डॉ. धनंजय दातार यांच्यामुळे अनेक मराठी कुटुंबे भारतात सुखरूप दाखल

स्रोत: विवेक मराठी    दिनांक03-Aug-2020
|

seva_1  H x W:


महिला-लहान मुलांचा समावेश असलेला १३६ महाराष्ट्रीयांचा दुसरा जथा परतला

 दुबईत अद्यापही अडकून पडलेल्या गरजू भारतीयांना मायदेशी सुखरूप परत पाठवण्यासाठी मसाला किंग डॉ. धनंजय दातार यांनी कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी १८६ रोजगारवंचित व निर्धन महाराष्ट्रीय कामगारांना स्वखर्चाने चार्टर्ड फ्लाइटने भारतात पाठवले होते. याच मोहिमेअंतर्गत आता दुसऱ्या फेरीत महिला व लहान मुले यांचा समावेश असलेल्या अनेक मराठी कुटुंबांना संधी मिळाली आहे. एकूण १३६ महाराष्ट्रीयांचा दुसरा जथा काल विमानाने येथे परतला आहे. ही कुटुंबे महाराष्ट्रभरातील विविध शहरांतील व गावांतील आहेत.

कोविड-१९ साथ व लॉकडाउन काळात हजारो भारतीय संयुक्त अरब अमिरातीत (यूएईमध्ये) अडकून पडले होते. दुबईहून भारतातील विविध ठिकाणी विमान वाहतूक सुरळीत झाल्यानंतरही यातील अनेकांना आर्थिक अडचणींमुळे मायदेशी परतणे अवघड झाले होते. त्यात रोजगारवंचित कामगार, विद्यार्थी, गरोदर महिला व लहान मुले यांचा समावेश होता. रोजगार गमावल्याने व राहत्या जागेचे भाडे भरण्यासाठीही खिशात पैसे नसल्याने बऱ्याच लोकांनी सार्वजनिक बागांमध्ये आश्रय घेतला होता आणि त्यांच्यापुढे रोजच्या भोजनाचा प्रबंध कसा करायचा या बाबतच्याही अडचणी होत्या. एकट्या महाराष्ट्रातील ६५,०००हून अधिक लोक आजही दुबईत अडकून पडले असून मायदेशी परतण्याच्या प्रतीक्षेत आहेत.दुबईस्थित अल अदील ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार हे अशा कठीण परिस्थितीत आपल्या निर्धन देशबांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. याआधी लॉकडाउनच्या काळात त्यांनी अडचणीत सापडलेल्या हजारो भारतीयांना रोजच्या गरजेच्या वस्तू, खाद्यपदार्थ व औषधांचे संच मोफत पुरवले होते. यूएई आणि भारतादरम्यानची विमान वाहतूक सुरळीत झाल्यावर त्यांनी कंपनी सामाजिक दायित्व (सीएसआर) उपक्रमांतर्गत जवळपास ३५०० गरजू भारतीयांचा खाण्या-पिण्याचा, वैद्यकीय चाचणीचा व विमान तिकिटाचा खर्च उचलून त्यांना भारतात सुखरूप रवाना केले. त्यामध्ये केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, आसाम, नागालँड, मिझोराम आदी राज्यांमधील रहिवाशांचा समावेश आहे. या मोहिमेसाठी डॉ. दातार यांनी आतापर्य़ंत ३ कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे.

खरोखर गरजू प्रवाशांची यादी निश्चित करणे, त्यातून अल्प मासिक उत्पन्नधारक प्रवासी निवडणे, संबंधित कंपन्यांच्या मनुष्यबळ विभागाशी संपर्क साधून त्यांचे पासपोर्ट मागवून घेणे, त्यांना विमान प्रवासाची मोफत तिकिटे देणे व होम क्वारंटाइनबाबतही मार्गदर्शन करणे या संपूर्ण प्रक्रियेसाठी अल अदील कंपनीच्या वतीने संचालक सौ. वंदना दातार, हृषिकेश दातार व रोहित दातार, तसेच प्रवाशांतर्फे प्रतिनिधी म्हणून पुण्याच्या सामाजिक कार्यकर्त्या धनश्री पाटील समन्वयाचे काम करत आहेत. परवानेविषयक औपचारिकता, तिकिटांची व्यवस्था व विमान कंपनीच्या संपर्कात राहणे आदी कामांत अकबर ट्रॅव्हल्सचे सुलेमान इक्रम यांची मोलाची मदत होत आहे.

ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून दुबईत अडकून पडलेल्या ज्या गरजू व निर्धन भारतीयांना भारतात परतण्यासाठी मदत हवी असेल, त्यांनी स्वतः अथवा नातलगांमार्फत संपर्क साधावा, असे डॉ. दातार यांनी आवाहन केले आहे.