देवा तूंचि गणेशु

विवेक मराठी    21-Aug-2020   
Total Views |
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो सांस्कृतिक उत्सवाचा एक भाग आहे. गणेश ही देवता, विश्वाची देवता आहे. कुठल्या एका संप्रदायाची देवता नाही. आपल्या देवतांत जी वैश्विकता आहे, तिचे स्मरण यानिमित्ताने केले पाहिजे


ganpati_1  H x
 
हिंदू धर्म रिलीजन आहे की जीवनपद्धती? रिलीजनचा कुणीतरी संस्थापक असतो. त्याचा एक सर्वमान्य ग्रंथ असतो आणि पूर्ण विश्वास ठेवण्याची मूल्ये असतात. या अर्थाने हिंदू नावाचा रिलीजन नाही. त्याचा कुणी संस्थापक नाही, सर्वमान्य असा एखादा धार्मिक ग्रंथ नाही; विश्वास ठेवावा अशी अनेक मूल्ये आहेत, निर्गुणाची उपासना करणारा, सगुणाची उपासना करणारा आणि या दोन्ही गोष्टी नाकारणारा केवळ भौतिकवादी सगळेच हिंदू असतात. हिंदू ही जीवनपद्धती आहे. ती सर्वसमावेशक आणि सर्व मतांचा आदर करणारी आहे.

या जीवनपद्धतीची वैशिष्ट्ये अशी आहेत -
* आध्यात्मिकता तिचे अधिष्ठान आहे.
* परिवार तिचा आधार आहे.
* पर्यावरण तिचे कवच आहे.
* कर्तव्याचरण हा तिचा मार्ग आहे.
* वैश्विकता तिची व्यापकता आहे.
* सांस्कृतिक उत्सव ही या सर्वांची अभिव्यक्ती आहे.


आता साजरा होणारा गणेशोत्सव या सांस्कृतिक उत्सवाचा एक भाग आहे. तो केवळ धार्मिक उत्सव नाही. प्रत्येक परिवाराची धार्मिक कर्मकांडे असतात. त्या त्या परिवाराच्या कुलधर्माप्रमाणे ती पार पाडली जातात. या कर्मकाडांच्या पलीकडे जाऊन गणेशपूजनाची व्यापकता समजून घ्यावी लागते.

या पूजनाचे आध्यात्मिक अधिष्ठान सर्वव्यापक कर्मतत्त्वाचे आहे. अथर्वशीर्षात ते व्यक्त झालेले आहे.
'त्वमेव प्रत्यक्षं तत्वमऽसि।।
त्वमेव केवलं कर्ताऽसि।
त्वमेव केवलं धर्ताऽसि।।
त्वमेव केवलं हर्ताऽसि।
त्वं प्रत्यक्षं ब्रह्माऽसि।
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि।।
असा भाव या मंत्रातून व्यक्त झालेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचा प्रारंभ गणेशस्तवनाने केलेला आहे. गणेश म्हणजे ओमकाराचे रूप आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
"अकार चरणयुगुल ।
उकार उदर विशाल ।
मकार महामंडल ।
मस्तकाकारें।।


हे तिन्ही एकवटले|
तेथ शब्दब्रह्म कवळले|
ते मियां गुरुकृपा नमिले| आदिबीज||"

या आदिबीजाला 'देवा तूंचि गणेशु' असे ज्ञानदेव म्हणतात, एवढी व्यापकता या गणेशात आहे. या सर्वांचे प्रतीक म्हणून गणेशपूजन करायचे.

हा उत्सव परिवाराला बांधून ठेवणारा उत्सव आहे. गणपतीच्या दिवसात परिवारातील सर्व सदस्य एका घरी एकत्र येतात, खेळीमेळीने राहतात, एकमेकांच्या सुखदुःखाची चिंता करतात, पारिवारिक कर्तव्यांचे पालन करतात. परिवाराचा हा आनंदोत्सव असतो.

