तळकोकणातील बांबू शेती

स्रोत: विवेक मराठी    दिनांक31-Aug-2020
|

@मिलिंद पाटील

सध्या तळकोकणातील शेतकर्‍याच्या अर्थकारणाला बांबू शेतीची जोड मिळाली आहे. येत्या काळात ती आणखी मजबूत होत जाईल. बांबूच्या माध्यमातून शाश्वत आर्थिक विकासाच्या दृष्टीने मार्गक्रमण करीत असलेला कोकण आज देशासाठी ‘रोल मॉडेल’ ठरलाय, यात शंका नाही.

bambu_1  H x W:
 
बांबू म्हटले की चटकन आपल्या नजरेसमोर येते ती गुढीपाडव्याची काठी किंवा धान्य आसडायचे सूप, कदाचित गावाकडे खुंटीवर टांगलेली, शेणाने सारवलेली एखादी बांबूची टोपली. कुणाला बांबूचे बेट पाहिल्याचेदेखील आठवत असेल किंवा कुणाकडे असेलही. पण आज तळकोकणात याच बांबू काठ्यांची शेती केली जातेय असे म्हटले, तर! होय. आंबा, काजू, नारळी-पोफळीच्या बागा, फणस, कोकम, जांभूळ या सर्वांबरोबर कोकणातील शेतकरी आता ‘बांबू’कडे नगदी पीक म्हणून पाहू लागलेत. तळकोकणात चार महिने मुसळधार कोसळणारा पाऊस, पाण्याचा निचरा होणारी लाल माती, उच्च आर्द्रता आणि जंगली झाडांच्या काहीशा सावलीत उंचच उंच गेलेले बांबू आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसू लागलेत. कोकणातील शेतकऱ्याच्या अर्थकारणाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या या बांबू शेतीची सफर खरेच स्फूर्तिदायक आहे.

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा माणगा बांबू उत्पादनातील अग्रेसर जिल्हा म्हणावा लागेल. येथे किमान आठ ते दहा हजार शेतकरी आज बांबू शेतीशी जोडले गेले आहेत. जवळपास पाच हजारहून अधिक ट्रक भरून बांबू सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यांत, तसेच राज्याबाहेर पाठवला जातो. एका ट्रकमध्ये सरासरी १२०० काठ्या असतात. एका बांबू काठीचे किमान ५० रुपये जरी गृहीत धरले, तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी किमान ३० कोटी रुपये थेट मिळतात. यात तोडणी कामगार, वाहतूक व इतर बाबींचा विचार केल्यास जिल्ह्याचे एकूण बांबू अर्थकारण जवळपास ६० कोटी रुपयांच्या घरात आहे. यात बांबूचा होत असलेला स्थानिक वापर बेरजेत धरला, तर आणखीन काही कोटीची भर पडावी. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सध्या मिळणाऱ्या एकूण कृषिउत्पन्नात बांबू शेतीची ही आकडेवारी लक्षणीय म्हणावी लागेल. बांबू लागवडीचा ताळेबंद कोकणातील शेती-बागायतीएवढाच किंवा त्याहीपेक्षा अधिक फायदेशीर ठरत असल्याचे दिसते.

वृक्षांबरोबर बांबू लागवड

कोकणातील बांबू लागवडीचे वेगळेपण - अर्थात स्थानिक वृक्षांबरोबर केली जाणारी पारंपरिक बांबू लागवड. शेती अथवा अन्य बागायती पिकांच्या लागवडीसाठी ज्याप्रमाणे त्या क्षेत्रातील जुन्या झाडांची सरसकट तोड करून जमीन साफ केली जाते, तसे बांबू लागवडीसाठी केले जात नाही. बांबू लागवड करू इच्छित असलेल्या क्षेत्रातील स्थानिक मोठे वृक्ष शेतकरी राखून ठेवतात. झाडांबरोबर केलेली लागवड व मोकळ्या ठिकाणी केलेली लागवड यात मोठा फरक दिसून येतो. बांबू काठ्या झाडांच्या सावलीत सूर्यप्रकाश मिळवण्याकरता स्पर्धा करतात, परिणामी त्या अधिक उंची गाठतात. काठीची जाडीदेखील काहीशी अधिक मिळते. झाडाच्या फांद्यांचा आधार असल्याने वाऱ्या-वादळांत काठ्या कधीच वाकत नाहीत किंवा नवीन येणारे कोंब मोडत नाहीत. झाडे आपल्या सोटमुळांनी खोल जमिनीतून शोषलेली अन्नद्रव्ये सुकलेल्या पानांकरवी जमिनीवर आणतात. या कुजणाऱ्या पालापाचोळ्यातून बांबूच्या वाढीसाठी आवश्यक ती पोषक मूलद्रव्ये मिळतात. या नैसर्गिक आच्छादनामुळे उन्हाळ्यात जमीन थंड राहते. वृक्षांची सावली अतिदाट असल्यास झाड समूळ तोडण्याऐवजी पसरलेल्या फांद्या तेवढ्या छाटल्या जातात. बांबू लागवडीस किमान ५०% सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक असल्याचे शेतकरी सांगतात.

