सहचर नव्हे, सहकर्मी उमा आणि सुरेश प्रभू

स्रोत: विवेक मराठी    दिनांक19-Aug-2020   
|
 सुरेश रेल्वे मंत्री असताना रेल्वेचा झालेला कायापालट सर्वांच्या ध्यानी आहेच, पण ते प्रथम आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अर्थतज्ज्ञ आहेत. हाती आलेले काम पूर्णत्वास नेणे हाच त्यांचा ध्यास आहे आणि उमाची त्याला संपूर्ण साथ आहे, तेही स्वत:चे करियर, सामाजिक काम, लेखन, अभ्यास सांभाळून. दोघेही कर्तृत्वाने सारखेच मोठे. एकमेकांना सहचरच नव्हे, तर सहकर्मी मानणारे हे दांपत्य.

 
Suresh Prabhu Biography

डाॅ. साने सरांच्या पाठिंब्याने राम नारायण रुइया महाविद्यालयात मी झोपडपट्टी अभ्यास केंद्र सुरू केले होते. 'झोपडपट्टी सुधारणा योजनांतील राजकारण' हा माझ्या पीएचडीचा विषय होता. ह्या केंद्राद्वारे पदविका अभ्यासक्रम सुरू झाले होते. योजना आणि व्यवस्थापन या विषयासाठी कुणीतरी जाणकार आणि तळागाळात काम करणारी व्यक्ती पाहुणे शिक्षक म्हणून हवी होती. मला माझ्या एका पत्रकार मैत्रिणीचे नाव आठवले. तेव्हा ती टाइम्स ऑफ इंडियामध्ये मोठ्या पदावर होती आणि त्याचबरोबर नरसी मोनजी व्यवस्थापन महाविद्यालयातून दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रमही पूर्ण करीत होती. तिला ही कल्पना फार आवडली. तिने टाइम्सच्या शैक्षणिक पुरवणीत आमच्या या उपक्रमाची माहितीही छापली. तसेच मुलांना शिकवण्याचा अभ्यासक्रम तयार केला आणि पाहुणे शिक्षक म्हणून शिकवूही लागली. माझी ही मैत्रीण म्हणजे उमा. अत्यंत लाघवी आणि झोकून देऊन मदत करणारे पारदर्शक व्यक्तिमत्त्व. खरे तर एक संपूर्ण लेख तिच्यावर लिहावा इतके तिचे कर्तृत्व मोठे आहे, पण तिचे आणि सुरेश प्रभू यांचे सहजीवन हा आज लेखाचा विषय आहे. दोघेही कर्तृत्वाने सारखेच मोठे. एकमेकांना सहचरच नव्हे, तर सहकर्मी मानणारे हे दांपत्य. उमा इंग्लिशमधील नामवंत पत्रकार, तर सुरेश आंतरराष्ट्रीय स्तरावरील अर्थतज्ज्ञ.

सुरेश प्रभू हे किरीटचे मित्र. ते खार (मुंबई) येथे राहत होते आणि C.A. करत होते. आमच्या लग्नाआधीपासूनच त्यांच्याशी ओळख होती. किरीट आणीबाणीत सक्रिय, C.A. करून पूर्णवेळ राजकारणात उतरण्याचे त्यांनी ठरवले. सुरेशनी C.A. केले आणि स्वतःचे काम सुरू केले. त्याचबरोबर कायद्याचा अभ्यास करून LLB झाले. त्याच काळात सारस्वत बँकेच्या संचालक मंडळातही ते होते. सुरेशचे सर्व बालपण खारलाच गेले. त्यांचे मूळ गाव मालवण, पण वडील प्रभाकर प्रभू उद्योग-धंद्यानिमित्त मुंबईत स्थायिक झाले. यशस्वी उद्योजक म्हणून त्यांचे नाव झाले. आई सुमती गृहिणी. सुरेशनी वडिलांच्याच कार्यालयाच्या जागेत आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. त्याचबरोबर ते खार रेसिडेंट्स असोसिएशनतर्फे तेथील तेथील रहिवाशांच्या समस्या सोडवू लागले. तेव्हा काही विकासक FSI बेकायदारित्या वापरत होते. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटले चालू होते. सुरेशकडे त्यांचे नेतृत्व आपसूकच चालून आले.

उमा तेव्हा वृत्तपत्रात शोधपत्रकार होती. तिला FSIच्या बेकायदा वापरावर लेख लिहायचा होता. तिच्या बरोबरीच्या काही पत्रकारांनी सुरेशना भेटायचा प्रयत्न केला होता, पण तो योग नव्हता, म्हणून नवीनच रुजू झालेल्या उमाकडे हे काम आले. पहिल्याच प्रयत्नात फोन लागला. बॅलार्ड पियरच्या त्याच्या कार्यालयात तिने सुरेशला भेटून तो लेख उत्तम प्रकारे लिहिला. त्यानंतर या संबंधात त्यांचे भेटणे होत असे. तेथेच त्यांची मने जुळली आणि सुरेशने उमापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला.

