पद्मविभूषण पं. जसराज - एका स्वर्गीय गायकीचे स्मरण

स्रोत: विवेक मराठी    दिनांक21-Aug-2020
|
@डॉ. विनोद ठाकूरदेसाई

 
सोमवार, दिनांक १७ ऑगस्टला न्यू जर्सी अमेरिका येथे वयाच्या ९०व्या वर्षी पं. जसराजजींचे दुःखद निधन झाले. ही वार्ता जेव्हा प्रसारित झाली, त्या वेळी त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीची जणू संपूर्ण चित्रफीत एका क्षणात डोळ्यासमोर सरकली. 

seva_1  H x W:


‘ॐ श्री अनंत हरी नारायण’ अशी ईश्वराची आळवणी करणारे धीरगंभीर स्वर कानावर येतात आणि संपूर्ण सभागृहात नीरव शांतता पसरते.. मंचावर अनेक वर्षे संगीताची साधना केलेले ॠषितुल्य व्यक्तिमत्त्व, डोळे मिटलेले.. जणू समाधी लागली आहे असे दृश्य. १६ नोव्हेंबर १९९१ची ती राजर्षि शाहू संगीत रजनी. शिवाजी विद्यापीठ ललितकला विभागाच्या विद्यमाने आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायक-वादकांची संगीत मैफल कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित केली होती. पं. ब्रिजनारायण यांच्या सरोदवादनाने या रजनीची सुरुवात झाली होती. त्यानंतर पं. राजन-साजन मिश्रा यांचे बहारदार गायन झाले. नंतर उ. सुलतान खाँ यांचे सारंगीवादन झाले. खाँसाहेबांच्या सुरेल सारंगीवादनानंतर उ. अल्ल्लारखाँ यांचे - त्यांच्या वयाच्या ७३व्या वर्षी एक परमोच्च उत्कर्षबिंदू गाठणारे असे एकल तबलावादन झाले. एव्हाना पहाट कधीच झाली होती आणि संगीत रजनीच्या अखेरच्या क्षणी पं. जसराजजींचे मंचावर आगमन झाले. पंडितजींनी भैरव रागाने आपल्या गायनाची सुरुवात केली. गमकयुक्त धीरगंभीर रिषभ-धैवताच्या लगावाने व आर्त पुकाराने संपूर्ण सभा स्तिमित झाली. यानंतर ललत राग आणि जसराजजींनी तोडी रागाने या शाहू संगीत रजनीच्या मैफलीची सांगता केली. ‘अल्ला जाने अल्ला जाने’, ‘चलो सखी सौतन के घर जैय्ये’ अशा एकापेक्षा एक सरस अशा बंदिशींनी अवघा श्रोतृवर्ग स्वरचिंब होऊन गेला. पंडितजींचे ते गायन संपूच नये असे वाटत होते, इतके ते स्वर्गीय सुख देणारे होते. कोल्हापूरला पंडितजींचे अनेक वेळा गायन झाले, पण राजर्षि शाहू संगीत रजनीच्या निमित्ताने त्यानी गायलेला भैरव आजही रसिकांच्या मनामध्ये ताजातवाना आहे.


