कोविडचा गोव्यालाही विळखा

स्रोत: विवेक मराठी    दिनांक29-Aug-2020
|
@सागर अग्नी

मार्च-एप्रिल महिन्यापासून संपूर्ण देश कोरोनाच्या विळख्यात सापडला असताना गोवा राज्य कोरोनामुक्त असल्याचे चित्र दिसत होते. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासून गोवा राज्यही कोरोनाच्या जाळ्यात अडकू लागले. तेथील आताची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गोवा राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहे आणि नागरिकही कोरोनाच्या दृष्टीने सुरक्षित उपायांचे पालन करताना दिसत आहेत.


corona_1  H x W

कोविड-१९ या जागतिक महामारीने अगदी सुरुवातीच्या काळात गोव्याला स्पर्शही केला नव्हता. ज्या वेळी महाराष्ट्रात, दिल्लीत तसेच गुजरातमध्ये कोविडचा प्रसार झपाट्याने वाढत होता, त्या वेळी गोव्यात कोविडचे जेमतेम सातेक (तेही सहा विदेशी) रुग्ण आढळले होते, तेसुद्धा उपचाराअंती बरे होऊन घरीही परतले होते. साधारणतः मे महिन्यापर्यंत गोवा तसा या महामारीपासून सुरक्षित व मुक्त होता. दुसऱ्या अनलॉकपासून मात्र गोव्यामसोर कोविडचे संकट उभे ठाकले ते आजमितीस दूर होण्याचे नाव काढत नाही. हा हा म्हणता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागली. शून्य मृत्यू असलेल्या गोव्यात कोविडने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली. काही रुग्णांच्या गळ्याभोवतीदेखील त्याने आपला फास टाकला... आणि काही कळायच्या आत शेकडोंचे मृत्यू ओढवले.

जूनच्या मध्यावधीस कोरोना संसर्ग झालेल्यांचा आकडा हळूहळू वाढू लागला. जोपर्यंत राज्यात कोरोनाचा संसर्ग पसरला नव्हता, तोपर्यंत शैक्षणिक संस्था जूनच्या अखेरीस किंवा जुलैमध्ये सुरू होतील अशी शक्यता दिसत होती. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्रीदेखील कोविडचा सामाजिक संसर्ग अजून झाला नसल्याचे सांगत होते व तशीच स्थितीही होती. पण अचानक कोविड रुग्णसंख्या बळावू लागताच शाळा सुरू होण्याची शक्यतादेखील आता धूसर बनली आहे. शाळा कधी सुरू होतील हे आजच्या घडीला सांगणे कठीण बनले आहे.

आजच्या घडीला - म्हणजे १७ आगस्ट २०२०पर्यंत राज्यात कोविडची लागण झालेले ११,९९४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यातील ८,०५८ बरे झाले असून आजही ३,८२५ रूग्ण सक्रिय आहेत. कोविडमुळे मृत्यू येण्याच्या संख्येने शतकही पार केले असून १११ जणांचा मृत्यू ओढवला आहे. राज्यासाठी तसा कोविड आता चिंतेचा विषय ठरू लागला आहे. मुरगाव तालुक्यातील मांगोरहील भागातून सामाजिक संसर्गाची सुरुवात झाली. तिने नंतर आपले रौद्ररूप धारण करताच त्या भागात पूर्ण तीन दिवस लॉकडाउन लागू करण्यात आला. 


corona_1  H x W

वास्कोतील खारीवाडा, मांगोरहील, बायणा हे भाग तसे दाट लोकवस्तीचे. कारण या भागात मजूरवर्गांची छोटी छोटी घरे आहेत. त्यामुळे संसर्ग सुरू होताच राज्य सरकारने हा मांगोरहील भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला. त्यामुळे जनतेच्या हालचालींवर मर्यादा आल्या खऱ्या, पण तेथील रुग्णांवर उपचार करणाऱ्या किंवा त्यांच्या तपासण्या करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाही संसर्गाने विळखा घालताच पंधरा-वीस दिवसांच्या अंतराने राज्याच्या इतर भागातही हळूहळू पॉझिटिव्ह रुग्ण दिसू लागले.