उमा केणी मूळची गोव्याची. वडील डॉ. सावळा रामचंद्र केणी हे प्रथितयश डॉक्टर. आई सुधा गृहिणी. घर खूप मोठे आणि माणसांचा गोतावळा. आई तो नीटपणे सांभाळायची. देव-धर्म, कुळाचार, पाहुणेरावळे, नातेवाईक अशा सुखवस्तू वातावरणात उमाचे बालपण गेले. चौथीपर्यंत मराठी आणि नंतर इंग्लिश माध्यमाच्या शाळेत तिचे शिक्षण झाले. घर पुढारलेल्या मतांचे होते. तिने गोव्यातूनच रसायनशास्त्रातून पदवी मिळवली. मग पत्रकारितेची आवड असल्यामुळे पुण्याला पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि नोकरीनिमित्त मुंबईत आली. तिची बहीण लग्न होऊन मुंबईत राहत होती. तिथेच राहून तिने सुरुवातीच्या काळात व्हरायटी, स्टार डस्ट, ब्लिट्झ अशा ठिकाणी अनेक दिग्ग्जांबरोबर काम केले. शोधपत्रकारिता हीच तिची खरी आवड होती. समाजात होणाऱ्या अन्यायाबद्दल तिला चीड होती. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यावर घाला घालण्याची धमक होती. आणि हाच समान धागा तिला आणि सुरेशला एकत्र येण्यास कारणीभूत झाला.

लग्नाला विरोध होण्याचे कारण नव्हतेच. दोघांचे कुटुंब समकक्ष होते. जातीपातीचा विचार करण्याइतके परंपरावादी नव्हते. सुरेश आपल्याच जातीचा आहे हे तिला लग्न ठरल्यानंतर कळले. दोघेही सच्छील, सरळमार्गाने आपापल्या कार्यक्षेत्रात पुढे जाणारे. सुरेश सारस्वत बँकेत संचालक झाले. ते अनेक समाजोपयोगी कामे करत असत. एक अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांचे नाव होऊ लागले होते. उमादेखील आता टाइम्स ऑफ इंडियामध्ये काम करू लागली होती. घरी सासूबाईंची पूर्ण साथ. अमेय झाला तरी कामात फरक पडला नाही. अनेकदा उशीर होत असे. खतरनाक ठिकाणी जावे लागे, पोलीस, गुंड यांच्या बातम्या द्याव्या लागत. शोधपत्रकारितेत बातमी प्रथमदर्शी आणि ताजी असावी लागते, त्यासाठी खबऱ्यांशी संपर्क ठेवावे लागत. धोका नेहमीचाच, पण उमा कधी घाबरली नाही. १९९३च्या बॉम्बस्फोटाची याकूब मेमनची खबर तिने सर्वप्रथम काढली. दहशतवादी कारवायांची पाळेमुळे खणून काढली. साक्षी-पुरावे गोळा केले. रात्र नाही, दिवस नाही. फोनची सुविधा विकसित नसतानाही तिचा हुरूप आणि धडाडी कमी झाली नव्हती.

तिला एक खंत जरूर वाटते. तिला यायला उशीर झाला की लहानगा अमेय खूप घाबरायचा आणि ती येईपर्यंत घराखाली रस्त्यात उभा असायचा. मुंबईवर आलेल्या प्रत्येक संकटाच्या काळात उमा सच्च्या पत्रकारितेचा एक आदर्श निर्माण करत राहिली. नंतर तिने MBA केले. पहिल्या वर्षाला मुंबई विद्यापीठात ती पहिली आली. प्रसिद्धीच्या क्षेत्रात असूनही उमा स्वत: प्रसिद्धीपासून लांबच राहिली.

उमा, सुरेश आणि अमेय यांच्या सरळमार्गी जीवनात एका दूरध्वनीमुळे वादळ आले. १९९६ साली घरच्या फोनवर एक फोन आला. तत्कालीन मा. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा. तेव्हा सुरेश बाहेरगावी गेले होते. जोशीसरांनी सांगितले, "सुरेशने शिवसेनेतर्फे मालवण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असे साहेबांचे मत आहे. तो निरोप तिने त्याला द्यावा."

सुरेशनी राजकारणात उतरावे याला तिचा आणि सुरेशच्या आईचा सख्त विरोध होता. लोकसभा लढवायची म्हणजे काय खायचे काम आहे का? पैसे कुठून आणणार? घराचे अर्थकारण गडबडणार. सर्व घडी बदलणार! अनेक प्रश्न अनुत्तरित. तसे पाहायला गेले, तर सुरेश समाजकारणात होते, सिद्धिविनायक ट्रस्टमध्ये कार्यरत होते, शिवसेनेतर्फे सामाजिक उपक्रमात जात असत. सरकारी मंडळांवर किवा समित्यांवर काम करत असत, पण सक्रिय राजकारण नको रे बाबा! असाच घरातल्यांचा सूर होता. शिवाय लढायचे ते सिंधुदुर्गातून. समोर मधू दंडवते. मधूजी दंडवते आणि प्रमिलाताई दोघांबद्दल उमाला आदर होता. दंडवते मंत्री होते. दंडवते पतिपत्नीचे साधेपण तेव्हा तिला भावले होते. त्यांच्यासमोर लढायचे?