सोमवार, दिनांक १७ ऑगस्टला न्यू जर्सी अमेरिका येथे वयाच्या ९०व्या वर्षी पं. जसराजजींचे दुःखद निधन झाले. ही वार्ता जेव्हा प्रसारित झाली, त्या वेळी त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीची जणू संपूर्ण चित्रफीत एका क्षणात डोळ्यासमोर सरकली. कधीतरी लहानपणी ‘पवनपूत हनुमान’ ही हंसध्वनीतील बंदिश असणाऱ्या कॅसेटच्या माध्यमातून पंडितजींचे स्वर कानावर पडले आणि मी त्यांच्या चाहत्यांमध्ये जाऊन बसलो. त्या स्वरांनी त्या वेळी घातलेली मोहिनी आज तिळमात्रही कमी झाली नाही. बिहाग रागातील ‘कैसे सुख सोवे’ आणि त्याच रागातील ‘लट उलझे सुलझा जा बालम’ याची तर अनेक पारायणे झाली, इतकी त्या स्वरांमध्ये मोहवून टाकण्याची विलक्षण ताकद होती. पंडितजींनी आपल्या स्वर्गीय संगीताच्या माध्यमातून माझ्यासारख्या अनेकांचे भावविश्व आनंदाने उजळून टाकले आहे. कित्येक पिढ्यांचे कान त्यांनी सुरेल करून टाकले आहेत. भारतीय संगीतातील अभिजातता, रागभाव, माधुर्य, रंजकता, सौंदर्य इत्यादी गुणांचे दर्शन सामान्य श्रोत्यांना, रसिकांना करून देण्यामध्ये पं. जसराज यांचे फार मोठे योगदान आहे. 
 
 
३८व्या सवाई गंधर्व महोत्सवामध्ये पंडितजींनी गायलेला बसंत राग ऐकतानासुद्धा आपण त्या मैफलीचे बाराती होऊन जातो.
और राग सब बने बराती,
दुल्हा राग बसंत,
मदन महोत्सव आज सखी री अब,
विदा भयो हेमंत ।
 
यातील अंतऱ्याला ‘सहचर गान करत ऊँचे स्वर, कोकील बोले असंख्य’मध्ये जसराजजींनी स्वरांचे खूप सुंदर काम केले आहे. सरगममधील त्यांनी घेतलेल्या तिहाया, बसंतच्या स्वरांचे अर्थपूर्ण उच्चारण यामुळे सवाईची ती मैफल अविस्मरणीय झाली आहे. या गायनात पं. संजीव अभ्यंकर यांची लहान वयातील स्वरसाथ खूप तयारीची जाणवते. शिष्याच्या या स्वरसाथीने गुरूच्या - म्हणजे जसराजजींच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित केल्याचे सहज जाणवते.

 
हरियाणा राज्यातील हिसार जिल्ह्यात २८ जानेवारी १९३० रोजी पं. जसराजजींचा जन्म झाला. त्यांच्या घराण्यामध्ये चार पिढ्यांची संगीताची परंपरा होती. वडील पं. मोतीरामजी, काका पं. ज्योतिरामजी, ज्येष्ठ बंधू पं. मणिरामजी आणि पं. प्रतापनारायणजी हे सर्व मेवाती घराण्याचे गायक होते. परंतु सुरुवातीला जसराजजींनी तबलावादनाची तालीम घेतली होती. वयाच्या १४व्या वर्षी ते उत्कृष्ट एकल तबलावादन व साथसंगत करीत असत. परंतु त्या काळी तबला साथ-संगतीला दुय्यम स्थान होते. अशाच एका प्रसंगी पंडितजींचा घोर अपमान झाला आणि त्यांनी गाणे शिकण्याचा निश्चय केला. त्यांनी आपले ज्येष्ठ बंधू पं. मणिराम यांच्याकडून शास्त्रीय गायनाची तालीम घेतली. पं. मणिराम हे देवीचे भक्त असल्याने त्यांच्या सर्व रचना देवीस्तुतिपर होत्या. ‘जय जय श्री दुर्गे’ (दरबारी कानडा), ‘माता कालिका’ (राग अडाणा), ‘निरंजनी नारायणी’ (राग भैरवी) इत्यादी रचना त्यांना पं. मणिराम यांच्याकडून मिळाल्या होत्या.

