शाश्वत विकास उद्दिष्टे - आपल्या उद्यासाठी

स्रोत: विवेक मराठी    दिनांक03-Aug-2020
|

@कपिल सहस्रबुद्धे

०१५ साली संयुक्त राष्ट्र संघाच्या पुढाकारातून सगळ्या जगाने 'शाश्वत विकास उद्दिष्टे' स्वीकारली. भविष्यातील आपल्या वाटचालीला दिशा देण्यासाठी यांचा मोठा उपयोग होईल असा विश्वास हे स्वीकारताना सगळ्यांनी दर्शवला आहे. जागतिक पातळीवर मानवी विकासासंबंधीचा हा पहिलाच एकत्रित प्रयत्न होता. मानवी आयुष्याच्या सर्व अंगांचा विचार करून, तसेच पृथ्वीवरील विविध प्राणिमात्र आणि निसर्ग यांच्या संरक्षणासाठीचे महत्त्व लक्षात घेऊन या उद्दिष्टांची रचना करण्यात आली. आपण या लेखमालेत यासंबंधी ममाहिती घेणार आहोत.


seva_1  H x W:  

महाराष्ट्रातील एखाद्या छोट्याशा गावात झालेले कृषी उत्पादनवाढीचे प्रयत्न, ओदिशातील जनजाती भागात नव्याने उभारलेले छोटे शेतीपूरक उद्योग, बंगळुरू-हैदराबादसारख्या शहरातील एका छोट्याशा सोसायटीने सेंद्रिय भाजीपाला, अन्नधान्ये यांचा धरलेला आग्रह, केरळच्या समुद्रकिनाऱ्यावर मासेमारी करणाऱ्यानी बदललेली जाळी, शहरात प्रवासासाठी कार-पूलिंगचा प्रयत्न या गोष्टी जगासमोरचे काही महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचे आहेत, असे तुम्हाला वाटते का? कोणते प्रश्न असावेत ते? आणि जग अशा प्रयत्नांची काही नोंद घेतेय असे आपल्याला वाटते का? 'कचरा वेगळा करा' असे सांगणाऱ्याची आपल्याकडे टिंगल होते. एखादा तरुण शेतीमध्ये काही प्रयोग करत असेल, तर 'आलाय मोठा शिकवणारा' अशी हेटाळणी होते. अशा स्थितीत असल्या छोट्या छोट्या गोष्टींचे महत्त्व जगाने एकमुखाने मान्य करावे आणि असे प्रयत्न वाढवण्यासाठी संपूर्ण जगाने मिळून एक आराखडा ठरवावा, हे सामान्य माणसाला लगेच पटणे अवघडच आहे. पण २०१५ साली संयुक्त राष्ट्र संघाच्या पुढाकारातून सगळ्या जगाने 'शाश्वत विकास उद्दिष्टे' स्वीकारली. भविष्यातील आपल्या वाटचालीला दिशा देण्यासाठी यांचा मोठा उपयोग होईल असा विश्वास हे स्वीकारताना सगळ्यांनी दर्शवला आहे. शासन व्यवस्था, मोठे मोठे उद्योग यांच्या प्रयत्नाबरोबरच सामान्य लोकांनी केलेल्या छोट्या छोट्या प्रयत्नांनासुद्धा तेवढेच महत्त्व या उद्दिष्टांमध्ये देण्यात आले आहे.

