शेवटाचा आरंभ - स्त्रीवादी विचारांनी प्रभावित कादंबरी

स्रोत: विवेक मराठी    दिनांक17-Aug-2020
|
@डॉ. अरुंधती वैद्य
अनवट विषयांना हात घालणारी लेखिका म्हणून जिचा आवर्जून उल्लेख करावा लागेल, त्या लेखिकेची - ज्योती पुजारी यांची 'शेवटाचा आरंभ' ही सातवी कादंबरी आहे. १९२ पृष्ठसंख्या असलेल्या या कादंबरीत एकूण १० प्रकरणे आहेत. १९२ पृष्ठांपैकी सहा पाने संदर्भग्रंथ आणि संदर्भलेख यांच्या सूचीने व्यापली आहेत. भोवतालच्या मराठी लेखिकांचे साहित्य मध्यमवर्गीयांच्या आशा-आकांक्षांच्या रिंगणात फिरत असताना परंपरेने लादलेल्या स्त्रीविशिष्ट आणि समाजमान्य भूमिकांचे ओझे न बाळगणारी कादंबरी म्हणून 'शेवटाचा आरंभ' या कादंबरीचा उल्लेख करावा लागेल.

 Novels influenced by fem 
आवतीभोवती सतत घडणाऱ्या इतिहासात, पुराणात घडून गेलेल्या स्त्रियांवरील शारीरिक व मानसिक अत्याचाराच्या, बलात्काराच्या नृशंस भीषण घटनांनी लेखिका अत्यंत अस्वस्थ होते. बलात्कारामध्ये पीडित स्त्रीचा काहीही दोष नसताना समाज तिच्याकडे दोषी म्हणून बघतो आणि बलात्कार करणारा पुरुष समाजात उजळ माथ्याने वावरतो, या वास्तवाने लेखिकेच्या संवेदनाशील मनाचा संताप होतो आणि हा संताप बसल्याजागी व्यक्त करण्यापेक्षा साहित्यकृतीच्या माध्यमातून परंपरेचे झापडे बांधलेल्या समाजासमोर हा विषय आणला पाहिजे, असे लेखिकेला तीव्रतेने वाटले. या विषयावर लिहायचेच, बलात्कारपीडित स्त्रियांचा श्वास मोकळा करायचा, या विचाराने तिला पार झपाटून टाकले आणि हा विषय कादंबरीच्या आकृतिबंधात मांडायचा, असे तिने ठरवले. या विषयाच्या मांडणीसाठी बलात्कार या अत्यंत नीच कृत्याचा तिने सर्व बाजूंनी अभ्यास केला, सतत तीन वर्षे मेहनत केली, असे लेखिकेने आपल्या मनोगतात नमूद केले आहे.

'शेवटाचा आरंभ' ही नायिकाप्रधान कादंबरी आहे. गौरी हसबनीस ही तरुणी या कादंबरीची नायिका आहे आणि कादंबरीचे केंद्रस्थानही आहे. एका सुखी-समाधानी, सुसंस्कृत, मध्यमवर्गीय कुटुंबाची पार्श्वभूमी या नायिकेला लाभली आहे. अतिशय आनंदात दिवस जात असताना गौरीला अचानक तिचे सगळे आयुष्य, तिचे भावविश्व छिन्नभिन्न करून टाकणाऱ्या घटनेला तोंड द्यावे लागले. एका पुरुषाच्या विकृत मनोवृत्तीचा बळी ठरली. एकुलत्या एक मुलीच्या आयुष्याचा सत्यनाश होऊ नये, म्हणून तिच्या आई-वडिलांनी समाजापासून ही घटना लपवून ठेवली आणि घाईघाईने तिचा विवाह करून टाकला. लग्नानंतर नवऱ्याशी भावनिक जवळीक साधता न आल्याने तिच्या नवऱ्याने 'फ्रिजिड 'म्हणून तिला घटस्फोट दिला. तिचा घटस्फोट झाला आणि त्या धक्क्याने तिचे वडील वारले. काही दिवसांनी अपघातात गौरीची आई वारली आणि गौरी एकटी पडली. गौरीला तिच्या उदरनिर्वाहाची काळजी नाही, कारण वडिलांची आयुष्यभराची जमापुंजी आणि त्यांनी विकत घेतलेला फ्लॅट तिला मिळाला आहे. शिवाय नवऱ्याकडून दरमहा पोटगीही मिळते. 'खबर 'या वृत्तपत्रासाठी ती काम करते.

