'निसर्ग'ने दिलेल्या जखमा अद्याप ओल्याच!

स्रोत: विवेक मराठी    दिनांक02-Aug-2020
|
@संतोष टाकळे

'निसर्ग' चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीवरच्या अनेक गावांचं आतोनात नुकसान केलं. या घटनेला तब्बल महिना ओलांडून गेला, तरी अद्याप येथील लोक नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. उद्ध्वस्त झालेल्या नारळी-सुपारीच्या वाड्या, छप्पर उडालेली घरं आणि आतून कोलमडलेला कोकणी माणूस अजूनही सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. या वादळाने या परिसरातील अनेक मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे.


seva_1  H x W:

तब्बल दोन महिने होतील येत्या ३ ऑगस्टला. निसर्ग चक्रीवादळाने रत्नागिरी आणि रायगड ह्या जिह्यांतल्या कोकणाची समुद्रकिनारपट्टी अक्षरशः उद्ध्वस्त केली. लोकांची घरं, गोठे, आंबा-नारळी-पोफळीच्या बागा आडव्या केल्या. अतोनात नुकसान झालं इथल्या माणसांचं. सरकारी यंत्रणा, सेवाभावी संस्था यांच्या प्रयत्नातून इथे मदत पोहोचली खरी, पण खरं तर इथला माणूस पार खचला आहे. डोळ्यासमोर आजही तो विकराळ वारा दिसतो आहे. काही क्षणात होत्याचं नव्हतं झाल्याची ती वेळ आजही अंगावर काटा आणणारी. अगदीच नाही म्हणायला जीव वाचला, पण आता हा सगळा पसारा कसा मोकळा करावा, ढिगाने पडलेले शेकडो नारळ, सुपाऱ्या, झावळ्यांचे खच. आडव्या झालेल्या लागत्या पोफळी, कोलमडलेले माड, मुळासकट आडवी झालेली हापूसची लागती कलमं, फुटलेल्या होड्या, फाटलेली जाळी-पत्रे-कौलांचा खच... आता ह्या सगळ्याचं पुढे करायचं काय? ह्या विचारात आजही इथल्या माणसाला झोप लागत नाही.

वादळानंतर तीन-चार दिवसांनी प्रशासन पोहोचल्याचं इथल्या गावातल्या लोकांनी सांगितलं, त्याबद्दल जेव्हा प्रांताधिकारी यांना विचारलं, तेव्हा ते म्हणाले, "या गावात जाणाऱ्या रस्त्यांवर झाडं आडवी झाली होती, त्यामुळे रस्ते ब्लॉक होते आणि म्हणून इथे पोहोचायला वेळ लागला." दरम्यान महिना उलटून गेला, तरी इथल्या अनेक गावांत वीज आली नव्हती. वीज नाही म्हणून नळपाणी योजनेचं पाणी नाही. महिनाभर लोकांना डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी वणवण करावी लागली. प्रशासनाचे टँकरही गावात चार दिवसांनी येत होते, त्यामुळे तोही पाणीपुरवठा अपुराच होता. मदतीसाठी इथे संपर्क साधायचा म्हटला, तर मोबाइलला रेंज नव्हती. आता तब्बल ५०-६० दिवसांनी काही गावांत वीज पोहोचली आहे. तीही अजून सुरळीत नाही. अगदी आजही इथे मोबाइलला रेंज नाही. त्यामुळे इथल्या कुणाशीही संपर्क साधणं शक्य नाही. तब्बल दीड महिन्यापेक्षा अधिक काळ इथल्या लोकांना वीज, पाणी आणि संपर्काशिवाय राहावं लागलं. त्यातल्या त्यात कलेक्टरांनी तत्काळ इथल्या गावात रेशनवर ५ लीटर रॉकेल मोफत देण्याचे आदेश दिले आणि म्हणून किमान रॉकेलच्या दिव्याने इथल्या घरात उजेड करता आला. दरम्यान महावितरणने रात्रंदिवस काम करून इथे वीज पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. महाराष्ट्रभरातून त्यांनी टीम्स मागवल्या. पण इथली भौगोलिक परिस्थीती पाहता हे काम सोपं नव्हतं.