पर्यावरणाचे रक्षण हे या पूजेचे कवच आहे. सर्वशक्तिमान परमेश्वराची पूजा श्रद्धेने आणि मनोभावे केली, तर ती त्याला पोहोचते हे खरे असले, तरी पूजा करताना अनेक प्रकारच्या वस्तू लागतात. विविध प्रकारची फळे, फुले, विविध प्रकारच्या पत्री, विविध प्रकारची सुगंधी द्रव्ये, दूध-दही लागते. या सर्व वस्तूंचा निर्माता 'आदिबीजच' असतो. त्याला या गोष्टींची काही आवश्यकता नसते, आवश्यकता आपल्याला असते. फळे, फुले, पत्री, दूध, दही, मध, अशा सर्व वस्तू पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या असतात. फळे, फुले, पत्री मिळण्यासाठी झाडे लावावी लागतात. त्याचे रक्षण करावे लागते. दुधासाठी गायी-म्हशींचे पालन करावे लागते. फुलांतून मधमाश्या मध गोळा करतात, त्यांचे रक्षण करावे लागते. या सर्वांचा संबंध आपल्या आरोग्याशी आहे. गणेशपूजन करताना याचे स्मरण करायला पाहिजे आणि जीवनात त्याचे पालन करायला पाहिजे.

गणेशाला विघ्नहर्ता, बुद्धिदाता, समृद्धीदाता अशी अनेक विशेषणे लावली जातात. समाजजीवनात विघ्ने असू नयेत, जीवन निर्विघ्न असावे असे वातावरण निर्माण करण्याचे सामर्थ्य गणेशात आहे, अशी आपली श्रद्धा आहे. बुद्धीशिवाय मानवी जीवनाला अर्थ नाही. प्राणिसृष्टीत केवळ मनुष्यालाच बुद्धीचे वरदान लाभलेले आहे. बुद्धी दोन प्रकारची असते. एक बुद्धी वाईट कर्म करायला लावते आणि दुसरी बुद्धी चांगले कर्म करायला लावते. म्हणून गणेशाकडे आपण सद्बुद्धीची मागणी करतो. ही मागणी सर्वांसाठी असते. केवळ विशिष्ट उपासना पंथ स्वीकारणाऱ्यांसाठी नसते. गणेशाला विनायक म्हणतात. तो दैवी शक्तीचा नेता आहे. या दैवी शक्तीचे संवर्धन व्हावे, यासाठी गणेशपूजन करायचे. गणेश हा शिव-शक्तीचा पुत्र आहे. शिव म्हणजे मंगलदायक. त्याचे रक्षण करण्यासाठी शक्ती पाहिजे. शिव-शक्तीचे प्रतीक म्हणजे गणेश.

गणेश देवता ही समृद्धी देणारी देवता आहे. आज ज्याला आपण विकास म्हणतो आणि त्यासाठी कल्याणकारी योजना आखतो, उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करतो, यातूनच समृद्धी निर्माण होते. समृद्धी केवळ प्रार्थना करुन, निष्क्रिय राहून होत नाही. त्यासाठी शक्तीचा, बुद्धीचा वापर करावा लागतो. या शक्ती-बुद्धीचा विकास आमच्यात व्हावा, म्हणून गणेशपूजन करायचे असते.

अशी ही देवता विश्वाची देवता आहे. कुठल्या एका संप्रदायाची देवता नाही. आपल्या देवतांत जी वैश्विकता आहे, तिचे स्मरण आपण केले पाहिजे. नटराजाच्या मूर्तीत मूलकणांचा उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचा वैश्विक नाच फार सुंदररित्या व्यक्त झालेला आहे, असे क्वांटम फिजिक्सचे वैज्ञानिक आज सांगतात. क्वांटम विज्ञानाचे संशोधन ज्या वैश्विक प्रयोगशाळेत चालू आहे, तेथे नटराजाची मूर्ती ठेवलेली आहे. ओमकाराचे, शब्दब्रह्माचे, आदितत्त्वाचे प्रतीक असलेली गणेशाची प्रतिमा ही अशीच वैश्विक देवता आहे. आपली पूजा विश्वदेवतेची, म्हणून विश्वकल्याणाची, मानवी कल्याणाची असते. मोदक खाताना आपण याचे स्मरण केले पाहिजे.