कोविड-१९ मधील हृदयविकार

स्रोत: विवेक मराठी    दिनांक18-Aug-2020
|

@डॉ. मिलिंद पदकी

कोविड-१९मध्ये सुमारे ५ ते २८ टक्के लोकांमध्ये हृदयाचा आणि रक्तवाहिन्यांचा विकारही आढळतो. मुळात हृदयविकार असल्यास कोविडने मृत्यू होण्याची शक्यता बरीच वाढू शकते.

corona_1  H x W


कोविड-१९मध्ये मुख्यतः फुप्फुसांची हानी दिसत असली, तरी, निरनिराळ्या प्रसिद्ध शोधनिबंधांकडे पाहता सुमारे ५ ते २८ टक्के लोकांमध्ये हृदयाचा आणि रक्तवाहिन्यांचा विकारही आढळतो. यात हृदयाला इज़ा होणे, हृदयाच्या स्नायूंना सूज येणे, हृदयाची लय बिघडणे, हृदय कमकुवत होणे आणि रक्तवाहिन्यांत रक्ताच्या गुठळ्या होणे हे दिसते. मुळात हृदयविकार असल्यास कोविडने मृत्यू होंण्याची शक्यता बरीच वाढू शकते.

 
आपले हृदय हे स्नायूपेशींचे बनलेले असले, तरी या स्नायूपेशी इतर स्नायूपेशींपेक्षा वेगळ्या असतात: त्यांना त्यांची स्वतःची हालचालीची लय असते. आयुष्याची ऐंशी-नव्वद वर्षे सतत 'धडधडत' राहण्याच्या दृष्टीने त्या बनलेल्या असतात. तुम्ही जर या पेशी काचेच्या ताटलीत वाढविल्यात, तर त्यांचा एक एकसंध थर तयार झाल्यास तो आपोआप हलू लागून या अंगभूत लयीचे प्रदर्शन करतो. या पेशींना हृदय-स्नायूपेशी म्हणतात.

हृदय-स्नायूपेशीवर विषाणूचा दरवाजा म्हणजे ACE2 हा रिसेप्टर असतो, त्या मार्गाने विषाणू पेशीत शिरून ती कमकुवत किंवा नष्ट करतो. यात मोठा प्रॉब्लेम असा की निसर्ग हृदय-स्नायूपेशी नव्याने निर्माण करू शकत नाही. त्यामुळे एखादी पेशी मरण पावली तर तिची जागा नवीन पेशी घेऊ शकत नाही.

हृदयविकाराच्या 'झटक्यात' हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी अडकल्यामुळे हृदयाचा छोटासा भाग (सुमारे एक इंच व्यासाचा!) मरण पावतो. याला 'मायोकार्डियल इन्फार्क्शन' म्हणतात. अशा मेलेल्या पेशींच्या जागी मूलपेशी बसवून हृदय दुरुस्त करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्या 'जखमेवर' मूलपेशींना चिकटविण्यात यशही आले आहे. पण या बाहेरून चिकटलेल्या मूलपेशी हृदयाची अंगभूत लय पकडत नाहीत, असा सध्या प्रॉब्लेम आहे.
 
corona_1  H x W
 
कोविडमध्ये, विषाणूच्या लांबलचक आरएनए माळेचे प्रमाण रक्तात फार वाढल्यास त्यामुळे रक्तगुठळ्या निर्माण होतात. या गुठळ्या हृदय, मेंदू, किडनी आणि फुप्फुसे या चारही इंद्रियांमध्ये मोठा प्रॉब्लेम निर्माण करतात.

रक्तपुरवठा थांबल्यामुळे होणारा हृदय-स्नायू-मृत्यू हा तर कोविडमध्ये दिसतोच. त्याला मायोकार्डियल इन्फार्क्शन प्रकार-१ असे म्हणतात.

कोविडमध्ये दुसऱ्या एका प्रकारानेही हृदय बंद पडू शकते, ते म्हणजे फुप्फुसात पाणी साठल्यामुळे रक्तातले प्राणवायूचे प्रमाण कमी होते आणि त्याची भरपाई करण्यासाठी हृदय नको तितक्या वेगाने काम करायची धडपड करते. तापामुळेही हृदयाची लय बिघडलेलीच असते. यातूनही मायोकार्डियल इन्फार्क्शन होऊ शकते, ज्याला प्रकार-२ म्हणतात. विषाणूच्या उपस्थितीमुळे संबंध हृदयावर आलेल्या सुजेचाही यात हात असू शकतो.

कोविडमधील हृदयविकारावर डॉक्टर घेऊ शकणारी सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे, हॉस्पिटलमध्ये आल्या आल्या रुग्णाची डी डायमर चाचणी करून तो वाढला असल्यास रक्तगुठळ्याविरोधी औषधे सुरू करणे आणि दुसरे म्हणजे हृदयावर यंत्रावाटे लक्ष सतत लक्ष ठेवणे, ज्यायोगे मायोकार्डियल इन्फार्क्शनविरुद्ध वेगाने कारवाई करता येईल. अमेरिकेत आता रुग्णाच्या खाटेवरच लहानशा अल्ट्रासाउंड यंत्राने हृदयाची परिस्थिती डॉक्टर तपासू शकतो.

हॉस्पिटलमधून बरे होऊन घरी आलेल्या रुग्णांवर दर आठवड्यातून एकदा लक्ष ठेवून, निदान ४५ दिवस गुठळ्याविरोधी औषधे चालू ठेवणे हेही अमेरिकेत आणि चीनमध्ये सुरू आहे.

निरोगी लोकांच्या दृष्टीकोनातून सांगायचे झाल्यास -
 
१. हृदयासाठीची आरोग्यदायी जीवनशैली चालू ठेवणे - यात पालेभाज्या/फळे खाणे, रोज सुमारे ३० ग्रॅम चोथा (फायबर) अन्नातून किंवा औषधी मार्गाने खाणे, नियमित व्यायाम, वजनावर, डायबेटिसवर आणि रक्तदाबावर उत्तम नियंत्रण हे येते. हे सर्व निर्देशक जितके तुम्ही स्वतः घरी मोजू शकाल, तितके तुमचे नियंत्रण वाढेल हे लक्षात घेणे.

२. डॉक्टरांना विचारल्याशिवाय औषधे आणि जीवनशैली न बदलणे. तसेच बेबी ऍस्पिरिन (७५ मि.ग्रॅ.) गोळी, जी रक्त-गुठळयाविरोधी असते, ती चालू करावी का हेही डॉक्टरांना विचारणे.