गौरी भूतकाळातला तो काळाकुट्ट दिवस विसरली नाही, पण नव्याने आयुष्याला सामोरे जाण्याची इर्षा बाळगून आहे. दाबलेल्या भूतकाळातून तिला तिच्यातल्या गौरीला मोकळे करायचे आहे आणि त्यासाठी ती बलात्कार या विषयावर पुस्तक लिहिते आहे. कविता महाजन यांच्या शब्दात सांगायचे, तर 'मौनाचे कवच' फोडण्यासाठी तिने हा पर्याय निवडला आहे.
 
या कादंबरीत गौरी, तिचे आई-वडील, तिचा प्राध्यापक मित्र अवधूत, अवधूतची आई, गौरीचा नवरा, शेजारच्या आजी अशी मोजकीच पात्रे आहेत, पण यांच्याव्यतिरिक्त अरुणा शानबागपासून - म्हणजे १९७३पासून २०१६पर्यंतच्या अनेक बलात्कारपीडितांचा वावर यामध्ये आहे. गौरी कादंबरीची नायिका आहे. बलात्कार झाला म्हणून खचून न जाता स्वतःला सिद्ध करणाऱ्या, कोणताही अपराधभाव मनात न बाळगता स्वतःची वाट स्वतः शोधणाऱ्या गौरीभोवती ही कादंबरी फिरते आहे. गौरी केंद्रस्थानी असली, तरी लेखिका गौरीच्या मनातील भावनांचा संघर्ष, विचारांचा कल्लोळ, तिच्या वाट्याला आलेला भयव्याकूळ एकटेपणा यांचे सूक्ष्म पदर उलगडण्यापेक्षा समकालीन बलात्काराच्या घटना, त्याविषयीचे तपशील, स्त्रीविषयक कायदे, त्यात वेळोवेळी झालेले बदल, त्यांच्या विस्तृत नोंदी यांची गुंफण करण्यातच गुंतली आहे. कादंबरी नायिकाप्रधान असूनही ती वाचून झाल्यावर गौरीची व्यक्तिरेखा मनात फार काळ रेंगाळत नाही, तिच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळा ठसा मनावर उमटत नाही.

गौरीची आई आणि अवधूतची आई या व्यक्तिरेखा मध्यमवर्गीय स्त्रियांच्या पारंपरिक मानसिकतेचे दर्शन घडवणाऱ्या आहेत. गौरीवर झालेल्या बलात्काराने तिची आई अंतर्बाह्य हादरून गेली असणार. कादंबरीच्या विशाल पटावर तिच्या मातृहृदयातला आक्रोश, भावनांचा कल्लोळ, संताप व्यक्त करायला अवसर होता, पण लेखिकेने त्याबाबत मौन बाळगले आहे.
 
अवधूत हे पात्र लेखिकेच्या मनातील आशय पुढे नेण्यासाठी, गौरीच्या व्यक्तिमत्त्वाला उठाव देण्यासाठी, कथानकाला गती देण्यासाठी निर्माण झाले आहे. त्यामुळे त्याच्या चित्राला स्वाभाविकपणे एक मर्यादा पडली आहे. अवधूत समाजशास्त्राचा प्राध्यापक असणे हे गौरीच्या पुस्तक लेखनाला पूरक आहे. अवधूत प्रेमभंगामुळे अविवाहित आहे. काहीसा बेदरकार, विक्षिप्त, बेफिकीर असणारा, देहाच्या पलीकडे असणाऱ्या तिच्या मनाला मान देणारा अवधूत गौरीचा मित्र आहे. अवधूत आणि गौरी यांचे नाते एका समंजसपणाने जुळून आले आहे. स्त्रीच्या आयुष्यात पुरुषाचे निखळ मित्ररूपात असणे स्त्री-पुरुषांच्या आत्मविकासाला एक प्रसरणशील अवकाश उपलब्ध करून देऊ शकते, असे त्यांच्यातल्या नात्यातून लेखिकेला सूचित करायचे आहे का? अशी शंका मनात निर्माण करणारे हे नाते आहे.