पंचनामे आणि नुकसानभरपाई

वादळग्रस्तांचं किती नुकसान झालं, याचं सर्वेक्षण आणि पंचनामे करण्याचं काम अत्यंत ढिसाळपणे, सुस्तपणे व दिशाहीन पद्धतीने झालं. सर्वेक्षणाची एक प्रत वादळग्रस्तांना देणं गरजेचं होतं. अशी प्रत वादळग्रस्तांना दिली गेली नाही. त्यामुळे सर्वेक्षणाला पारदर्शकता आली नाही व वादळग्रस्तांच्या मनात अनेक संशय निर्माण झाले. सरकारने तातडीने प्रत्येक वादळग्रस्ताच्या बॅंक खात्यात १५,०००/- रुपये जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याची पूर्तता अगदीच आंशिक झाली. त्यामुळे वादळग्रस्तांना हवा तो दिलासा मिळालाच नाही.

नुकसानग्रस्त भागात सरकारी पंचनामे आणि सर्वेक्षणं झाली, तीही १० ते १२ दिवसांनी, त्यातही बरेच पंचनामे सदोष असल्याचं इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. दापोलीतल्या हर्णे इथल्या मच्छीमार वस्तीत चुकीचे पंचनामे केल्याचा आरोप गावकाऱ्यांनी केल्याने दापोलीच्या तहसीलदारांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं, इतका यात गोंधळ आहे. काहींचे तर पंचनामेच झाले नाहीत. यापूर्वी आलेल्या फयाण वादळात त्रोटक मदत मिळाली होती, तशीच मदत या वेळी मिळेल तशी बतावणी करून पंचनामे करायला आलेल्यानी पंचनामे केले नाहीत, अशाही घटना झाल्याचं नुकसानग्रस्त भागातल्या लोकांनी आम्हाला सांगितलं. यात बहुतेक किरकोळ नुकसानग्रस्त असल्याने अधिकचं काम वाचवण्यासाठी, पंचमाने करणाऱ्यांनी कदाचित ही युक्ती केली असावी. दापोली तालुक्यातील आडे ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक, सरपंच व क्लार्क या तिघांनीं तर सर्व पंचनामे ग्रामपंचायतीमध्ये बसून केलेले आहेत. या तिघांनीं गावातील काही लोकांशी संगनमत करून त्यांच्या मर्जीतील लोकांचे व नातलग यांचे अर्ज भरून सरकारकडून वादळग्रस्तांच्या नावाने जास्त सरकारी मदत मिळवून दिलेली आहे. काही लोकांची घरं पक्की व स्लॅबची आहेत, ज्यांचं नुकसान झालेलं नव्हतं, तरीही ग्रामपंचायतमधील या पदाधिकारी, अधिकारी यांच्यामुळे त्यांना १,६०,०००/- रुपये इतकी जास्त मदत मिळाली आहे. या तिघांनी सरकारची फसवणूक केली असल्याचं इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. यामुळे ज्यांचं प्रत्यक्ष नुकसान झालं आहे, त्यांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवण्यात आलं आहे.


seva_1  H x W:

बाकी या पंचनाम्यांच्या गोंधळाइतकाच पंचनाम्याचा फॉर्मही गोंधळात टाकणारा होता - म्हणजे अगदीच मोघम माहिती भरता येईल असा. त्यामुळे सविस्तर नुकसानाची नोंद त्यात करता आली नाही. अनेक गावांत तर इतर ग्रामसेवक तलाठी यांच्या मदतीकरिता शासकीय विभागातल्या कर्मचाऱ्यांना आणि कोरोनामुळे शाळा बंद असल्याने शालेय शिक्षकांनादेखील पंचनामे करण्याचं काम देण्यात आलं होतं. यांना विशेषतः महसूल विभागाच्या नुकसानाच्या नोंदी कशा असतात, त्यांची आकडेमोड कशी करायची असते याची अजिबात कल्पना नसल्याने त्यांनी केलेल्या पंचनाम्यात असंख्य त्रुटी आहेत. काहींनी यात नावाच्या, बँक खात्याच्या अशा महत्त्वाच्या नोंदी चुकवल्याने अनेकांच्या मदती अडकल्या आहेत. त्यात यांच्या मूल्यमापनातही चुका झाल्याने ज्याचं ३०-४० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालंय, त्यांनाही १० ते २० टक्क्यांचीच नुकसानभरपाई मिळाल्याची तक्रार आहे. काहींचं किरकोळ नुकसान होऊनही त्यांच्या खात्यात एक लाख साठ हजार अशी पूर्ण नुकसानभरपाई असलेली रक्कम जमा झाली आहे. आणि दुसरीकडे आजही किनारपट्टी भाग सोडला, तर आतल्या गावांमध्ये अनेकांच्या खात्यात तत्काळ मदत म्हणून सरकारने जे पंधरा हजार जाहीर केले होते, त्यातला एकही रुपया जमा झालेला नाही. एकंदरीत सरकारी अनास्था, स्थानिक प्रशासनाचा ढिम्म कारभार या कठीण काळात इथल्या लोकांना सहन करावा लागतोय आणि इतकं सगळं सहन करूनही ज्यांना मदत मिळली, तीही अत्यंत तोकडी आहे. म्हणजे ज्याचं संपूर्ण घर उद्ध्वस्त झालंय, त्यांना एक लाख साठ हजार रुपये इतकी मदत मिळणार आहे आणि अर्थात एक लाख साठ हजारात पुन्हा घर उभं करण शक्य नाही. बागायतीच्या नुकसानाची मदत तर पडलेली झाडं बाजूला करून बाग साफ करण्याची मजुरी देता येईल इतकीही नाही. आधी सरकारने प्रतिहेक्टरी ५० हजार इतकी मदत जाहीर केली होती. पण त्यानंतर झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत, नष्ट झालेल्या नारळाच्या प्रतिझाडाला २५० रुपये आणि सुपारीच्या प्रतिझाडाला ५० रुपये अशी अगदीच किरकोळ मदत देण्याचा निर्णय झाला. आता ही मदत कोणत्या हिशोबाने आणि कोणत्या निकषानुसार ठरवली, की सरकारची चेष्टा चालू आहे? असा प्रश्न नुकसानग्रस्तांना पडला आहे. आम्ही हर्णे, मुरूड, आंजर्ले, आडे, उटंबर, केळशी आणि मंडणगड तालुक्यातील शेवटचं टोक असलेलं आणि मच्छीमार वस्ती असलेलं वेशवीतलं वाल्मिकी नगर हे गाव इथे प्रत्यक्ष मदत घेऊन गेलो, तिथल्या लोकांशी बोललो.

इथल्या कोळी लोकांच्या समस्या वेगळ्या आहेत. कोरोनाच्या लॅाकडाउनमुळे त्यांचा धंदा मार्चपासून चांगलाच बसला आहे. त्याअगोदरपासून छोटे मासेमार कोळी बड्या मासेमार कोळ्यांच्या L.E.D. पद्धच्या मासेमारीने त्रस्त झालेले होतेच. L.E.D. पद्धतीत आपण LEDचे टॉर्च वापरतो, तसे खूप मोठे LED प्रकाशझोत रात्रीच्या वेळी एका होडीतून समुद्रातील पाण्यात सोडले जातात. मासे प्रखर प्रकाशाला दिपतात, भांबावतात व एकाच ठिकाणी स्थिर राहतात. दुसऱ्या होडीतून जाळं टाकून मासे पकडले जातात.


seva_1  H x W:

वादळामुळे निर्माण झालेल्या प्रचंड लाटांनी किनाऱ्यावर प्रचंड प्रमाणात वाळू ओढून आणली. त्यामुळे किनाऱ्याला लावलेल्या काही होड्या वाळूत पुरत्या फसल्या आहेत. त्या ड्रेजरच्या मदतीशिवाय बाहेर काढणं शक्य नाही. खाडीतून वाळू उपसा करण्यासाठी क्रेन व इतर यांत्रिक उपकरणं असलेली मोठी होडी म्हणजे ड्रेजर. पावसामुळेही आता मासेमारी बंद आहे. त्यामुळे कसलीच आर्थिक उलाढाल नसल्याने, पुढे करायचं काय? असा इथल्या अनेक कुटुंबांना मोठा प्रश्न पडला आहे. शिवाय ज्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत, त्याही कुटुंबांना बागेतून येणारं उत्पन्न आता पुढची काही वर्षं मिळणार नाही. उत्पन्न नाही म्हणजे इथल्या बागेत मजुरी मिळणार नाही. इथल्या बऱ्याच लोकांकडे मजुरी, बागायती आणि शेती याव्यतिरिक्त उत्पन्नाचं दुसरं कोणतंच साधन नाही. शिवाय जी झाडं वाचली आहेत, त्यांच्यावर बागेतून येणारं उत्पन्न अवलंबून आहे. नवीन लागवड आणि त्याचं उत्पन्न याला मोठा काळ द्यावा लागणार आहे. यातल्या अनेकांच्या कुटुंबांतील मुलं नोकरीनिमित्त मुंबई, पुणे या आणि इतर शहरांत होती. पण कोरोनाने शहरात काम करणारी तरुण पोरंसुद्धा गावात आणून ठेवली आहेत. म्हणजे किमान त्यांच्याकडून येणाऱ्या काही पैशांचा आधार होता, तोही आता नसल्यात जमा आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकण किनारपट्टी भागात निसर्ग चक्रीवादळामुळे खूप मोठी आपत्ती आली. या वादळामुळे मनुष्यहानी झाली नसली, तरी वित्तहानी खूप मोठ्या प्रमाणात झाली. दापोली, मंडणगड, श्रीवर्धन, मुरूड, म्हसळा इत्यादी तालुक्यांना या वादळाचा मोठा तडाखा बसला. कोणत्याही आपत्तीत संघस्वयंसेवक मदतीसाठी उभा राहत असतो, हा समाजाचा अनुभव आहे. निसर्ग चक्रीवादळानंतर तातडीने मदतकार्य सुरू केलं गेलं, ते अजूनही चालू आहे. अन्नपाकिटांच्या आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणाने या मदतकार्याची सुरुवात झाली आणि मग जी जी आवश्यकता लक्षात येईल ती पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. वादळामुळे पडलेल्या झाडाच्या फांद्या कापण्यासाठी संघस्वयंसेवकांनी अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून रस्ते, मंदिर, शाळा इत्यादी ठिकाणी पडलेली झाडं कापली. या आपत्तीने बाधित झालेल्या गावांचं सर्वेक्षण केलं गेलं. घरदुरुस्तीसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू बाधित बांधवांना उपलब्ध करून देण्यात आल्या. सुरुवातीला पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता युद्धपातळीवर करावी लागली. वादळानंतर साफसफाई करून घेण्यासाठी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांत विविध तालुक्यांतील संघस्वयंसेवकांनी काम केलं. घर, पाणवठे, विहिरी, बागा स्वच्छ करण्यासाठी खूप परिश्रम घेतले गेले. कौलं, पत्रे यांचं वाटप करण्यात आलं. अजूनही या आपत्तीतून किनारपट्टीवरचे हे तालुके सावरलेले नाहीत. शासकीय व्यवस्थेतून मदत होते आहे, पण ती मर्यादित आहे. संघाच्या माध्यमातून आपत्तिग्रस्त गावाचं सर्वेक्षण करण्यात येत आहे. काही ठिकाणी नारळी-पोफळीची रोपं वाटली आहेत. अजून वेगवेगळ्या गावांमध्ये मदत आणि पुनर्वसन यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर काम चालू आहे. संघविचार परिवारातील विविध संस्था आणि समाजहितैषी सामाजिक संस्था या कामात सहभागी आहेत.
 