नंतर मात्र कोविडचा फैलाव रोखणे कठीण बनले. दर दिवशी ४०-५० असे करता करता पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचा दर दिवसाचा आकडा आता साडेचारशे-पाचशेपर्यंत पोहोचलाय. गोव्याचा आदिवासी समाज तसा डोंगराळ भागात राहतो. हल्ली शिक्षणामुळे शिकली-सवरलेली मुले जरी शहरात स्थायिक झालेली असली, तरी हा समाज डोंगराळ भागात राहत आहे. त्यामुळे ते जणू विलगीकरणात असल्यासारखे असायचे. पण तेथेही कोविडचे रुग्ण आढळू लागले आहेत.

वंदे भारत मिशनखाली परदेशात नोकरीनिमित्त स्थायिक झालेले मूळ गोमंतकीय घराकडे वळले. परराज्यातून व विदेशातून आलेल्या अशा लोकांना घरच्या घरी विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला. तरुण व तडफदार मुख्यमंत्री डाँ. प्रमोद सावंत यांनी अधिकारिवर्गाच्या सहकार्याने सुरुवातीच्या काळात अत्यंत कुशलतेने परिस्थिती हाताळली होती. पण सध्याच्या परिस्थितीत कोविडसमोर सारेच हतबल झाले आहेत. सरकार आपल्या परीने परिस्थिती आटोक्यात आणण्याचा निश्चितच प्रयत्न करतेय. त्याला जनतेचेही सहकार्य लाभणे गरजेचे ठरले आहे.

केवळ सरकारच्या माथी परिस्थितीचा दोष फोडून चालणार नाही, तर राज्यातील जनतेनेही सरकारच्या सूचनांचे पालन करून मार्गक्रमण केल्यास निश्चितच या संकटाचाही सामना करणे कठीण नाही. सरकारने मांगोरहीलमध्ये रुग्ण दिसताच तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करायला हवा होता, असा मानणारा एक गट आहे; तर तसे केले तरी फारसे काही झाले नसते, असा सूर लावणाराही दुसरा गट आहे. एक खरे की, जे झाले ते झाले. आता जर-तरच्या मुद्द्यांचा विचार न करता भविष्यात काय केले पाहिजे यावर विचार व्हायला हवा. पण महामारीतही राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी विरोधक प्रयत्न करताना दिसतात, ही खरे तर खेदाची बाब ठरेल. जोवर कोविडचे रुग्ण आढळले नव्हते, तेव्हा विरोधकांनी सरकारला सहकार्याचा दिलेला हात नंतर मात्र जणू सोडल्यासारखाच होता. परिस्थितीला सरकारला वारंवार जबाबदार धरत विरोधक दूषणे देत होते. 

दक्षिण गोव्यातील कोविड इस्पितळानंतर सरकारने रुग्णांसाठी फोंड्यातही कोविड इस्पितळ सुरू केले. शिवाय वेगवेगळ्या संस्थांचे सभागृह कोविड उपचारासाठी ताब्यात घेतले. आज बहुतांश पॉझिटिव्ह रुग्ण अशा सरकारी कोविड सुविधा केंद्रामध्ये उपचार घेत आहेत, तर असिम्प्टोमॅटिक रुग्णांना जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने घरच्या घरीच विलगीकरणात राहण्याचीदेखील मोकळीक देण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी सुविधा केंद्रावरील ताण तसा कमी झाला आहे. पण रुग्णांची दिवसागणिक वाढणारी संख्या मात्र सरकारसाठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे.

या साऱ्या परिस्थितीत स्वतः काळजी घेतल्याशिवाय पर्याय नाही व कोविड स्वीकारून आपल्याला सध्याच्या स्थितीत राहायचे आहे, हे जनतेलाही कळून चुकले आहे. त्यामुळे राज्यात बाजार, माँल्स, भुसारी दुकाने, भाजीपाला खरेदी आदी ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवून ग्राहकांच्या रांगा दिसू लागल्या आहेत. मास्कचा वापर केल्याशिवाय आता बाहेर पडण्यास कोणीच धजत नाही.