bambu_1  H x W:

कोकणातील बांबू लागवडीमध्ये आढळणाऱ्या स्थानिक जुन्या स्थानिक वृक्षांच्या यादीत प्रामुख्याने फणस, जांभूळ, चारोळी, आंबा, कोकम, वट सोल, तिसळ, असणा, अर्जुन, बेहडा, बिवळा, खैर, सातवीण, सावर, पळस, कुंभा, सुरमाड, शिवण, धामण, नाणा, बकुळ, कुसुम, बिब्बा, हरडा, ऐन, किंजळ, काजरा, जांभा अशा अनेक बहुपयोगी वृक्षांचा समावेश आहे. बांबूखेरीज या वृक्षांपासूनदेखील अधिकचे आर्थिक उत्पन्न मिळते. काही वृक्षांच्या खोडांवर चढवलेले मिरीचे वेल शेतकऱ्यांस अधिकचे आर्थिक उत्पन्न देत असल्याचे मी पाहिलेत.

याउलट, मोकळ्या ठिकाणी वाढलेल्या बांबू काठ्यांची प्रतिबेट संख्या अधिक असली, तरी उंची व जाडी कमी मिळते. त्यामुळे व्यापारी हिशेब करताना 'दोन लहान काठ्यांची एक काठी' असे गृहीत धरतात. म्हणूनच लहान लहान २० काठ्या मिळण्यापेक्षा उंच, जाड, सशक्त १० ते १२ काठ्या जास्त पैसे मिळवून देतात. झाडांबरोबर केलेल्या बांबू लागवडीतून पाचव्या वर्षीपासून प्रतिवर्षी किमान एक ते सव्वा लाख रुपये प्रतिएकर निव्वळ आर्थिक नफा मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. एकीकडे आर्थिक उन्नती साधत असताना स्थानिक जुन्या वृक्षांचे संवर्धन करीत असलेली कोकणातील बांबू शेतीची ही पारंपरिक पद्धत ‘युनिक’ म्हणवी लागेल.

bambu_1  H x W: 

लागवड तंत्र

आज लागवडीसाठी पेरापासून तयार केलेली रोपे, तसेच टिश्यू कल्चर रोपेदेखील उपलब्ध आहेत. पारंपरिक बांबू लागवड मात्र कंद पद्धतीने केली जाते. कोकणात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात कंद काढणी केली जाते. हा कालावधी मृग नक्षत्रादरम्यान असतो. खणून काढलेल्या कंदावर शेकडो तंतुमय मुळे असतात, तर कंदाच्या दोन्ही बाजूंचे मिळून सुप्तावस्थेतील सहा ते दहा डोळे असतात. याच डोळ्यांपासून नवीन कोंब जन्माला येतात.

बांबूची मुळे जमिनीत दोन फुटांपेक्षा जास्त खोल जात नसल्याने खड्डा खोलीपेक्षा रुंदीस जास्त ठेवला जातो. त्यात कुजलेले शेणखत, लेंडी खत, पालापाचोळा इ. वापरून लागवड केली जाते. बांधाने लागवड करताना दोन रोपांमध्ये ६ ते ७ फूट अंतर राखले जाते, तर सलग क्षेत्र लागवड करताना दोन रोपांतील अंतर किमान ७ फूट व दोन ओळींतील अंतर किमान १२ फूट ठेवले जाते.


कोकणात बांबूच्या ८ प्रजाती काही उपप्रजाती
जगभरातील विविध १२२ देशांत बांबूच्या एकूण १६६२ प्रजाती आढळतात. सर्वाधिक (७००) बांबू प्रजाती चीनमध्ये असून त्याखालोखाल ब्राझिल (४१०) आणि मेक्सिको (१४०) या देशांत आहेत. स्थानिक १२५, तसेच अन्य देशांतून आणल्या गेलेल्या ११ मिळून भारतात १३६ प्रजाती आहेत. देशातील पूर्वेकडील व ईशान्येकडील राज्ये, मध्य भारतातील काही भाग आणि सह्याद्री पर्वतरांगा हे भारतातील प्रमुख बांबू उत्पादक प्रदेश आहेत. सह्याद्री पर्वतरांगांत साधारण २२ प्रजाती आढळतात, तर कोकण प्रदेशात यातील ८ प्रजाती व काही उपप्रजाती आढळतात.