 
भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये अनेक शैली किंवा घराणी आहेत. पण मेवाती घराण्याची एक आगळीवेगळी गायकी पं. जसराज यांच्या रूपाने गेली साठ-सत्तर वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अशी काय मोहिनी आहे या गायकीमध्ये? असा कोणता धागा आहे, जो रसिक मनाशी जोडला गेला आहे? याचा विचार करताना एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव होते, ती म्हणजे जसराजजींच्या गायकीतील भक्तिरस. मुळात पंडितजींचे व्यक्तिमत्त्व आध्यात्मिक होते. त्यांच्या गाण्यातून, बोलण्यातून अनेक वेळा त्यांची आध्यात्मिक वृत्ती दिसून येत असे. त्यांच्या बंदिशींमध्येही देवदेवतांची वर्णने आढळतात. त्यांना स्वतःला अनेक वेळा आध्यात्मिक प्रचिती आल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या बाबतीत अशाच एका घटनेचा एके ठिकाणी उल्लेख सापडतो, तो असा - एकदा अहमदाबादजवळील साणंदच्या देवीच्या मंदिरात स्वतः जसराजजी त्यांचे ज्येष्ठ बंधू पं. मणिराम यांच्या गायनप्रसंगी तबल्याच्या साथीला बसले होते. पं. मणिरामजी देस रागातील ‘गल भुजंग, भस्म अंग, शंकर अनुरागी’ ही रचना गात होते. जसराजजींचे वय त्या वेळी चौदा वर्षे असेल. अतिशय तल्लीन होऊन मणिरामजी गात होते. मध्यलय एकतालाचा ठेका सुरू होता. जसराजजी आपल्या ज्येष्ठ बंधूंकडे आश्चर्याने पाहात होते, कारण मणिरामजींचा गेलेला आवाज सर्व डॉक्टरी उपाय करूनही परत आला नव्हता, परंतु त्या दिवशी साणंदच्या मंदिरात देवीच्या कृपाशीर्वादाने तो पुन्हा प्राप्त झाला होता. जसराजजींना लहान वयातच ही आध्यात्मिक प्रचिती आली होती.
अतिशय भावपूर्ण आलापी, तिन्ही सप्तकांत लीलया फिरणारा आवाज, भक्तिरसप्रधान बंदिशी, मेरखंड पद्धतीने रागविस्तार, विशिष्ट प्रकारे गमक, कण आणि मिंडेचा वापर ही मेवाती घराण्याच्या गायकीची काही वैशिष्ट्ये आहेत. या घराण्यामध्ये नेहमीच्या रागांबरोबर नट नारायण, धुलिया मल्हार, चरजू की मल्हार, नानक मल्हार, खमाज बहार, शुद्ध बराडी असे घराण्याचे काही खास राग गायले जातात. पं. जसराजजींनी या तत्त्वांमध्ये आपल्या स्वयंप्रतिभेने खूप मोठी भर घातली आहे. ते स्वत: उत्कृष्ट तबलावादक असल्याने मेवाती घराण्याच्या ख्यालगायनामध्ये त्यांनी वेगळ्या प्रकारच्या लयीचा आणि लयकारीचा अंतर्भाव केला. लयकारीयुक्त सरगम, विशिष्ट प्रकारची तानक्रिया, मधुरा भक्तीतील बंदिशी ही पंडितजींच्या गाण्याची काही वैशिष्ट्ये. त्यानी अनेक बंदिशींच्या रचनाही केल्या आहेत - उदा., ‘जबसे छब देखी’ (राग नट नारायण), ‘तुम बिन कैसे कटे दिन रतियाँ’ (राग जोग), ‘बरखा रितु आयी’ (राग धुलिया मल्हार), ‘अब ना मोहे समझाओ’ (राग बैरागी) इत्यादी. त्यांनी शाम मनोहर गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली संगीताचाही अभ्यास केला होता. आद्य शंकराचार्य, वल्लभाचार्य, चैतन्यमहाप्रभू यांच्या रचना हिंदुस्थानी संगीतातील रागांमध्ये बांधून त्या रसिकांसमोर सादर केल्या. ते स्वतः उत्तम संगीतकार होते. त्यांनी अनेक स्तोत्रे, मंत्र, भजने संगीतबद्ध केली आहेत.


seva_1  H x W:

मूर्छना तत्त्वावर आधारित ‘जसरंगी जुगलबंदी’ ही तर पंडितजींची भारतीय संगीताला दिलेली देणगी आहे. खरे तर मूर्छना तत्त्व ही भारतीय संगीतातील पारंपरिक संकल्पना आहे. परंतु पंडितजींनी अनोख्या ढंगात ती रसिकांसमोर आणली. जसरंगी जुगलबंदीमध्ये स्त्री कलाकार आपल्या स्वरात - म्हणजे काळी चार, पांढरी सहा किंवा काळी पाचमध्ये ज्या रागाचे गायन करेल, त्याच रागाच्या मध्यम स्वरापासून जी मूर्छना होईल, त्या रागाचे पुरुष कलाकार आपल्या स्वरात - म्हणजे काळी एक, पांढरी दोन किंवा काळी दोनमध्ये गायन करेल. जर स्त्री कलाकाराने आपल्या स्वरात राग अभोगीने सुरुवात केली, तर त्याच्या मध्यमातून पुरुष गायक कलावती राग सुरू करेल. याप्रमाणे स्त्री कलाकार चंद्रकंस गाईल, त्याच वेळी चंद्रकंसच्या मध्यमातून पुरुष गायक मधुकंस सुरू करेल, ही जसरंगीची संकल्पना आहे. सुरुवातीला श्वेता जव्हेरी तसेच तृप्ती मुखर्जी आणि पं. संजीव अभ्यंकर, तर अलीकडे अश्विनी भिडे-देशपांडे आणि पं. संजीव अभ्यंकर ही जुगलबंदी सादर करताना पाहायला मिळतात. ज्या वेळी हा प्रयोग झाला, त्या वेळी या प्रयोगाची सर्वत्र स्तुती झाली, तर काही ठिकाणी यामध्ये नवीन ते काय? असाही सूर निघाला. पण आज सर्वत्र ‘जसरंगी जुगलबंदी’च्या मैफली आयोजित केल्या जात आहेत.


भारतीय अभिजात संगीत आपल्या वेगवेगळ्या शैलींच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये पोहोचविण्यात पं. जसराजजी यांचे खूप मोलाचे योगदान आहे. कॅनडामध्ये व्हॅकुंव्हर, अमेरिकेमध्ये अटलांटा, न्यू जर्सी, टँपामध्ये कार्यरत ‘पंडित जसराज स्कूल ऑफ म्युझिक’ तसेच त्यांच्या अगणित मैफलींच्या माध्यमातून भारतीय संगीत सर्व जगामध्ये पोहोचविण्याचे अद्वितीय कार्य पंडितजींनी आपल्या संपूर्ण आयुष्यात केले आहे. त्यांचे भारतात आणि भारताबाहेर अनेक शिष्य आहेत. कला रामनाथ (प्रसिद्ध व्हायोलिन वादक), श्वेता जव्हेरी, तृप्ती मुखर्जी, साधना सरगम, अरविंद थत्ते (प्रसिद्ध हार्मोनियमवादक), शिवदास देगलूरकर, पद्मजा फेणाणी, रतन मोहन शर्मा, पं. संजीव अभ्यंकर, शोभा अभ्यंकर, अंकिता जोशी, प्रीतम भट्टाचार्य, मुकेश देसाई इत्यादी असंख्य शिष्यांना जसराजजींनी भरभरून गानविद्या दिली आहे.
 
 
पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, संगीत मार्तंड (हरियाणा), संगीत नाटक अॅकॅडमी अॅवॅार्ड, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, कालिदास सन्मान, पं. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविले आहे. रसिक मनांवर आपल्या दिव्य स्वरांची मोहिनी घालणारा हा कलाकार आज आपल्यात देहरूपाने नाही, पण त्याचे स्वर, गाणे अमर आहे. रोज नव्याने होणाऱ्या प्रात:कालाची सुरुवात पं. जसराजजींच्या गाण्याने - म्हणजे ‘मेरो अल्ला मेहेरबान कोई बिगाड़ सकत नहीं तेरो’ या भैरवमधील ख्यालाने व्हावी, असेच वाटते.

93256 02016