seva_1  H x W:
गौरीचा नवरा कथार्थाची निर्मिती करणारा एक घटक म्हणून कादंबरीत आला आहे. त्याला नाव नाही. अगदी मोजक्या शब्दांमध्ये लेखिकेने हे पात्र उभे केले आहे. तो सुष्टही नाही आणि दुष्टही नाही. सर्वसाधारण 'नवरा' या मानसिकतेचा हा नमुना आहे.
प्रधान आणि गौण पात्रांव्यतिरिक्त अनेक बलात्कारपीडित व्यक्तींचा वावर या कादंबरीत आहे. या व्यक्तींच्या माध्यमातून लेखिकेने प्राचीन काळापासून समकालीन अनेक बाह्य- आणि अंतर्वास्तवाचे अतिशय थेटपणे दर्शन घडवले आहे. पात्रचित्रण करताना लेखिकेने मनोव्यापारांना विशेष महत्त्व दिले नाही. पात्रांच्या मनाचा तळ न गवसल्याने लेखिका घटना आणि त्या अनुषंगाने संवाद आणि निवेदन, तपशील यांच्या जाळ्यात वाचकांना गुंतवून पात्रांच्या मनाचे सखोल चित्रण शिताफीने टाळते, असे प्रत्ययाला येते.
 
निवेदन लेखिकाश्रयी असल्यामुळे कथारचनेत लेखिकेला भरपूर स्वातंत्र्य मिळाले आहे. या स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा घेऊन लेखिकेने तिला अपेक्षित असलेला आशय सहजपणे वाचकांकडे संक्रमित केला आहे. कादंबरीतल्या निवेदनातून, भाष्यातून गौरीच्या मागे लेखिका ठामपणे उभी असल्याचा सतत प्रत्यय येत असतो. कादंबरीचे निवेदन घटना, घटनेचे विश्लेषण, चिकित्सा, नोंदी करीत जाणारे असल्यामुळे संथ आहे. घटनांचे निवेदन करताना भूतकाळातून वर्तमानाकडे आणि वर्तमानातून भूतकाळाकडे अशी काळाची सांगड घालत कादंबरीचा प्रवास सुरू राहतो. कोणत्याही प्रतिमा-प्रतीकांचा वापर न करता अतिशय साध्या सरळ, ओघवत्या भाषेत लेखिकेने कादंबरीतील अनुभवविश्व साकारले आहे.
 
विस्तृत नोंदी आणि तपशील यामुळे कादंबरीची रचना वेगळ्या स्वरूपाची झाली आहे. तपशिलाचा परीघ अमर्याद आहे. त्याला देशाची, धर्माची सीमा नाही. बलात्काराच्या घटनांभोवती निर्माण झालेली मानसिक, शारीरिक, सामाजिक, आर्थिक, न्यायिक प्रतिक्रियात्मक वर्तुळे आणि त्यांचे लेखिकेने केलेले विश्लेषण यामुळे या कादंबरीला संदर्भग्रंथाचे मोल आले आहे. बलात्कारी व्यक्तीच्या मानसिकतेवरही लेखिकेने प्रकाश टाकला आहे, हे या कादंबरीचे वेगळे योगदान आहे.
 
तपशिलाच्या बारकाव्यांमधून लेखिकेने तपशील गोळा करण्यासाठी खूप परिश्रम केल्याचे जाणवते, पण यथातथ्य चित्रणाची प्रक्रिया ही वाङ्मयीन सर्जनाची प्रक्रिया नाही, हेही लक्षात घ्यावे लागते. आपल्याजवळील निर्मितीपूरक अनुभूतिज्ञानाचा वापर कसा आणि किती करावयाचा, याचे भान न ठेवल्याने कादंबरीची कलात्मकता उणावली आहे.
 
 
गौरीच्या जीवनानुभवाला आणि बलात्कारासारख्या गंभीर आणि अत्यंत संवेदनशील विषयाला कलारूप देताना आवश्यक असणारी उत्कटता व कल्पनेची भरारी, तसेच पात्रांशी संपूर्ण तादात्म्य न साधल्याने सत्याचा आभास निर्माण करण्यात लेखिकेला संपूर्ण यश लाभले नाही, असे म्हणावे लागते. कादंबरी हा अतिशय लवचीक साहित्यप्रकार आहे. लेखिकेने कादंबरीच्या या वैशिष्ट्याचा उपयोग करून तिला हवी तशी कादंबरीची रचना केली आहे.
 