बांबूंना येणाऱ्या नवीन कोंबाची वाढ पूर्ण होण्यास साधारण ८० ते १०० दिवस लागतात. येथील शेतकरी बांबू लागवडीस सहसा पाणी देत नाहीत. कोकणात जून ते सप्टेंबर नैसर्गिकरित्या पाऊस असतोच. शिवाय येथील पावसाची वार्षिक सरासरी ५५०० मि.मी. असल्याने नंतर बांबूस विशेष पाण्याची आवश्यकता नसते. जूनमध्ये लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षी किमान एक ते दोन कोंब हमखास येतात. लागवडीनंतरची पहिली दोन वर्षे तण काढणी आवश्यक असते. तीन-चार वर्षांनंतर बांबू बनात निर्माण होणाऱ्या सावलीमुळे, तसेच खाली पडणाऱ्या सुकलेल्या पानांच्या दाट थरामुळे गवत वगैरे वाढत नाही. बांबूची तंतुमय मुळे बेटापासून १० ते १५ फूट अंतरापर्यंत आणि जमिनीत वरच्या ६ इंच भागात दाट जाळी तयार करत असल्याने अपोआप तणांना प्रतिबंध होतो. उन्हाळ्यात आजूबाजूला पडणारा झाडांचा व बांबूचा पालापाचोळा बांबूच्या मुळांवर ओढला जातो. पावसाळ्याच्या सुरुवातीस बांबू बेटांत शेणखत, लेंडी खत, भाताचे तूस वगैरे घालून त्यावर थोडी मातीची भर दिली जाते.

उन्हाळ्याच्या दिवसांत कोकणात आग लागण्याचे प्रमाण जास्त असते. मध्यम स्वरूपाच्या आगींमुळे बांबू मरत नाही. काठ्या बाहेरून काळ्या दिसत असल्या, तरी पावसाळ्यात त्यांना भरपूर पालवी येते आणि कोंबदेखील येतात. मोठ्या स्वरूपाच्या आगीपासून संरक्षण होण्यासाठी लागवडीभोवती जाळ रेषा काढणे आवश्यक असते.

तुरळक ठिकाणी ‘शेंडेमोड’ या किडीचा प्रादुर्भाव वगळता बांबूस कीड-रोगाचा विशेष प्रादुर्भाव दिसत नाही. मात्र वन्य प्राणी - विशेषतः वानर, रानडुक्कर, साळिंदर, गवे, सांबर, हत्तीं इ. बांबूच्या नवीन कोंबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. त्यामुळे नवीन कोंब येणाच्या कालावधीत, कोंब येण्याच्या सुरुवातीचे किमान दोन महिने (जुलै व ऑगस्ट) पीक संरक्षण करणे गरजेचे असते. शेतकरी या कालावधीत दिवसा पूर्ण वेळ लागवडीची राखण करतात. राखण करताना फटाके वाजवणे, हवेत बंदुकीच्या फैरी झाडणे, तसेच पीक संरक्षणासाठी कुत्र्यांचा वापर करणे इत्यादींमुळे वानरांपासून होणारे नुकसान ९०%पर्यंत कमी होत असल्याचे शेतकरी सांगतात. नॅफ्थेलीन गोळ्या आणि फोरेटच्या पुरचुंड्या मुळांजवळ बांधून ठेवल्यास त्या एकत्रित उग्र वासाने रानडुक्कर व साळिंदर नवीन कोंब उकरत नाहीत, असेही काही शेतकरी सांगतात. कर्नाटक, तामिळनाडू राज्यात वन्य प्राण्यांना पिकांपासून दूर ठेवण्यासाठी काही अतिउग्र वासाची रसायने उपलब्ध आहेत, त्यांचाही वापर काही शेतकऱ्यांनी यशस्वीरित्या केल्याचे कळते. बेटांत तोड झाल्यावर बांबूच्या फांद्या बेटातच मुळांवर ओढला जातात. त्यामुळे रानडुक्कर, साळिंदर थेट मुळांजवळ कोंब उकरू शकत नाहीत. वानरांकडून अर्ध्यावर मोडलेल्या कोंबांचे नुकसान झाले, तरी अशा काठ्यांचे कंद पुढल्या वर्षी लागवडीसाठी वापरता येतात.

