोश करत पाठलाग केला, म्हणून त्यांच्या करामतीला ‘बहादुरी’ म्हटले. असे हे आमचे अंगठेबहाद्दर रोज संध्याकाळी आम्हाला भेटतात. पण आमची चाहूल लागताच चटकन दृष्टीआड होतात. त्यांची मोहक हालचाल बघणे हाच आमचा एक विरंगुळा झाला आहे. आताशा त्यापैकी एकाची घरट्यातील हालचाल जरा वाढली आहे. बहुधा ती होणारी आई असावी! जरा सबुरी ठेवली तर पुढच्या पिढीशी तुमची दोस्ती होऊ शकेल, पण सध्या नाही. कारण कोरोनासंबंधीच्या सूचना आम्ही काटेकोरपणे पाळतो. मागचे अनेक महिने आम्ही घराबाहेर पडलो नाही आणि कुटुंबीयाशिवाय इतरांना घरात प्रवेश दिलेला नाही. तेव्हा तुम्हालादेखील आमच्या अंगठेबहाद्दरांशी ऑनलाइनच मैत्री ठेवावी लागेल. त्यांच्या या करामती कॅमेर्‍यात पकडण्याचा प्रयत्न आम्ही जरूर केला आहे, पण त्यांच्या क्षणभरही स्वस्थ न बसण्यामुळे तो यशस्वी होणे कठीण होते.