 
लेखिकेने गौरीसाठी संघर्षाला कुठे स्थानच ठेवले नाही. तिच्यावर बलात्कार झाला, हे समाजापासून लपवून ठेवले. त्यामुळे तिला समाजाच्या कुत्सित नजरांचा सामना करावा लागला नाही. वडिलांचे घर, पैसा मिळाल्यामुळे जगण्यासाठी संघर्ष करण्याची तिला गरज नाही, शिवाय ती एकटीच राहते. तिला विरोध करणारे कोणी नाही. तिच्यासाठी लेखिकेने सगळे सहजसोपे करून ठेवले. प्रस्थापित मूल्यव्यवस्थेच्या विरोधाचा सूर लावताना वाङ्यमयीन सौंदर्याचे निकष सांभाळणे हे लेखिकेसमोर आव्हानच होते.

कादंबरीच्या अखेरीला स्वतःच्या पुस्तक प्रकाशनाच्या समारंभात गौरी स्वतः पुरुषाच्या विकृत कामवासनेचा बळी आहे, हे मनात कोणताही अपराधभाव न ठेवता जाहीर करते आणि त्याच वेळी अवधूतच्या साथीने मैत्रीला नात्याचे कोणतेही लेबल न लावता ती जगणार आहे, हे निवेदनातून कळते. गौरीचे अवधूतबरोबर कोणत्याही नात्याचे लेबल न लावता जगणे, हे स्त्री-पुरुष नात्याने घेतलेले नवे वळण आहे आणि हे स्वीकारण्याचे धाडस लेखिकेने इथे दाखवले आहे. माणूस म्हणून जगण्यासाठीचा आपला हक्क मिळवण्यासाठी आपणच पुढे व्हायला हवे, व्यवस्थेचे दडपण न मानता व्यवस्थेला आकार द्यायला हवा, या स्त्रीवादी विचारांचे प्रतिबिंब ठळकपणे कादंबरीच्या शेवटावर अंकित झाले आहे.
 
स्त्रीवादी चळवळीशी लेखिकेचा प्रत्यक्ष संबंध नसला, तरी तिच्या संवेदनशील स्वभावावर आणि वैचारिक जडणघडणीवर स्त्रीवादी विचारांचे संस्कार झाले आहेत आणि ते या कादंबरीत पदोपदी प्रकटले आहेत, नव्हे, संपूर्ण कादंबरीची गुंफण स्त्रीवादी विचारांनी प्रभावित होऊन केली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही! हे या कादंबरीच्या शेवटी असलेली सहा पानांची संदर्भग्रंथांची आणि संदर्भलेखांची सूची बघितली की लक्षात येते. स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या पुरुषी मानसिकतेच्या विरोधात अगदी उच्च स्वरात बोलण्याचे तिला सिमाॅन द बोव्हुआर, छाया दातार, करुणा गोखले, प्रतिभा रानडे, मुक्ता मनोहर इत्यादी अनेक स्त्रीवादी लेखिकांच्या पुस्तकांच्या परिशीलनातून प्राप्त झाले आहे. या लेखिकांच्या कार्याबद्दल तिच्या मनात असलेला कृतज्ञभाव तिने कादंबरीत ठळकपणे व्यक्त केला आहे (पृ. १२७).
 
सामग्र्याने पाहता बलात्कारासारख्या ज्वलंत समस्येचा अत्यंत संवेदनशीलतेने आणि अनेक बाजूंनी वेध घेणारी, बलात्कारपीडितांच्या अनेक समस्यांकडे समाजाचे लक्ष वेधणारी, स्वाभिमानासाठी त्यांना लढण्याचे बळ देणारी, नव्या युगाचे सूतोवाच करणारी, बलात्काराच्या संदर्भात झालेल्या कायदेविषयक नोंदींचे अत्यंत प्रामाणिकपणे आलेखन करणारी, स्त्रीवादी विचारांनी प्रभावित झालेली आणि या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे समकालीन रंजनप्रधान, परंपराशरण कादंबऱ्यांपेक्षा वेगळी ठरणारी कादंबरी म्हणून 'शेवटाचा आरंभ' या कादंबरीचा उल्लेख करावा लागेल.
९४२०३९७५५९