मानवी विकासाचे जागतिक प्रयत्न

भटके जीवन जगता जगता एकेकाळी मानव स्थिर झाला. आपल्या विविध प्रयत्नांतून गेल्या हजारो वर्षांत त्याने जीवनाच्या विविध भागांत नेत्रदीपक प्रगती केली, तर काही भाग अजूनही त्याच्या आकलनाबाहेर राहिले आहेत. पण हा सगळा विकास एका अर्थाने स्वतंत्रपणे झाला आहे. वैज्ञानिक प्रगतीबरोबरच जगाला आपल्या मुठीत ठेवण्याच्या काही देशांच्या, विचारांच्या विस्तारवादी वृत्तीने जगातील बहुतेक देशांना पारतंत्र्यात लोटले. तिथल्या नैसर्गिक साधनांची व अन्य संपत्तीची लूट केली गेली. या काळात अनेक वेळा जग विनाशाच्या उंबठ्यावरही पोहोचले. संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाल्यावर सगळ्यांना एकत्र आणून जगाचा एकत्रित विचार करायचे प्रयत्न झाले, पण त्यांना वेगवेगळ्या कारणांनी मर्यादा राहिल्या. पण खऱ्या अर्थाने विकासासाठी, पर्यावरण रक्षणासाठी आणि मानवी स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी जगाने एकत्रित प्रयत्न करायची सुरुवात २०व्या शतकाच्या उत्तरार्धात झाली. १९९२ साली ब्राझिलमधील रिओ शहरात भरलेल्या पर्यावरणविषयक जागतिक परिषदेनंतर याला गती मिळाली. यानंतर अनेक विषयांसंबंधी जागतिक पातळीवर एकमत तयार करण्यात आले. यातील ज्यांची नावे ऐकली असतील, असे म्हणजे जागतिक व्यापार करार, हवामान बदलासंबंधी जागतिक संधी इत्यादी. यामुळे अनेक प्रश्नासंबंधी जगभरात एकत्रित प्रयत्न सुरू झाले, त्यांना गती मिळाली. जगातील मोठ्या परिसरात वन्य जीव, सागरी जीव यांना संरक्षण मिळाले, पृथ्वीभोवती जो ओझोन आहे, त्याला हानी पोहोचवणाऱ्या पदार्थांचा वापर अत्यंत कमी झाला, पर्यावरण रक्षणासाठी आर्थिक मदत पुरवणारी जागतिक व्यवस्था तयार झाली हे अशा प्रयत्नांचे महत्त्वाचे यश आहे.
 
seva_1  H x W:
 
पण यातील बरेच प्रयत्न विशिष्ट प्रश्नांबद्दल होते. उदा. देवमासे वाचवणे, ओझोन छिद्र किंवा स्थलांतरित पक्ष्यांचा अभ्यास इत्यादी. मानवी जीवनातील रोजच्या गोष्टींशी त्याचा संबंध मर्यादित स्वरूपातच यायचा. त्यामुळे अशा प्रयत्नांचे यश मर्यादितच राहिले. बरेचदा 'विकसित देशातील पोट भरलेल्या लोकांचे चोचले' अशाच दृष्टीकोनातून याकडे बघितले गेले. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे विकसनशील आणि अविकसित देशातील महत्त्वाच्या प्रश्नांचा यात समावेश नव्हता. त्यामुळे लोकांच्या रोजच्या जीवनात फार फरक पडला नाही.
 
सगळ्यांच्या एकत्रित विकासाची सुरुवात

एकविसावे शतक सुरू होत असताना संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून एक विशेष प्रयत्न सुरू झाला. जगातील सर्व लोकांचे जीवनमान सुधारावे, सगळ्या मानव जातीला किमान सोयी मिळाव्यात, आरोग्याचे प्रश्न कमी व्हावेत अशा उद्देशांनी सगळ्या देशांची मिळून 'सहस्रक विकास उद्दिष्टे' ठरवण्यात आली.

सप्टेंबर २०००मधील संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ही उद्दिष्टे सगळ्या जगाने स्वीकारली. सन २०१५पर्यंत जगातील गरिबी व भूक संपवणे, सर्वांना प्राथमिक शिक्षण उपलब्ध करणे, महिला सक्षमीकरण, बालमृत्यू कमी करणे, माता आरोग्य सुधारणे, एड्स, मलेरिया, टी.बी. यासारख्या रोगांवर नियंत्रण आणणे, पर्यावरण रक्षण आणि हे करण्यासाठी जागतिक सहकार्य व्यवस्था उभारणे अशी उद्दिष्टे ठेवण्यात आली. ही उद्दिष्टे मोजली जावी यासाठी त्याचे लक्ष्य ठरवण्यात आले. प्रत्येक देशानेसुद्धा स्वतःचे लक्ष्य ठरवले.
 