तोडणी

किमान व्यवस्थापन केल्यास चौथ्या वर्षी पहिली तोड करता येते. पहिल्या तोडणीस बेटांतील २ व ३ वर्षे वयाच्या किमान ५ काठ्या तोडणीयोग्य मिळतात. कोवळ्या काठ्यांपासून पुढील वर्षी नवीन कोंब मिळणार असल्याने बेटातील दीड वर्ष व त्यापेक्षा कमी वयाच्या काठ्यांची तोड केली जात नाही. सहाव्या वर्षांनंतर दर वर्षी सरासरी ८ ते १२ तोडणीयोग्य काठ्या प्रतिबेट हमखास मिळतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांबू शेतकऱ्यांना काठी विक्रीसाठी विशेष त्रास घ्यावा लागत नाही. व्यापारी स्वतः शोधत शेतकऱ्याजवळ येतात. व्यवहार ठरवले जातात. व्यापारी शेतकऱ्यांना तोडणीअगोदरच - विशेषतः गणेश चतुर्थी किंवा दिवाळीसाठी निम्मे पैसे देऊन ठेवतात. नोव्हेंबर ते मे महिन्यादरम्यान सर्वाधिक व्यावसायिक तोड होते. पावसाळ्यात नवीन कोंब येण्याचा कालावधी असल्याने तोड केली जात नाही.

काठीची तोड जमिनीबरोबर केली जाते. पारंपारिक पद्धतीनुसार समुद्राच्या ओहोटीदरम्यान किंवा अमावास्येदरम्यान तोड करावी, असा प्रघात आहे. ओहोटीच्या वेळी बांबू तोडल्यास तो अधिक टिकतो, तसेच अमावास्येस बांबू तोड केल्यास त्याला लवकर भुंगा/कीड लागत नाही, असे शेतकरी सांगतात. ३ वर्षे वयाच्या काठ्या तोड झाल्यावर कित्येकदा वाहत्या पाण्यात महिनाभर ठेवून नंतर वापरल्यास त्या १० ते १५ वर्षे टिकत असल्याचे शेतकरी सांगतात. बांबूपासून विणून बनविलेली सुपे, टोपल्या, रोवळ्या, चटया वगैरे वस्तूंना दर वर्षी गाईचे शेण व गोमूत्र यांनी एकत्रित सारविले जाते. यामुळे वस्तू आणखी टिकाऊ होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
 

bambu_1  H x W: 

बांबू आधारित विकासाचे ‘रोल मॉडेल’

सन १९९०नंतर कोकणात बांबूकडे पाहण्याचा दृष्टीकोन हळूहळू बदलत होत गेला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सन २००० ते २०१० या कालावधीत शेतकरी खऱ्या अर्थाने बांबू लागवडीकडे वळले असल्याचे दिसून येते. दोन-पाच बेटांपासून सत्तर एकरपर्यंत बांबू लागवड असलेल्या बागा येथे पाहावयास मिळतात. विशेषतः जिल्ह्यातील माणगाव व आजूबाजूच्या २१ गावांना खऱ्या अर्थाने बांबूचे ‘हब’ म्हणता येईल. येथे प्रत्येक शेतकऱ्याकडे कमी-अधिक प्रमाणात बांबू आहेच. शिवाय दर वर्षी थोडी नवीन लागवडदेखील सुरू आहे. येथील सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभाग, जिल्हा परिषद - मनरेगा, जिल्हा बँक वगैरे साऱ्यांच्या सहकार्यातून लागवड वाढण्यास मदत होतेय. नवीन बांबू रोपवाटिका उभ्या राहताहेत. बांबू उद्योगास कोकण बांबू अँड केन डेव्हलपमेंट सेंटर अर्थात ‘कॉनबँक’ या संस्थेचे खूप महत्त्वाचे योगदान लाभले आहे. पारंपरिक बुरुड समाजास बरोबर घेत, त्यांना आधुनिक प्रशिक्षण देत बांबूपासून अत्यंत दर्जेदार वस्तू बनविणारी ‘चीवार’ ही संस्थादेखील शेकडो हातांना रोजगार देतेय. येत्या काळात जिल्ह्यात बांबूपासून पट्ट्या काढून प्लायवूडप्रमाणे बोर्ड बनविण्याचा एक महत्त्वाकांशी प्रकल्पदेखील सुरू होतोय. काही तरुण उद्योजक बांबूच्या कोवळ्या कोंबावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करीत आहेत. एकूणच रोपनिर्मितीपासून अगदी शेतकरी व उद्योजकांपर्यंत एक उत्तम साखळी येथे तयार झाली आहे. येत्या काळात ती आणखी मजबूत होत जाईल. बांबूच्या माध्यमातून शाश्वत आर्थिक विकासाच्या दृष्टीने मार्गक्रमण करीत असलेला कोकण आज देशासाठी ‘रोल मॉडेल’ ठरलाय, यात शंका नाही.


९१३०८३७६०२