 
 
कठीण काळातली लूट

वाड्यांची साफसफाई करणं, झाडं तोडणं, ती एका बाजूला ठेवणं व साफ झालेल्या जागेत पुन्हा लागवड करणं ही आव्हानात्मक कामं आहेत. स्थानिक पातळीवर ही कामं करणाऱ्यांनी त्यांची मजुरी लगेचच दिवसाला ३००/- रुपयांवरून ५०० रुपयांवर चढवून ठेवली आहे. यांत्रिक कटर अॅापरेटर अव्वाच्या सव्वा पैशाची मागणी करत आहेत. आम्हाला आडे व आंजर्ले गावात फक्त एकेका दिवशी दोन दोन तास कटर उपलब्ध होऊ शकला. वादळानंतर लगेचच मॅान्सूनचे वेध लागले होते, म्हणून परिसरात ज्यांची भातशेती आहे, ते त्यांच्या शेतकामात गुंतले गेले. त्यामुळेही वाडीवाल्यांना कामगार मिळणं अवघड झालं. परजिल्ह्यातून व परराज्यातून आलेला बराचसा मजूरवर्ग कोरोना लॅाकडाउन काळात आपापल्या गावी गेला. त्यामुळेही कामगारांची चणचण भासत आहे.

अजूनही अनेकांच्या वाड्या तशाच पडून आहेत. काहींनी स्वतः मेहनत करून त्या साफ केल्या, तर ज्यांना मजूर करून शक्य आहे त्यांनी मजूर करून त्या मोकळ्या केल्या. पण या कठीण काळात लोकांनी मजुरीचा आकडा वाढवल्याने काही छोट्या बागायती करणाऱ्या ज्यांच्या घरा-गोठ्यावर झाडं पडली आहेत, अशांना मजूर करणं परवडणारं राहिलं नाही. आम्ही ज्या दापोली तालुक्यातील आडे आणि आंजर्ले गावात श्रमदान केलं, त्या गावातही आम्हाला वूडकटरवाल्यांनी काही वाट्टेल ती रक्कम सांगितली. पण मदतकार्यासाठी इतक्या लांबून टीम्स आल्या होत्या, त्यामुळे काम थांबू नये म्हणून आम्ही वर्गणी काढून ती रक्कम दिली. वादळानंतरच्या दोन-चार दिवसांत तर झाडं कापणाऱ्या कटरवाल्यांनी माणुसकी सोडून लोकांकडून पैसे घेतल्याचं इथल्या अनेकांनी सांगितलं. त्याबद्दल तक्रारी झाल्या आणि मग प्रशासनाने इथल्या ग्रामपंचायतीना कटर घ्यायची परवानगी दिली. बरं, फक्त मजुरांनी आणि वूडकटरवाल्यांनीच ही लूट केली असं नाही, तर वादळाआधी सिमेंटचा एक पत्रा ५५० रुपयांत मिळत होता, तो वादळानंतर ६५० ते ८०० रुपये या किमतीला व्यापारी विकत होते. २००० रुपयांना मिळणारी प्लास्टिकची ताडपत्री ४०००ला विकली जात होती. कौलं तर बाजारात उपलब्ध नव्हती. ज्या व्यापाऱ्यांकडे ती होती, त्यांनी तीही पैसे वाढवून विकली. अगदी वाणसामान या जीवनावश्यक वस्तू, मेणबत्त्या, काडेपेटीसुद्धा इथल्या स्थानिक दुकानदारांनी चढ्या भावात विकल्याची तक्रार इथल्या लोकांनी तहसीलदारांकडे केली आणि लोकांचा वाढता रोष पाहता प्रशासनाला त्या दुकानदारांवर कारवाई करावी लागली. या सगळ्या गोंधळात ग्रामपंचायतीने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचं इथल्या लोकांनी सांगितलं आणि आम्ही ते स्वतः अनुभवलंदेखील. ज्या ज्या गावात आम्ही मदत घेऊन जात होतो, तिथल्या ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला म्हणावं तस सहकार्य केलं नाही - म्हणजे फक्त वादळ येणार असल्याचा अलर्ट देण्यासाठी रिक्षा फिरली आणि त्यानंतर नुकसानग्रस्त भागातल्या कित्येक गावांत पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी थेट पंचनामा करतेवेळी तोंड दाखवल्याच लोकांनी सांगितलं. त्यामुळे ह्या लुटणाऱ्या व्यापाऱ्यांकडे स्थानिक प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे या व्यापाऱ्यांचं अधिक फावलं आणि वादळ येऊन गेल्यानंतर ही लूट काही दिवस चालू राहिली.