जागतिक पातळीवर मानवी विकासासंबंधीचा हा पहिलाच एकत्रित प्रयत्न होता. यातून मूलभूत प्रश्नाविषयी जागतिक मत तयार व्हायला, ते सोडवण्यासाठी विकसनशील आणि अविकसित देशांना आर्थिक मदत मिळायला, प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी गरजेची माहिती गोळा करण्याच्या व्यवस्था तयार व्हायला मदत झाली. जागतिक पातळीवरून प्रश्न सोडवण्यासाठी दबाव तयार झाला. यातून प्रत्येक देशसुद्धा या प्रश्नांकडे नव्याने बघू लागला. नवनवीन उपाय करू लागला. याचाच परिणाम म्हणून
• १९९०च्या पातळीपेक्षा जागतिक गरिबी निम्म्याने कमी झाली आहे.
• कुपोषित मुलांचे प्रमाण १२%पर्यंत कमी झाले.
• प्राथमिक शिक्षण सोई वाढल्या आहेत.
• शेतीबाह्य कामामध्ये महिलांचा सहभाग वाढला आहे.
• विविध देशांतील संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढले आहे.
• ५ वर्षांखालील मुलांचा मृत्युदर ५०%नी कमी झाला आहे.
• मलेरियासारख्या रोगाने होणारे लाखो मृत्यू रोखण्यात यश आले आहे.
• नव्याने एड्स होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
• ओझोन वायू कमी करणाऱ्या पदार्थांचा वापर पूर्णपणे थांबल्यामुळे भविष्यात ओझोन छिद्र बंद होणार आहे.

जगभर या कामातील अनुभव, त्यातून मिळालेली दिशा, तयार झालेल्या व्यवस्था याचा अभ्यास सुरू झाला. यातून कमी पडलेल्या गोष्टी लक्षात आल्या. त्याचबरोबर विकासाची उद्दिष्टे साध्य करत असताना शिक्षणातील गुणवत्तेचे महत्त्व, शेतीची शाश्वतता, आर्थिक विकास होताना लोकांना काम मिळणे व कामामध्ये सन्मान असणे, मानवी उपभोगाच्या मर्यादा, विकासाच्या कामात लोकांचा सक्रिय सहभाग असणे याचाही विचार केला पाहिजे, असे लक्षात आले. पृथ्वीवरील इतर प्राणिमात्रांचे रक्षण करणे, त्यासाठी गरजेच्या परिसंस्था वाचवणे याची निकडसुद्धा अधोरेखित झाली. विकासाची रूपरेखा आखताना, त्यासाठी गरजेची साधने, तंत्रज्ञान वापरताना त्याच्या भविष्यात होणाऱ्या परिणामांचा विचार करणे आणि ते विचारात घेऊन आपले कार्यक्रम, धोरणे ठरवणे गरजेचे आहे, हेसुद्धा लक्षात आले.

२०१०पासूनच सहस्रक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठीच्या अडचणींची चर्चा व्हायला लागली होती. २०१२ सालच्या रिओ येथील संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास परिषदेत '२०१५नंतर काय?' याची चर्चा सुरू होणार होती. कोलंबिया देशाने शाश्वत उद्दिष्टांची कल्पना २०११पासून मांडायला सुरुवात केली. हळूहळू या कल्पनेला अनेक देशांनी पाठिंबा दिला. भारताने यासंबंधी केलेली मदत महत्त्वाची ठरली. या प्रयत्नातून २०१२ सालच्या 'रिओ +२०' या परिषदेत शाश्वत विकास उद्दिष्टांची संकल्पना २०१५नंतरच्या आपल्या एकत्रित वाटचालीची मार्गदर्शक असेल, यावर सर्व देशांनी शिक्कामोर्तब केले. यानंतर संयुक्त राष्ट्रांनी राजकीय व तांत्रिक अशा दोन्ही पातळ्यांवर या उद्दिष्टांची चर्चा सुरू केली. सर्व देशातील सरकारे, स्वयंसेवी संस्था, जागतिक पातळीवरील विविध संस्था, संघटना, उद्योग विश्व आदी विविध गटांची मते ऐकून घेण्यात आली. या प्रयत्नांतून २०३०पर्यंत काय साध्य केले पाहिजे, यासाठी कोणती तत्त्वे स्वीकारली पाहिजेत असे सांगणारा एक कार्यक्रम तयार झाला.