Suresh Prabhu Biography   

पण सुरेशचा निर्णय झाला होता. एका क्षणात सर्वावर तुळशीपत्र ठेवून ते निवडणूक लढायला तयार झाले. देशासाठी, समाजासाठी काहीतरी करायला मिळणार असेल तर त्यासाठी कितीही त्रास झेलायची त्याची तयारी होती. आणि हे जेव्हा उमाला उमगले, तेव्हापासून तिने पूर्णत्वाने त्यांना साथ दिली. अनेक संकटे आली, पण ते दोघेही एकमेकांच्या साथीने न डगमगता त्यातून बाहेर आले.

जेव्हा १९९६च्या निवडणुकीचे निकाल लागले, तेव्हा अमेय ९ वर्षांचा होता. शाळेतर्फे १५ दिवसांसाठी नेपाळच्या सहलीला गेला होता. मधू दंडवतेंना हरवून सुरेश प्रभू भाजपा-शिवसेना युतीचे खासदार झाले. अटलजी पंतप्रधान झाले. त्यांच्या मंत्रीमंडळात सुरेश मंत्री झाले. उमाला आणि सुरेशला अटलजींबद्दल फार आदर. सुरेश मंत्री झाले. रालोआचे ते सरकार फक्त १३ दिवस चालले. सरकार पडल्याच्या दुसऱ्या दिवशी अमेय सहलीहून परतला. त्याला ह्या सर्व घडामोडींचा पत्ताच लागला नाही. अमेय आज अर्थतज्ज्ञ आहे, त्याचा स्वत:चा व्यवसाय आहे. त्याचे पाय जमिनीवर आहेत, यामागचे कारण सुरेश आणि उमा दोघांचा साधेपणा आहे.

उमाचे आणखी वेगळे रूप पाहायला मिळते ते गणपतीमध्ये. कोकणातल्या सर्वांप्रमाणे त्यांचा गणपती गावी येतो. मोठे घर आहे. उमा स्वत: सर्व स्वयंपाक करते. ते दोघेही देवभोळे आहेत. सर्व परंपरागत पद्धतीने व्हावे असे त्यांना वाटते. अजूनही घरात आलेली स्वकमाईची वस्तू, कागद प्रथम देवापुढे ठेवले जातात. तर गणपतीत मालवणच्या घरी सतत राबता असतो. कोकणातल्या लोकांसाठी दोघांनी खूप केले आहे. मानव संसाधन विकास संस्थेद्वारे व्यावसायिक प्रशिक्षण देणारी जन शिक्षण संस्था १९९९पासून तेथे कार्यरत आहे.

उमा महिलांसाठी आणि युवकांसाठी विविध उपक्रम राबवत असते. आता मानव संसाधन विकास संस्थेद्वारे व्यावसायिक प्रशिक्षण देणारी एक वास्तू कोपरखैरणे येथेही उभी राहिली आहे. येथील गरजू तरुणांसाठी खूप गोष्टी करण्याचा तिचा मानस आहे.

सुरेश रेल्वे मंत्री असताना रेल्वेचा झालेला कायापालट सर्वांच्या ध्यानी आहेच, पण ते प्रथम आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अर्थतज्ज्ञ आहेत. हाती आलेले काम पूर्णत्वास नेणे हाच त्यांचा ध्यास आहे आणि उमाची त्याला संपूर्ण साथ आहे, तेही स्वत:चे करियर, सामाजिक काम, लेखन, अभ्यास सांभाळून.

सध्या सुरेश प्रभू राज्यसभेवर खासदार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या G-20 मोहिमेसाठी अर्थविषयक सल्लागार असा दर्जा असलेल्या शेर्पा या पदावर कार्यरत आहे, तर उमा आपल्या संपादकीय कामात व्यग्र आहे. तिच्याकडे कधीही जा, हसतमुखाने ती तुमचे स्वागतच करेल. ती कदाचित स्वयंपाकघरातून हात पुसत बाहेर येत असेल, घरच्या आंब्यांचा रस आटवून प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून हवाबंद करून फ्रीझरमध्ये टाकत असेल किवा सुरेशना आवडणारा गुळांबा ढवळत असेल.. मध्येच तिला अडवत चमचाभर चाखायचीही परवानगी असेल.

‘आमच्या या सख्ख्या मित्रांना - उमा आणि सुरेशला दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून खूप सारी देशसेवा घडो’ हीच प्रार्थना मी देवाजवळ करेन आणि देव म्हणेल – “व्हय म्हाराजा!”