सेवाभावी संस्थांची मदत

वादळानंतर जो हाहाकार उडाला, त्यात लोकांना धीर द्यायला अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या. त्यांनी तत्काळ जी मदत हवी आहे ती मदत देण्यासाठी प्रयत्न केले. यात कोल्हापूरच्या सिद्धगिरी कणेरी मठाच्या माध्यमातून पत्रे, कौलं, ताडपत्र्या, मेणबत्त्या, अन्नधान्याची किट्स याची तत्काळ मदत पोहोचली. अर्थात सगळ्याच ठिकाणी आणि सगळ्याच लोकांना ही मदत देणं शक्य झालं नाही, पण अगदी गरजू लोकांना कणेरी मठाच्या माध्यमातून मदत मिळाली. दरम्यान समाजसेविका मेधा पाटकर यांनी नुकसानग्रस्त गावांमध्ये जाऊन लोकांची परिस्थिती जाणून घेतली आणि प्रांत अधिकारी यांना लोकांच्या मागण्यांचं निवेदन दिलं. काही गावांत पंचनामे झाले नव्हते किंवा जे नीट झाले नसल्याचं इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं होतं, तिथे त्यांच्या निवेदनानंतर पुन्हा पंचमाने करण्याचं आश्वासन प्रांतांनी दिलं. काही गावांत पाण्याचा टँकर चार दिवसांनी जात होता, तिथे किमान दोन दिवसांनी पाणी पोहोचेल याची खात्री दिली.


seva_1  H x W:

त्याचबरोबर राष्ट्र सेवा दल, AIRSO, रोटरी क्लब, Yumetta Foundation, महाराष्ट्रभरातले काही सामाजिक गट, स्थानिक सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक कट्टे, पेन्शनर मंडळ, अगदी महिलांची भजनी मंडळीसुद्धा या सगळ्यांनी अन्नधान्य, पिठं, पाण्याच्या बाटल्या, मेणबत्त्या, सॅनिटरी नॅपकिन, चादरी, चटया.. जे जे शक्य असेल ते ते दिलं. त्यात आणखी एक उल्लेखनीय मदत म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून कै. कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान आणि अखिल चित्पावन विद्यार्थी साहाय्यक मंडळ, रत्नागिरी यांच्या माध्यमातून निसर्ग वादळग्रस्त शेतकऱ्यांना नारळाच्या आणि सुपारीच्या रोपांचं वाटप करण्यात आलं. खरं तर अशा अनेक संघटना-संस्था या मदतकार्यात सहभागी होत्या. सगळ्यांची माहिती उपलब्ध नसल्याने त्यांचा उल्लेख इथे करता येत नाही, पण त्यांचंही काम इथल्या लोकांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी उल्लेखनीय होतं.