शाश्वत विकास उद्दिष्टे

या कार्यक्रमाला 'शाश्वत विकास उद्दिष्टे’ म्हणून सगळ्या जगासमोर मांडण्यात आले. सप्टेंबर २०१५मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत याला सर्व देशांच्या प्रमुखांनी मान्यता दिली. संयुक्त राष्ट्रांच्या ७० वर्षांच्या कार्यकाळात सर्वात जास्त देशांनी मान्यता दिलेला हा कार्यक्रम आहे. ही उद्दिष्टे स्वीकारताना, 'Living no one behind (कोणीच मागे राहता कामा नये)' या तत्त्वाचा स्वीकार करण्यात आला आहे. मानवी आयुष्याच्या सर्व अंगांचा विचार करून, तसेच पृथ्वीवरील विविध प्राणिमात्र आणि निसर्ग यांच्या संरक्षणासाठीचे महत्त्व लक्षात घेऊन या उद्दिष्टांची रचना करण्यात आली आहे.
• यामध्ये एकूण १७ उद्दिष्टे नक्की केली आहेत. ही उद्दिष्टे पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रत्येक उद्दिष्टाची काही लक्ष्ये ठरवण्यात आली आहेत.
• एकूण १६९ लक्ष्ये आहेत. ही लक्षे साध्य झाली की नाही, हे मोजण्यासाठी सूचक ठरवण्यात आले आहेत. असे ३००हून जास्त सूचक नक्की करण्यात आले आहेत.
• प्रत्येक देशाने २०१५ या वर्षीची माहिती ही आधाररेषा मानायची आहे. त्यासाठी किमान सूचकांसाठी अशी बेसलाइन तयार करणे हेसुद्धा एक महत्त्वाचे काम आहे.
• ज्या देशांना अशी आधाररेषा करण्यासाठी मदतीची गरज आहे, तीसुद्धा पुरवण्यात आली आहे. तसेच उद्दिष्टांची पूर्तता कशी होते आहे, हे मोजण्यासाठीसुद्धा व्यवस्था तयार करण्यात आल्या आहेत.
• ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी प्रत्येक देशांच्या शासनाच्या बरोबरीने विकासातील अन्य भागीदारांनीसुद्धा काम करावे, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
 
seva_1  H x W:
 
या उद्दिष्टांना मानवविकास, पृथ्वीरक्षण, समृद्धी, जागतिक शांतता आणि जागतिक भागीदारी अशा ५ प्रमुख भागात विभागता येऊ शकते. मानवी विकास विभागात २०३०पर्यंत गरिबी पूर्णपणे संपवणे, एकही व्यक्ती भुकेली राहणार नाही याची व्यवस्था करणे, सर्वांना चांगले आरोग्य तसेच गुणवत्तापूर्वक आयुष्य मिळावे, सर्व प्रकारची विषमता दूर करणे, सर्वांना शुद्ध पाणी व स्वच्छता मिळेल अशी उद्दिष्टे आहेत.

पृथ्वीरक्षणासाठी हवामान बदलाचे परिणाम कमी करणे, जमिनीतील व पाण्यातील जीवनाचे संरक्षण, स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढवणे, मानवी उपभोगामध्ये संयम आणणे या उद्दिष्टांचा समावेश करण्यात आला आहे. तर समृद्धीसाठी ऊर्जेचा शाश्वत पुरवठा, आर्थिक विकासाच्या जोडीला सगळ्यांना सन्मानजनक काम मिळणे, उद्योगामध्ये शाश्वत तत्त्वांचा वापर, पर्यावरणाची हानी न होता समाजाला गरजेच्या पायाभूत सुविधा तयार करणे आणि शहरातील व्यवस्था शाश्वत बनवण्यासाठी विशेष लक्ष देणे या उद्दिष्टांचा समावेश केलेला आहे.