कोविडच्या काळात सरकारने सामान्य जनतेची कोणतीच गैरसोय होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली. विरोधक लाख बोलतील, पण परप्रांतीय मजूरवर्गाकडेदेखील राज्य सरकारने दुर्लक्ष केले नाही. त्यांच्यासाठी आसरा घरांची स्थापना करून तेथे त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था केली गेली. लॉकडाउनमुळे अडकून पडलेल्या सुमारे पाचेक हजार विदेशी पर्यटकांना विशेष विमानांद्वारे त्यांच्या मायदेशीही पाठवण्याची जबाबदारी सरकारने पार पाडली.
 

corona_1  H x W 

मुख्यमंत्री डाँ. प्रमोद सावंत यांनी कोविडचा संसर्ग सुरू होताच, "भिवपाची कांयच गरज ना" (घाबरण्याची काहीच गरज नाही) असे स्थानिक कोकणी भाषेत केलेल्या निवेदनावर अनेकांनी विनोद केले. त्यावरून त्यांना ट्रोल करण्याचाही प्रयत्न झाला व आजही होतोय. मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो व त्यांचे निवेदन हे जनतेसाठी धीर व दिलासा देणारे असते. संसर्ग पसरू लागलाय, आता काही खरे नाही असे कोण मुख्यमंत्री सांगेल बरे? पण, विरोधकांनी त्यांच्या या विधानाची खिल्ली उडवत मात्र स्वतःचे हसे करून घेतले.

आजही सरकार आपल्या पद्धतीने जनतेच्या सेवेसाठी कार्यतत्पर आहे. सोशल डिस्टन्सिंग - म्हणजेच सुरक्षित सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे हे का गरजेचे आहे, याबाबत ठिकठिकाणी माहितीपर जागृती कार्यक्रम करण्यावर सरकारने अधिक भर दिला आहे. त्यात सरकारला यशही आले आहे. कारण आता बाजारात व इतर सार्वजनिक ठिकाणी जनतेकडून सुरक्षित अंतर राखले जात आहे. एरवी जी झुंबड उडायची, त्याला आता कुठेतरी आळा बसलाय ही वस्तुस्थिती आहे.

आरोग्य खात्याने प्लाझ्मा थेरपीची प्रक्रियासुद्धा गोव्यात सुरू केली आहे. जे पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, त्यांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. अनेकांनी प्रसंग ओळखून त्यासाठी पुढाकारही घेतला आहे. त्यामुळे इतर रुग्णांना आता त्याचा लाभ मिळेल हे निश्चित. केंद्राच्या कोविड प्रतिबंधक कोवाक्सिन या लस चाचणीसाठीदेखील गोवा हे एक केंद्र राहिले होते. उत्तर गोव्यातील कोलवाळच्या रेडकर इस्पितळात माणसांवर त्याची चाचणी घेतली जात होती. त्यालाही अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे कोविडबाबत सरकार सुस्त राहिले असे म्हणणे चुकीचे ठरेल. कोविडबाबत विरोधकांनी सरकारच्या सकारात्मक बाबीही लक्षात घ्यायला हव्यात. विरोधासाठी विरोध हे धोरण अशा संकटकाळी उपयोगाचे नाही, तर अशा समयाला सहकार्याची भावना ठेवायला हवी.

साप्ताहिक विवेकच्या २० एप्रिल २०२०च्या अंकात 'गोवा कोरोनामुक्तीच्या दिशेने' अशा मथळ्याखाली माझा लेख प्रसिद्ध झाला होता. राज्य सरकारनेही त्यानंतर गोवा कोरोनामुक्त असल्याची घोषणा केली होती. तथापि या घोषणेला महिनाभराचा कालावधी लोटताच राज्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. कोरोनामुक्त गोव्याच्या घोषणेमुळे सारे आनंदित असतानाच अचानक कोरोनाने गोव्याला आपल्या कवेत घेतले व आजही गोवा त्या कवेतून सुटण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत आहे.


ज्येष्ठ पत्रकार
पणजी, गोवा