सांगली-मिरज इथून आलेल्या सदाशिव मगदूम आणि त्यांच्या राष्ट्र सेवादलाच्या टीमने, मुंबईतून आलेल्या अक्षय पाठक यांच्या A.I.R.S.O. (All India Revolutionary Students Organization) ह्या विद्यार्थी संघटनेच्या तरुणांनी गरजू लोकांच्या बागेत चार दिवस सलग श्रामदानही केलं. खरं तर कोरोनाची भीती असताना ही सगळी तरुण मुलं गावात आली, त्यांना जमेल ते काम त्यांनी केलं. मदत करायची त्यांची धडपड बघून इथले लोक भारावून गेले. काही काळ इथल्या लोकांना धीर आला. आपण एकटे पडलो आहोत ह्या मानसिकतेतून ते थोडे बाहेर आले आणि आणखी एक म्हणजे, बाहेरून येणारी तरुण पोरं गावात राबताहेत हे बघून इथल्या गावातली तरुण पोरंही या मदतकार्यात सामील झाली. अक्षय पाठकच्या टीमबरोबर तर गावातली लहान लहान पोरं एकत्र आली आणि मदतकार्यात आम्हलासुद्धा घ्या म्हणून कामाला तयार झाली. अशा अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या आणि मग हळूहळू इतर ठिकाणांहूनदेखील लोक श्रमदान करायला येऊ लागले. पण नुसत्या टीम येऊन भागत नाही. त्यांचं नियोजन, त्यांची राहण्याची-खाण्याची व्यवस्था आणि कोरोनामुळे इतर जास्तीची काळजी घेण्याची जबाबदारी घ्यावी लागते, जी इथले स्थानिक सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते आणि लेखक विकास घारपुरे आणि समीर साने यांनी घेतली आणि श्रामदान योग्य ठिकाणी करता आलं.

माध्यमांचं दुर्लक्ष

माध्यमांनी ह्या आपत्तीची म्हणावी तितकी दखल घेतली नाही. एका वृत्तवहिनीच्या प्रमोशन प्रोमोमध्ये तर निर्सग चक्रीवादळ ते राजकारण्यातल्या वादळाचा आढावा घेणाऱ्या सगळ्या बातम्या अशी टॅग होती. फार वाईट वाटलं हे ऐकून. लोकांची आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या वादळाची तुम्ही टॅगलाइन करता... कठीण आहे! शहरातल्या माध्यमांचं राहू द्या, इथल्या स्थानिक मोजक्या पत्रकारांनी बातम्या केल्या, पण बाकी बहुतेकांनी फक्त नेत्यांचे दौरे कव्हर केले. त्यामुळे ग्राउंड रिपोर्टिंग झालं नाही. बाकी महाराष्ट्रात इतर ठिकाणी आपत्तीच्या वेळी जितकं कव्हरेज होतं, रिलीफ फंड जमा करण्यासाठी माध्यमं सरसावतात, रोज नवे अपडेट देत अगदी बंबार्डिंग होत आणि लोकांनाही याचं गांभीर्य लक्षात येतं, यातलं काहीही या निसर्ग चक्रीवादळानंतर झालं नाही, हे दुर्देवाने खरं आहे.


seva_1  H x W:

नुकसानग्रस्तांच्या रोजगाराचा प्रश्न

ह्या वादळाने जे अनेक प्रश्न उभे केलेत, त्यात मोठा प्रश्न आहे तो रोजगाराचा. स्थानिकांना मजुरी, दुकानं, हॉटेल्स आणि इतर ठिकाणच्या छोट्या-मोठ्या नोकऱ्यांशिवाय पर्याय नाही. इथे कोकणात नारळी-फोफळी, आंबा, काजू, फणस, कोकम याचं विक्रमी उत्पादन असूनही त्या तुलनेत प्रक्रिया उद्योग नाहीत. लघुउद्योगांच्या सोसायट्या नाहीत. त्यांची प्रशिक्षण केंद्रं नाहीत. कर्ज कसं घ्यावं, उद्योग कसा उभारावा याची माहिती केंद्र नाहीत. इतकंच काय, इथलं कृषी विद्यापीठ जागतिक कीर्तीचं असूनही इथल्या परिसरात त्याची किमया दिसत नाही. आता यात सगळाच दोष यंत्रणांचा नाही. इथल्या माणसांचाही आहे. दरम्यान ज्यांनी खेटे घालून का होईना, जे पदरात पाडून घेतलं, त्यांची अजूनही धडपड चालू आहे. एकंदरीत स्वयंरोजगार, फळप्रकिया केंद्र, आपत्तिग्रस्तांसाठीच्या विशेष योजना आणि इतर रोजगार देणाऱ्या लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांचा विचार अतिशय गांभीर्याने झाला नाही, तर पुन्हा इथला तरुण शहरात विस्थापित होईल. गावात आहे ती परिस्थिती कायम राहील आणि या वादळाने जी गावं १५-२० वर्षं मागे लोटली आहेत, ती आणखी खोलात जातील.

येत्या काळात येणाऱ्या संभाव्य वादळांसाठी उपाययोजना

फयाण आणि आता निसर्ग चक्रीवादळ हे काही शेवटी वादळं नव्हेत. येत्या काळात येणाऱ्या संभाव्य वादळांचा धोका पाहता आता यापुढे पश्चिम किनारपट्टीवर अधिक सजग राहण्याची गरज आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या उपाययोजनांना गांभीर्याने घेत त्या तत्काळ राबवल्या पाहिजेत. यात विशेषत: घरांच्या छापराची ठेवण, नवीन बांधणीच्या घरांमधील अपेक्षित बदल, घरालगत असणाऱ्या झाडांचं नियोजन आणि यापुढील लागवडीत सुचवलेले बदल, बागेतली घरं मोकळ्यावर आणण्याची सूचना अशा सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. वास्तुविशारदांचा एक मोठा गट यावर काम करतो आहे. लवकरच ते याबद्दल त्यांची निरीक्षणं लोकांसमोर मांडतील.

पण आता येत्या काळात कोकणात फक्त नारळ, सुपारी, काजू, आंबा या पारंपरिक पिकांच्या लागवडीवर विसंबून चालणार नाही, तर आता कोकणातही केरळ राज्याप्रमाणे 'स्पाइस गार्डन', बागायती उत्पादनावर प्रक्रिया उद्योग, त्याच्या स्वतंत्र सोसायट्या यात महिलांना प्राधान्य देत बचत गटांचे फसलेले उपक्रम नव्याने बाजारातल्या मागणीनुसार अधिक प्रामाणिक आणि जबाबदारीने पुन्हा सुरू व्हायला हवेत. शिवाय कोकणात व्यावसायिक भाजीपाला शेती, फुलं शेती, मधुमक्षिकापालन, शेळीपालन, गावठी वाणाचं कुक्कुटपालन, प्रचंड मागणी असणारं अळंबी उत्पादन आणि चांगला आर्थिक परतावा देणारे असे अनेक शेती आणि तत्सम उत्पादनांच्या उद्योगाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आम्ही ज्या गावात फिरलो, तिथल्या तरुणांची गावात उद्योग हवा अशी मागणी होती, ज्याकडे प्रशासनाने आता आपत्तिग्रस्त म्हणून तरी विशेष लक्ष द्यायला हवंय.

येत्या काही दिवसांत इथलाही माणूस हे सगळं विसरेल. जे घडलंय त्याला काळ मागे टाकेल. निसर्ग चक्रीवादळाची नोंद कायम असेल. त्याच्या खुणा मात्र कायम रुतून राहतील या माणसांच्या मनाच्या काठाशी आणि इथल्या मातीत पुन्हा नव्याने रुजणाऱ्या त्या प्रत्येक नारळी-पोफळीच्या तळाशी.


९१६७६९४९२२


दापोली, रत्नागिरी.

[email protected]