शांतता, न्याय व त्यासाठी गरजेच्या संस्थात्मक रचना हे एक विशेष उद्दिष्ट ठेवले गेले आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी जागतिक भागीदारी तयार करणारे हे एक विशेष उद्दिष्ट ठेवले गेले आहे. यामध्ये वैज्ञानिक माहितीची, तंत्रज्ञानाच्या आदानप्रदानासाठी, आर्थिक मदतीच्या सतत पुरवठ्यासाठी, व्यापारामधील विकसनशील देशांचा वाटा वाढण्यासाठी भागीदारी त्यार करणे अपेक्षित आहे.

seva_1  H x W:
 
उद्दिष्टपूर्तीची लक्ष्ये

प्रत्येक उद्दिष्ट साध्य होण्यासाठी सगळ्यांसाठी काही लक्ष्ये ठेवली आहेत. प्रत्येक देशाने याच्या आधारे आपल्या देशासाठीचे लक्ष्यांक ठरवायचे आहेत. ही सूट यासाठी आहे की काही देशांत यातील काही लक्ष्यांक आधीच पूर्ण झाले आहेत. काही लक्ष्ये ही ठरावीक देशांना - उदा., विविध बेटे किंवा जमिनींना वेढलेले देश, अत्यंत गरीब देश यांनाच लागू होतात. त्यामुळे इतर देशांनी ते गाळले तरी चालणार आहेत. हे लक्ष्यांक ठरवताना ते मोजताही येतील अशा पद्धतीने ठरवायचे आहेत, जेणेकरून आपण कुठे पोहोचलो हे लक्षात येईल. प्रत्येक उद्दिष्टासाठी विविध प्रकारचे लक्ष्य ठेवले आहेत. अशी एकूण १६९ लक्ष्ये निश्चित करण्यात आली आहेत. उदा., गरिबी निर्मूलनाचा विचार करताना जागतिक स्तरावर अत्यंत गरिबी पूर्णपणे संपवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच आताच्या गरीब लोकांपैकी किमान ५०% टक्के लोक सर्व प्रकारच्या गरिबीपासून मुक्त होतील असे लक्ष्य ठेवले आहे. भूक मिटवणे या उद्दिष्टाचा विचार करताना छोट्या शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न दुप्पट करणे असे लक्ष्य ठेवले आहे. अशा प्रकारे सर्व उद्दिष्टांसाठी मोजता येतील अशी लक्ष्ये निश्चित केली आहेत.


seva_1  H x W:

पुढे काय?

अशा प्रकारचे जागतिक स्तरावरील करार प्रत्यक्षात येणे हे एक भगीरथ कार्य आहे. यासाठी विविध स्तरांवर निश्चित प्रयत्न करावे लागतात. यासाठी देशांची सरकारे, तेथील स्वयंसेवी संस्था, उद्योग क्षेत्र आणि सर्वसामान्य नागरिक या सगळ्यांना प्रयत्न करावे लागतात. यासाठी शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये विशेष भर देण्यात आला आहे.
२०१५मध्ये ही उद्दिष्टे मान्य केली गेली. पण
• ही उद्दिष्टे साध्य होण्यासाठी जागतिक पातळीवर काय प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत?
• यासाठीच्या आर्थिक गरजा कशा पूर्ण होणार आहेत?
• विकसनशील आणि अविकसित देशांना यासाठी लागणारे विज्ञान-तंत्रज्ञान मिळावे, यासाठी काय सुरू आहे?
• २०२० साली या उद्दिष्टांच्या पूर्ततेमध्ये जग कुठे पोहोचले आहे?
• भारतात यासाठी काय सुरू आहे? आपण कशा प्रकारच्या व्यवस्था तयार केलेल्या आहेत?
• कोविड महामारीचा या प्रयत्नांवर काय परिणाम होईल?
असे अनेक प्रश्न आपल्या मनात येऊ शकतात. या लेखमालेत आपण वरील विविध प्रश्नांसंबंधी माहिती घेणार आहोत. याशिवाय एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आपण या उद्दिष्टांशी कसे जोडलेलो आहोत, याची चर्चाही आपण करणार आहोत आणि आपण काय करू शकतो यासंबंधी विविध उदाहरणांतून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपले भविष्य हे जगाचे भविष्य आहे. आणि ते आपल्याच हातात आहे.


९८२२८८२०११
योजक सेंटर फॉर रिसर्च अँड स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट
पुणे